प्रेरणादायी, ध्येयवेडय़ा तरुणाईचा गौरव करणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाचे नवे पर्व सुरू झाले आहे. सर्जनशीलतेच्या जोरावर यशोशिखरे गाठणाऱ्या विविध क्षेत्रांतील तरुणाईला २०१७, २०१८, २०१९ आणि २०२१ या वर्षांत ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े या उपक्रमाच्या पाचव्या पर्वानिमित्त निवडक ‘तेजांकितां’चा अल्प परिचय..
‘रोबोटिक्स’चा मंत्र
समीर केळकर (उद्योग)
तरुण तेजांकित (२०२१)
समीर केळकर हे रोबोटिक्स विज्ञानातील तज्ज्ञ असून या क्षेत्रात त्यांनी अनेक प्रकल्प राबवले आहेत. तंत्रज्ञ आणि उद्योजक म्हणून काम करताना समीर केळकर वेगवेगळे प्रयोग करतात. रोबोटिक्समध्ये त्यांनी केलेले बदल हे या क्षेत्रात अनेक देशांत नावाजले गेले आहेत. त्यांनी यंत्रमानवाच्या साहाय्याने अगदी विविध प्रकारची शिल्पेही तयार केली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ऑटो उद्योगात विविध सुटे भाग जोडण्यासाठी अतिशय बारकाईने रोबोज काम करतात. त्यांनी केलेले नक्षीकामही तेवढय़ाच ताकदीचे असते, हे समीर केळकर यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे. धातू ओतकामातील त्यांची कंपनी नावाजलेली आहे. त्यांनी केलेली उत्पादने जगभर अचूकतेसाठी ओळखली जातात.
अंतराळाचा वेध
ऋता काळे (विज्ञान)
तरुण तेजांकित (२०२१)
वर्तमानपत्र आणि मासिकातून खगोलशास्त्राची आवड निर्माण झालेल्या ऋता काळे यांनी अल्पावधीतच भौतिकशास्त्रातील संशोधनात स्वत:च्या कामाचा ठसा उमटविला आहे. क्लस्टर कोअरपासून मोठय़ा आकाराच्या संरचनेपर्यंतच्या स्केलवर वैश्विक किरण आणि चुंबकीय क्षेत्रांच्या निर्मिती आणि उत्क्रांतीमागील भौतिक यंत्रणा समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रेडिओ आकाशगंगा आणि रेडिओ खगोलशास्त्राच्या तंत्रांच्या अभ्यासात ऋता यांना विशेष रुची आहे. रामन रिसर्च इन्स्टिटय़ूटमधून ‘मल्टी वेव्ह लेन्थ स्टडी ऑफ रेडिओ हॅलोस आणि क्लस्टर्स ऑफ गॅलेक्सीज’ या विषयावर पीएचडी करून एनसीआरए येथे डीएसटी इन्स्पायर फॅकल्टी म्हणून त्यांनी काम केले आहे.
गणितामुळे नवी ओळख
महेश काकडे (विज्ञान)
तरुण तेजांकित (२०२१)
महेश काकडे या तरुण संशोधकाला गणिताने एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. महेश काकडे हे ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ या बंगळूरुमधील संस्थेमध्ये गणित विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. बंगळूरुमधील ‘इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट’मधून त्यांनी पदवीधर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून २००४ ते २००८ या काळात गणित विषयात पीएचडी पूर्ण केली. नंबर थिअरी आणि अरेथमॅटिक जॉमेट्री हे महेश यांचे संशोधनाचे आणि जिव्हाळय़ाचे विषय. गणितातील क्लिष्टतेतही आनंद प्रदान करणारे १५ पेक्षा जास्त संशोधन महेश यांनी केले आहेत. या अभ्यासासाठी त्यांना संशोधनवृत्तीही मिळाल्या आहेत. गणितातील याच उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.
तंत्रस्नेही समाजसेवक
गौरव सोमवंशी (नवउद्यमी)
तरुण तेजांकित (२०२१)
कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात ‘गव्हर्मेट ऑफ छत्तीसगड’मध्ये गौरव सोमवंशी या तरुणाने काम केले. त्या वेळी तिथे काम करत असताना गौरव यांनी भारताचे पहिले ब्लॉकचेनचे प्रयोग केले. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होऊ शकतो यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना बोलावून त्यांनी प्रयोग केले. विविध ठिकाणी या तंत्रज्ञानाचे प्रयोग केल्यानंतर त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिले. या तंत्रज्ञानाचा वापर करत नाशिकमध्ये १३ ते १४ हजार शेतकरी सोबत घेऊन भव्य प्रकल्प उभारला. त्यानंतर कृषी कंपन्यांना शेतीजन्य मोडय़ुल मिळवून देण्याचे काम केले. यामध्ये फळभाज्यांवर क्यूआर कोड छापला जातो. ते छापील क्यूआर कोड स्कॅन केले तर संबंधित वस्तूंची म्हणजेच फळभाज्यांची आणि त्या कुठल्या मार्गे आल्या याची सर्व माहिती मिळते.
प्रयोगशील चित्रकार
शिशिर शिंदे (कला)
तरुण तेजांकित (२०२१) चित्रकार क्षेत्रातही अनेक वाटा आहेत, त्यापैकी पारंपरिक शैली आणि मापदंड यांना दूर सारत स्वत:ची शैली निर्माण करणारा युवा चित्रकार म्हणजे नाशिकचा शिशिर शिंदे. किशोरवयीन वयात पुण्यामध्ये काही वर्षे काढल्यानंतर तेथेच चित्रकलेत स्वत:ची वेगळी शैली निर्माण केली. समकालीन कलेतील त्यांचा मुक्तपणा त्यांच्या चित्रांना थेट युनेस्को, इस्रो तसेच दिल्लीतील महाराष्ट्र सदनापर्यंत घेऊन गेला आहे. जे. डी. आर्ट पूर्ण केल्यानंतर व्यवसाय म्हणून हेच कला क्षेत्र निवडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कलेकडे केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून न पाहता स्वच्छंदी कलानिर्मितीचा आनंद घेता आल्याचे शिंदे सांगतात.