– गिरीश कुबेर

जागतिक बाजारात काल, शुक्रवारी ‘जिलाद सायन्सेस’ या कंपनीचे समभाग गडगडले. ही कंपनी करोनासाठी एक लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. ‘रेमेडिसिव्हिर’ (Remdesivir) असं या कंपनीच्या संभाव्य लशीचं तांत्रिक नाव. या लशीच्या चाचण्या सुरू झाल्या होत्या. करोनाचं केंद्र असलेल्या चीनमध्ये आणि अन्यत्रही हे औषध करोनाबाधितांना दिलं जात होतं.

पण करोनाची व्याधी बरी होण्यात आणि मुख्य म्हणजे गंभीर करोनाबाधितांचं मरण टळण्यात संभाव्य लस तितकी काही उपयोगी ठरत नाही, अशी बातमी पसरली आणि या कंपनीचे समभाग गडगडले.

पण हे प्रकरण इतकं साधं असेल? शक्यता कमीच तशी. ज्यांना जिलाद ही काय चीज आहे माहिती असेल ते या सगळ्याकडे जरा संशयाच्या नजरेनंच बघतील. कारण या कंपनीचा- खरं तर अख्ख्या औषध उद्योगाचाही-  लौकिकच तसा आहे. या घटना त्या लौकिकास साजेशाच.

करोना लढय़ाचं केंद्र असलेल्या ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या वेबसाइटवर शुक्रवारी सकाळी ‘जिलाद’च्या अपयशाची ही बातमी झळकली. अनेकांना त्याहीपेक्षा या कंपनीचं अपयश बाहेर फुटलं याचा धक्का बसला. तो किती योग्य होता हे लगेचच कळालं. कारण आरोग्य संघटनेनं आपल्या वेबसाइटवरून ही वाईट बातमी काढून टाकली. पण तोपर्यंत या कंपनीवर नजर ठेवून असणाऱ्या पत्रकारांनी ती उचलली आणि हा बभ्रा झाला. त्यावर प्रश्न विचारल्यावर जागातिक आरोग्य संघटनेचा प्रवक्ता म्हणाला : या संभाव्य लशीचा अहवाल तयार व्हायचाय.. जो काही फुटला तो कच्चा खर्डा होता.. तो चुकून फुटला.

खरंच असेल त्यांचं. पण जिलाद ही कंपनी आणि असं काही चुकून होणं हा योगायोग काही संपत नाही. उदाहरणार्थ- २००५ साली अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांना अमेरिकेच्या अर्थसंकल्पासाठी विक्रमी तरतूद करायची इच्छा झाली; ती चुकून. त्यांनी संभाव्य साथीसाठी त्या वेळी तब्बल ७०० कोटी डॉलर्स (आजच्या हिशेबाने सुमारे ५२,५०० कोटी रु. फक्त एका आजारासाठी. आपला वर्षांचा आरोग्य अर्थसंकल्प आहे साधारण ६५,००० कोटी रु.) तरतूद जाहीर केली.

त्यानंतर त्या वर्षीच्या उत्तरार्धात मेरीलँड इथं एक विशेष कार्यक्रम करून या आरोग्य कार्यक्रमाची घोषणा त्यांनी केली आणि ती करताना जगात आगामी काळात काही एक साथ धुमाकूळ घालणार आहे, असं त्यांना वाटलं. चुकूनच अर्थात. आणि त्या कार्यक्रमाला जागतिक आरोग्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तेही चुकूनच.

आणि बुश म्हणाले त्याप्रमाणे खरोखरच अशी साथ आली. बर्ड फ्लू. आणि असाच चुकून झालेला योगायोग म्हणजे त्या आजाराला एकच औषध होतं. टॅमी फ्लू नावाचं. त्या औषधाची निर्मिती करणारी कंपनी म्हणजे जिलाद. या कंपनीचं दुसरं काही उत्पादनच नव्हतं, तेही असं चुकूनच. ‘लोकसत्ता’च्या वाचकांना पुढचं सगळं माहीत असेल. या कंपनीचा समभाग कसा वधारला, या कंपनीतले सर्वात मोठे गुंतवणूकदार डोनाल्ड रम्सफेल्ड हे नेमके चुकून याच वेळी बुश यांचे संरक्षणमंत्री होते आणि मग चुकूनच त्यांनी ते समभाग विकून बक्कळ नफा कसा कमावला, नंतर ही कंपनी रोश या कंपनीनं चुकून कशी घेतली.. वगैरे वगैरे.

आता पुढची चुकून झालेली गोष्ट म्हणजे बुश यांच्या रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष आहेत आणि करोना हा नवा फ्लू-अवतार हाहाकार उडवतोय. आणि ट्रम्प यांनी त्याच जिलाद सायन्सेस या कंपनीला करोना प्रतिबंधक लस तयार करण्याचे अधिकार दिलेत. इतकंच नाही तर त्याबरोबर ७.९ कोटी डॉलर्सचा विशेष संशोधन अनुदान निधीही कंपनीसाठी त्यांनी दिलाय. हे सगळं चुकूनच असणार यात शंका नाही. पण वर उल्लेखलेल्या सर्व घटनांपेक्षाही महत्त्वाची आणखी एक घटना घडलीये. ती अनेकांना माहीत नसेल.

ती म्हणजे जिलादला हे लस निर्मिती अधिकार ‘द ऑर्फन ड्रग अ‍ॅक्ट’नुसार देण्यात आलेत. अमेरिकेत ‘द ऑर्फन ड्रग अ‍ॅक्ट ऑफ १९८३’ असा एक कायदा आहे. ज्या आजारावर औषध नाही त्यावर ते विकसित करण्यासाठी या कायद्यान्वये अधिकार देता येतात. आणि यातला भयंकर धक्कादायक भाग म्हणजे एखाद्या कंपनीला तसे अधिकार दिले गेले की ती कंपनी प्रस्तावित नव्या औषधावर तब्बल सात वर्ष मालकी गाजवू शकते. या काळात अन्य कोणतीही कंपनी हे वा असं औषध विकसित करू शकत नाही. या औषध विक्रीतून येणारं सर्व आणि सर्व उत्पन्न फक्त आणि फक्त त्याच कंपनीला मिळणार. म्हणजे या प्रकरणात लस तयार झाली तर फायदा ‘जिलाद’ला. वास्तविक हा कायदा जी कंपनी औषध विकसनातला आपला खर्च वसूल करू शकत नाही, त्यांना आर्थिक संरक्षण देता यावं यासाठी आहे. पण या प्रकरणात तो अशा कंपनीसाठी वापरला गेलाय की जिच्या संशोधनाच्या खर्चाचा भारसुद्धा सरकारने उचललाय.

आणि आता हे औषध निरुपयोगी असल्याची बातमी चुकून फुटली आणि जिलादचा समभाग गडगडला.

कधी कधी चुकून बरोबर गोष्टी घडतात त्या अशा..!

@girishkuber