गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षांनिमित्ताने त्यांच्या राजकारणावर झोत..
श्री. मा. भावे
महात्मा गांधींच्या थोर आणि असाधारण चरित्रातील एखाद्या प्रसंगाची निसटती आठवण झाली तरी सामान्य मनुष्याच्या मनात आशा व आदर या भावनांचे सुंदर अंकुर उद्भवतात. तुमच्या-आमच्यासारख्याच एका साध्यासुध्या आणि विकार-वासनांनी लिप्त असणाऱ्या माणसाने निश्चयाने आणि कठोर प्रयत्नांती स्वत:ची आध्यात्मिक उन्नती साधली. आणि नंतर त्यांनी संन्यास न घेता लोकजागरणासाठी समाजात राहून अथक काम केले. याबद्दल वाटणारा आदर आणि आपणही त्यांचे अनुकरण करून नेटाने प्रयत्न केल्यास महात्मापदाला जरी पोहोचलो नाही, तरी निदान अध्यात्माच्या मार्गावर काहीएक पल्ला गाठू शकू, ही आशा सामान्य माणसांच्या मनात त्यांनी निर्माण केली. देवाला लाडक्या असणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी कोणते गुण असतात याचे वर्णन गीतेत स्वत: ईश्वरानेच केले आहे. गांधीजींच्या चरित्रातील निरनिराळ्या प्रसंगांवरून हेच कळूून येते, की स्थितप्रज्ञाची बहुतेक लक्षणे त्यांच्या आचारविचारांचा अविभाज्य भाग होऊन राहिली होती.
स्वातंत्र्यलढय़ाला गांधीजींनी अशी विलक्षण कलाटणी दिली, की तोपर्यंत त्या आंदोलनापासून दूर असणारी साधीसुधी माणसेही चळवळीत हिरीरीने भाग घेऊन तुरुंगवास भोगू लागली. गांधीजींनी उपाशी माणसाला उपोषणाची दीक्षा दिली, नि:शस्त्राला अिहसेचे ‘शस्त्र’ दिले आणि दुर्बळाला सत्याग्रहाची शिकवण देऊन अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती दिली. त्यामुळेच िहदुस्थानातील लोकांनी ‘राष्ट्रपिता’ ही अजोड पदवी त्यांना दिली.
तथापि, ‘सत्य आणि अिहसा या अमूर्त व संदिग्ध संकल्पनांवर उभारलेली सत्याग्रही लढय़ाची पद्धती अतिरेकी आदर्शवादी आहे, व्यवहारी जगात सर्व प्रसंगांत तिचा वापर यशस्वी होईलच असे नाही,’ असा इशारा ज्येष्ठ राजकारण्यांनी गांधीजींच्या िहदुस्थानातील कारकीर्दीच्या सुरुवातीलाच दिला होता. (‘महात्मा गांधी’- लोकमान्य टिळकांची प्रस्तावना, पान १५). स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे टीकाकार सत्याग्रहाच्या तत्त्वज्ञानाचा कायमच उपहास करीत.
गांधीजींच्या सत्याग्रही राजकारणाला दक्षिण आफ्रिकेत सुरुवात झाली. अगदी सुरुवातीलाच त्यांना कशी ठोकर बसली ते पाहण्याजोगे आहे. दक्षिण आफ्रिकेत ट्रान्सवाल नावाचे राज्य होते. तेथील सरकारने १९०८ मध्ये असा कायदा केला की, राज्यातील सर्व िहदी रहिवाशांनी संबंधित कचेरीत जाऊन आपल्या नाव-पत्त्याची हाताच्या बोटांच्या ठशासकट नोंद करावी व अशी नोंद केल्याचे प्रमाणपत्र कायम जवळ बाळगावे. कोणाही सरकारी अधिकाऱ्याने प्रमाणपत्र पाहायला मागितले तर ते िहदी मनुष्याने दाखविले पाहिजे, नाहीतर त्याच्यावर पोलिसी कारवाई होईल. सरकारचा हेतू असा होता की, कोणाही िहदी व्यक्तीने ट्रान्सवालमध्ये अनधिकृतपणे राहू नये. हा कायदा गांधीजींना अपमानकारक वाटला आणि त्यांनी िहदी समाजाला त्याचे अपमानास्पद विशेष पटवून दिले. िहदी लोकांनी या कायद्याला ‘काळा कायदा’ असे नाव दिले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली या कायद्याच्या विरोधात सत्याग्रहाची चळवळ सुरू झाली. हा कायदा मोडून (म्हणजे नोंद न करता ट्रान्सवालमध्ये राहून) मिळेल ती शिक्षा निमूटपणे सोसायची असे या चळवळीचे स्वरूप होते. गांधीजी स्वत: तुरुंगात गेले आणि त्यांच्या मागोमाग शेकडो ट्रान्सवालवासी िहदी लोकांनी तुरुंगवास पत्करला.
ट्रान्सवालच्या सरकारातील एक प्रमुख मंत्री स्मट्स (१८७०-१९५०) याने गांधीजींसमोर तडजोडीचा मसुदा ठेवला. िहदी लोकांनी काळ्या कायद्याला शरण जाऊन नव्हे, तर स्वेच्छेने नोंदणी करावी. त्याचे िहदी लोकांना ‘स्वेच्छा-नोंद प्रमाणपत्र’ देण्यात येईल. बहुसंख्य िहदी लोकांनी स्वेच्छा-नोंद केल्यावर काळा कायदा रद्द करण्यात येईल. गांधीजी आणि त्यांचे सहकारी तुरुंगात होते. त्यांनी आपसात विचारविनिमय केला. काही सहकारी स्मट्सच्या शब्दावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. गांधीजी म्हणाले, ‘प्रतिपक्षाने वीस वेळा वचनभंग केला तरी सत्याग्रह्य़ाने एकविसाव्या वेळी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे!’ (‘सत्याग्रह इन् साऊथ आफ्रिका’- पान २४६)
इतके झाल्यावर िहदी कैद्यांनी स्मट्सच्या ठरावाला मान्यता दिली. सर्व कैद्यांना सोडून देण्यात आले. नंतर गांधीजींनी ‘िहदी लोकांनी स्वेच्छा-नोंद करून घ्यावी’ असा प्रचार करायला सुरुवात केली. काही पठाण लोकांना ही तडजोड मान्य नव्हती. त्यापकी मीर आलम नावाच्या पठाणाने तर गांधीजी स्वेच्छा-नोंद करण्यासाठी नोंदणी कचेरीत गेले असता त्यांना बेदम मारहाण केली. पुढे बहुतेक िहदी लोकांनी स्वेच्छा-नोंद केल्यानंतरही स्मट्सने काळा कायदा मागे घेतला नाही. त्यामुळे हिंदी लोकांमध्ये ‘तडजोड करून गांधीजी फसले’ असे मत तयार झाले. गांधीजींनी स्मट्सकडून पसे खाऊन तडजोड केली, असे आरोपही गांधीजींवर करण्यात आले. सारांश, गांधीजींच्या आदर्शवादामुळे राजकीय व्यवहारात बाळगावी तेवढी काळजी त्यांनी बाळगली नाही असे मानावयास जागा झाली.
