धनपशू
केंद्रात-राज्यांमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून आपल्याला परंपरा-संस्कृतीचं ज्ञान आहे, असा भाजपच्या नेत्यांचा गैरसमज झालेला आहे. रामायण, महाभारत किंवा अन्य एखादी पौराणिक रचना घ्यायची, त्यातल्या एखाद्या गोष्टीचा उल्लेख करायचा आणि ती तुम्हाला माहिती नसेल तर भारतवर्षांत राहण्यासाठी तुम्ही अयोग्य आहात असं सांगायचं, असं आजकाल कुणीही उठून करू लागला आहे. भाजपमध्ये एक सुनील भराला नावाचे गृहस्थ आहेत. ते उत्तर प्रदेशमधील श्रम कल्याण परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या सोनाक्षी सिन्हा हिला माणूस मानण्यास नकार दिला आहे. सोनाक्षी सिन्हा या ‘धनपशू’ आहेत, असा त्यांचा दावा आहे. धनपशू म्हणजे फक्त पैसे मिळवणारा प्राणी. या प्राण्यावर कोणतेही संस्कार झालेले नाहीत. त्याला फक्त पैसे मिळवणं एवढंच माहीत आहे. ते वगळता त्याला भारताची संस्कृतीदेखील माहिती नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. याला संदर्भ आहे, ‘कौन बनेगा करोडपती’चा. या कार्यक्रमात हॉट सीटवर बसलेल्या सोनाक्षीला रामायणाशी संबंधित एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, त्यामुळे ती समाजमाध्यमांवर ट्रोल झाली. तिनंही ट्रोल्सना उत्तर दिलं. पण सुनील भराला यांचा या सगळ्यामुळे फारच संताप झाला. घराचं नाव रामायण, वडिलांचं नाव साक्षात शत्रुघ्न, असं असताना त्या घरातल्या मुलीला रामायण माहीत नाही म्हणजे काय.. तिला साधं संजीवनी बुटी कुणासाठी आणली गेली हे माहिती नाही, हे योग्य नव्हे.. त्यामुळे भराला यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना सल्ला दिला आहे, की जरा मुलीवर संस्कार करा. मुलीला रामायण, गीता शिकवा. हा सल्ला शत्रुघ्न सिन्हा यांनी ऐकला की नाही, हे माहिती नाही. पण सोनाक्षी सिन्हा यांनी संस्कृतिरक्षकांच्या सल्ल्याला केराची टोपली दाखवली एवढं मात्र खरं!
फसवा मान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित एका संस्थेनं देशातील महिलांच्या स्थितीबद्दल सर्वेक्षण करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्याचं प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झालं. या सर्वेक्षणाची व्याप्ती मोठी आहे. त्याचं काम दोन र्वष सुरू होतं. प्रकाशन समारंभाला मोहन भागवत येणार असल्यानं डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय भवनचं सभागृह हाऊसफुल्ल होतं. या सर्वेक्षणातील अनेक प्रश्नांपैकी एक होता, महिलांचा निर्णयप्रक्रियेत किती सहभाग असतो? काही हजार महिलांना हा प्रश्न विचारला गेला होता. बहुतेक महिलांचं उत्तर होतं, निर्णयप्रक्रियेत आमचा सहभाग असतो. घरात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला विचारलं जातं. आमचं घरात ऐकलं जातं.. हे सर्वसाधारण, काहीसं अपेक्षित उत्तर होतं. पण ते निम्मंच उत्तर होतं. अहवालात नोंदवलेलं पुढचं निरीक्षण वस्तुस्थिती सांगून