प्रदीप नणंदकर pradeepnanandkar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विषमुक्त शेती किंवा शेतातील रासायनिक खतांच्या वापरातील धोक्यांबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या प्रकारच्या शेतीमध्ये जमीन, खते आणि बियाण्यांची भूमिका महत्त्वाची असते. या त्रिसूत्रीतील बियाण्यांमध्ये त्याच्या देशी वाणाच्या जतनाचा वापर महत्त्वाचा असतो. हाच वापर पुन्हा सुरू करण्यासाठी उस्मानाबादच्या धनाजी धोतरकर यांनी देशी वाण संकलन आणि वापराची एक चळवळ रुजवली आहे. याच उपक्रमाविषयी..

विषमुक्त शेती किंवा शेतातील रासायनिक खतांच्या वापरातील धोक्यांबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या प्रकारच्या शेतीमध्ये जमीन, खते आणि बियाण्यांची भूमिका महत्त्वाची असते. या त्रिसूत्रीतील बियाण्यांमध्ये त्याच्या देशी वाणाच्या जतनाची परंपरा आपल्याकडे पूर्वापार सुरू होती. मात्र काही दशकांपासून प्रयोगशाळेत तयार केलेल्या, कंपन्यांनी विकसित केलेल्या अधिक उत्पादन देणाऱ्या बियाण्यांची चलती सुरू झाली आणि पारंपरिक देशी वाण वापरण्याची परंपरा खंडित झाली. सेंद्रिय शेती किंवा विषमुक्त शेतीत या देशी वाणांच्या बियाण्यांचा वापर पुन्हा सुरू करण्यासाठी उस्मानाबादच्या धनाजी धोतरकर यांनी देशी वाण संकलन आणि वापराची एक चळवळ रुजवली आहे.

आपापल्या परीने अनेक मंडळी आपले ध्येय निश्चित करून समाजासाठी योगदान देत असतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील आरळी बुद्रुक या छोटय़ाशा गावात राहणारे व केवळ दहा एकर शेती असणारे धनाजी धोतरकर हे गेल्या १७ वर्षांपासून देशी बियाणांचे संकलन व संवर्धन करत आहेत. या कामातून धनाजी हे वेगळय़ा अर्थाने आपले नाव सार्थ करत आहेत. धनाजींचे शिक्षण हे केवळ बारावीपर्यंत झाले आहे. २००० सालापूर्वी ‘१६ एमएम’च्या पडद्यावर जत्रा, उरुस अशा निमित्ताने चित्रपट दाखवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. त्यामुळे विविध गावात त्यांचे जाणे होते व वेगवेगळे अनुभव ते घेत असत. घरात सर्वजण शेती करणारे व वडील हे पारंपरिक शेती करणारे. त्यांच्या वडिलांनी शेतामध्ये कधीही रासायनिक खताचा वापर केल्याचे त्यांना आठवत नाही. लहानपणापासूनच घरची शेती असल्याने शेतात विविध कारणांमुळे त्यांना जावे लागे. वेगवेगळे वाण शेतात दिसत असत पण या वाणाचे संवर्धन व्हायला पाहिजे अशी एक त्यांच्या मनात सुप्त इच्छा होती. जेव्हा घरोघरी टीव्ही आला आणि जत्रा-यात्रांमधून चित्रपट बघण्याचे प्रमाण कमी झाल्यावर त्यांनी आपला व्यवसाय बंद केला.

वेगळं काहीतरी करावं या भावनेने त्यांनी गावांमध्ये लोकप्रबोधन संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून छोटे-मोठे उपक्रम करण्यास त्यांनी सुरुवात केली. याच दरम्यान लातूर येथील ‘अफार्म’ या संस्थेमध्ये सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी ते गेले आणि त्या प्रशिक्षणात अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन मिळाले. अनेकांनी विषमुक्त शेती ही आगामी काळात केली पाहिजे यावर भर दिला तो विषय त्यांच्या डोक्यात होता.

शेतीमध्ये रासायनिक खताचा भडीमार मोठय़ा प्रमाणावर केला जातो. उत्पन्न अधिक मिळावे यासाठी जमिनीची गरज न बघता रासायनिक खताचा वापर केला जातो आणि त्यातून अनेक समस्या निर्माण होतात हे ते अनुभवत होते. आपल्यासारखी इतरांनीही सेंद्रिय शेती करावी, असा ते आग्रह धरू लागले मात्र ऐकतं कोण. त्यानंतर जे आपल्या चर्चेला चांगला प्रतिसाद देतात अशा लोकांशी ते गप्पा मारायला लागले. प्रारंभी गाईचे संगोपन केले पाहिजे, रासायनिक खताऐवजी जीवामृताचा वापर केला पाहिजे, गोमूत्राचा वापर केला पाहिजे, गांडुळखत, दशपर्णी, पंचामृत याचा वापर हा लाभदायक ठरेल असे सांगण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काहीजण सोबत आले आणि त्यातून हळूहळू माहोल बनत जायला लागला.