गांधीजींचा भीषण शेवट ज्यांनी केला त्यांचे म्हणणे हेच होते की, ‘गांधीजींच्या आदर्शवादी आणि अतिरेकी अिहसावादी शिकवणीच्या प्रभावामुळे स्वतंत्र भारताचे सरकार सुसज्ज सन्य निर्माण करण्याकडे दुर्लक्ष करील व व्यवहारी राज्यकारभार चालणार नाही अशी खात्री वाटल्याने आम्ही त्यांचा (नाइलाजाने) खून केला.’ (‘लेट्स किल गांधी’, पृष्ठे- ७२४-२५)
थोडक्यात, सुरुवातीपासून शेवटापर्यंत आपल्या राजकीय आयुष्यात गांधीजींवर ते अतिरेकी आदर्शवादी आहेत आणि व्यवहारी राजकारणाकडे ते दुर्लक्ष करतात असा आरोप होत होता. स्वत: गांधीजींना मात्र ही टीका अजिबात मान्य नव्हती. ‘मी भ्रामक समजुतीत राहणारा माणूस नाही. मी स्वत:ला ‘व्यवहारी आदर्शवादी’ (practical idealist) समजतो.’ आपण आदर्शवादी असलो तरी व्यवहारी दृष्टी ठेवून वागतो, हे सांगताना गांधीजींनी शौकत अल्ली यांचा उल्लेख केला आहे. शौकत अल्लींना अिहसा मान्य नसली तरी त्यांची मदत व मित्रत्व आपण स्वीकारले याची त्यांनी आठवण करून दिली आहे. गांधीजींनी हे वारंवार मान्य केले आहे की, जग व जगाचे व्यवहार सत्य व अिहसा यांची कठोर कसोटी लावल्यास हिणकस असल्याचे आढळतात. त्यामुळे व्यवहारात वावरताना सत्य व अिहसा यांना काही प्रमाणात मुरड घालावी लागते. पण व्यावहारिक देवाणघेवाणीच्या बाबतीत चलाखी दाखवणारे राजकारणी व गांधीजी यांच्यात फरक असा आहे की, गांधीजी आदर्शाचे भान कधीच सोडत नाहीत. जग आदर्श स्थितीला कदाचित कधीच पोहोचणार नाही; पण म्हणून आदर्श असे काही असूच शकत नाही, हा दावा मान्य होण्याजोगा नाही. भूमितीला मान्य असणारी (म्हणजे जिला रुंदी नाही अशी) सरळरेषा जगात आढळत नाही; पण म्हणून आपण आदर्श रेषेची कल्पना सोडून देत नाही. (Gandhi : Essential Writings पृष्ठे- १४६, १५०, १७०) (कुतुहलाची गोष्ट ही की, गीतारहस्याच्या ‘सिद्धावस्था व व्यवहार’ या प्रकरणात लोकमान्य टिळकांनीदेखील हाच दाखला दिला आहे.)
खुद्द गांधीजींनी सांगितले आहे की, सत्याग्रहाची संकल्पना बोअर लढाईच्या काळात त्यांच्या मनात रुजली. दक्षिण आफ्रिकेत मुळात डच (यांनाच ‘बोअर’ असे म्हणत.) लोकांनी वसाहती स्थापल्या. नंतर इंग्रजांनी बोअर लोकांच्या वसाहतीशेजारी स्वत:च्या वसाहती थाटल्या. साहजिकच या दोन सत्तांमध्ये संघर्ष सुरू झाला. इंग्रजांना मदत करण्यासाठी िहदुस्थानातून सन्य पाठविण्यात आले. बोअर लोकांना बाहेरून मदत मिळण्याजोगी नव्हतीच. बोअर पुरुषांना आपली घरेदारे सोडून लढाईवर जावे लागले. इंग्रज सन्याने बोअर लोकांची कुटुंबे पकडून त्यांना छळछावण्यांत (concentration camps) कोंडले व त्यांचे क्रूर हाल केले. बोअर स्त्रियांनी सर्व क्लेश निर्धाराने सोसले. स्त्रियांचा छळ चालल्याच्या बातम्या इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर तेथील राजा व प्रजा यांना या लढाईची घृणा वाटली व ‘हे युद्ध ताबडतोब संपवावे’ अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे लवकरच तह होऊन लढाई संपली. हा घटनाक्रम पाहून गांधीजींची खात्री पटली की, ‘ज्या पक्षाचा छळ होत आहे, त्याने ते क्लेश प्रतिकार न करता धर्याने सहन केले तर छळ करणाऱ्या पाषाणहृदयी प्रतिपक्षालाही उपरती होते, ही सत्याग्रहाची गुरुकिल्ली आहे.’ (Satyagraha in South Africa, पृष्ठे- ३१-३२) वर आपण पाहिलेच की, गांधीजींनी स्मट्सशी केलेली तडजोड अनेक िहदी लोकांना नापसंत होती. त्यांचा युक्तिवाद असा होता : १) आधी काळा कायदा मागे घ्या, नंतर स्वेच्छा-नोंद करू, असा क्रम हवा होता; २) ‘नोंद करण्याचे नाकारून तुरुंगवास सोसायचा’ हे आपल्या लढय़ाचे सूत्र आहे. आपण स्वत:हूनच नोंद करून घेतल्यानंतर आपल्या लढय़ाचा आधारच जाईल. ३) आपण स्वेच्छा-नोंदी केल्या आणि तरी स्मट्सने काळा कायदा रद्द केला नाही तर आपण तोंडघशी पडू. ४) सध्याचा लढा आपण थांबवला तर पुन्हा नव्याने परिणामकारक लढा उभारता येणार नाही.
या आक्षेपांचा प्रतिवाद करताना गांधीजींनी सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान व व्यवहार यांची प्रभावी मांडणी केली. १) ‘कायदा मागे घ्या, नंतर स्वेच्छा-नोंद करू’ असा क्रम असायला हवा, हे बरोबर आहे. पण इथे आपण तडजोड करीत आहोत. तडजोडीत आपले तत्त्व न सोडता तपशिलाच्या बाबतीत परस्परांना जास्तीत जास्त सवलत द्यायची असते. आपला नोंद करण्याला विरोध नव्हता. काळ्या कायद्याखाली अपमानास्पद पद्धतीने नोंद करणे आपल्याला मान्य नाही. सध्याच्या तडजोडीत ते साधले आहे. सरकारचा मुद्दा होता की, ट्रान्सवालमध्ये अनधिकृत िहदी रहिवाशी नकोत. आपण स्वेच्छा-नोंद केली तर सरकारचा तो उद्देश पुरा होतो. सत्याग्रह्य़ाने अशा तडजोडीस सतत तयार राहिले पाहिजे. २) स्वेच्छा-नोंद केल्याने आपण सरकारशी लढण्याचे शस्त्रच टाकून देत आहोत, हे म्हणणे बरोबर नाही. स्वेच्छा-नोंदीचे प्रमाणपत्र सरकारी अधिकाऱ्याला दाखवणे किंवा न दाखवणे हा आपल्या मर्जीचा मामला आहे. प्रमाणपत्र दाखवण्याचे नाकारून आपण तुरुंगभरती करू शकतो. ३) स्मट्सवर विश्वास ठेवणे हे सत्याग्रही म्हणून आपले कर्तव्यच आहे. पण हा तात्त्विक भाग सोडला तरी आता स्मट्सवर विश्वास ठेवण्याला पर्याय नाही. स्मट्सची इच्छा असेल तर वचन पाळूनही तो आपल्याला फसवू शकतो. तो आता काळा कायदा मागे घेईल व नंतर पुन्हा तोच कायदा नव्याने लागू करील. त्यावेळी आपणास नव्याने लढा करावाच लागेल. ४) या तडजोडीनंतर लढा मागे घेतल्यास पुन्हा तितक्याच जोमाने नवी चळवळ उभारता येणार नाही, ही शंका व्यर्थ आहे. सध्याच्या लढय़ामुळे जे चतन्य समाजात आले आहे, त्याच्याविषयी अविश्वास दाखवणे बरोबर नाही. झालेली जागृती चिरंतन राहिली पाहिजे. तशी ती राहिली तर नवी चळवळ सुरू करणे अवघड नाही.
दक्षिण आफ्रिकेतील चळवळीचा सारा इतिहास इथे द्यायचा नाही. स्मट्सने शब्द मोडल्यानंतर िहदी लोकांनी स्वेच्छा-नोंदीच्या प्रमाणपत्रांची सार्वजनिक होळी करून पुन्हा तुरुंगभरतीची चळवळ सुरू केली. हा लढा १९१४ सालापर्यंत चालला.
