सीमावर्ती भागात घुसखोरांच्या संशयास्पद हालचालींवर रात्रंदिवस बारकाईने लक्ष ठेवण्याचे काम ‘टीआय-आयओई’ (थर्मल इमेजिंग-इंटिग्रेटेड ऑब्झर्वेशन इक्विपमेंट्स) तसेच ‘लोरोज’सारख्या अत्याधुनिक टेहळणी यंत्रणा करतात. किमान ८० ते कमाल २० हजार मीटर अंतरावरील हालचाली टिपणाऱ्या या यंत्रणेत दोन शक्तिशाली कॅमेऱ्यांच्या मदतीने दृश्य साठविता येतात. इस्रायली बनावटीच्या या दोन्ही यंत्रणा कोणत्याही हवामानात कार्यरत राहू शकतात. नक्षलप्रभावित क्षेत्रात त्यांचा कसा वापर करता येईल, यावर मंथन होण्याची गरज आहे.
सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी भूसुरुंगाचा स्फोट घडविणे.. पाळत ठेवून अचानक हल्ला करणे.. जवानांना अडचणीच्या ठिकाणी घेरून अंदाधुंद गोळीबार करणे.. असे तंत्र नक्षलवाद्यांनी अवलंबिल्याचे लक्षात येते. जंगलमय युद्ध क्षेत्राची नक्षलवाद्यांना अधिक जाण आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील चार्मोशीलगतच्या भागात घडविलेला शक्तिशाली भूसुरुंगाचा स्फोट, हे त्याचे उदाहरण. त्यात सात जवान शहीद झाले. स्थानिक समर्थकांच्या मदतीने नक्षलवादी पोलीस यंत्रणेच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवतात. त्याप्रमाणे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचा पोलिसांचाही प्रयत्न आहे. जंगल क्षेत्रात नक्षलवाद्यांच्या हालचालींचा वेध घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून सीमावर्ती भागात वापरल्या जाणाऱ्या काही अत्याधुनिक टेहळणी यंत्रणा महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतात. सुरक्षा दलाकडे असणारी तोकडी यंत्रणा पाहता नक्षलवाद्यांना गारद करण्यासाठी वेगवेगळी कामगिरी करणाऱ्या टेहळणी यंत्रणांचा वापर झाल्यास जवानांचा जीव धोक्यात घालणे टाळता येईल.
घनदाट जंगलांनी वेढलेल्या क्षेत्रात नक्षलवाद्यांनी छेडलेले युद्ध आणि जम्मू-काश्मीरच्या वादग्रस्त सीमावर्ती भागात पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी चालविलेले युद्ध या दोन्हींच्या पद्धतीत फरक करता येणार नाही. भौगोलिक व नैसर्गिक स्थितीचा लाभ उठवत दोन्ही घटक गनिमी काव्याने भारतीय सुरक्षा दलांना लक्ष्य करीत आहेत. मैदानी प्रदेशातील युद्धापेक्षा अतिदुर्गम जंगलमय क्षेत्रातील युद्धपद्धत वेगळी असते. या प्रदेशात रस्ते असले तरी ते मर्यादित असतात. त्यामुळे मोठा फौजफाटा घेऊन संचार करणे अवघड ठरते. लहानलहान तुकडय़ांद्वारे संचार करावा लागतो. दुर्गम भागातील रस्त्यावर भूसुरुंग पेरणे अथवा घेराव घालणे नक्षलवाद्यांना सहजसाध्य होते. घनदाट जंगल लपण्यासाठी उपयोगी ठरते. तसेच या ठिकाणी आभास निर्माण करण्यासाठी बराच वाव असतो. यामुळे जवानांना सावध हालचाली करणे क्रमप्राप्त ठरते. किंचितसा गाफीलपणा जिवावर बेतणारा ठरतो. आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असणारे महाराष्ट्रातील गडचिरोली हे ७० टक्के जंगलमय क्षेत्र. दाट जंगलामुळेच छत्तीसगड नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला बनला आहे. गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्य़ांत नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस स्थानिक आदिवासी युवकांना लढाऊ प्रशिक्षण देऊन सी ६० पथकात समाविष्ट करत आहेत. इतर राज्यांतील पोलीस पथकांच्या तुलनेत सी ६० पथकाची कामगिरी निश्चित प्रभावी आहे. या भागात दाखल होण्यापूर्वी या जवानांना नागपूरच्या प्रशिक्षण केंद्रात जंगल युद्धतंत्राचे प्रशिक्षण देण्यात येते. ‘ऑपरेशन ग्रीन हंट’अंतर्गत नक्षलविरोधी मोहिमेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवानही कार्यरत आहेत. नक्षलवाद्यांविरुद्ध लढणाऱ्या जवानांसाठी गृह मंत्रालयाने मानक कार्यपद्धती निश्चित केली आहे. या क्षेत्रात मोहीम राबविताना तिचे पालन अनिवार्य आहे. पण प्रत्यक्ष कार्यवाहीदरम्यान काही त्रुटी राहतात. त्याचा लाभ नक्षलवादी उचलतात. हे आजवरच्या घटनांवरून दिसून येते.
दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेल्या अरण्यमय क्षेत्रात नक्षलवाद्यांचा ठावठिकाणा शोधणे हे सुरक्षा यंत्रणांसमोरील खडतर आव्हान आहे. स्थानिक स्रोतांवर सुरक्षा यंत्रणेची मुख्य भिस्त असते. त्यांच्याकरवी मिळणाऱ्या माहितीच्या आधारे सापळे रचले जातात. ही उत्तम व्यवस्था असली तरी तिला काही मर्यादा येतात. मध्यंतरी भ्रमणध्वनीद्वारे आपला माग निघत असल्याचे लक्षात आल्यावर नक्षलवाद्यांनी त्याच्या वापरावर र्निबध आणले. आता अपवादात्मक स्थितीत ते त्याचा वापर करतात. यामुळे भ्रमणध्वनी संदेश पकडून त्यांचा छडा लावणे जिकिरीचे ठरले आहे. सी ६० पथकातील जवानांकडे सध्या अंधारात उपयुक्त ठरणारे‘नाइट व्हिजन गॉगल’, दुर्बीण आणि संपर्कासाठी बिनतारी यंत्रणेबरोबर उपग्रहाधारित दूरध्वनी (सॅटेलाइट फोन) अशी साधने आहेत. टेहळणीसाठी त्यांच्याकडे खास उपकरणे वा यंत्रणा नाही. हेलिकॉप्टरचा वापर आपत्कालीन प्रसंगात केला जातो. शोध मोहीम राबविताना जवानांना सर्वाधिक धोका ठिकठिकाणी पेरलेल्या भूसुरुंगांचा आहे. रस्तेबांधणीच्या वेळी व नंतरही अगणित सुरुंग नक्षलवाद्यांनी पेरले आहेत. उपरोक्त परिसरात जवानांनी शोध मोहीम राबविल्यास त्याचा त्यांना सहजपणे वापर करता येतो. अशा मोहिमेवेळी बॉम्बशोधक व नाशक पथकाची मदत सी ६० पथकाला मिळणे गरजेचे असते. पण ती अपवादाने मिळते. त्यातही या पथकाच्या यंत्रणेला जमिनीपासून काही विशिष्ट अंतराच्या पलीकडील सुरुंगांचा थांगच लागत नाही. सुरुंग शोधणाऱ्या यंत्रणेचे तंत्रज्ञान त्यास कारणीभूत आहे. यामुळे जमिनीत खोलवर पुरलेल्या शक्तिशाली भूसुरुंगाचा स्फोट झाल्यास सी ६० पथकाच्या चिलखती वाहनांचाही निभाव लागत नाही.
