|| प्रदीप आपटे

एक बरे की, ‘कंपनी सरकार’ला आपल्या ‘अडाणीपणाची’ जाण होती. व्यापारी म्हणून येऊन राज्यकर्ते बनायचे, तर दरबार आणि महसुलादी कामांसाठी रुळलेली फारसी आणि हिंदूंच्या न्यायदानापासून ज्ञानार्जनापर्यंत वापरली जाणारी संस्कृत या भाषांकडे पाहिलेच पाहिजे, हे वॉरन हेस्टिंग्जने थोडेफार ओळखले…

Loksatta lokshivar Agriculture Business Milk business animal husbandry
शेती नसणाऱ्याची धवलक्रांती!
Successful experiment of pistachio farming in Solapur
सोलापुरात पिस्ता शेतीचा यशस्वी प्रयोग!
famous personalities who win tarun tejankit award
तरुण तेजांकित
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

युरोपीय लोकांना हिंदुस्तानाबद्दल संमिश्र कुतूहल होते. त्यात आश्चर्याच्या बरोबरीने घृणा आणि तिरस्काराची विश्रब्ध काळवंड असायची. विशेषकरून ‘मूर्तिमंत अनेक रूपी’ ईश्वर ही कल्पना त्यांना अतोनात सलत असे. ‘एकेश्वरी श्रद्धा’ नसणाऱ्यांचा उल्लेख तर्कहीन अंधश्रद्ध असा केल्याखेरीज त्यांना राहावत नसे. ज्यू वारशातून उपजलेल्या धर्मचिंतनांत ‘ज्ञानाचे रूप’, ‘अस्तित्वाचे रूप’, ‘तर्कशास्त्र’ असा तात्त्विक फुलोरा बिलकूल नव्हता. प्रेषितांच्या आज्ञांचे समर्थन आणि निरूपण यातच अवधी बौद्धिक कसरत रमलेली असे. तर्क आणि तत्त्वज्ञानाची उणीव ग्रीक रोमन विचारवंतांच्या आधारे भरून काढती जाई. ग्रीक देवदेवतांचे पुतळे, मूर्ती, देवळे ख्रिस्ती अट्टहासाने जमीनदोस्त केली गेली. पण त्यांची तत्त्वज्ञान आणि तर्काची उधारी फिटेना! प्राचीन काळाबाबत तत्त्वज्ञान कला सैंदर्यविचार शिल्पकला अशा बाबतीत ग्रीक आणि रोमन वारसा हे त्यांचे मापदंड. पण विश्वाच्या उत्पत्तीबद्दलचे ज्ञान जुन्या कराराच्या संकेतांनी जेरबंद असे. जगातल्या अन्य काही संस्कृतींचा संपर्क आला की सहसा याच फूटपट्ट्या युरोपीय वापरत.

पण कालांतराने व्यापाराच्या काठाकाठाने सत्ताधीश होण्याचा प्रसंग आला. इंग्रजांवर सत्ताधीश म्हणून न्यायव्यवस्था, कायद्याच्या अमलाचे जूमानेवर आले. अगोदरची सगळी पाटी कोरी करून समाजाचे गाडे हाकता येईल अशी ना परिस्थिती होती ना कुवत! अगोदरची चाकोरी मोडणे वा सोडणे जोखमीचे होते. त्यात हिंदू आणि मुस्लिमांच्या न्याय-निवाड्याच्या रीती, प्रमाणभूत तत्त्वे वेगळी. त्याचे रूप सांगणारे ग्रंथ निराळे. त्या ग्रंथांच्या भाषा आणि लिपी निराळ्या. ते रूप जाणणारे पंडित आणि मौलवी निराळे. हे अवडंबर पेलल्याखेरीज गत्यंतरच नव्हते. अमलाखालचा भूभाग विस्फारून वाढू लागला तसतसा राज्याचा अंमल सांभाळण्याचा बोजा वाढत चालला. इस्लामधर्मी राजवटींकडे दरबार आणि न्यायखाते फारसी भाषेच्या आश्रयाने चाले. परिणामी बहुतेक फिरंगींना फारसी ‘थोडी’ ते ‘बहोत’ अवगत असे.      

ती भाषा शिकायलादेखील सोपी. मुख्य, ठळक म्हणावी अशी व्याकरणाची धाटणी पाच-दहा पानांत सांगता येईल इतपत सुटसुटीत. त्यातत्या त्यात किचकट काय तर फारसी लिपीचे शिकस्ता म्हणजे धावते मोडकळी रूप ऊर्फ मोडी! ते सरावाने वाचून लिहून अंगवळणी चढे. परंतु अरबी भाषा बरीच क्लिष्ट. ती जाणणारे मोजके. विवाद मुद्द्यांवर मतमतांतरे जाणणारे त्याहून मोजके.

