सांगलीतील इस्लामपूरचे या शहराचे नाव ‘ईश्वरपूर’ करण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला जाणार आहे. याआधी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचे अहिल्यानगर झाले आहे. पण महाराष्ट्राला ३०० वर्षांपलीकडेसुद्धा इतिहास आहे. गावांची नावे बदलताना दख्खनचा मध्ययुगीन काळातील स्वतंत्र बाणा दर्शवणारा इतिहासही पुसला जात आहे, याचा विसर पडू नये…

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) या शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ असे करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र सरकारला सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही घोषणा नुकत्याच राज्य विधिमंडळाच्या पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात करण्यात आली. तसेच यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला ज्या निजामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो, त्या ग्रामपंचायतीचे नाव बदलून रायगडवाडी करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. गाव किंवा शहर यांचे नाव बदलण्याचा विषय हा केंद्राच्या अखत्यारीत येतो. ‘या प्रकरणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता होत असल्याने, या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्र शासनास शिफारशींसह सादर करणार आहे!’ असे मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत जाहीर केले. राज्य सरकारच्या या नाव बदलण्याच्या प्रस्तावांना केंद्र सरकार मान्यता देणारच, याबाबत दुमत नाही.

यापूर्वी अहमदनगरचे अहिल्यानगर, औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यात आले आहेच. याबाबत पहिल्यापासून त्या वेळची अविभाजित शिवसेना आणि त्यांचे संस्थापक नेतृत्व कमालीचे आग्रही होते. विशेषत: ऐंशीच्या दशकात हिंदुत्व हा राजकीय अजेंडा हाती घेतल्यानंतर, आपल्या पक्षाच्या मुखपत्रातून ते संबंधित जिल्ह्यांच्या प्रचलित नावांऐवजी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी नगर तसेच धाराशिव असा जाहीर उल्लेख करत. या नामांतरावर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय अपरिहार्यतेतून स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाग असलेल्या, तत्कालीन अविभाजित शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झालेल्या त्या वेळच्या अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मान्यतेची मोहोर उमटवली.

हे सर्व मांडण्याचे कारण…

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या भाजपच्या मातृसंस्थेने राजकीय मध्ययुगीन काळातील (विशेषत: मुघल काळातील) मुस्लीम संस्कृतीच्या प्रतीकांविरुद्ध सातत्यपूर्ण भूमिका उघडपणे घेतली आहे. यासाठी त्या वेळी अविभाजित शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका वेळोवेळी भाजपला सहाय्यभूत ठरली. हा फार अलीकडचा राजकीय इतिहास. पण तत्कालीन महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या, धर्मनिरपेक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाने तरी किमान भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील काही संदर्भ ध्यानात घ्यायला हवे होते.

आजही महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाखालील राज्य सरकार मुस्लीम संस्कृतीचे या भूमीशी (महाराष्ट्र भूमीशी) असलेले नाते पुसण्याचा प्रयत्न करत आहे, अशी शंका घेण्यास वाव आहे! राज्यात सत्ताधारी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. ‘धर्मनिरपेक्षता, फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा मानणारा आमचा पक्ष आहे!’, अशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर भूमिका आहे. वेळोवेळी पक्षनेतृत्वाने ती जाहीरही केली आहे. त्या पक्षाचे एक नेते मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत इस्लामपूरचे ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव मांडला. भुजबळ स्वत:ला महात्मा फुले यांचे वैचारिक वारसदार मानतात. महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ते स्वत: कार्यरत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा त्यांची राजकीय शाखा असलेल्या भाजपला जरी मध्ययुगीन काळातील मुस्लीम प्रतीके त्यातही मुघलांशी संबंधित इतिहासाबाबत तिटकारा असला तरी तसा तो महात्मा फुले यांना नव्हता. हे मंत्री छगन भुजबळही जाणून असणार.

