scorecardresearch

फळमाशीचा शेतीला धोका!

यंदा कोकणातील आंबा मोठय़ा प्रमाणात फळमाशीमुळे खराब झाला आहे.

प्रमोद पाटील ppramodpatil22 @gmail.com

यंदा सर्वच पिकांवर किडींचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला. अनेक किडींनी कोणत्याही रासायनिक औषधाला न जुमानता आपले चांगलेच बस्तान बसविले आहे. यामध्ये सर्वात डोकेदुखी बनलेली कीड म्हणजे फळमाशी ! फळमाशी सध्या अंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी ठरली आहे. शेतीमधील या किडीचा धोका वरचेवर वाढत चालला आहे. अतिशय भयंकर जीवनचक्र असलेल्या आणि कमी काळात मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती होणाऱ्या या किडीने देशातील विविध अशा दीडशे फळांना आपल्या घेऱ्यात घेतले आहे. यंदा कोकणातील आंबा मोठय़ा प्रमाणात या फळमाशीमुळे खराब झाला आहे.

हवामान बदलाच्या परिणामाची झुळूक यंदा द्राक्ष, कांदा, टोमॅटो आणि मिरचीसारख्या पिकांच्या उत्पादकतेमधून दिसून आली. यंदा शेतीमधील उत्पादकता घटण्याचे मुख्य कारण ठरते ते पिकावर पडणाऱ्या किडी. वेळप्रसंगी शेतीमधील भौतिक समस्यांवर नक्की मार्ग काढता येईल. मात्र अशा नौसर्गिक समस्येवर कसा मार्ग काढणार? हा खरा प्रश्न आहे.

यंदा सर्वच पिकांवर किडींचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला. अनेक किडींनी कोणत्याही रासायनिक औषधाला न जुमानता आपले चांगलेच बस्तान बसविले आहे. यामध्ये सर्वात डोकेदुखी बनलेली कीड म्हणजे फळमाशी. फळमाशी सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी ठरली आहे. शेतीमधील या किडीचा धोका वरचेवर वाढत चालला आहे. अतिशय भयंकर जीवनचक्र असलेल्या आणि कमी काळात मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती होणाऱ्या या किडीने देशातील विविध अशा १५० फळांना आपल्या कब्ज्यात घेतले आहे.

महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशात या फळमाशीचा प्रादुर्भावर दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत अंतरराष्ट्रीय पातळीवर फळमाशीची दखल घेतली गेली आहे. कारण गेल्या काही वर्षांत बहुतांश वेलवर्गीय पिकाबरोबच सर्व प्रकारच्या फळबागांमध्येही फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. पूर्वी ही फळमाशी फक्त खरीप आणि उन्हाळी हंगामात दिसून येत होती. आता मात्र ही फळमाशी बाराही महिने दिसून येऊ लागली आहे.

फळमाशी क्वारंटाईनम्हणून जाहीर

विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फळमाशीचा प्रादुर्भाव फळांची तोडणी करण्यापूर्वीच झालेला असतो. मात्र याची लक्षणे फळ मार्केटमध्ये आल्यानंतर दिसून येतात. कधी-कधी ग्राहकांपर्यंत पोहोचल्यानंतरही याची लक्षणे दिसतात. म्हणून या फळमाशीला क्वारंटाईन कीड असेही म्हटले जाते. निर्यातीच्यावेळी ही कीड एका देशातून दुसऱ्या देशात जाते. त्यामुळे युरोप, अमेरिकेसारख्या देशात ही माशी ‘क्वारंटाईन’ म्हणून जाहीर झाली आहे. त्यामुळे या देशात फळमाशीचा प्रादुर्भाव झालेल्या कोणत्याही फळांची अथवा वेलवर्गीय भाज्यांची निर्यात होऊ शकत नाही.

नुकसान अटळ

जानकारांना फळमाशी सहज डोळय़ानेही दिसून येते. तिचा रंग पिवळसर सोनेरी असतो. ती आकाराने घर-माशीपेक्षा थोडी मोठी असते. फळाला छिद्र पाडून ती आत अंडी घालते. त्या छिद्रातून पातळ द्रव्य बाहेर येते. काही काही फळे वरून चांगली दिसतात. मात्र आतमध्ये पांढऱ्या रंगाच्या आणि डोक्याकडे निमुळत्या अशा अळय़ा असतात. या अळय़ा फळाच्या गरावर उपजीविका करतात. गरामध्येच विष्ठाही करतात. त्यामुळे फळे सडतात. फळे खाण्यायोग्य राहत नाहीत.