दुसरीकडे हिंदूंचे यमनियम अगदी वेगळे! त्यात वर्ण-जात भेदांचे फरकांचे जाळे. स्थानिक वेष्टनात मढलेले, पुराणी मुशीत घडलेले न्यायसंकेत संस्कृत ग्रंथांच्या आधाराने उभे असायचे! मौखिक सरावाने वाहात राहिलेली, सूक्ष्मतर यमनियमांनी आणि भेदांनी सजलेली पण सौष्ठवपूर्ण जैवयंत्री भाषा! कानी पडणे अशक्य नाही पण दुर्लभ. शिकायची तर शिकवणाऱ्यांवरची सांकेतिक बंधने मोठी निष्ठुर!

 इंग्रज राज्यकर्त्यांना व न्यायाधीशांना भेडसावणारी समस्या कुठली? तर त्या पंडित किंवा मौलवींमध्ये मतभेद झाले तर कुणाची तळी धरायची? संस्कृत आणि अरबी भाषा शिकण्याची कळ या ‘कायदेबाज’ गरजेपोटी लागली. वॉरन हेस्टिंगजच्या कारकीर्दीत प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांत फेरफार आणि निराळा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले. हिंदुस्तानात कंपनी सरकारचा कारभार कसा आणि कोणत्या ‘विधि’वत चौकटीत चालावा याबद्दल वादंग चालू झाले होते. एडमंड बर्क विरुद्ध हेस्टिंग्ज असे चित्र रंगविताना हेस्टिंग्ज ब्रिटिश पद्धतीचा हेका धरणारा असे कधी कधी रंगवले जाते. परंतु खुद्द हेस्टिंग्जचे प्रयत्न निराळे चित्र दर्शवितात. नथानिएल ब्रासी हालहेड् या गृहस्थाने ‘अ कोड ऑफ गेंटू (हिन्दू) लॉज्’ या नावाचा ‘तत्त्वसंग्रह’ वा ग्रंथ १७७६ साली तयार केला होता. तो ‘विवादार्णवसेतु’नामक ग्रंथावरून भाषांतर करून बेतलेला होता. तो होस्टिंगच्या प्रेरणेमुळेच! विवादार्णवसेतु म्हणजे तंटा आणि कज्जांचा समुद्र! पत्रव्यवहार आणि समकालीनांचे लिखाण बघता अकबर आणि दारा शुकोह यांनी संस्कृतातून फारसीत भाषांतर केलेले ग्रंथ कंपनी सरकारला उपलब्ध होते. त्यातल्या उपनिषदाचेदेखील भाषांतर हालहेडने केले होते. याच गृहस्थाने बंगाली भाषेचे व्याकरण लिहिले होते. ह्या भाषांतरामुळे हालहेड्ला संस्कृत भाषेची सरावाने पुरेशी ओळख होती. जोडीला बंगाली भाषेचे व्यापक ज्ञान होते. ग्रीक-लॅटिन तर अवगत होत्याच. यामुळे एक बाब हालहेड्च्या ध्यानात आली होती, ती म्हणजे या भाषांत पदोपदी साम्याचे ठसे भासतात. त्याबद्दल त्याने वानगीदाखल साम्यस्थळे दाखविणारे लिखाण पण केलेले आढळते. आपल्या बंगाली भाषेचे व्याकरण या ग्रंथाच्या प्रस्तावनेत तो म्हणतो : ‘इराणच्या सामुद्रधुनीपासून चिनी समुद्रापर्यंत प्रचारात असणाऱ्या सगळ्या भाषांचे पालकत्व संस्कृतमध्ये आढळते. ही भाषा तूर्तास धार्मिक ग्रंथरूपाने ब्राह्मणांच्या हाती बंदिस्त भासते; पण त्याची मूळ छाप या सगळ्या भाषांच्या चलनामध्ये आढळते. मला आश्चर्य वाटले ते ग्रीक लॅटिनशी असणारे साम्य. हे साम्य फक्त चलनामधल्या रोजच्या उपयोगी वस्तू तांत्रिक नामांपुरते नाही. तर मूळ वर्णाक्षरे संख्यावाचक शब्द आणि संस्कृतीच्या उदयाच्या आदिम काळात ज्या वस्तू व गोष्टींचा आढळ असतो त्या शब्दांतदेखील साम्य उठावाने आढळते.’

