scorecardresearch

चावडी : हूल, अफवा, कुजबुज की सत्यता?

अशोकराव चव्हाण हे भाजापमध्ये जाणार ही वार्ता कानोकानी पसरत समाजमाध्यमांमध्ये घुसली.

चावडी : हूल, अफवा, कुजबुज की सत्यता?
अशोक चव्हाण (संग्रहित छायाचित्र)

हूल उठवणे, अफवा- कुजबुज पसरविणे हे सारे राजकारणाचा अंगभूत भाग हे मान्यच. भाजपकाळात या राजकीय प्रक्रियेला प्रतिष्ठाही मिळालेली. पण या प्रक्रियेचं ‘बांधकाम’ हळूहळू पक्कं होत असतं. आता अशोकराव चव्हाण हे भाजापमध्ये जाणार ही वार्ता कानोकानी पसरत समाजमाध्यमांमध्ये घुसली. त्यावर मग प्रश्न विचारले जाऊ लागले. मग अशोकरावांनी, ‘कोण चर्चा करतंय?’ अशी विचारणा केली. ‘असा काही निर्णय मी घेतला नाही’, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. पण ते भाजपमध्ये जाणार नाहीत, यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी मग संशय वाढवत नेला. अशोकरावांचे स्वागत असेल असंही स्पष्ट केलं. आता नवी चर्चा सुरू आहे, आता अशोकरावांचं भाजपमध्ये जाणं म्हणे, बांधकाम खात्यामुळे अडकलं आहे. त्यांनी काँग्रेस सोडली तर त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा बांधकाम खातंच हवं आहे, अशी हूल आता उठली आहे. विधिमंडळात मतदानाच्या वेळी उशिरा पोहोलेल्या अशोकरावांविषयीची कुजबुज आणि त्यावरचे खुलासे असा नवा खेळ काँग्रेस दरबारी रंगला आहे. आता हूल, अफवा, कुजबुज की सतत्या हे मात्र कोडेच आहे.

देवाक पन सोडला नाय!

कोकणात गौरी गणपतीचा सण घरोघरी मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. त्यातच गेली दोन वर्षे करोनामुळे घातले गेलेले निर्बंध यंदा नसल्याने बाप्पाच्या स्वागतासाठी उत्साहाने  लगबग सुरू झाली आहे. अर्थात कोकणातल्या या राष्ट्रीयह्ण सणावर यंदा महागाईचं सावट आहे. त्यातच आता गणपतीच्या मूर्तीसाठी लागणाऱ्या रंगावर सरकारने सेवा व वस्तू कर (जीएसटी) लावला असल्याने गणेश मूर्ती महागणार आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार प्रत्येक सुमारे दोन फुटांपर्यंत उंचीच्या मूर्तीची किंमत २००-३०० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भक्तांच्या खिशाला आणखी चाट बसणार आहे. येत्या ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे गणेश चित्रशाळांमध्ये मूर्ती घडवण्याचं काम सध्या अहोरात्र चालू आहे. कोकणात स्वत:च्या घरचा पाट मूर्तिकाराकडे देऊन मागणी नोंदवण्याची पद्धत आहे. त्यानुसार  नागपंचमी साजरी झाल्यावर गणेशभक्त चित्रशाळेत पाट घेऊन गेले तेव्हा त्यांना मूर्तिकारांनी या किंमतवाढीची कल्पना दिली. ते ऐकताच देवाक पन सोडला नाय हाह्ण अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया गणेशभक्तांच्या तोंडून बाहेर पडली.

सहनही होत नाही..

राज्यात सत्ताबदल होऊन दीड महिना होत आला. मात्र मंत्रिमंडळच अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय पातळीवर सगळा गोंधळच दिसतोय. महापालिकेत महापौर राष्ट्रवादीचे, उपमहापौर काँग्रेसचे आणि सभागृहात संख्याबळाने सर्वाधिक असलेल्या भाजपकडे तिजोरी म्हणजे स्थायी समिती. अशा स्थितीत प्रशासनाची मनमानी होणार हे सांगायला ज्योतिषाची गरजच पडत नाही. असा प्रशासकीय पातळीवर गोंधळ असताना ठेकेदारांची अवस्था मात्र सांगताही येईना, सहनही होईना अशी झाली आहे. महापालिका ताब्यात आल्यावर महाविकास आघाडीकडून निधीही मिळाला. विकासकामासाठी ३५ कोटी आले, त्याची वाटणीही झाली. प्रत्येकाने ठेकेदारही ठरवले, आणि बदल्यात टोल वसुलीपोटी काही ‘प्रसाद’ही पदरी पडला. आता दुसरा हप्ता घ्यायच्या वेळीच सरकार कोसळले. ठेकेदारांचे लाखो रुपये अडकल्याने अस्वस्थता वाढली आहे. सरकार कोणाचेही असू दे, स्थगितीचे ग्रहण सुटू दे असे म्हणायची वेळ ठेकेदारांवर आली आहे.

तुमचं आमचं जमलं तर

सत्ता बदलली की राजकीय नातेसंबंधातील बदल अपरिहार्य ठरतो. याचा प्रत्यय इचलकरंजी येथे राष्ट्रीय विणकर दिनानिमित्त माजी वस्त्रोद्योगमंत्र्याबाबत दिसून आला. मावळत्या मंत्रिमंडळात राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा समावेश होता. तर भाजपला पाठिंबा दिलेले प्रकाश आवाडे विरोधी गोटात होते. स्वाभाविकच वस्त्र उद्योगाचे विविध प्रश्न, वस्त्र उद्योगाची सवलत यावरून दोघांमध्ये खटके उडत असत. वीज सवलतीचा प्रश्न कोणी सोडवायचा यावरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत चुरस लागलेली असायची. श्रेयवादात प्रश्न रेंगाळला. आता चित्र बदलले आहे. प्रकाश आवाडे व राजेंद्र पाटील हे दोघेही शिंदे -फडणवीस सरकारमधील सहप्रवासी बनले आहेत. दोघांनाही मंत्रीपदाचे वेध आहे. उभयतांनी त्यासाठी परस्परांना शुभेच्छा दिल्या. शिवाय, आता हातात हात घालून वस्त्रोद्योगाचे प्रश्न सोडवूया असे आश्वासित करत उभयतांनी दुरावलेले मार्ग दूर करून समांतर मार्गाने जाण्याची भूमिका घेतली. राज्यकर्त्यांचा हा सोयीचा तुमचं आमचं जमलंह्णचा प्रकार विणकारांना मात्र दिलासा देऊन गेला.

(सहभाग :  सुहास सरदेशमुख, अभिमन्यू लोंढे,  दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे)

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या