‘मानव महंमद’ या शब्दात महमंद पैगंबरांचा महात्मा फुले यांनी गौरव केला. ते म्हणतात,

आर्यधर्म श्रेष्ठ भट वाखाणीतो।

जुलमी म्हणतो। मोंगलास।।

भट पाशांतून शूद्र मुक्त केले।

ईशाकडे नेले। कोणी दादा?।।

(संपादक – कीर धनंजय, मालशे स. गं, फडके य. दि, सहावी आवृत्ती २००६, महात्मा फुले समग्र वाङ्मय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

भौगोलिकदृष्ट्या भारत ही अखंड भूमी असली तरी, भारताच्या आतापर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात, उत्तर विरुद्ध दक्षिण हे दोन ध्रुव कायम राहिले आहेत. प्रबळ केंद्रीय सत्तेविरुद्ध संघर्ष किंवा केंद्रीय सत्ता दुर्बल झाल्यास दक्षिणेकडील राज्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करणे आणि टिकवणे हा भारताचा राजकीय इतिहास आहे. उत्तरेकडील प्रबळ मौर्य साम्राज्यास दक्षिणेकडील चोळ राज्यांनी दक्षिणेत पाय रोवू न देणे किंवा मौर्यांच्या उतरत्या काळात सातवाहनांनी दक्षिणेत स्वतंत्र प्रबळ राज्य निर्माण करणे.

उजव्या विचारसरणीस अडसर आहे, तो मध्ययुगीन कालखंडाचा! मुघलांच्या अगोदर, गुलाम (१३ वे शतक), तुघलक (१४ वे शतक) आणि लोधी (१५ वे शतक) यांची उत्तर भारतात सत्ता होती. यातील तुघलकांनी भारताच्या दक्षिणेकडील बराचसा भाग आधिपत्याखाली आणला! तो दख्खन म्हणून ओळखला जाऊ लागला! मोहम्मद बिन तुघलकने त्याच्या कालखंडात, काही काळ राजधानी दिल्ली येथून हलवून महाराष्ट्रातील दौलताबाद (देवगिरी) येथे वसवली होती.

यानंतर साधारण ३०० वर्षांपूर्वी मुघलांची सत्ता उत्तर भारतात स्थिरस्थावर होत असताना, दख्खनेतील बहामनी साम्राज्य लयाला जात असताना त्याच्या विघटनातून निर्माण झालेल्या बिजापूरच्या आदिलशाहीने, अहमदनगरच्या निजामशाहीने, गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीने उत्तरेतील मुघल सत्तेच्या विरोधात संघर्ष कायम ठेवला! एक धर्म-संस्कृती (इस्लाम) असतानाही त्यांनी मुघलांचे अंकित होणे नाकारले! हे दख्खनचे भारताच्या उत्तरेकडील बाजूविरुद्ध उघड बंड होते!

दख्खनेतील मुस्लीम सत्तांची सुरुवात ही दख्खनी मुसलमान विरुद्ध उत्तरेकडील (आणि अफाकी मुसलमान) मुसलमान अशा वादातून होते. अलाउद्दीन खिलजीच्या नंतर मोहम्मद तुघलक दक्षिणेत आला. इसवी सन १३२७ मध्ये दौलताबादला राजधानी स्थापन करून त्याने राज्यकारभारात गती आणण्याचा आणि राज्याला सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न केला. पण दख्खनेविषयीचा तिटकारा आणि उत्तरेकडील केंद्रीय सत्तेच्या अहंकाराने तो दख्खनेत स्थिरावू शकला नाही. त्याच्या उत्तरेप्रतिच्या कर्मठतेविषयी रिचर्ड इटन यांनी माहिती दिली आहे : ‘चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला दख्खनेचा प्रदेश थेट दिल्ली सल्तनतीशी जोडला गेला. तोपर्यंत दिल्लीचे शासक भारतीयत्वाच्या रंगात असे रंगले होते की, ते स्वत:ला इस्लाम आणि मुसलमान नव्हे तर उत्तर भारतीय संस्कृतीच्या संरक्षकाच्या रूपात पाहत होते. ही प्रवृत्ती मोहम्मद बिन तुघलकामध्ये पाहता येईल, ज्याने दक्षिणेचे पाणी पिण्यासदेखील नकार दिला होता. त्याऐवजी तो गंगा नदीचे पाणी खांद्यावर वाहून दौलताबादपर्यंत मागवत होता.’

