गावोगावच्या रंजक किश्शांचे साप्ताहिक सदर विधिमंडळात कितीही चांगली भाषणे केली तरी प्रसिद्धी मिळेल याची आमदारांना खात्री नसते. पण सभागृहात गोंधळात सहभागी झाल्यास हमखास नाव येते आणि मतदारसंघात चर्चा होते ही आमदारांची झालेली भावना. मग आमदार मंडळी प्रसिद्धीत येण्यासाठी वेगेवेगळय़ा युक्त्या करू लागले. गेल्याच आठवडय़ात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी गोंधळ झाला आणि अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल तावातावाने निघून गेले. सत्ताधाऱ्यांकडून मग घोषणा सुरू झाल्या. ‘या राज्यपालांचे करायचे काय, खाली डोके वर पाय’ ही घोषणा नेहमीची. आमदार घोषणा देत असताना राष्ट्रवादीचे बीडमधील विधान परिषद आमदार संजय दौंड यांनी पायऱ्यांवर शीर्षांसन घालून खाली डोके वर पाय हे प्रत्यक्षात आणले. या कृतीमुळे दौंड यांचे नाव साऱ्यांना समजले. काही वर्षांपूर्वी नागपूर अधिवेशनात पायऱ्यांवर भाजपचे तत्कालीन आमदार सुधाकर भालेराव हे पोतराजच्या वेषात आले होते. तेव्हा माध्यमांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते. तेव्हापासून भालेराव हे नाव परिचित झाले. प्रसिद्धी कशी मिळते याचा धडा भालेराव किंवा दौंड यांच्यापासून आमदारांना बहुधा घ्यावा लागेल. मंत्र्यांनाच प्रश्न डिजिटलची दुनिया भारी. बघा काँग्रेसचा कुणी बी असू त्याचं नाव डिजटल नोंदलं की तिकिट मिळणारंय. पण ही डिजिटल चर्चा दिल्ली दरबारी मोठी अन् गावाकडं अजूक त्याचं वारंच नाय. झालं असं का, परवा मंत्री अमितराव देशमुख गेले औरंगाबादला. तिथं डिजिटल सदस्य कोनकोन झालेत असं त्यांना विचारलं म्हणे. ते मुत्तेमवार साहेबाचं कोण तर आहे का, विशाल का नाव आहे त्यांच हो. त्यांनी आकडे सांगितले सभेत. त्या आकडय़ानं लाच आणली राव चारचौघात. मग आता सावरून घ्यायचं म्हणून भैय्यानं लई जोरदार भाषण केलं. डिजिटल गरजेचंच असं सांगितलं एकमत साहेबाच्या (विलासराव देशमुख )शैलीत. पण बोलता बोलता खरं बाहेर पडलं. भैय्या काय म्हटले माहितंय का ? - आता मला पण तपासावं लागेल. मी डिजिटल सदस्य आहे का. तिथं सगळे म्हनुलाल्ते डिजिटल सदस्य असेल तरच तिकीट आहेत म्हणे. पण भैय्या म्हनले, ‘काँग्रेस अखिल भारतीय पक्ष आहे. उमेदवारीला खूप निकष असतात. आता डिजिटल सदस्यता गरजेची असेल तर ती करूच पण तेवढय़ावर काही सगळं नसतं.’ गडय़ा, आपुला गाव बरा मारवाडी संमेलनाची जालना जिल्हा शाखा आणि स्थानिक पातळीवरील नागरी सत्कार समितीच्या वतीने पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. िहमतराव बावस्कर यांच्यासह इतरांचा सत्कार सोहळा जालना शहरात आयोजित करण्यात आला होता. दोन केंद्रीय राज्यमंत्री तसेच अन्य लोकप्रतिनिधी आणि व्यापारी- उद्योजकांच्या उपस्थितीत झालेल्या या सत्कार सोहळय़ात इतरांचीच भाषणे एवढी लांबली की, प्रमुख सत्कारमूर्ती डॉ. बावस्कर यांना उत्तरादाखल मनोगत व्यक्त करण्यासही वेळ मिळाला नाही. परंतु दुसऱ्याच दिवशी जालना जिल्ह्यातील देहेड या मूळ गावी झालेल्या सत्काराच्या निमित्ताने डॉ. बावस्कर यांनी सुखावणारा अनुभव आला. आपल्या गावात जन्म झालेल्या व्यक्तीस पद्मश्री पुरस्कार मिळाला म्हणून संपूर्ण देहेड गावात अपूर्व उत्साह होता. डॉ. बावस्कर येणार म्हणून घरांसमोर रांगोळय़ा काढण्यात आल्या होत्या. लेझिम आणि बैलगाडीमधून सपत्नीक मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ते म्हणाले की, मूळ गावात झालेला सत्कार आणि बैलगाडीतून काढलेली मिरवणूक स्वर्गसुखापेक्षा अधिक आनंद देणारी आहे. मिरवणुकीच्या वेळचा ग्रामस्थांचा उत्साह आणि दुतर्फा करण्यात आलेल्या पुष्पवृष्टीमुळे डॉ. बावस्कर अक्षरश: भारावून गेले होते. देहेड गावात शेती करणारे त्यांचे बंधू भगवानराव बावस्कर यांनी जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. आदल्या दिवशी जालना शहरातील सत्काराचा अनुभव पाहता गावातील सत्काराच्या प्रेमामुळे ‘गडय़ा आपुला गाव बरा’ असेच म्हणण्याची वेळ डॉ. बावस्कर यांच्यावर आली . प्रणिती शिंदे यांची गुगली सोलापुरात मागील पाच-सात वर्षांत भाजपचे वर्चस्व वाढले असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आपले मित्र पक्ष काँग्रेस व शिवसेनेतील नेते फोडून स्वत:ची ताकद वाढविण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. विशेषत: काँग्रेसमधून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या निकटच्या सहका-यांना घडय़ाळ बांधण्याचे सत्र आरंभले गेल्याने शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही राष्ट्रवादीत वाद निर्माण करण्याची नीती आखली आहे. काँग्रेस, शिवसेना असा प्रवास केलेले महेश कोठे आता कुठे राष्ट्रवादीत स्थिरावले. तेथे तरी आमदारकीचे घोडे न्हाऊन निघेल ही त्यांची इच्छा. पण प्रणिती शिंदे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना आमदारकीच्या शुभेच्छा दिल्याने कोठे अस्वस्थ होणे स्वाभाविकच. प्रणितीताईंच्या या गुगलीने पालकमंत्री दत्तामामा भारणे यांची पंचाईत झाली. मग त्यांना सारवासारव करावी लागली. (सहभाग - सुहास सरदेशमुख, एजाज हुसेन मुजावर, संतोष प्रधान, लक्ष्मण राऊत)