दिल्लीवाला
संसदेत शुक्रवारी दुपारपासून चर्चा फक्त कनिका कपूर नावाच्या गायिकेची होती. गेल्या आठवडय़ात नागरिकांना प्रवेश बंद केल्यापासून संसदेच्या आवारात गर्दी तुरळक असते. खासदारही कारमधून येतात, सभागृहात थोडा वेळ बसतात आणि निघून जातात. कार्यक्रमसूचीतील विषयानुसार ज्यांना सभागृहात बोलायचं असतं तेवढेच सदस्य असतात. खासदारांची उपस्थिती होळीनंतर तशीही कमीच झालेली आहे. कनिकामुळं ती आता आणखी कमी होईल. मध्य प्रदेशमधलं राजकीय सत्ताकारणही संपलेलं असल्यानं पुढील आठवडय़ात संसदेचं अधिवेशन थांबवलं जातंय की नाही, हे पाहायचं. खरं तर केंद्र सरकारनं वित्त विधेयक अडवून धरल्यानं संसद चालवावी लागतेय. रविवारच्या जनता संचारबंदीमुळं संसद सदस्यांना दिल्लीत पोहोचायला वेळ लागेल. म्हणून लोकसभाध्यक्षांनी संसदेचं कामकाज दुपारी २ ते रात्री ९ ठेवलेलं आहे. सध्या महत्त्वाचे विषय चर्चेला येताहेत असंही नाही. शून्य प्रहर चालवला जातोय. त्यात सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील विषय मांडण्याची संधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देतात. दिल्ली दंगलीच्या चर्चेच्या आधी सभागृहांमध्ये जाणवणारा तणावही या आठवडय़ात नव्हता. त्यामुळं बिर्ला सभागृहात पुन्हा नियमित येऊ लागले आहेत आणि त्यांचा मूडही ठीक दिसला. करोनाबद्दल सगळेच सतर्क आहेत, बिर्लाही आहेत. शुक्रवारीच त्यांनी संसदेत सगळीकडं फिरून पाहणी केली. तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील मोकळ्या जागेत पत्रकारही उभे राहत नाहीत. तिथल्या एका खोलीत वेगवेगळ्या स्थायी समितींच्या बैठका होतात. त्यामुळं किमान दहा-पंधरा सरकारी अधिकारी, सदस्यांचे स्वीय सचिव गोळा होतात. अन्यथा उर्वरित संसदेत गर्दी तुरळकच. सुट्टी असल्यानं शनिवार-रविवार या दोन दिवसांत संपूर्ण संसदेचं र्निजतुकीकरण केलं जाणार आहे. आपापल्या परीने संसदेचं प्रशासन करोनाविरोधात काळजी घेतंय..
पर्यटन राजदूत
वरिष्ठ मंत्री-नेते नसले की, सत्ताधारी बाकं तुलनेत रिकामी असतात. सदस्यांचं येणं-जाणं सुरू असतं. भाजपचे इतर सदस्य नसले तरी निशिकांत दुबे, राजीव प्रताप रुडी हे सदस्य नियमित लोकसभेत हजर असतात. वचक ठेवणारा कोण नसल्याने दुबेंसारखे सदस्य कधी कधी बागडत असतात. रुडी तुलनेत गंभीर असतात पण, बोलण्याची संधी मिळाली की थांबत नाहीत. पर्यटन वगैरे विषय रुडी यांच्या आवडीचे. लोकसभेत पर्यटनावरील अनुदान मागण्यांवर चर्चा सुरू होती. रुडी बोलायला उभे राहिले ते थांबेनात. या एकाच विषयावर ते ४५ मिनिटं बोलत होते. बिर्ला नसल्यानं पीठासीन अधिकारी म्हणून भर्तृहरी महताब काम पाहात होते. त्यांनी रुडींना थांबण्याची सूचना केली होती, तरीही रुडी बोलत होते. रुडी वैमानिक असल्यानं व्यावसायिक अनुभवही ते सांगतात. भाजपच्या सदस्यांना सरदार पटेलांच्या पुतळ्याचं आकर्षण फार. भारतातील पर्यटन स्थळांत आता पटेलांच्या पुतळ्याचाही समावेश झालेला असल्यानं त्या भागातून विमान गेलं की मी इतर प्रवाशांना लगेच त्याबद्दल सांगतो, रुडी सांगत होते. रुडींनी सदस्यांचा अभ्यासवर्गच घेतला. देशात निसर्गसौंदर्य किती आहे, कसं आहे, पर्यटन विकासासाठी त्याचा कसा उपयोग होईल, त्यासाठी काय काय केलं पाहिजे, अशी सविस्तर माहिती रुडींनी दिली. हे सांगता सांगता त्यांनी मोदींचं पर्यटनाकडं कसं लक्ष आहे, ते कसे साहसी आहेत, याचीही ‘ओळख’ सभागृहाला करून दिली. या माहितीत रुडींना दिलेला वेळ कधीच संपून गेला. अखेर महताब पर्यटनमंत्र्यांकडं बघून म्हणाले की, मंत्रीजी पर्यटनाच्या प्रसार-प्रचाराचं काम तुम्ही रुडींनाच का देत नाही?
नवी इमारत..
