दिल्लीवाला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठल्याही आंदोलनाचं जत्रेत रूपांतर झालं की समजावं आंदोलन स्थिरावलं आहे. दिल्लीत सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आता असंच स्थिरावल्याचं दिसू लागलंय. आंदोलन करण्याची ऊर्मी टिकून आहे, पण आक्रोश उरलेला नाही. कोणतीही घाई दिसत नाही. पंजाब-हरियाणाच्या गावांमधून ट्रॅक्टर-बसगाड्या येतात व जातात. छोट्या सिंघू गावाला अचानक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. महामार्ग बंद असला तरी गाड्या आडवाटेनं विनातक्रार निघून जातात. सिंघू गावकऱ्यांचीही आंदोलनाबद्दल तक्रार नाही. चार-पाच किलोमीटरच्या पट्ट्यात हट्टेकट्टे पंजाबी उत्साहात वावरत असतात. हे आंदोलन इतकं संघटित आहे की, या पंजाब्यांच्या मनात आलं तर ते वर्षभरदेखील ते चालवलं जाऊ शकतं. ट्रक, ट्रॅक्टर, डिझेलचे जनरेटर, सिलेंडर, लंगरसाठी सरपणाची लाकडं, औषधांची दुकानं अगदी कपडे धुवायला वॉशिंग मशीन्सचीसुद्धा सुविधा. कपडे, पिशव्या, बॅगांपासून छोट्या-मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी थाटलेले स्टॉल्स… शेतकऱ्यांनी सिंघू सीमेवर नवा संसारच थाटलेला आहे. आंदोलनाबद्दल उत्सुकता म्हणून पाहायला येणाऱ्या लोकांची रांग लागलेली आहे. फोटोसेशन्स होताहेत, गाणी, घोषणाबाजी, मैदानी खेळ, जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट हे सगळं उत्सवी वातावरण तिथे पाहायला मिळतं आहे. आंदोलनाच्या एका टोकाला मोठा पंडाल उभा केलाय, तिथल्या व्यासपीठावर भाषणं सुरू असतात, लोक आत्मीयतेनं ऐकतात. तिथंच साखळी उपोषण सुरू आहे. हे आंदोलन डाव्या विचारांच्या लोकांनी चालवलेलं नाही, पण त्यांचा सहभाग असल्यानं कम्युनिझमवरील पुस्तकंही विकायला ठेवलेली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील तसेच आंबेडकरवादावरील पुस्तकंही पाहायला मिळतात. लोकांनी या पुस्तकांची खरेदी केली वा ना केली तरी ते या पुस्तकांमध्ये डोकावून पाहतात, काही जण ती चाळतातदेखील. या आंदोलनातील महिलांचा सहभाग अचंबित करणारा आहे. महिला आंदोलकांनी भरलेल्या बसगाड्यांचा सिंघू सीमेवर राबता असतो. पंजाब-हरियाणातील बहुतांश शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी झालेल्या असल्यामुळं या दोन्ही राज्यांतील गावागावांतून तरुण सिंघू सीमेवर गर्दी करत असतात. जितकी गर्दी अधिक तितका जोश अधिक. शेतकऱ्यांच्या आंदोलनानं गर्दी आणि जोश दोन्ही गेले दोन महिने टिकवून धरलं आहे. या ताकदीवरच शेतकरी संघटना केंद्र सरकारशी दोन हात करत आहेत!