नक्षलप्रभावित क्षेत्रातील सुरक्षा दलांच्या अडचणींवर भारतीय लष्कर वापरत असलेल्या काही टेहळणी यंत्रांद्वारे तोडगा काढता येईल. त्यातील बहुतांश यंत्रणा लष्कराने कारगिल युद्धानंतर खरेदी केलेल्या आहेत. सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी त्या लष्कराला साहाय्यभूत ठरत आहेत. त्यातील काही यंत्रणांचा वापर नक्षलप्रभावित क्षेत्रात निश्चितपणे करता येऊ शकतो. ‘रडार ई एम – २१४०’ ही त्यापैकीच एक. ६० किलोमीटरच्या परिघातील हालचालींचा आवाज टिपून त्यांचे ठिकाण तातडीने संगणकावर दाखविण्याचे कार्य इस्राएल बनावटीची ही यंत्रणा करते. एखाद्या गटात चाललेली चर्चा, तुकडीची हालचाल असा कोणताही ध्वनी तिच्यामार्फत टिपला जातो. घनदाट जंगलात ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांचा वावर असल्याचा संशय आहे, तिथे या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करता येईल. एका वाहनावर ‘मोबाइल टॉवर’, ‘डिस्प्ले युनिट’चा अंतर्भाव असणारी ही यंत्रणा असून तिच्यामार्फत ग्रहण होणारे आवाज ओळखण्याचे एक शास्त्र आहे. त्याकरिता विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षित व्यक्तीच प्राप्त झालेले आवाज कशाचे आहेत ते ओळखू शकते. आवाजाचे ठिकाण लगेच संगणकावर नकाशाच्या स्वरूपात उपलब्ध होत असल्याने नक्षलवाद्यांचा माग काढणे सुरक्षा यंत्रणांना सोपे होऊ शकते.
सीमावर्ती भागात घुसखोरांच्या संशयास्पद हालचालींवर रात्रंदिवस बारकाईने लक्ष ठेवण्याचे काम ‘टीआय-आयओई’ (थर्मल इमेजिंग-इंटिग्रेटेड ऑब्झर्वेशन इक्विपमेंट्स) तसेच ‘लोरोज’सारख्या अत्याधुनिक टेहळणी यंत्रणा करतात. किमान ८० ते कमाल २० हजार मीटर अंतरावरील हालचाली टिपणाऱ्या ‘टीआय-आयओई’ यंत्रणेत दोन शक्तिशाली कॅमेऱ्यांच्या मदतीने दृश्य साठविता येतात. इस्राएल बनावटीच्या या दोन्ही यंत्रणा कोणत्याही हवामानात कार्यरत राहू शकतात. नक्षलप्रभावित क्षेत्रात त्यांचा कसा वापर करता येईल, यावर मंथन होण्याची गरज आहे. खोल जंगलात नक्षलवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत. अशा ठिकाणी चळवळीत नव्याने भरती झालेल्यांना बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अशी केंद्रे शोधण्यासाठी अमेरिकन बनावटीच्या ‘एनटीपीक्यू – ३७ डब्लूएलआर’ या यंत्रणेचा वापर करता येऊ शकतो. शत्रूकडून होणारा मारा नेमक्या कोणत्या भागातून केला जातो, ते ठिकाण शोधण्याची या यंत्रणेची क्षमता आहे. १५ किलोमीटरच्या अंतरावरून होणाऱ्या माऱ्याचे ठिकाण ही यंत्रणा सांगते. सरावावेळी होणाऱ्या गोळीबाराचे ठिकाण ही यंत्रणा दाखवू शकते. त्यांच्या सरावाची दिशा व निश्चित ठिकाण समजले तर पुढील काम सोपे होईल. सुरक्षा दल थेट त्या ठिकाणीच हल्ला चढवून नक्षलवाद्यांना गारद करू शकते.