ट्रान्सवालमध्ये सगळे मिळून ३००० िहदी लोक होते. (बाकीचे िहदी लोक करारावरील मजूर म्हणून काम करीत असत.) सत्याग्रहाच्या लढय़ात त्यामुळे त्याच त्याच व्यक्ती आणि कुटुंबे पुन्हा पुन्हा सत्याग्रह करून तुरुंगात जाऊ लागली. अशा लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा गांधीजींनी ‘तोल्स्तोय फार्म’ नावाचा आश्रम थाटला. त्यातून सत्याग्रह्य़ांनी समूहजीवन जगावे, ही कल्पना अमलात आली.
अन्यायाविरुद्ध नि:शस्त्र प्रतिकार करण्याची पश्चिम युरोपात जुनी परंपरा होती. अशा चळवळींना ‘passive resistance’ असे वर्तमानपत्री नाव होते. (गेल्या शतकाच्या पहिल्या दशकात स्वा. सावरकर लंडनमध्ये होते. ते ‘काळ’ या वर्तमानपत्रात ‘लंडनची बातमीपत्रे’ नावाचा स्तंभ लिहीत. त्यांनी passive resistance ला ‘रडका विरोध’ असे नाव दिले होते. सावरकरांची ही उपरोधपूर्ण बातमीपत्रे गांधीजींच्या चळवळीवर टीका करणारी आहेत असे वाटून ‘सावरकर चरित्रकथन’ या शि. ल. करंदीकर यांच्या पुस्तकात त्यांचे उतारे दिले आहेत.) ‘सत्याग्रह’ हे नाव सुचण्यापूर्वी गांधीजी आपल्या चळवळीला ‘passive resistanceहेच नाव देत. पण त्यांना passive resistance व आपली चळवळ यांत दोन फरक आढळले. एक passive resistance मध्ये िहसेचा निषेध अपेक्षित नव्हता; दोन- passive resistance ही दुर्बलांनी सबलांचा केलेला प्रतिकार- असे या चळवळीचे रूप होते. याउलट, गांधीजींच्या चळवळीत िहसेला अजिबात स्थान नव्हते आणि चळवळ करणारा पक्ष स्वत:ला सबळ समजत असे. म्हणून गांधीजींनी चळवळीच्या आपल्या पद्धतीला ‘सत्याग्रह’ असे नाव दिले.
अिहसा व सत्य या दोन संकल्पना ‘सत्याग्रह’ या शब्दाशी जडलेल्या आहेत. या संकल्पना बंदिस्त किंवा व्याख्येने बांधून टाकलेल्या नाहीत. निरनिराळ्या संदर्भातून आपला आशय समृद्ध करीत त्या संकल्पना विस्तारत गेलेल्या आहेत. त्यामुळे या दोन संकल्पनांबाबत गांधीजींनी केलेल्या लिखाणात विसंगतीही दिसून येते. या आरोपाला उत्तर देताना गांधीजींनी म्हटले होते, ‘एखाद्या प्रश्नाविषयी लिहिताना त्यावर मी पूर्वी काय म्हटले होते ते आठवण्याचे कष्ट मी घेत नाही. पूर्वी जे लिहिले त्याच्याशी नंतरचे लिखाण सुसंगत असलेच पाहिजे असा माझा कटाक्ष नसतो. त्या प्रश्नासंबंधी त्या, त्या वेळी जे सत्य मला जाणवले त्याचे मी विवरण करतो. माझी सत्यापासून सत्याकडे अशी प्रगतीपर वाटचाल असते.’ (Gandhi : Essential Writings, pg. 440)
अिहसा म्हणजे दुसऱ्याला कोणतीही इजा (शारीरिक किंवा मानसिक) न पोहोचवणे, असे आपण समजतो. गांधीजींचे मित्र अंबालाल साराभाई यांच्या कापड गिरणीत अनेक मोकाट कुत्री धुमाकूळ घालू लागली तेव्हा ती कुत्री मारून टाकण्यास गांधीजींनी साराभाई यांना अनुमती दिली. त्यावेळी मोठाच वाद निर्माण झाला. त्या वादात गांधीजींनी पुढील खुलासा केला : ‘माझ्या शरीराला इजा पोचली तरी चालेल, पण इजा करणाऱ्याला मी मारणार नाही,’ अशी भूमिका एखादा सिद्धपुरुष घेऊ शकेल. पण अशा परमावस्थेला पोहोचलेल्या माणसांच्या जगात आपण राहत नाही. आपल्याला हे मान्य केले पाहिजे की, प्रत्येकाला (अ) स्वत:चे रक्षण करण्यासाठी, (आ) किंवा आपल्यावर विसंबून असणाऱ्या जीवांचे रक्षण करण्यासाठी, (इ) किंवा एखाद्यावर प्राणांतिक हल्ला होत असता त्याचा बचाव करण्यासाठी हत्या करावी लागते. त्यापकी (इ) या विकल्पात िहसा होतच नाही असे म्हणावे लागेल. पहिल्या दोन विकल्पांत िहसा नक्कीच आहे. म्हणून ज्याला निरपवाद अिहसेकडे प्रगती करावयाची आहे त्याने ही अटळ िहसा कमीत कमी कशी राहील याची काळजी घेतली पाहिजे. यावरून हे स्पष्ट होते की, निरपवाद अिहसा ही आदर्श स्थिती आहे. मात्र, आपले व्यवहारी जग हे आदर्शापासून दूर असल्याने तेथील वर्तनात आपल्याला आदर्श स्थितीचे भान ठेवून, पण िहसा अपरिहार्य आहे हे समजून वागावे लागते.
आपल्याला माहीत आहे की, रौलेट कायद्याविरुद्ध केलेली चळवळ आणि त्यानंतरचे असहकार आंदोलन हे दोन्ही लढे त्यात िहसाचाराच्या घटना घडताच गांधीजींनी थांबवले आणि प्रायश्चित्त म्हणून उपोषणही केले. नंतर मात्र आपल्या या अिहसेच्या आग्रहाला त्यांनी मुरड घातली. १९२६ साली एका अनुयायाला पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते, ‘जर माझी खात्री पटली की उद्भवलेल्या िहसाचाराचा चालू लढय़ाशी काही संबंध नाही व िहसाचारात काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग नाही, तर असे कितीही िहसक प्रसंग घडले तरी आंदोलन पुढे चालविण्यास मी कचरणार नाही. (Gandhi : Prisoner of Hope, 1992 , pg. 191)
यावरून हे कळून येईल की, राजकीय व्यवहारात गांधीजी आदर्श भूमिकेपासून दूर जाण्यास तयार असत. अिहसा या संकल्पनेच्या अनेक पायऱ्या आहेत. सिद्धावस्थेस पोहोचलेल्या मनुष्याने अिहसेच्या ज्या पायरीवर वावरावयाचे ती अिहसेच्या सोपानाची सर्वोच्च पायरी होय. बाकीच्यांनी आपली सिद्धावस्थेकडे ज्या प्रमाणात प्रगती झाली असेल, त्या प्रमाणाशी अनुरूप अशा पायरीवर राहावे. गांधीजींचे अिहसाविषयक लिखाण वाचताना ते कुठल्या पायरीवरून लिहीत आहेत हे समजून घ्यावे लागते. ते जेव्हा आदर्शवादी भूमिकेतून लिहितात, तेव्हा ते अतिशय टोकाची भाषा वापरतात. एरवीही सामान्य व्यवहारातसुद्धा ठाम आणि टोकाची भूमिका घेऊन लिहिण्याची गांधीजींना सवय होती. उदा. १९१६ साली गांधीजींना बेळगावच्या प्रांतिक परिषदेला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण होते. त्याला पाठवलेल्या उत्तराच्या तारेत गांधीजींनी म्हटले होते, ‘आता फक्त मृत्यूच मला बेळगावला येण्यापासून थांबवू शकेल.’ अिहसेसारखा गांधीजींच्या जिव्हाळ्याचा विषय असला की गांधीजींना निकराची भाषा वापरण्याची हौस पुरवून घेता येत असे. होऊन गेलेल्या किंवा होऊ घातलेल्या घटनेविषयी बोलताना गांधीजी आदर्शवादाच्या पायरीवरून आपली मते मांडत. साहजिकच गांधीजींच्या (िहदुत्ववादी) विरोधकांना गांधीजींवर उपरोधिक टीका करण्याची संधी मिळे.
