जागावाटपावरून मतभेद असल्याने आम्ही शिवसेनेसोबतची युती तोडत आहोत, अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील शिवसेना-भाजपची १९८९ पासूनची युती सप्टेंबर २०१४ च्या अखेरीस तुटली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपला शतप्रतिशतचे लक्ष्य आठवले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपाचे निमित्त करत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने युती तोडली, पण घोषणा करण्यासाठी एकनाथ खडसे यांना पुढे करण्यात आले. विधानसभेत भाजपला १२२ जागांसह अभूतपूर्व यश मिळाले; मात्र लोकसभेप्रमाणे स्वबळावर बहुमत न मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अल्पमतातील सरकार म्हणून शपथ घेतली. विधिमंडळात बहुमत सिद्ध झाले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेला एकतर्फी पाठिंबा सरकारला होता आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते होते. पण सिंचन घोटाळ्यावरून वातावरण तापवत सत्तेवर आल्याने राष्ट्रवादीची संगत नको, असा धोरणीपणा दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला पुन्हा युतीत घेऊन सत्तेत सामील होण्यास राजी केले.
युतीला पुन्हा मोठा हादरा बसला तो मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी. शिवसेनेचा जीव की प्राण असलेली मुंबई महापालिकेतील सत्ता मोदी यांच्या लोकप्रियतेचा वापर करत संपादन करायची असे भाजपने ठरवले आणि युती तुटली. या वेळी मात्र उद्धव ठाकरे यांचे मन खट्टू झाले आणि ‘‘२५ वर्षे शिवसेना युतीत सडली,’’ असे कडवट भाष्य करत यापुढे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार, असे त्यांनी जाहीर केले. महापालिकेत कशीबशी सत्ता राखण्यात शिवसेनेला यश आले. शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर फडणवीस यांनी आपले सरकार सुरळीत चालवण्यासाठी सेनेला मुंबई महापालिकेत सत्तास्थापन करण्याचा मार्ग खुला करून दिला. मुंबई महापालिकेचा धडा न विसरलेल्या उद्धव ठाकरे यांनी जानेवारी २०१८ मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव केला आणि २०१९ मध्ये पुन्हा दिल्ली काबीज करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला झटका दिला. देशात कृषीसंकटापासून ते बेरोजगारी, नोटाबंदी, जीएसटी यावरून असंतोष होता. अशा वेळी ४८ लोकसभा जागा असणाऱ्या महाराष्ट्रातून २०१४ प्रमाणे घसघशीत संख्याबळ मिळवायचे असेल तर शिवसेनेच्या मिनतवाऱ्या कराव्या लागणार, हे ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी नेटाने किल्ला लढवत, सेनेला जास्त जागा मान्य करत उद्धव ठाकरे यांची मर्जी राखली आणि युती पदरात पाडून घेतली. त्याच वाटाघाटीत विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तापदांचे व जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप होईल, असेही शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीरपणे वदवून घेतले. विधानसभा निवडणुकीत युती झाली, पण एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे उद्योग जोरात झाले. निकाल लागले आणि युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. पण संख्याबळाचे दान असे काही पडले, की शिवसेनेशिवाय भाजपला सरकार स्थापन करणे अशक्य व्हावे. त्यामुळे मातोश्रीवरील खोलीत दिलेल्या शब्दानुसार मुख्यमंत्रिपद अडीच वर्षांसाठी मिळायलाच हवे, असा आग्रह शिवसेनेने धरला. २०१४ च्या विधानसभेपासून २०१९ च्या लोकसभा-विधानसभेपर्यंत युती तुटण्यात व पुन्हा जुळण्यात फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका होती. त्याच फडणवीस यांनी बोलण्याच्या ओघात अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे ठरले नव्हते, असे विधान करून टाकले. तेच युती तुटण्यास निमित्त ठरले आणि शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत यंदा एक नवे पर्व सुरू केले.