scorecardresearch

Bamboo Farming : बांबूची शेती

तृणवर्गीय बहुवर्षीय पर्यायी पीकपद्धती म्हणून बांबू लागवडीकडे पाहण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.

दिगंबर शिंदे digambar.shinde@expressindia.com

बहुउपयोगी असल्याने दिवसेंदिवस बांबूच्या मागणीत वाढ होत चालली आहे. यामुळे आता शाश्वत उत्पन्नासाठी बांबू शेतीकडे पाहिले जात आहे. बहुवर्षीय पीक असल्याने आणि बदलत्या वातावरणाबरोबरच रोगराईचा धोकाच नसल्याने हे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे.

हिरवं सोनं म्हणून ज्याची ओळख करून दिली जात आहे, ती बांबूची. तृणवर्गीय बहुवर्षीय पर्यायी पीकपद्धती म्हणून बांबू लागवडीकडे पाहण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. बांधकाम क्षेत्रात आवश्यक असलेल्या लाकडाला पर्याय म्हणून बांबूकडे पाहिले जात असताना त्याची मागणीही वाढत चालली असून शेतीमध्ये शाश्वत उत्पन्नासाठी बांबू लागवडीकडे पाहिले जात आहे. बहुवर्षीय पीक असल्याने आणि बदलत्या वातावरणाबरोबरच रोगराईचा धोकाच नसल्याने शेतकऱ्यांनी आता बांबू लागवडीकडे वळण्याची गरज आहे. एक वेगळा प्रयोग म्हणूनही याकडे पाहिले पाहिजे.

मानवी जीवनात खाद्यान्न म्हणून ज्याचा उपयोग प्रामुख्याने केला जातो ती सर्व पिके तृणवर्गीय आहेत. ज्वारी, मका, बाजरी, गहू ही मुख्य पिके एक प्रकारे गवताचाच प्रकार आहे. याचबरोबर ऊसही गवतच म्हणून ओळखले जाते. याच पद्धतीने बांबू सुद्धा एक गवताचाच प्रकार आहे. अनादी कालापासून या बांबूचा वापर प्रामुख्याने घरासाठी केला जात आहे. झोपडी बांधण्यापासून ते आधुनिक काळातील बांबू हाउस पर्यंत याचा वापर केला जात आहे. याशिवाय घरामध्ये वापरण्यात येत असलेल्या बैठक व्यवस्थेसाठीही बांबूचा वापर केला जात आहे. तसेच बांबूच्या कोवळय़ा कोंबाचा वापर भाजीसाठी आणि लोणच्यासाठीही करण्यात येतो. बांधकाम क्षेत्रात बांबूचा वापर अमर्याद पद्धतीने केला जातो. तसेच इंधन निर्मितीबरोबरच कागद उद्योगामध्येही बांबूचा वापर होत असल्याने बाजारातील बांबूची मागणी वाढतच आहे. आजच्या घडीला बांबू उद्योगातील देशातंर्गत उलाढाल २५ हजार कोटींची आहे.

बांबू हे जलदगतीने वाढणारे काष्ठ गवत आहे. माणगा बांबू अशी याची ओळख असली तरी राज्यात चिवा, माणगा, कर्नाटकात सिमे, बिदुर गोव्यात कोंडवा तर केरळमध्ये ओविये या स्थानिक नावाने बांबूला ओळखले जाते. उष्ण दमट प्रदेशात याची वाढ चांगली होत असली, तरी नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता उपजतच असल्याने पाण्याचा निचरा होणाऱ्या काळय़ा, लाल मातीतही बांबूची उपज चांगली होते. पाणलोट, पाणस्थळ जमिनीवर, सागरी किनारपट्टीवर याची लागवड लाभदायी ठरते. शेताला नैसर्गिक सजीव कुंपण म्हणूनही याची लागवड करता येते. यामुळे पर्यावरण संतुलनालाही चांगली मदत होते. हवेतील प्राणवायूचे प्रमाण वाढण्यासाठी बांबू लागवडीची मोलाची मदत होते.

बांबूमधील माणगा ही प्रजाती काटेविरहित, सुटसुटीत काठय़ा यामुळे प्राधान्याने या जातीचा उपयोग लागवडीसाठी केला जातो. याची उंची दहा ते बारा मीटपर्यंत असते, टोकाशी सरळ, जास्त फांद्या नसलेले ताठ, मजबूत आणि भरीवपण असतो तर पेरातील अंतर पंधरा ते ३० सेंटीमीटर आणि व्यास अडीच ते सहा सेंटीमीटर असतो.