याबाबत दोन उदाहरणे पाहण्यासारखी आहेत. बंगाल सरकारने अनेक राजकीय कार्यकर्त्यांना पकडून ठेवले होते. त्या राजबंद्यांनी आपली सुटका व्हावी यासाठी उपोषण सुरू केले होते. राजबंद्यांना पािठबा देण्यासाठी नागपूरमध्ये कायदेभंगाची चळवळ झाली. गांधीजींना ही चळवळ पटली नव्हती. तिच्याविषयी गांधीजींनी लिहिले होते, ‘मी आता सांगतो तो कायदेभंग अगदी एकटी व्यक्तीदेखील प्रभावीपणे करू शकेल. नि:शस्त्र सत्याग्रहींच्या तुकडीने नागपूरपासून चालत कलकत्त्याच्या गव्हर्नरच्या राजवाडय़ापर्यंत जावे. जिथे त्यांना अडवतील तिथे थांबावे आणि मागणी करावी की, राजबंद्यांना सोडा किंवा आम्हाला अटक करा. तिथे पोलिसांनी सत्याग्रहींना लाथांनी तुडविले तरी त्यांनी निमूटपणे व प्रतिकार न करता छळ सोसावा. अटक होईपर्यंत जागेवरून हलू नये. असे थोडे सत्याग्रही जरी मिळाले तरी त्यांच्यामुळे सगळे राजकीय वातावरण थोडय़ा काळात बदलून जाईल.’
गांधीजी आदर्शवादी भूमिकेतून हे सर्व लिहीत होते, हे नंतरच्या वाक्यातून स्पष्ट होते.. ‘‘मला लोक विचारतील की, मग तुम्हीच याचे उदाहरण का घालून देत नाही? माझे उत्तर असे की, अशी मर्दुमकी दाखविण्याइतकी शुद्धता माझ्या ठिकाणी नाही.’’ (Young India- 14/7/27) तथापि, या आदर्शवादी भूमिकेची बोचरी थट्टा करणारा लेख ‘श्रद्धानंद’ या साप्ताहिकात ११/८/२७ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला होता. तो मुळातूनच वाचला पाहिजे. (‘गांधी गोंधळ’- पहिलाच लेख)
नंतर १९४० साली दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर अमेरिकेतील एका मनुष्याने गांधीजींना विचारले, ‘समजा, स्वतंत्र िहदुस्थानने सत्याग्रह हेच (संरक्षणाचे) धोरण ठरवले, तर तो परकीय आक्रमणापासून आपले संरक्षण कसे करील?’ त्यावर उत्तर देताना गांधीजी म्हणतात, ‘अशा प्रसंगात अिहसक देशाला दोनच पर्याय आहेत. त्यांनी देश आक्रमकाला ताब्यात घेऊ द्यावा, पण त्याच्याशी असहकार करावा. दुसरा- त्यांनी नि:शस्त्रपणे आक्रमकाच्या तोफखान्यापुढे बळी जावे. शत्रूला जेव्हा स्त्री-पुरुषांच्या अगणित रांगा शरण न येता मरण पत्करत आहेत अशा दृश्याला सामोरे जावे लागेल, तेव्हा आक्रमण करणाऱ्याची इच्छाशक्ती कोलमडून पडेल.’(हरिजन, १३/४/१९४०) इथेही हे स्पष्ट आहे की, गांधीजी आदर्श व अिहसक राष्ट्राच्या प्रतिकाराचे काल्पनिक चित्र रंगवीत आहेत.
यावरून कळून येईल की, गांधीजींच्या अिहसेच्या तत्त्वाचा व्यावहारिक राजकारणाच्या दृष्टीने विचार करताना त्यांची केवळ आदर्शवादी भूमिका लक्षात घेणे एकांगीपणाचे होईल. त्यावेळी या आदर्शवादाला गांधीजी कशी मुरड घालीत तेही पाहावे लागेल.
वर जे अिहसेविषयी लिहिले आहे तेच, गांधीजींचे दुसरे तत्त्व- ‘सत्य’ याची चिकित्सा करताना लक्षात ठेवावे लागेल. अिहसेच्या जशा अनेक पायऱ्या आहेत तशाच सत्याच्याही अनेक परी आहेत. स्थूलमानाने पाहावयाचे झाले तर ‘सत्य’ या संकल्पनेच्या तीन बाजू सांगता येतील : ऐहिक, आध्यात्मिक आणि ईश्वरी योजना. ऐहिक बाबतीत एखाद्या विधानाचा वस्तुस्थितीमध्ये पडताळा घेता येतो. तसा पडताळा मिळाला तर ते विधान ऐहिक पातळीवर सत्य आहे असे समजले जाते. अर्थात, सकृत्दर्शनी मिळालेला पडताळा चुकीचाही असू शकतो. गांधीजींना याचा अनुभव त्यांनी १९३९ साली राजकोट संस्थानाविरुद्ध चळवळ केली तेव्हा आला. संस्थानिकाने असे मान्य केले होते की, प्रजेला ज्या राजकीय सुधारणा द्यावयाच्या त्यांचा आराखडा ठरविण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल. परंतु संस्थानिक अशी समिती नेमण्यास टाळाटाळ करू लागला. संस्थानिकाच्या या असत्य वर्तनाच्या विरोधात गांधीजींनी फेब्रुवारी १९३९ मध्ये उपोषण सुरू केले. तेव्हा व्हाइसरॉय लिनलिथगो याने हे प्रकरण मुख्य न्यायाधीशाकडे सोपवले. न्यायाधीशाने ‘समिती नेमली पाहिजे’ असा निर्णय दिला. गांधीजींनी उपोषण संपवले. नंतर अशा समितीत जहागीरदार, व्यापारी, हरिजन, इतर प्रजाजन यांचे प्रतिनिधी किती प्रमाणात असावेत, याविषयी इतके कडवट वाद झाले की गांधीजी त्रासून गेले. त्यांनी संस्थानिकाला सांगितले की, ‘समिती नेमण्याच्या वचनातून मी तुम्हाला मुक्त केले आहे!’ सारांश, ‘संस्थानिक वचन पाळत नाहीत’ याचा सकृत्दर्शनी आलेला पडताळा विश्वास ठेवण्याजोगा नव्हता, हे स्पष्ट झाले. (Gandhi- Prisoner of hope, pg. 293-94)
एखादे वर्तन वरवर पाहता खोटेपणाचे वाटले तरी त्याची नतिक बाजू विचारात घेतल्यास ते वर्तन समर्थनीय ठरू शकते. याचे उदाहरण १९३७ साली राजनिष्ठेची शपथ घ्यावी की न घ्यावी, असा प्रश्न आला असता गांधीजींनी जो निर्णय दिला त्यावरून कळून येते. तेव्हा प्रांतिक विधानसभांच्या निवडणुका होत्या आणि त्या लढविण्याचे काँग्रेसने ठरवले होते. काँग्रेसच्या तिकिटावर ‘गांधी सेवा संघा’च्या कार्यकर्त्यांनी निवडणुका लढवाव्यात असा प्रस्ताव आला. गांधीजींचे जवळचे अनुयायी किशोरलाल मश्रूवाला यांनी असा मुद्दा काढला की, ‘निवडून आलेल्या उमेदवाराला राजनिष्ठेची शपथ घ्यावी लागेल व हा खोटेपणा होईल.’ यावर गांधीजींनी फार मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले, ‘यह किशोरलाल तो धर्मराज है. हर समस्या इसके सामने धर्मसंकट के रूप में ही आती है. लेकीन मं तो महात्मा भी हूं. और ये लोग भूलते है, की मं बारीस्तर भी रह चूका हूं. कुछ समस्यायें, कुछ प्रश्न नतिक होते है और कुछ केवल कानूनी या वैधानिक होते है. यह राजनिष्ठा की शपथ नतिक नहीं है, संवैधानिक है. इसलिये वह शपथ लेने में हर्ज नहीं है.’ (‘मनीषी की स्नेहगाथा’, पान ७२-७३)
(स्वा. सावरकरांच्या माफीनाम्यावरून कित्येक लोक त्यांच्यावर टीका करतात. त्यांनी नतिक व संवैधानिक यांत गांधीजींनी केलेला फरक लक्षात घेतला पाहिजे.)