प्रश्नोत्तरे

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची दोन दिवसांपूर्वी झालेली पत्रकार परिषद हा नववर्षातला पहिलाच वार्ताहर संवाद होता. राहुल आणि भाजपचे नेते एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सातत्याने खेळत असतात. त्यामुळे क्वचित होणाऱ्या राहुल यांच्या पत्रकार परिषदेत राहुल यांना भाजप नेत्याच्या विधानांवर प्रतिक्रिया विचारल्या जातात. त्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते हे आता राहुल यांना कळू लागलं आहे. ‘लक्ष विचलित करणारे’ (डिस्ट्रॅक्शन) प्रश्न बाजूला ठेवा, असं ते सांगतात. काँग्रेसच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार संवादात एका पत्रकारानं स्वत:हूनच सांगितलं की, ‘‘दोन प्रश्न आहेत, पण त्यातला एक ‘डिस्ट्रॅक्शन’चा आहे.’’ त्यावर राहुल यांनी उत्तर दिलं, ‘‘नको नको, ‘डिस्ट्रॅक्शन’वाले प्रश्न नकोत!’’ तरीही प्रश्न आलेच. अखेर राहुल गांधी म्हणाले, ‘‘तुम्ही सारखं सारखं नड्डा काय म्हणतात हे मला कशाला सांगता? ते काय माझे प्राध्यापक आहेत काय, की मी त्यांना उत्तर देत बसावं? उत्तरं हवी तर तुम्ही त्या प्राध्यापकांकडे जा!’’ दुसरं ‘डिस्ट्रॅक्शन’ असतं की, तुम्ही पक्षाध्यक्ष कधी बनणार? हाही प्रश्न होता, तोही त्यांनी उडवून लावला. कार्यकारिणी बैठकीतही हा प्रश्न आला होता. तिथं मात्र, गेहलोत हे राहुल यांच्या मदतीला धावले. ‘बंडखोर’ नेत्यांनी पक्षनेतृत्वाचा प्रश्न सातत्याने करून राहुल निष्ठावानांना हैराण केलेलं आहे. त्यांना उत्तर द्यायला अखेर बंडखोरांच्या पसंतीला उतरतील अशा गेहलोत यांनाच राहुल यांच्या बाजूने किल्ला लढवायला लावलं गेलं. गांधी कुटुंबातील व्यक्ती पक्षाध्यक्ष नसेल तर मुरब्बी काँग्रेसी अशोक गेहलोत या नावाला बंडखोरांना आक्षेप नाही. पण कार्यकारिणी बैठकीत गेहलोत यांनीच हल्लाबोल केल्यानं बंडखोरांचा नाइलाज झाला.

कार्यपद्धती

शेतकरी आंदोलनावर गप्पा सुरू होत्या… दोन महिने शेतकरी आंदोलन करताहेत, पण पेच सुटत कसा नाही? कुणाचं नेमकं काय चुकतंय? या गप्पा अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीपर्यंत गेल्या. मोदींनी गेल्या सहा वर्षांमध्ये घेतलेले सर्व निर्णय यशस्वी झाले, मग या वेळीच त्यांच्या हाताला यश कसं येत नाही, असा मुद्दा उपस्थित झाला. आंदोलनावर तोडगा न निघायला कदाचित मोदींची कार्यपद्धती कारणीभूत असू शकेल, या मुद्द्यावर एखाद् दोन मोदी समर्थकांनी होकारार्थी मान डोलावली. शेतकरी नेत्यांशी झालेल्या संवादांमध्ये रणनीती म्हणून पीयूष गोयल यांचा समावेश करणं किती सयुक्तिक होतं, हा कळीचा प्रश्नही आला. ज्या नेत्याची प्रतिमा उद्योजकांच्या वर्तुळात उठबस करणारा मंत्री अशी आहे, त्याच्यावर शेतकरी विश्वास ठेवतील तरी कसा, हा दुसरा प्रश्न आला. राजकीय प्रक्रियेचं भान असलेल्या नेत्याला लोकांशी चर्चा कशी करायची, त्यांचं मन कसं वळवायचं हे समजतं. मोदींच्या मंत्रिमंडळात असा नेता कोण? राजनाथ सिंह या नावावर सर्वसंमती झाली. राजनाथ हे जुन्या वळणाचे, वाजपेयींच्या भाजपमध्ये तयार झालेले नेते आहेत. त्यांच्याकडं प्रशासनाचा अनुभव आहे व त्यांच्याबद्दल अन्य पक्षीय नेत्यांनाही आदर आहे. त्यांनी मध्यस्थी केली असती तर कदाचित आंदोलन इतकं चिघळलं नसतं. हे म्हणणं मोदी समर्थकांनाही मान्य होतं. मोदींची कार्यपद्धती प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासन करण्याची आहे. त्यांनी कधी राजकीय प्रक्रियेतून समस्या सोडवलेल्या नाहीत, शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात या प्रक्रियेचा अभाव दिसतो, हेही मोदी समर्थकांनी मान्य केलं. पण त्यांचं म्हणणं होतं की, मोदी या अनुभवातून शिकतील व त्यांचं नेतृत्व अधिक व्यापक होईल.