गेलं : पुरुष मंडळी आमचं ऐकून घेतात, पण ते फक्त ऐकूनच घेतात. आमच्या म्हणण्यावर होत काहीच नाही! हे निरीक्षण ऐकताच सभागृहात बसलेले तमाम पुरुष आणि महिलाही हसायला लागल्या. खरं तर हा हसण्यावारी नेण्याजोगा मुद्दाच नव्हता. कुटुंबांमध्ये महिलांचं स्थान अजूनही काय आहे, याचं वास्तव मांडणारं हे निरीक्षण होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांच्या भाषणात पहिलाच संदर्भ या निरीक्षणाचा होता. त्यांनी सभागृहातील तमाम हसणाऱ्या संघविचारांच्या प्रेक्षकांना या निरीक्षणातील गांभीर्य स्पष्ट करून सांगितलं. मग मोहन भागवत यांनादेखील याच निरीक्षणावर बोलावं लागलं. महिलांच्या सबलीकरणाची सुरुवात घरातून होते हे पुरुषांनी लक्षात घ्यावं, असा सल्ला भागवतांनी पुरुषांना दिला. आता भागवत असं म्हणत असले तरी संघाच्या निर्णयप्रक्रियेत महिलांचं स्थान काय, हा भाग वेगळा! सीतारामन म्हणाल्या, महिलांचं म्हणणं निव्वळ ऐकल्यासारखं करायचं असला फसवा मान महिलांना नको. एखाद्या कंपनीच्या संचालक मंडळावर नियम आहे म्हणून महिलेला संचालक नेमलं म्हणजे महिलांना न्याय मिळाला असं समजू नका. महिलांच्या विकासासाठी कायदे हवेतच. आरक्षण हवेच. त्याच्याकडे प्रतीक म्हणून पाहणं योग्य नाही. चांद्रयान मोहिमेत महिला शास्त्रज्ञ सहभागी होतात. स्वत:चं कौशल्य, क्षमता वापरण्याची कुवत त्यांच्याकडे आहेच. फक्त महिलांनी ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडायला हवं. सीतारामन यांनी निरीक्षणाचा नेमका अर्थ समजून सांगितल्यावर उपस्थित महिलांना त्यांचं म्हणणं पटलं आणि रुचलंही!
रस्त्यांवर दिवे
दिल्लीत आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीत सकारात्मक प्रचार करण्याचं ठरवलंय. अनुच्छेद-३७०, एनआरसी अशा कोणत्याही वादग्रस्त मुद्दय़ावर ‘आप’ लक्ष केंद्रित करणार नाही, असं त्यांच्या नेत्यांनी जाहीर केलंय. अर्थात सकारात्मक प्रचार करण्याशिवाय आपकडे दुसरा पर्यायही नाही. त्यामुळे आपने मध्यमवर्गाला आकर्षित करू शकतील अशा मुद्दय़ांवर भर दिलेला आहे. २०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय तर आपने आधीच घेतला होता. आता शहरभर रस्त्यांवर दोन लाख दिवे लावले जाणार आहेत. हा निर्णय विशेषत: महिला मतदारांना डोळ्यांसमोर ठेवून घेतलेला आहे. २०१२ मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर दिल्लीत महिलांची सुरक्षा हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे. २०१५ मध्ये आपने केलेल्या सर्वेक्षणात दिल्लीतील ७० टक्के रस्त्यांवरील दिवे बंद असल्याचं आढळलं. निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा शहरातील काळोखी ठिकाणं शोधण्याचं काम आपकडून केलं जाणार आहे. २०१६ मध्ये ७,५०० काळोखी ठिकाणं होती. ५,५०० एलईडी दिवे लावले गेले. आता दोन लाखांहून अधिक दिवे लावून एकही काळोखं ठिकाण राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
प्लास्टिक नको!