ऐहिक बाबतीत वस्तुस्थिती समजणे किंवा वस्तुस्थितीचे यथार्थ आकलन होणे हे किती अवघड असते याचा प्रत्यय आपण वर्तमानपत्रांतून ज्या परस्परविरोधी बातम्या येतात त्यांच्यावरून रोज घेतच असतो. त्यावरून हे कळून येते की, ऐहिक सत्य हीसुद्धा एक हुलकावणी देणारी संकल्पना आहे. त्यामुळेच सत्याची अधिक वरची संकल्पना सत्याग्रही मानतो. तिला ‘आध्यात्मिक सत्य’ असे म्हटले पाहिजे. आध्यात्मिक सत्याचा वस्तुस्थितीपेक्षा श्रद्धेशी निकटचा संबंध असतो. गांधीजींचे उदाहरण घेऊन बोलायचे तर विश्वावर ज्या नियमावलीची सत्ता चालते त्या नियमावलीचा कर्ता हाच परमेश्वर होय, असे गांधीजी मानत. (Gandhi: Essential writings, pg.71) मनुष्याचा आत्मा हा शरीरात कोंडलेला असतो व त्याला व्यवहारातील अनेक अशुद्धे चिकटलेली असतात. मनुष्याने व्रतस्थ राहून जाणीवपूर्वक ही अशुद्धे धुऊन टाकावयाची असतात. गांधीजींच्या रोजच्या प्रार्थनेत अशा ११ व्रतांचा उल्लेख येत असे. अर्थात, प्रत्येक व्रताच्यादेखील निरनिराळ्या पातळ्या अनुभवाला येतात. उदा. ब्रह्मचर्य हे व्रत घेतले तर त्याच्या किती पायऱ्या होतात ते पाहू. गांधीजींनी १९०६ साली ब्रह्मचर्याची शपथ घेतली. पत्नीच्या अनुमतीने त्यांनी असे ठरवले की, इथून पुढे शरीरसंबंध ठेवावयाचा नाही. पण ही पहिली पायरी झाली. गांधीजींचे मत असे होते की, ब्रह्मचाऱ्याच्या मनात कामभावनाही येता कामा नये. १९३९ साली एकदा त्यांच्या मनात अशी भावना निर्माण झाली तेव्हा त्यांनी ‘हरिजन’मध्ये लेख लिहून कबुली दिली व सार्वजनिक माफी मागितली. पुढची पायरी म्हणजे ब्रह्मचाऱ्याचे वर्तन इतके पवित्र असले पाहिजे की त्याच्या सहवासातील कोणाही व्यक्तीला ब्रह्मचाऱ्याविषयी आसक्ती वाटता कामा नये. यापुढची मजल म्हणजे ब्रह्मचाऱ्याच्या मनातील आपण किंवा समोरची व्यक्ती स्त्री किंवा पुरुष आहोत ही भावनाही नष्ट झाली पाहिजे. अखेरच्या काळात गांधीजींना असे वाटत होते की, िहदू-मुसलमानांतील िहसाचार आपल्या हातून संपत नाही याचे कारण आपल्या ब्रह्मचर्यात काहीतरी खोट आहे.
प्रत्येक व्रताची जितक्या उंचीपर्यंत उपासना केली जाते तितक्या प्रमाणात आत्मा शुद्ध होतो आणि परमात्म्याच्या जवळ जातो. जितका आत्मा शुद्ध असेल तितके त्याचे सामथ्र्यही वाढते. त्यालाच गांधीजींच्या भाषेत ‘आत्मबल’ (soul force) असे म्हणतात. आत्म्याची टप्प्याटप्प्याने शुद्धता वाढत जाणे याला ‘आत्मोन्नती’ असे म्हणतात. गांधीजींच्या दृष्टीने जी कृती आत्मोन्नतीला उपयोगी आहे ती ‘सत्य’ होय. गांधीजींनी आत्मकथेला ‘सत्याचे प्रयोग’ असे नाव दिले, त्याचे कारण हेच, की आपली प्रत्येक कृती आत्मोन्नतीच्या निकषावर तपासून घेत गांधीजी पुढे जात.
एखादी कृती सत्याला धरून आहे की नाही, हे तपासण्याचा तिसरा निकष म्हणजे ‘ईश्वरी योजना’! गांधीजींची ‘ईश्वर’ या कल्पनेवर श्रद्धा होती, हे आपण पाहिले आहे. ईश्वराने विश्वाची व्यवस्था लावणारी एक नियमावली तयार केली आहे, याही कल्पनेला त्यांची मान्यता होती. या दोन कल्पनांची सांगड घातली तर असे निष्पन्न होते की, कोणतीही घटना ईश्वराने ठरविलेल्या योजनेला अनुसरून होते. त्या घटनेशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या इच्छेला किंवा कर्तृत्वाला ती घटना घडून येण्याच्या संबंधात किरकोळ महत्त्व असते. गीतेच्या अकराव्या अध्यायात कृष्ण अर्जुनाला सांगतो की, ‘मी मृत्यू असून लोकांचा संहार करण्यासाठी अवतरलो आहे. तू काही केले नाहीस तरी सन्याच्या वेगवेगळ्या तुकडय़ांत असणारे योद्धे मरणारच आहेत!’ म्हणजे ‘तू केवळ साधन किंवा निमित्त आहेस. काय होणार आहे ते ठरलेलेच आहे.’ गांधीजींना गीतेची ही शिकवण मान्य होती. त्यांनी म्हटले आहे, ‘आपण ईश्वराची साधने आहोत. आपला उद्देश कशाने साध्य होईल, हे आपल्याला कळत नाही. (आपले काम होण्यासाठी लागणाऱ्या) साधनांची आपल्याला माहिती असणे पुरेसे आहे. ही साधने शुद्ध असतील तर आपले कार्य यशस्वी होते.’ (Satyagrah in South Africa, pg. 408) सारांश, ईश्वरी योजनेत बसणारे जर आपले उद्देश असतील व आपली साधने शुद्ध असतील तर आपले उद्देश सिद्धीस जातात. म्हणूनच ईश्वरी योजनेच्या स्तरावर आपण सत्याची व्याख्या अशी करतो की, आपली कृती आणि तिचे साध्य ईश्वरी योजनेला अनुसरून असेल तर ती ‘सत्य’ व एरवी ‘असत्य’! उदा. गांधीजी ‘स्वराज्य’ हे ‘सत्य’ आहे असे म्हणत. याचा अर्थ स्वराज्य हे ईश्वराने ठरविलेल्या योजनेला धरून आहे. मात्र, ते मिळविण्याची साधने शुद्ध म्हणजे अिहसापूत असायला हवीत.
इथे अर्थातच मोठी अडचण अशी आहे की, ‘ईश्वराची योजना’ आपल्याला कळणार कशी? आपली परंपरा असे मानते की, व्रतस्थ राहून ज्याचा आत्मा शुद्ध झाला आहे अशा सिद्धावस्थेला पोहोचलेल्या मनुष्याला ‘ईश्वराच्या मनोगता’ची कल्पना येते. भारतातील क्षत्रियांचा संहार होणार आहे, ते विनाशाच्या कडय़ाच्या टोकाला उभे आहेत याची कल्पना कृष्णालाच नव्हे, तर भीष्माचार्यानाही आली होती, असे ‘उद्योग पर्वा’वरून दिसते. तेव्हा हे मान्य केले पाहिजे की, फार मोठे स्थित्यंतर (उदा. साम्राज्यवादी शक्तींशी आत्मविश्वासाने लढण्यासाठी सत्याग्रहशास्त्र वापरणे.) घडून येणार असेल तर कोणा सिद्धपुरुषाला त्याचा सुगावा लागणे शक्य आहे.