लढाई

दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णायातील निवासी डॉक्टरांनी पहिल्यांदा करोना लसीवर शंका घेतली. तिथल्या डॉक्टरांनी दाखवलेलं धाडस केंद्राच्या अन्य सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी दाखवलं नाही. तसं झालं असतं तर कदाचित वेगळंच आंदोलन उभं राहिलं असतं. तसं करण्याचा छोटा प्रयत्नही झाला होता. काही डॉक्टरांनी अन्य रुग्णालयांतील आपल्या सहकारी डॉक्टरांशी संपर्क साधला होता. त्यांच्याशी चर्चा करून लसीला विरोध करण्याचा विषय पुढे नेता येईल का, अशीही चाचपणी झाली होती. पण कोणी विरोधाचा झेंडा हाती घेण्यास तयार नव्हतं. या रुग्णालयांमध्ये ‘कोव्हॅक्सिन’ दिली जात होती. लोकनायक रुग्णालयात ‘कोव्हिशिल्ड’ दिली जात होती. तिथंही काही डॉक्टरांना लसीबाबत शंका होती. या डॉक्टरांना एकच प्रश्न विचारला, ‘‘एम्ससारख्या मोठ्या सरकारी रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर ‘कोव्हॅक्सिन’ लस टोचून घेत आहेत आणि या लसीमुळे कोणताही धोका नसल्याचं सांगत आहेत, तर तुम्ही विरोध कशासाठी करता?’’ त्यावर, एका डॉक्टरचं म्हणणं होतं, ‘‘मोठे लोक जे काही म्हणत आहेत, ते त्यांचं मत आहे. विज्ञान कधी मतांवर अवलंबून असतं का? याच मोठ्या लोकांनी आम्हाला शिकवलंय की, मतांवर नव्हे, पुराव्याच्या आधारावर विज्ञान अवलंबून असतं. मग ही मंडळी आता शास्त्रीय दृष्टिकोन विसरा असं सांगताहेत.’’ हा डॉक्टर हतबल होता, त्यानं आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लसीवर शंका घेतली होती, पण तो एकटा पडण्याचा धोका निर्माण झाला होता. ‘‘मी एकटा किती लढणार? प्रश्न उपस्थित करण्याचं काम आम्ही केलं, आता लढाई पुढं न्यायची कशी हे काम इतरांचंदेखील आहे,’’ असं डॉक्टरचं म्हणणं होतं. ‘‘वाढीव गुण देऊन पुढच्या वर्गात ढकललेल्या विद्यार्थ्यांसारखं झालं आहे या दोन लशींचं. विद्यार्थी स्वत:च्या कुवतीवर उत्तीर्ण झाला की नाही हे ठरवायला परीक्षा तरी नीट घेतली पाहिजे, इथं परीक्षाच झाली नाही; मग विद्याथ्र्याची हुशारी तपासणार कशी? पण लोक मतं व्यक्त करताहेत, त्याला किती महत्त्व देणार?,’’ हा त्या निवासी डॉक्टरचा युक्तिवाद बिनतोड होता. पण त्याची लढाई मात्र सुरू होण्याआधीच संपली.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From chandni delhi jatra movement former congress president rahul gandhi akp
First published on: 24-01-2021 at 00:02 IST