  तेव्हा संस्कृत ग्रंथांचा आधार आणि आशय बऱ्याचदा फारसी मार्गे मिळत असे. पंडितांच्या साहाय्यकृपेविना उलगडा सुलभ नसे. संस्कृत पुरेपूर जाणणारे इंग्रज इसम नव्हते. त्याची घवघवीत मुहूर्तमेढ करणारा इंग्रज गृहस्थ म्हणजे एच. टी. कोलब्रूक. त्याने एशियाटिक रिसर्चेसमध्ये छोटेमोठे असे सात विस्तृत निबंध खंड लिहिले. त्यातल्या सातव्या खंडाचे शीर्षक : ‘ऑन दि संस्कृत अ‍ॅण्ड प्राकृत लँग्वेजेस’. तो म्हणतो, ‘‘संस्कृत आणि प्राकृत यातली संस्कृत मोठी झळाळती भाषा. ती धिमेपणे विकसित आणि परिष्कृत होत होत गेली आणि कित्येक अभिजात लावण्यसंपन्न कविंच्या वाङ्मयात कोरून विराजली. त्यातले बहुतेक अनेक जण ख्रिस्ताब्दाच्या फार अगोदरचे आहेत. ही भाषा हिंदुस्तानातल्या अभिजनांची अभिरुचीपूर्ण वाङ्मय, विज्ञान, तत्त्वज्ञानाची भाषा आहे. त्यांच्या जीवनातील विधिव्यवस्थेचे धार्मिक सामाजिक संकेतांचे ग्रंथित रूप देणारी अशी ती भाषा आहे.’’

अशा या ‘देववाणी’चे व्याकरण इंग्रजीत सविस्तर समजावून सांगणारा ग्रंथकार म्हणजे चाल्र्स विल्किन्स. त्याच्या या कर्तृत्वाची मुहूर्तमेढही हेस्टिंग्जच्या उत्तेजनामुळे झाली, पण पूर्ण ग्रंथ फार उशिराने (१८०८) प्रकाशित झाला.

इतिहास समजून घेणे हा मोठा वळण-आडवळणाचा प्रवास असतो. त्या त्या काळामधली माणसे एका प्रेरणेने चालणारी असतात. त्यांना अगदी त्या काळात विचारले तर जे उत्तर मिळेल त्यापेक्षा येणारे फलित भलते निराळे रूपडे घेऊन अवतरत असते. बऱ्याचदा ते त्यांच्या ध्यानीमनी नसते. पण प्रत्यक्षात होणारे परिणाम त्यांचा उद्देश आणि अपेक्षांची कुंपणे ओलांडून धावतो. समाजाचा इतिहास आकळायचा तर हे भान सोडून चालत नाही. हेस्टिंगच्या समोर असलेली एक मोठी समस्या काय होती? तर पदरी पडलेल्या प्रदेशाची राजवट कशी चालवायची? त्याचा कायदेकानूनी गाडा कसा सांभाळायचा? प्रजेला रुचेल असे त्याचे रूप कसे राखायचे? या प्रश्नांचा उलगडा आणि सोडवणूक म्हटले तर कायदेपंडिताची जबाबदारी. पण हाती आलेला इतिहासदत्त वारसा तरी कुठे पुरेसा परिचित होता? तो उमजून घेता घेता मूळ चौकशीला भलते नवे धुमारे फुटू लागले!

त्या धुमाऱ्यांमध्ये लपलेली कोडी होती! अनुत्तरित प्रश्न होते! प्रचलित समजांना छेद देणाऱ्या भलत्या शक्यता होत्या. नव्या कंपनी सरकार इंग्रज राज्यकर्त्यांना आपल्या ‘अडाणीपणाची’ जाण होती. त्यासाठी वेगळे आधार पाहिजेत, समज पाहिजे, याचे भान होते. ते राखले नाहीतर आपली खैर नाही हे पुरेसे उमगले होते. स्थित्यंतर कठीण होते. व्यापारी कंपनी राज्यकर्ती झाली खरी! पण व्यापाराभोवती घोंघावणारी लाचलुचपत जोमात होती. कंपनीच्या व्यवहारावर वैयक्तिक हिताची कुरघोडी बजबजली होती. कंपनीचे व्यवहार आणि नीतिमत्ता याबदल प्रश्नांची मोहोळे फुटत होती. रॉबर्ट क्लाइव्हपाठोपाठ वॉरन हेस्टिंग्जला चौकशी-अभियोगाला सामोरे जावे लागले. या जंजाळी समस्येची हेस्टिंग्जला मनोमन कुणकुण होती. हिंदुस्तानातील कायदा व्यवस्थेचे जंजाळ हाताळायला त्याने प्राच्यविद्येचा चसका असलेल्या बहुभाषा तज्ज असलेल्या सुधारणावादी व्हिग विचाराच्या तरुण वकिलाला मुख्य न्यायाधीशपद बहाल केले. त्याची भारतवर्षातली कारकीर्द भारतविद्येचा नकाशा बदलणारी ठरली. इतकी की त्याला आता जग ‘प्राच्य विद्या कैवारी’ म्हणूनच ओळखते. त्याचे नाव विल्यम जोन्स!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com