आता पुढचा प्रश्न असा की, समजा, गांधीजींना सत्याग्रहशास्त्राचा शोध लागला तरी त्या शास्त्राचा अवलंब करणारे हजारो सत्याग्रही कोणत्या विश्वासावर लढय़ात उतरतील? गांधीजींवर तोल्स्तोय (१८२८-१९१०) याच्या शिकवणीचा खूप प्रभाव पडला होता. तोल्स्तोयने मनुष्यजातीच्या उन्नतीचे तीन स्तर मानले होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मनुष्यजात ‘सामाजिक जीवना’च्या स्तरावर पोहोचली होती व लवकरच तिची उत्क्रांती ‘धार्मिक जीवना’च्या स्तरावर होणार होती. हे परिवर्तन कसे घडून येणार याचा खुलासा करताना तोल्स्तोय सांगतो, ‘थोडय़ा लोकांना नव्या सत्याचा (किंवा ईश्वरी योजनेचा) शोध लागतो. या शोधाचा प्रसार सुरुवातीला अगदी दमादमाने होतो. या प्रसाराच्या ओघात एक मुक्काम असा येतो की, समग्र समाज अचानकपणे त्या शोधाची सत्यता मान्य करतो. ज्यांनी नवा शोध लावला आणि आपल्या अंगी बाणवला, त्यांच्यावर विश्वास ठेवून समाज नवीन शोधाला मान्यता देतो.’ (Mahatma Gandhi : The early phase, pg. 692)
सत्य आणि अिहसा ही सत्याग्रहाचे वेगळेपण स्पष्ट करणारी तत्त्वे आहेत. या तत्त्वांचे आदर्श रूप गांधीजींनी वारंवार व निकराच्या भाषेत मांडले आहे. तथापि, गांधीजींना याची पूर्ण जाणीव होती की, संपूर्ण समाज आदर्श स्थितीला पोहोचेल तेव्हाच ही तत्त्वे निरपवाद स्वरूपात व्यवहारात आणता येतील. यासाठीच गांधीजींनी आदर्शापासून व्यवहारापर्यंत अनेक स्तर कल्पून प्रत्येक स्तरावर या तत्त्वांचा कशा प्रकारे अवलंब करता येईल याची उदाहरणे आपल्या लिखाणातून आणि वर्तनातून घालून दिली होती.
गांधीजींनी काँग्रेसशी आपले ज्या प्रकारचे संबंध ठेवले होते, त्यांचा अभ्यास केला असता गांधीजी व्यवहारी राजकारणात कशा प्रकारची नीती वापरत ते वेधकपणे कळून येते.
गांधीजी व काँग्रेस यांच्यातील संबंधांचा तपशीलवार अभ्यास करावयाचा म्हटला तर िहदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीच्या एका मोठय़ा कालखंडाचा इतिहास द्यावा लागेल व या लेखाच्या चौकटीत ते शक्य नाही. इथे मी गांधीजी व काँग्रेस यांची जवळीक ज्यामुळे झाली त्या असहकार चळवळीची व त्यांच्यातील संबंध ज्यामुळे दुरावले त्या फाळणीच्या राजकारणाची थोडक्यात चिकित्सा करणार आहे. तीही दोन मुद्दय़ांच्या संदर्भात : गांधीजींना दोन्ही बाबतींत अपेक्षित असणारी आदर्श स्थिती व व्यावहारिक राजकारणाशी जुळवून घेताना त्यांनी दाखवलेली लवचीकता!
गांधीजी १९१५ च्या जानेवारीत दक्षिण आफ्रिकेतून िहदुस्थानात परतले. तरी त्यांनी लगोलग काँग्रेसच्या संघटनेत प्रामुख्याने भाग घेतला नाही. ते काँग्रेसच्या परिघावरच होते. त्यांनी काही स्थानिक चळवळी केल्या. १९१९ सालच्या एप्रिलमध्ये इंग्रज सरकारने ‘रौलट कायदा’ नावाचा जुलमी कायदा केला. त्याच्या विरोधात गांधीजींनी ‘सत्याग्रह सभा’ नावाची संस्था स्थापून कायदेभंगाची व्यापक चळवळ केली. या चळवळीत मुंबई, अहमदाबाद व पंजाबमध्ये मोठा िहसाचार झाला. पंजाबात तर सरकारने लष्करी कायदा लावला. गांधीजींनी १८ एप्रिल रोजी कायदेभंगाची चळवळ पश्चात्तापपूर्वक मागे घेतली. ‘माझी पर्वताएवढी चूक झाली..’ अशी कबुली त्यांनी दिली.
रौलेट कायद्याविरोधी चळवळ असफल झाली तरी त्यामुळे गांधीजी काँग्रेसच्या वर्तुळाच्या केंद्राजवळ पोहोचले. काँग्रेसने ‘पंजाबातील अत्याचारांची चौकशी समिती’ आणि ‘काँग्रेस घटना समिती’ या दोन महत्त्वाच्या समित्यांवर त्यांची नेमणूक केली. ‘आता माझा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला’ असा समाधानाचा उद्गार गांधींनी काढला. (आत्मकथा, प्रकरण ३८) गांधीजींनी तयार केलेल्या घटनेमुळे काँग्रेस ही वर्षभर कार्य करणारी, सुसंघटित व देशव्यापी संघटना झाली.
या सुमारास िहदी मुसलमानांनी ‘खिलाफत समिती’ स्थापन करून सरकारविरोधी चळवळ चालू केली होती. तुर्कस्थानचा सुलतान हा इस्लामचा प्रमुख राहिला पाहिजे अशी या समितीची मागणी होती. गांधीजी या चळवळीत सामील झाले. जून १९१९ मध्ये ‘खिलाफत परिषद’ दिल्लीत भरली होती. तेथे गांधीजींनी सरकारशी ‘अिहसापूर्वक असहकार’ अशी चळवळीची पद्धत ठरवली. खिलाफत समितीच्या नेत्यांना अिहसेविषयी फारसा जिव्हाळा नव्हता. पण धोरण म्हणून अिहसा स्वीकारण्यास ते तयार झाले. पुढे काँग्रेसने कलकत्ता (सप्टेंबर १९२०) व नागपूर (डिसेंबर १९२०) या अधिवेशनांत असहकाराचा ठराव मंजूर केला. खिलाफतीबाबत झालेला अन्याय, पंजाबमधील अत्याचार यांचा निषेध आणि स्वराज्य नाकारणे या अन्यायाविरुद्ध ही चळवळ होणार होती.
गांधीजींच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ही चळवळ टप्प्याटप्प्याने वाढत जाणार होती. १) सुरुवात सरकारने दिलेल्या पदव्या व सन्मान परत करून होणार होती. २) इंग्रज सरकारने १९१९ साली देशाच्या राज्यकारभारात नवीन सुधारणा केल्या होत्या. केंद्रात व प्रांतात विधिमंडळे स्थापून तेथे लोकांचे प्रतिनिधी निवडून यावेत व त्यांनी राज्यकारभारावर नियंत्रण ठेवावे अशी तरतूद केली होती. या निवडणुकांवर काँग्रेसने बहिष्कार टाकावा- म्हणजे निवडणुकांना उमेदवार उभे करू नयेत व मतदारांनी मतदान करू नये- ही नंतरची पायरी होती. ही गोष्ट काँग्रेसमधील अनेकांना मान्य नव्हती. ३) सरकारी व सरकारी मदतीने चालणाऱ्या शिक्षणसंस्थांवर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी बहिष्कार टाकावा व वकील आणि अशिले यांनी सरकारी न्यायालयांच्या कामात भाग घेऊ नये, हा पुढचा कार्यक्रम होता. ४) परदेशी वस्तू, मुख्यत: कापड लोकांनी वापरू नये व स्वदेशी वस्तू वापरून देशी उद्योगांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले गेले होते. ५) शेवटची पायरी म्हणजे सरकारी कर भरणे बंद करून सरकारची कोंडी करावी.