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची ठाण मांडून बसण्याची क्षमता प्रचंड आहे. शहा चर्चेला बसले की बैठक किती तास चालू राहील, सांगता येत नाही. प्रदेश भाजपच्या सुकाणू समितीची बैठक सुरू झाली ती संपेचना. तोपर्यंत पत्रकारांनीही भाजपच्या मुख्यालयाचा कोपरान्कोपरा नजरेखालून घातला. हे मुख्यालय म्हणजे भूलभुलैया आहे. कोण कुठून येतो आणि कुठं निघून जातो, हे कळतच नाही. प्रत्येक मजल्यावर गोल गोल फिरावं लागतं. दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यांवर उपाध्यक्षांची दालनं आहेत. संघटनमंत्री बी. एल. संतोष यांचं दालन दुसऱ्या मजल्यावर आहे. तिथं प्लास्टिकबंदी आचरणात आणली गेलेली दिसली. फुलांचे गुच्छ आणू नयेत, असं विनंतिपत्रक लावण्यात आलं आहे. फुलांचे गुच्छ आणले जातात ते प्लास्टिकच्या आवरणात. ते टाळून प्लास्टिकचा कचरा कमी करण्यासाठी ही विनंती केली असावी. भाजपच्या कार्यालयात आधीपासूनच पाणी पिण्यासाठी कागदाचे कप वापरले जातात. आता पदाधिकाऱ्यांच्या दालनात काचेचा मग आणि ग्लास ठेवलेले असतात. अनेक मंत्रालयांनीही प्लास्टिकपासून सुटका करून घेतलेली आहे. पंतप्रधान मोदी फिल्टरमधून गाळून आलेलं पाणी पिण्यास तयार असतील, तर मंत्री-अधिकाऱ्यांना काय अडचण आहे? दिल्लीच्या पाण्यात क्षारांचं प्रमाण खूप असतं. ते कमी करण्यासाठी फिल्टर वापरले जातात. या फिल्टरना अधिक महत्त्व आलं आहे.
कार्यक्रमांचा धडाका
झोपी गेलेला काँग्रेस पक्ष आत्ता कुठं जागा व्हायला लागला आहे. राजकीय पक्ष म्हणून कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम दिला पाहिजे असं या राष्ट्रीय पक्षाला वाटतंय हे काय कमी आहे? महात्मा गांधींची दीडशेवी जयंती काँग्रेस साजरी करणार आहे. देशभर शहरा-शहरांमध्ये काँग्रेसचे खासदार-आमदार पदयात्रेत सहभागी होणार आहेत. सोनिया गांधी दिल्लीमध्ये, प्रियंका गांधी-वढेरा हरयाणात पदयात्रा करतील. राहुल गांधीदेखील पदयात्रा करणार आहेत. वध्र्याला सेवाग्राममधील पदयात्रेत काँग्रेसचे हे माजी अध्यक्ष दिसतील. या कार्यक्रमानंतर काँग्रेसचे आर्थिक संकटाच्या मुद्दय़ावर भाजपविरोधी आंदोलन १५ ऑक्टोबरपासून सुरू होईल. या काळात महाराष्ट्र, हरयाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने प्रचारासाठीही आर्थिक मुद्दा काँग्रेससाठी सोयीचा ठरणार आहे. केंद्रात पुन्हा सत्तेवर आल्यापासून भाजपने मात्र भरगच्च कार्यक्रम आखलेले आहेत. देशभर नवनव्या कार्यक्रमांची मांदियाळीच दिसते. २ ऑक्टोबरपासून प्लास्टिकबंदीची मोहीम सुरू होईल. गांधी संकल्पयात्रा काढली जाणार आहे. हजारो कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून यात्रेच्या तयारीचा आढावाही शहा आणि नड्डा यांनी घेतला आहे. भाजप एकामागून एक कार्यक्रम घेत आहे. सदस्य नोंदणी मोहीम नुकतीच संपलेली आहे. फिट इंडिया मोहिमेत लोकसभा अध्यक्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक जण कसरती करताना दिसले. सध्या भाजपची महत्त्वाची मोहीम सुरू आहे ती अनुच्छेद-३७० विषयी. जम्मू-काश्मीरचा विशेषाधिकार रद्द का केला, हे लोकांना समजावून सांगितलं जात आहे. पहिल्या टप्प्यात काही मंत्र्यांनी सन्मानित लोकांना भेटून केंद्र सरकारची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या टप्प्यात शहा, नड्डा, राजनाथ, गडकरी यांसारख्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची देशभर भाषणं आयोजित केली जात आहेत. दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर अनुच्छेद-३७० वर प्रदर्शन भरलेलं होतं. कदाचित अशी प्रदर्शनंही ठिकठिकाणी भरवली जाऊ शकतील.