मोहम्मद तुघलकाने दौलताबादला राजधानी वसवताना, आपल्यासोबत दिल्लीहून अनेक विद्वान, कवी, इतिहासकार आणले होते. तो दख्खनेतून निराश होऊन दिल्लीला परतला. पण हे विद्वान, कवी आणि सूफी येथेच राहिले. ते जी भाषा बोलत होते, ती भोजपुरी, ब्रज आणि पंजाबीतील शब्द घेऊन व्यवहारात रुजलेली भाषा होती. अमीर खुसरोंनी त्या भाषेला हिंदवी असे नाव दिले होते. कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांनी हाच ‘हिंदवी’ शब्द स्वराज्यासाठी वापरला. या ‘हिंदवी’ भाषेला दख्खनचे रंगरूप मिळाले. मराठी, कानडी, तेलुगूतील अनेक शब्द त्यात सामाविष्ट झाले. तिला दख्खनी हेल मिळाला आणि हीच दख्खनी भाषा झाली. संत तुकाराम यांनीसुद्धा दख्खनी भाषेत रचना केल्या आहेत. रामदास स्वामी यांच्याही दख्खनी- उर्दू भाषेतील रचना आहेत. अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या ‘मुसलमान मराठी संतकवी’ या संशोधनावर आधारित पुस्तकातून दख्खनी प्रदेशात सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन दोन्ही संस्कृतींचा समन्वय कसा झाला होता, हे लक्षात येते.

बिजापूरला युसुफ शाहने आदिलशाह हा किताब घेऊन आदिलशाही स्थापन केली. त्यानंतर अहमद निजामशाहने निजामशाहीची स्थापना केली. सर्वांत प्रभावशाली सरदार म्हणून मलिक अंबरचा (१६ वे शतक आणि १७ व्या शतकाचा पूर्वार्ध) उल्लेख येतो. अहमदनगर ही मलिक अंबरची कर्मभूमी होती. गुलाम म्हणून भारतात आलेल्या मलिक अंबरला इथे स्वातंत्र्य मिळाले. याच राजकारणाचा आधार घेऊन मलिक अंबरने जहांगीरच्या उत्तर भारतीय फौजेला दक्षिणी सैन्याच्या गनिमी तंत्राचा वापर करून अस्मान दाखवले. गनिमी काव्याचा जनक मलिक अंबर आहे. मलिक अंबरच्या काळात हजारोंच्या संख्येने आफ्रिकन हबशी दख्खनेत आले होते. त्यांचे आणि मराठ्यांचे एकमुखी नेतृत्व त्या काळात मलिक अंबरने केले.

हिंदू निम्नवर्णीय मराठे आणि गुलामी लादलेले हबशी हे ज्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्याची पायाभरणी मलिक अंबरने केलेली होती. मराठ्यांनी परधर्मीय अभिजनांच्या विरोधात लढलेला हा पहिला लढा होता आणि विशेष म्हणजे त्याचे नेतृत्वही परधर्मीय गुलामांच्या नेत्याकडे (मलिक अंबर) होते. त्यांनी ज्या गुलामांच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला त्या नेत्यानेही आणलेली व्यवस्था सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्मिलेली होती. ‘त्यामुळेच मलिक अंबर पुढे कित्येक वर्षांनी स्थापन झालेल्या मराठ्यांच्या स्वराज्यालादेखील पार्श्वभूमी देऊन गेला!’ असे शरद पाटील म्हणतात. त्यासाठी मलिक अंबरच्या सामान्य शेतकरीकेंद्री धारा पद्धतीचा ते संदर्भ देतात. ‘जमीनधारा’ पद्धतीशिवाय मलिक अंबरने ‘खडकी’ हे शहर वसवले ज्याला आज छत्रापती संभाजीनगर (औरंगाबाद) म्हणून ओळखले जाते. अहमदनगरला ज्या पद्धतीने दख्खनी राजकारणाची, विद्वत्तेची, ज्ञानसंस्कृतीची परंपरा आहे, तशीच सुफींचीदेखील आहे.