संसदेची नवी इमारत बांधण्याच्या कामाला हळूहळू वेग येऊ लागला आहे असं दिसतंय. नवी इमारत २०२२ मध्ये होईल आणि त्या वर्षीचं पहिलं अधिवेशन तिथंच होईल, असं लोकसभाध्यक्षांनी पूर्वीही सांगितलेलं आहे. नव्या इमारतीची संरचना कशी असेल वगैरे सगळ्या बाबी निश्चित झालेल्या आहेत. अर्थात पुढच्या टप्प्याचं काम कधी सुरू होईल ते अजून स्पष्ट झालेलं नाही. नवी इमारत बांधून पूर्ण झाली की मंत्रालयांच्या इमारती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती यांचं निवासस्थान अशी एकापाठोपाठ एक कामं केली जातील. दोन दिवसांपूर्वी संसदेच्या सामान्य व्यवहार समितीच्या काही सदस्यांना नवी इमारत कशी असेल, याची माहिती देण्यात आली. सामान्य व्यवहार समिती नावाची कुठली समिती असते, हे संसद सदस्यांनादेखील अलीकडेच कळलं असावं. गेल्या २० वर्षांमध्ये ही समिती तयार करण्यात आलेली नव्हती. या समितीकडं पूर्वीच्या लोकसभाध्यक्षांनी लक्ष दिलेलं नव्हतं. स्थायी समिती, प्रवर समिती, लोकलेखा समिती या संसदीय समित्यांना अधिक महत्त्व असतं. संसदे संदर्भातील निर्णय लोकसभाध्यक्ष घेत असतात, त्यामुळं सामान्य व्यवहार समितीकडं दुर्लक्ष झालं असावं. पण गेल्या नोव्हेंबरमध्ये ही समिती तयार करण्यात आली. त्यात ४५ सदस्य आहेत. तिचे अध्यक्ष अर्थातच लोकसभेचे अध्यक्ष. गिरीश बापट, हीना गावित, प्रतापराव जाधव, विनायक राऊत, सुप्रिया सुळे असे काही मराठी खासदार या समितीचे सदस्य आहेत. संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर महात्मा गांधींचा पुतळा आहे. हे संसदेतील निदर्शनांचं ठिकाण आहे. या पुतळ्याच्या मागे संसदेचा स्वागत कक्ष, वाहनतळ, सुरक्षा यंत्रणांच्या बराकी, किराणा दुकानदेखील आहे. तिथं वस्तू स्वस्तात मिळतात. या मोठय़ा जागेवर संसदेची नवी इमारत उभी राहणार आहे. नव्या इमारतीकडे गांधीजींची पाठ असेल! नव्या रचनेत प्रत्येक खासदाराला स्वतंत्र कार्यालयीन खोली देण्यात येईल. सध्या मंत्री आणि समितीचे प्रमुख यांनाच कार्यालय दिलेले आहे. शिवाय राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. नव्या इमारतीत त्यांचीही व्यवस्था असेल. लोकसभा १२०० आणि राज्यसभा ५०० सदस्य क्षमतेची असेल. नव्या रचनेमुळं संसदेच्या आसपासच्या ल्युटन्स परिसराचा चेहरा पूर्ण बदलून जाईल..
भूकंपाचं भाकीत
संसदेत काही मराठी खासदारांची मैफल जमली होती. सध्या संसदेत महत्त्वाची विधेयकं चर्चेला नाहीत. त्यामुळं अनेकदा हे खासदार मध्यवर्ती सभागृहात गप्पा मारतात. गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांचा राजकीय सुसंवाद सुरू होता. तेवढय़ात कवीराज तिथं आले. कविराज अजातशत्रू. त्यांना ओळखत नाही असं कोणीच नाही. त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळं लोकांनाही त्यांच्याशी बोलताना परकेपणा वाटत नाही. इथं तर या नेत्यांशी पूर्वापार मैत्रीचे संबंध. खुद्द जाणता राजा तिथे असल्याने कविराज थांबले. जाणत्या राजांचा स्वभाव मिश्कील. कधी गुगली टाकतील सांगता येत नाही. जाणत्या राजांनी कविराजांना अचानक गुगली टाकला. काय कविराज महाराष्ट्रात राजकीय भूकंप कधी होणार?.. कविराज लगेच म्हणाले, राजा, लवकरच होईल! कविराजांचं म्हणणं जाणत्या राजांनी मनावर घेतलं नाही. कविराजांच्या विधानामुळं हास्यात सगळे हरवून गेले. विषय तिथंच संपून गेला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनण्यापूर्वी कविराजांनीही वेगवेगळे उपाय सुचवले होते. त्यांची दिल्लीतल्या इंग्रजी पत्रकारांनी गंभीर दखल घेतली होती. त्यावेळीही कविराज जाणत्या राजांना भेटले होते. कविराजांनी राजकीय मित्र बदलला असला तरी त्यांचं सगळ्यांकडं येणंजाणं असतंच. कविराजांचं भाकीत सत्यात उतरेल असं आत्ता तरी राजकीय चित्र दिसत नाही. पण मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचं सरकार कोसळल्यामुळं राज्यातील भाजप नेत्यांच्या आशा मात्र पल्लवित झालेल्या असू शकतील!