वेलवर्गी फळभाज्याची फळे फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे वाकडी होतात. काही फळे अकाली पक्व होतात. काही फळात अळय़ा पडतात. काही फळांना बुरशी लागते तर काही फळांवर डाग पडतात. अशी सडलेली, खराब झालेली फळे लवकर पक्व होतात आणि गळून पडतात. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते.

योग्य वेळी योग्य उपाययोजना

फळमाशीवर आजपर्यंत झालेल्या संशोधनानुसार भारतामध्ये फळमाशीच्या सुमारे २०० प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यापैकी ५ ते ६ प्रजाती पिकांना थेट नुकसान पोहोचवतात. यासंदर्भात कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रात झालेल्या सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्यात बॅक्ट्रोसेरा डॉर्सेलिस, बॅक्ट्रोसेरा झोनॅटा, बॅक्ट्रोसेरा करेक्टा व बॅक्ट्रोसेरा टाऊ या चार जाती आढळून आल्या. तर वेलवर्गीय भाज्यांवर बॅक्ट्रोसेरा कुकरबीटी ही फळमाशीची प्रजात आढळून आली. या केवळ पाच ते सहाच प्रजाती असल्या तरी देशात पिकणाऱ्या सुमारे १५० फळांसाठी उपद्रवी ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, वेगवेळय़ा फळांची फळमाशी वेगवेगळय़ा प्रकारची असते. याच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठ स्तरावर चांगले संशोधनही झाले आहे. यासाठी योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्यास फळमाशीवर नियंत्रण मिळवणे शक्य होत असल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

जैविक नियंत्रण हाच चांगला पर्याय

प्रामुख्याने फळमाशीचा प्रादुर्भाव फळभाज्या आणि फळे यांच्यावर होतो. विशेष म्हणजे हिची उत्पत्ती ही अतिशय झपाटय़ाने होत असते. नेमका पिकाच्या फळ तयार होण्याच्या अवस्थेमध्येच फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. परंतु तो दिसून येत नाही. या किडीची अळीची अवस्था फळाच्या आत असते. याच्या नियंत्रणासाठी फवारणी करावयाची ठरवली तर कीटकनाशकाचा अंश फळाच्या आतपर्यंत पोहोचू शकत नाही. फळातील अळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. उलट फवारणी केल्याने फळांमध्ये कीटकनाशकाचा अंश मात्र रहातो. अशी फळे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे फळमाशीच्या नियंत्रणासाठी रासायनिक नियंत्रणापेक्षा जैविक नियंत्रण हा एकच चांगला पर्याय असल्याचे अनुभवी शेतकरी सांगतात.

काममंध सापळा : योग्य उपायोजना

फळमाशी फळामध्ये अंडी घालण्यापूर्वीच तिचा नाश करणे किंवा तिचा जीवनक्रम खंडीत करणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी प्रभावी उपाय म्हणून कामगंध सापळय़ांचा वापर सर्रास केला जातो. आजपर्यंतच्या अनेक शेतकऱ्यांच्या अनुभवावरून फळमाशीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावणे कमी खर्चाचे आणि फायद्याचे ठरलेले आहे. दापोली येथील डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला कामगंध सापळा शेतकऱ्यांना वापरण्यासाठी सहज सोपा आहे. बहुतांश शेतकरी या पद्धतीचा सापळा उपलब्ध साहित्यापासून स्वत: तयार करतात आणि त्याचा वापर फळमाशी नियंत्रणासाठी करतात. व्यापारी तत्त्वावरील काही कंपन्यांचे अशा प्रकारचे अकर्षक कामगंध सापळे बाजारात उपलब्ध आहेत.

कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या या सापळय़ामध्ये अतिशय साधे तंत्र वापरलेले आहे. हा सापळा तयार करण्यासाठी रुंद तोंडाची पारदर्शक बाटली किंवा डब्याचा वापर केला जातो. या डब्याला टोपणापासून खाली तीन इंचावर फळमाशीला आत येण्यासाठी समान अंतरावर तिन्ही बाजूने लहान खिडक्या तयार केल्या जातात. टोपणाला मध्यभागी छिद्र पाडून त्यामध्ये बायडींग तार घातली जाते. तारेच्या मध्यभागी टोपण घट्ट बसेल अशा पद्धतीने टोपणाला खाली आणि वर पिळे मारून टोपण लावले जाते. आतील तारेच्या खालच्या बाजूला कापसाचा बोळा बसविण्याची व्यावस्था असते. तर तारेची वरील बाजू सापळा टांगण्यासाठी अकडी म्हणून वापरली जाते. त्या सापळय़ाच्या आतमध्ये तळाला पाणी किंवा कीटकनाश मिश्रीत पाणी टाकले जाते. तर कापसाच्या बोळय़ाला मिथिल युजेलॉलचे द्रावण लावले जाते. या द्रावणाच्या वासाने आकर्षित होऊन नरमाशी आत येते आणि पाण्यात किंवा द्रावणात बुडून मरते. असे याचे साधे तंत्र आहे. कालांतराने त्या कापसाच्या बोळय़ाचा वास कमी झाल्यानंतर सुमारे २० दिवसाच्या अंतराने तो बोळा पुन्हा मिथिल युजेलॉलच्या द्रावणात बुडवावा लागतो.