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे गुरू म्हणून ओळखले जाणारे शाह शरीफ हेदेखील अहमदनगरचेच होते. त्यांच्या नावावरून शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी आणि काकाचे नाव शरीफजी ठेवले होते, असा काही इतिहासकारांचा दावा आहे! मोहम्मद तुघलकाने दख्खनी मुसलमानांच्या द्वेषातून अनेक निर्णय घेतले. मुघल साम्राज्यातील मुराद, जहांगीर, शहाजहानने या दख्खनी मुसलमानांना चिरडण्यासाठी बरीच उठाठेव केली.

शेवटी औरंगजेबाने इथल्या दख्खनी संस्कृतीवर आघात करत सर्व दख्खनी मुस्लीम शाह्या संपवल्या. दख्खनी विद्वानांना पळवून लावले. त्यांचे विद्यापीठ पाडले. बिजापुरातील दख्खनी साहित्याचे ग्रंथ नष्ट केले. दख्खनेत हबशी मुसलमान मोठ्या संख्येत होते. त्यावरून दख्खनेतील मुसलमानांचा उल्लेख मध्ययुगात ‘काळे मुसलमान’ करून त्यांच्या संस्कृतीचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न अनेक उत्तर भारतीय मुस्लीम राज्यकर्त्यांनी (मुघल) केला.

हा अंतर्विरोध समजून घेतला पाहिजे. एक धर्म (इस्लाम) असतानासुद्धा, दख्खनच्या या सर्व शाह्या मुघलांच्या विरोधात उभ्या राहिल्या! भौगोलिकदृष्ट्या आज आपण ज्याला दख्खनचे पठार म्हणतो, त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण वगैरे राज्ये येतात. मध्ययुगीन काळात निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही या शाह्या येथेच स्थिरस्थावर झाल्या आणि इथल्याच मातीत मिसळून गेल्या! पण त्यांनी एका मोठ्या सांस्कृतिक वारशात भर घातली.

थोडं विषयांतर वाटेल पण एक उदाहरण देतो. एसटी सेवेतील विविध प्रकारच्या बस सेवांचे ‘हिरकणी’, ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’ वगैरे नामकरण करण्यात आले. ही सर्व नावे शिवकालीन इतिहासाशी (१७ वे शतक) संबंधित आहेत. यापूर्वी मुंबई महानगरातील प्रमुख रेल्वे स्थानक, विमानतळ, वस्तुसंग्रहालय यांची नावे बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाविषयी सर्वांना आदरच आहे. पण महाराष्ट्राला ३०० वर्षांपलीकडेसुद्धा इतिहास आहे, याचा विसर पडता कामा नये. सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांनीसुद्धा आपल्या परीने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात आणि वारशात भर घातली आहे. असो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता काळ बदलला आहे. लोकशाही राज्यात तरी दख्खनेतील या काळ्या मुसलमानांच्या (असे उत्तरेकडील मुसलमान राज्यकर्त्यांकडून हिणवल्या गेलेल्या) संस्कृतीचा वारसा जपायला हवा होता. पण तो लोकशाहीतही संपवला जातोय, हे दुर्दैवी आहे. गाव, शहर, जिल्हा यांची इस्लामी परंपरेशी नाते सांगणारी नावे बदलताना, एक सांस्कृतिक वारसा तसेच दख्खनचा मध्ययुगीन काळातील स्वतंत्र बाणा दर्शवणारा इतिहासही पुसला जात आहे! सामान्य मुसलमानांचे या भूमीशी असलेले सांस्कृतिक नातेबंधही तोडले जात आहेत.
padmakarkgs@gmail.com