जंगलात संचार करताना नक्षलवादी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करतात. समूहाने संचार न करता ते काही अंतर ठेवून भ्रमण करतात. अनेकदा ग्रामस्थांना ते सोबत ठेवतात. यामुळे त्यांना ओळखणे अवघड जाते. पण अशा संशयास्पद हालचालींवर वैमानिकरहित विमानांच्या साहाय्याने लक्ष ठेवता येईल. सीमावर्ती भागातील संशयास्पद हालचाली तात्काळ छायाचित्रांच्या स्वरूपात उपलब्ध करून देणारी इस्राएल बनावटीची सर्चर मार्क-१, सर्चर मार्क-२ आणि हेरॉन ही वैमानिकरहित विमाने भारतीय लष्कराच्या ताफ्यात आहेत. आकाराने अतिशय लहान असल्याने शत्रूला त्यांचा सुगावा लागत नाही. सलग १२ ते १५ तास उड्डाण करणाऱ्या या वैमानिकरहित विमानांची १२० किलोमीटरच्या परिघातील क्षेत्राची टेहळणी करण्याची क्षमता आहे. त्यावरून नक्षलवाद्यांच्या हालचालींची माहिती नियमितपणे छायाचित्रांद्वारे उपलब्ध करवून घेता येईल. वैमानिकरहित विमानांचा वापर नक्षलविरोधी मोहिमेत छत्तीसगडमध्ये केला जात आहे. उपग्रहावरून या क्षेत्राची छायाचित्रे काढून शोधमोहिमेला वेगळा आयाम देता येईल. या छायाचित्रांचा वापर मोहिमेसाठी करण्याचा विचार सुरू होता. परंतु अद्याप तो प्रत्यक्षात आला नसल्याचे सी ६० पथकातील अधिकारी सांगतात.
गडचिरोलीतील प्रमुख रस्त्यांवर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग पेरून ठेवलेले असल्याने पोलिसांनी वाहनाचा कमीतकमी वापर करावा या दृष्टीने विचार होत आहे. जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागांतही लष्करी वाहनांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवादी असे बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न करतात. लष्करी ताफा मार्गक्रमण करत असताना असे प्रकार घडू नयेत, यासाठी एखाद्या वाहनावर खास ‘जॅमर’चा वापर केला जातो. जेणेकरून दहशतवाद्यांना स्फोट घडविण्याची संधी मिळत नाही. तसा विचार पोलीस दलास करता येईल. नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगांचा शोध घेण्यासाठी जुनाट तंत्रज्ञान बदलण्याची निकड आहे. नक्षलवादी शक्तिशाली भूसुरुंग बनवितात. तो पेरताना जमिनीखाली खोलवर राहील, याची दक्षता घेतात. परिणामी, बॉम्बशोधक पथकाच्या यंत्रणेला अनेकदा त्याचा शोध लागत नाही. त्यातही सुरुंगात धातूचा अंश ठेवला जाईल की नाही, याची शाश्वती नसते. आंतरराष्ट्रीय निकषानुसार सुरुंग पेरणाऱ्या देशाला त्यात धातूचा अंश ठेवणे बंधनकारक आहे. कारण त्यामुळे विरोधी देशाला त्यांचा शोध घेऊन तो नष्ट करणे शक्य व्हावे, असा त्यामागे उद्देश आहे. परंतु नक्षलप्रभावित क्षेत्रात अशा निकषाचे पालन होईल, ही अपेक्षाही मूर्खपणाच ठरेल. भारतीय लष्कराने जर्मन बनावटीच्या अत्याधुनिक सुरुंगशोधक यंत्रणेला पसंती दिली आहे. तिचे वैशिष्टय़ म्हणजे जमिनीखालील संशयास्पद वस्तू सुरुंग आहे की नाही, याची पडताळणी यंत्रणेच्या पटलावरून (स्क्रीन) करता येते. तथापि, सीमावर्ती भागांत आणि नक्षलवादी भागांत पेरल्या जाणाऱ्या सुरुंगांच्या खोलीत मोठी तफावत असते. नक्षलग्रस्त भागात अधिकाधिक खोलीवर पेरलेले सुरुंग शोधणारी यंत्रणा सुरक्षा यंत्रणांच्या स्वाधीन करण्याची नितांत गरज आहे. नक्षलप्रभावित क्षेत्रातील युद्धात अशा काही अत्याधुनिक साहित्याचा वापर झाल्यास युद्धशैलीत बदल होईल, शिवाय देशासाठी अनमोल असलेल्या जवानांच्या जिवाचाधोकाही कमी होऊ शकेल.
