बेस्ट उपक्रमाने ९ जुलैपासून केलेली भाडेकपात ही प्रवाशांकरिता सुखद घटना ठरली. पाच किलोमीटरसाठीच्या प्रवासाचे भाडे थेट दहावरून पाच रुपयांवर आल्याने बेस्टकडे प्रवासी पुन्हा वळले. तुलनेत उत्पन्न मात्र वाढले नाही. तर मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरील भार कमी करण्यासाठी मार्चमध्ये परळ टर्मिनस प्रत्यक्षात आले. लगोलग १५ डब्यांच्या अतिरिक्त सहा फेऱ्यांचीही भर पडून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकलही दाखल झाली. यंदा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात मोठा बदल केला. नियम मोडणाऱ्या चालकांना होणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली गेली. त्यास काही राज्यांत विरोध झाला. वर्ष संपता संपता, वाहन चालकांची टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी ‘फास्टॅग’सारखी आणखी एक नवी योजना आली. ही योजना कितपत यशस्वी ठरते, हे नव्या वर्षांत कळेलच!