अशा प्रकारे शेतात सापळे लावल्यामुळे त्या परिसरातील नर फळमाशीची संख्या कमी होते. त्यामुळे मादी माशीला मिलनासाठी नरमाशी उपलब्ध होत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मादीची यौनअवस्था ही नरापेक्षा आठ दिवस जास्त असते. त्यामुळे नराच्या शोधात मादीमाशी फिरत अन्य ठिकाणी जातात. अशातही त्यांनी फळामध्ये अंडी घातलीच तर ती अफलित निघातात. त्यामुळे पुढचा जीवनक्रम रोखला जातो. अशा प्रकारे फळमाशी नियंत्रणात आणण्यासाठी कामगंध सापळय़ाची मदत मिळते.

शेतामध्ये एकरी पाच ते सहा कामगंध सापळय़ाचा वापर करवा, अशी शिफारस विद्यापीठ स्तरावर केली गेली आहे. सापळे लावताना ते सावलीत लावल्यास त्याचा जास्त काळ प्रभाव रहातो. शिवाय सापळे लावताना पिकाच्या उंचीचा विचारही केला जातो. शेतातील पिकाच्या उंचीप्रमाणे शेतात अथवा झाडांना हे सापळे टांगून ठेवावे लागतात. फळबागेत किंवा वेलवर्गीय फळभाजी पिकात फळ येण्यापूर्वी फुले येण्याच्या काळात सापळे लावणे जास्त फायद्याचे ठरते. असे कामगंध सापळे पर्यावरणपूरक असल्याने सुरक्षित असतात. त्यामुळे निर्यातक्षम उत्पादन घेणे शक्य होते. विशेषत: हे कामगंध सापळे कीटकनाशकाच्या तुलनेत स्वस्त पडतात.

फळबागेतील स्वच्छता महत्त्वाची

शेतातील अस्वच्छता हीच खरी कोणत्याही किडीला आमंत्रण दिल्यासारखेच असते. त्यामुळे फळमाशीपासून चारहात लांब रहाण्यासाठी शेतातील स्वच्छतेला महत्त्व देणे गरजेचे आहे. शेतातील खराब फळभाज्या किंवा फळे खोल खडय़ात गाडून टाकावीत. उन्हाळय़ात जमीन चांगली खोलवर नांगरून उन्हात तळून घ्यावी. त्यामुळे फळमाशीचे कोष नष्ट होतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना करणे उचीत ठरते.

फळमाशीचे जीवनचक्र

* प्रौढ नरमाशी व मादीमाशी यांचे मिलन होते.

* मिलनानंतर ५ ते १० दिवसांनंतर फळामध्ये अंडी घालते.

* अंडी घातल्यानंतर त्यातून ३ ते १० दिवसांत अळय़ा बाहेर पडतात.

* अळी ११ ते २५ दिवसांनी कोषामध्ये रुपांतरित होते.

* कोष अवस्था ८ ते ४० दिवसांची असते.

* प्रौढ माशी ४ ते ५ महिने जगते.

* एक फळमाशीची मादी जीवनकाळात पुंजक्यात ५०० ते १००० अंडी देते.

* अशा प्रकारे एका वर्षांत फळमाशीच्या ८ ते १० पिढय़ा पूर्ण होतात.

दीडशे फळे फळमाशीच्या घेऱ्यात

सर्वच फळपिकात व वेलवर्गीय फळभाज्यांत फळमाशीचा प्रादुर्भाव वाढत असला तरी केवळ सीताफळामध्ये निघणाऱ्या फळमाशीची चर्चा यंदा मोठय़ा प्रमाणात झाली. मात्र भारतातील सर्वसाधारण विविध प्रकारची १५० फळे फळमाशीच्या घेऱ्यात आली आहेत. सध्या सफरचंदापासून आंबा, द्राक्ष, केळी, पेरू, चिक्कू, डािळब, मोसंबी, जांभूळ, खारीक, ड्रॅगन फ्रुट अशा बहुतांश फळांमध्ये तर कारली, दोडका, किलगड, काकडी, तोंडली, भोपळा आदी वेलवर्गीय भाज्यांमध्ये फळमाशीचा प्रादुभाव दिसून आला आहे.

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Farmers face threat of fruit fly threats to fruit and vegetable crops zws