असहकाराच्या चळवळीची ही रूपरेषा पाहता असे स्पष्ट होते की, या चळवळीचे आदर्श स्वरूप म्हणजे परकीय सरकारला समांतर अशी नवी व्यवस्था उभी करणे हे होते. सरकारकडून राज्यकारभारात लोकप्रतिनिधींना अधिक सहभाग मिळावा व प्रजेला नवीन सवलती प्राप्त व्हाव्यात असे आजवरच्या चळवळींचे उद्देश असत. आता गांधीजी सांगत होते की, सरकारकडे पूर्ण दुर्लक्ष करून लोकांनी स्वत:चे शासन निर्माण करावे. ही विचारसरणी क्रांतिकारक होती. ‘शिक्षणसंस्थांवर बहिष्कार टाका’ याचा अर्थ ‘स्वत:च्या पशावर निर्वाह करणाऱ्या स्वतंत्र शिक्षणसंस्था स्थापन करा’; ‘सरकारी न्यायालयांकडे जाऊ नका’ याचा परिणाम ‘स्वत:च्या न्यायपंचायतींचे गठन करा’ हा होणार होता. अखेर सरकारी नोकऱ्या सोडा व कर देणे बंद करा, इथे या चळवळीची परिणती होणार होती. जानेवारी १९२२ मध्ये गांधीजींनी गुजरातमधील बारडोली तालुक्यात शेतसारा बंदीची चळवळ करण्याची चोख तयारी केली होती. इतक्यात ५ फेब्रुवारी १९२२ रोजी चौरीचौरा येथे भीषण िहसाचार झाला व गांधीजींनी ८ फेब्रुवारीला चळवळ स्थगित केली. १२ फेब्रुवारीला काँग्रेस कार्यकारिणीने या स्थगितीला मान्यता दिली. त्यानंतर गांधीजींना अटक झाली व राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांची शिक्षा झाली.
चौरीचौराचा िहसाचार हे चळवळीच्या शेवटाचे निमित्त झाले. परंतु चळवळीची वाटचाल निरपवादपणे सफल होत होती असे म्हणता येणार नाही. काँग्रेसने व खिलाफत समितीने निवडणुकांवर बहिष्कार टाकला खरा; पण निवडणुका झाल्या आणि निर्वाचित प्रतिनिधींनी प्रांतांमध्ये मंत्रिमंडळे स्थापन केली. सरकारी शिक्षणसंस्था व न्यायालये यांच्यावरचा बहिष्कार अगदीच थोडय़ा प्रमाणात अमलात आला व जनतेने स्थापलेल्या शिक्षणसंस्थांचा लवकरच ऱ्हास झाला. गांधीजी तुरुंगात गेल्यानंतर काँग्रेसमधील एका गटाने ‘स्वराज्य पक्ष’ या नावाखाली निवडणुका लढवल्या व चांगले यश मिळवले. म्हणजे असहकाराच्या चळवळीच्या मुख्य कार्यक्रमाला इथे निरोप देण्यात आला. यावरून असे म्हणता येईल की, गांधीजींचा आदर्शवादी असहकार काँग्रेसला व िहदी जनतेला पेलवला नाही.
तथापि, दुसऱ्या बाजूने पाहिल्यास या अयशस्वी आंदोलनाने देशाला स्वराज्याच्या दिशेने खूपच पुढे नेले होते. पहिले म्हणजे- सरकारी शिक्षण व सरकारी न्यायालये यांच्या मायाजालातून या चळवळीने लोकांना बाहेर काढले होते. आपण स्वत:च्या स्वतंत्र शिक्षणसंस्था स्थापू शकतो असा विश्वास लोकांना वाटू लागला होता. दुसरे असे की, देशसेवेला आजन्म वाहून घेणारे, वाटेल तेव्हा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवणारे, गरिबीत आनंद मानणारे असे देशसेवक निर्माण झाले व त्यांच्या निर्वाहाची जबाबदारी समाजाची आहे असे समाज मानू लागला. सतत आंदोलनोत्सुक असणारी देशव्यापी संघटना असा काँग्रेसचा लौकिक झाला (गांधीवाद, पान ७५)
याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय चळवळ करताना आदर्शाचे भान सोडून चालत नाही, अशी शिकवण लोकांत रुजली. किंबहुना, अशा प्रकाराने चळवळ करण्यात काही निराळी प्रसन्नता आहे व बहुजन समाज अशा चळवळीत उतरू शकतो, हे असहकार आंदोलनाने लोकांना पटवले. स्वातंत्र्य हे उद्दिष्टच इतके पवित्र आहे की त्याच्या प्राप्तीसाठी वापरलेले कोणतेही साधन शुद्धच असते अशी पूर्वी समजूत होती. त्यामुळे अिहसक चळवळीतही गुप्तपणा, कारस्थाने, पोलिसांना हुलकावण्या देणे या हुशारीच्या गोष्टी मानून त्यांचे कौतुक होई. आता सर्व पालटले. उघडपणे सर्व गोष्टी सरकारी अधिकाऱ्यांना सांगून करायच्या; त्यांच्याशी असहकार करायचा, पण त्यांच्याप्रती वैरभाव ठेवायचा नाही; कायदेभंग करून व छातीठोकपणे ‘जास्तीत जास्त शिक्षा द्या’ असे न्यायाधीशाला सांगायचे.. असे स्वच्छ, पारदर्शी व विश्वासाचे वातावरण नांदू लागले. (याळगी चरित्र, पान १८०)
सारांश, गांधीजींनी आपला आदर्शवाद सोडला नाही, पण या चळवळीने तळागाळातल्या कार्यकर्त्यांचे मात्र आदर्शाकडे उन्नयन झाले. तुरुंगातून सुटल्यानंतर गांधीजींनी स्वराज्य पक्षाच्या विधिमंडळ प्रवेशाला मुभा देऊन व्यवहारी राजकारण मान्य केले. नंतर गांधीजींनी काँग्रेसचा दैनंदिन कारभार स्वराज्य पक्षाकडेच सोपविला व स्वतला खादी, िहदू-मुस्लीम ऐक्य आणि अस्पृश्यता निर्मूलन या कार्याला वाहून घेतले.
‘गांधीजी व फाळणी’ या विषयाचा विचार करताना फाळणीचा समग्र इतिहास अभ्यासण्याची जरूर नाही. आपला मूळ विषय लक्षात घेता हे पाहणे जरुरीचे आहे की, फाळणीविषयी आदर्शवादी भूमिका काय होती व तिथून व्यवहारी राजकारणापर्यंत येताना त्यांनी किती स्तरावर तडजोडी केल्या. दुसरा विषय म्हणजे गांधीजींचे विचार आणि काँग्रेस संघटनेची धोरणे यांच्यात कसे व किती झपाटय़ाने अंतर पडत गेले. शेवटी याचाही विचार केला पाहिजे की, काँग्रेसने फाळणी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यास गांधीजींनी पािठबा का दिला?
फाळणीच्या चच्रेला अधिकृतपणे सुरुवात झाली ती २४ मार्च १९४० रोजी मुस्लीम लीगने केलेल्या एका ठरावामुळे! याला ‘पाकिस्तान ठराव’ असे नाव चच्रेत दिले जाते. पण ठरावात ‘पाकिस्तान’ हा शब्द कोठेही नाही. ठरावाचा संदर्भ १९३५ साली िहदुस्थानातील कारभाराची नवी घटना ब्रिटिश सरकारने तयार केली होती, तिचा होता. त्या घटनेनुसार, िहदुस्थानात ११ मुख्य प्रांत आणि पाच दुय्यम प्रांत होते. मुस्लीम लीगची मागणी अशी होती की, वायव्येकडील मुस्लीम बहुसंख्याक प्रांत यांचा एक गट व पूर्वेकडील मुस्लीमबहुल प्रांत यांचा दुसरा गट असे दोन गट करून एकूण िहदुस्थानात मुस्लीम बहुसंख्याक अशी ही दोन पोटराष्ट्रे असावीत. हा सर्वच ठराव अतिशय मोघम होता आणि खुद्द मुस्लीम लीगला त्यात किती स्वारस्य होते याची शंकाच होती.