माणगा बांबूची वैशिष्टय़े

* भरीव बांबू म्हणून ओळख

* प्रबळ पेरांची रचना, नैसर्गिक घनता, टिकण्यासाठी टणकपणा

* सोलण्यासाठी सुलभ असल्याने विणकामासाठी उत्कृष्ट

* लागवड व देखभाल खर्च कमी

उपयुक्तता

१ विणकाम व हस्तकलेच्या वस्तू निर्मितीसाठी

२ कागद, लगदा उद्योग, बांधकाम उद्योगामध्ये स्लॅबच्या कामांना आधारासाठी

३ द्राक्ष, टोमॅटो, केळी, मिरचीसह वेलवर्गीय भाज्यांच्या आधारासाठी

४ पिकांसह, राहत्या घरांना सजीव कुंपण

५ प्रक्रिया केलेल्या बांबूंचा वापर हरितगृहे, उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये केला जातो.

६ नदीकाठी, ओढय़ाकाठी होत असलेली जमिनीची धूप थोपविण्यासाठी बांबू उपयुक्त ठरतो.

गृहबांधणीसाठी नैसर्गिक साधनांचा वापर वाढत चालला असून पर्यावरण पूरक म्हणून बांबूचा वापर वाढताच राहणार आहे. यामुळे बांबू लागवडीला भविष्यात चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. हे ओळखून शेतीसाठी सजीव कुंपण म्हणून बांबूची लागवड एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून याकडे पाहिले पाहिजे. आटपाडी तालुक्यात या वर्षी एक हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे.

विलास काळे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, सांगली.

लागवड व व्यवस्थापन बांबू लागवड पावसाळय़ात जून-जुलै महिन्यात किंवा सिचन सुविधा असेल तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केली तर चालते. ३ बाय ३ मीटर किंवा १० बाय १० मीटरवर लागवड केली तर खरीप व रब्बी हंगामाची पिके घेता येतात. लागवडीसाठी दोन बाय दोन फुटांचा खड्डा काढून पाच ते दहा किलो शेणखत अथवा गांडूळ खत १०० ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यांचे मिश्रण घालावे, तसेच बुरशीनाशक, वाळवी नाशकाचा वापर करून तयार रोपे लावावीत. गरजेनुसार दोन वेळा खुरपणी करावी. आठवडय़ातून एक वेळ पाणी द्यावे. बांबूची काढणी कोंब आल्यापासून तिसऱ्या वर्षांपासून करता येते, मात्र पूर्ण वाढ होण्यासाठी चार वर्षे वाट पाहावी लागते. त्यापुढे तसाच बांबू ठेवला तर ठिसूळपणा वाढण्याचा धोका असतो. चांगली देखभाल असलेल्या बेटाकडून तीनचार वर्षांनंतर सरासरी आठ ते दहा बांबू मिळतात, तर पाच ते पंधरा काठय़ा मिळतात. आजच्या बाजारभावाने प्रत्येक काठीचा दर ५० रुपयांच्या पुढे आहे. एक एकर बांबू लागवडीपासून दर वर्षी ७० ते ८० हजारांचे उत्पन्न मिळू शकते. तसेच बांबू मिशनने बारपूर इंडस्ट्रीशी केलेल्या करारानुसार बांबू खरेदीसाठी शाश्वत बाजारपेठ असून या ठिकाणी साडेतीन हजार रुपये प्रतिटन दर निश्चित करण्यात आला आहे. बहुवर्षीय पीक असल्याने उत्पन्न दरवर्षी मिळते. एकदा लागवड केली, की दर वर्षी मशागत, पेरणी, मेहनत, मजुरी यावर खर्च करावा लागत नाही. बांबू लागवड बिया, शाकीय, कंदाद्वारे, उतीसंवर्धित रोपाद्वारे केले जाते. शाकीय प्रजननसाठी कंद, खोड, फांदी याचा वापर करता येतो. सामाजिक वनीकरण विभागाकडून शाकीय पद्धतीचा प्रामुख्याने वापर रोप निर्मितीसाठी केला जातो.

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bamboo farming guide to bamboo cultivation bamboo plantation in maharashtra zws

ताज्या बातम्या