घरच्या शेतीत सेंद्रिय शेती करण्याची प्रथा होती तीच प्रथा पुढे चालवायची असा त्यांनी मनोमन निश्चय केला होता. त्यानंतर त्यांच्या हे लक्षात आले की शेतीमध्ये रासायनिक खताच्या बरोबरच संकरीत बियाणे अधिक वापरले जाते आणि ठरावीक बियाणेच शेतामध्ये पेरले जाते. पूर्वीचे हुलगे, करडी, अंबाडी,मूग, उडीद, मटकी, नाचणी, गहू, हरभरा, बाजरी, पिवळी, साळी, कुचकुचीचा हुरडा, शेपू, पालक, वांगी अशा वेगवेगळय़ा जाती आपण जतन केल्या पाहिजेत याची तीव्रता त्यांना जाणवायला लागली.

रासायनिक खताचे प्रमाण वाढत असल्यामुळे शेतीत तन वाढते व ‘तन खाई धन’ अशी स्थिती निर्माण होते. जर सेंद्रिय शेती केली व मिश्र पिके घेतली तर ‘तन देई धन’ असा बदल घडू शकतो हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी असे देशी वाण जमवण्याचा निग्रह केला.

हळूहळू त्यांच्याकडे तब्बल सव्वाशेपेक्षा अधिक देशी वाण जमलेले आहेत. हे वाण आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ते पेरण्यासाठी देतात. प्रारंभी त्यांनी मोफत देऊन नंतर बियाणे घेऊ असे ठरवले मात्र मोफत दिले जात असल्यामुळे त्याचे महत्त्व लोकांना वाटत नव्हते. त्यानंतर ते विकत एक किलो धान्य एका शेतकऱ्याला देतात आणि त्यांनी जर परत दोन किलो दिले तर दुसऱ्या किलोचे पैसे मी देऊन ते खरेदी करेन असे सांगतात. दिलेले वाण पुन्हा गोळा करण्यासाठी पंचक्रोशीमध्ये ते फिरतात. आपल्याकडे असणारे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी ते विविध गावांमध्ये जाऊन आपला अनुभव लोकांना सांगतात. ते म्हणाले, की मी सेंद्रिय शेती करत असल्यामुळे माझ्या जमिनीचा पोत सुधारला आणि मला मिळणारे उत्पन्न हे नेहमीपेक्षा तिपटीने मिळायला लागले. कारण भांडवली खर्च कमी झाला, खताचा खर्च कमी झाला, खुरपणीचाही खर्च कमी व्हायला लागला. मिश्र पिके घेत असल्यामुळे एकाच वेळी काढणीचा हंगाम येत नाही त्यामुळे कमी श्रमात काम व्हायला लागले आणि ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्य शेतात काम करतात त्यांना भाजीपाला मिळायला लागला. वेगवेगळे वाण खायला मिळाले त्यामुळे आजाराचे प्रमाण कमी झाले आणि एकूणच त्यांचा लाभ व्हायला लागला.

देशीवाणाचे संगोपन करत त्यांनी आता स्वत: त्यांच्या शेतात दहा गावरान गाई, त्याची दहा वासरे, चार बैल याचे संगोपन केले आहे. पूर्णपणे कीटकनाशकाचा वापर बंद केलेला आहे, रासायनिक खत अथवा रासायनिक कीटकनाशके यांचा वापर अपरिहार्य आहे असा जो लोकांचा समज झालेला आहे तो समज हा चुकीचा असल्याचे धोतरकर सांगतात. त्यांच्या कामाची दखल घेत परिसरातील विविध सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कारही दिलेले आहेत. त्यांची शेती पाहण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी दिपाली मुधोळकर यांनी भेट दिली आहे. कृषी विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी धोतरकरांच्या शेतीला भेट देऊन त्यांना शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी विविध ठिकाणी निमंत्रित केलेले आहे. धोतरकर यांचे बियाणे संग्रहाचे काम निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अन्य ठिकाणीही अशा कामाची पुनरावृत्ती होण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conservation of indigenous seeds by dhanaji dhotarkar zws
First published on: 11-01-2022 at 01:28 IST