गांधीजींची या ठरावावरची प्रतिक्रिया ४ मे १९४० च्या ‘हरिजन’च्या अंकात प्रसिद्ध झाली, ती अशी: या फाळणीच्या प्रस्तावामुळे िहदू-मुस्लीम प्रश्नाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. हा ‘असत्यवादी’ प्रस्ताव आहे व त्याच्याशी तडजोड होऊच शकत नाही! मात्र, िहदुस्थानातील सर्व मुसलमानांनी अशी मागणी केल्यास फाळणी कोणालाच थांबवता येणार नाही. (Gandhi : Essential Writings, pg. 231) सारांश, सत्याग्रहाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे फाळणी ही ‘असत्य’ होती, म्हणजेच ईश्वरी योजनेला धरून नव्हती. त्यामुळे त्या मागणीशी कोणत्याच प्रकारे जुळवून घेणे अशक्य होते. याच लेखात गांधीजींनी पुढे म्हटले होते की, ‘आपण अशी परिस्थितीच उद्भवू देता कामा नये की, मुसलमानांवर फाळणीची मागणी करण्याची पाळी यावी.’
िहदू व मुसलमान हे दोन समाज म्हणजे वेगळी व स्वयंपूर्ण राष्ट्रे आहेत, हा विचार सर सय्यद अहमद (१८१७-१८९८) यांच्यापासून अनेकांनी मांडला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही द्विराष्ट्रवाद मान्य होता. मात्र, ‘भिन्न भिन्न राष्ट्रके एकाच सामान्य राज्यतंत्राची घटक म्हणून नांदू शकतात..’ (समग्र सावरकर-खंड ८ मधील एकसष्टीनिमित्त सत्कार : पुणे, हे भाषण) असे त्यांचे मत असल्यामुळे फाळणीला त्यांचा विरोध होता. मुस्लीम लीगचे सर्वोच्च पुढारी मोहम्मद अली जीना हे द्विराष्ट्रवादी असले तरी त्यांना फाळणी हवी होती का, याविषयी दुमत आहे. (India wins freedom, pg. 164) त्यामुळे १९४० सालचा लीगचा ठराव कुणीच गांभीर्याने घेतला नाही. मुस्लीम समाजाला तो ठराव मान्य आहे असे मानायला वाव नव्हता. १९३७ सालच्या निवडणुकांत (आणि पुढे १९४५ साली झालेल्या निवडणुकांतही) मुस्लीम लीगला मुस्लीम बहुसंख्य असलेल्या प्रांतांतही सरकारे स्थापन करता आली नव्हती. इतकेच नव्हे तर मुस्लीम बहुसंख्य असलेल्या वायव्य सरहद्द प्रांतात काँग्रेसचे सरकार होते.
गांधीजींचा असा विश्वास होता की, मुसलमानांची फाळणीची मागणी ही ब्रिटिश सरकारच्या चिथावणीवरून करण्यात येत आहे. ब्रिटिश सरकार गेले तर िहदू-मुसलमानांतील भांडणे परस्परांत तडजोड होऊन मिटतील. १९४४ साली ‘भारत छोडो’ चळवळीमुळे अटकेत पडलेले गांधीजी सुटून बाहेर आल्यावर त्यांनी जीनांशी वाटाघाटी सुरू केल्या. त्यात मुख्य मुद्दा असा होता की, स्वातंत्र्याच्या चळवळीत मुस्लीम लीगने काँग्रेसशी सहकार्य करावे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच फाळणीचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल. परंतु जीनांनी यातील गोम ओळखली होती. इंग्रज सरकार गेले की फाळणीला पािठबा उरणार नाही याची त्यांना भीती होती. म्हणून वाटाघाटी असफल झाल्या. इथे आपल्याला गांधीजींनी आदर्श भूमिका सोडून व्यवहारी राजकारणाकडे वाटचाल केल्याचे दिसून येते.
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपले. इंग्लंडमध्ये निवडणुका होऊन मजूर पक्षाचे सरकार आले. त्यांनी जाहीर केले की, िहदुस्थानला उशिरात उशिरा जून १९४८ मध्ये स्वातंत्र्य देण्यात येईल. तेव्हा मुस्लीम लीगने आक्रमक धोरण स्वीकारून मुस्लीम बहुसंख्याक असलेल्या सिंध, पंजाब, बंगाल या प्रांतांत आपली सरकारे स्थापन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुस्लीम लीगला मदत केल्यामुळे हे शक्यही झाले. तसाच प्रयत्न त्यांनी वायव्य सरहद्द प्रांतातील काँग्रेस सरकारच्या विरोधातही चालवला होता.
ही राजकारणे चालू असतानाच पंजाब व बंगाल या प्रांतांत िहदू-मुसलमानांचे मोठे दंगे झाले. या क्रूर दंगलींत हजारो माणसे मारली जात होती. (१६ ऑगस्ट १९४६ या दिवशी कलकत्त्यात झालेल्या दंग्यात ५००० माणसे मारली गेली होती.) खरे तर असे जातीय दंगे १८९३ सालापासून वेळोवेळी झाले होते, परंतु पाकिस्तान ठरावानंतर या दंग्यांना अतिशय घातक रूप आले होते. नौखाली इथे िहदूविरोधी दंगली झाल्या. त्यांचा हेतू असा होता की, त्या जिल्ह्य़ातील सर्व िहदूंना हाकलून काढावे. त्यानंतर बिहारमध्ये मुसलमानविरोधी दंगे झाले. त्यांचा उद्देशही मुसलमानांनी घाबरून बिहार सोडून जावे असाच होता. या दंग्यांबाबत स्पष्ट सल्ला असा होता की, त्यांच्याकडे धार्मिक दंगली म्हणून न पाहता कायदा व सुव्यवस्थेची समस्या म्हणून पाहावे. सरकार कोणत्याही पक्षाचे व कोणत्याही मताचे असो, सर्व नागरिकांचे संरक्षण करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. यासाठीच नोआखलीतील अत्याचारग्रस्त िहदू नागरिकांना मदत करण्यासाठी गांधीजी अनेक स्वयंसेवक घेऊन नोआखलीत जाऊन राहिले व बंगाल सरकारच्या मागे आपल्या सल्ल्यांचा ससेमिरा लावून त्यांनी बंगालच्या लीग सरकारला नोआखलीतील हताश िहदूंना मदत करण्यास भाग पाडले. नंतर बिहारात दंगली सरू झाल्या. गांधीजी तेथे गेले व तेथील काँग्रेस सरकारने अत्याचारांचे बळी झालेल्या मुसलमानांचे संरक्षण केलेच पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला. सारांश, गांधीजींनी फाळणीविरोधात चालवलेली ही एक सत्याग्रही मोहीमच होती.
या काळात दिल्लीतील राजकारण वेगाने पुढे सरकले होते. मध्यवर्ती सरकारात काँग्रेस व लीग यांचे संयुक्त मंत्रिमंडळ कारभार करीत होते व त्यांच्यात सतत भांडणे होत होती. सरकार कामच करू शकत नव्हते. पंजाबमध्ये लढाईच्या स्वरूपाच्या दंगली चाललेल्या होत्या. अशा काळात मार्च १९४७ च्या पहिल्या आठवडय़ात काँग्रेस कार्यकारिणीने असा ठराव केला की, पंजाब प्रांताचे िहदू बहुसंख्याक व मुस्लीम बहुसंख्याक असे दोन भाग करावेत. ही बातमी गांधीजी बिहारमध्ये असताना त्यांना कळली. आपल्या पायाखालची जमीनच दुभंगली आहे असे त्यांना वाटले. कारण पंजाबची फाळणी करण्याची सूचना काँग्रेसने करणे म्हणजे देशाची फाळणी करण्याला मान्यता देण्यासारखेच होते. इथून पुढे गांधीजी व काँग्रेस यांचे मार्ग पूर्णपणे भिन्न झाले. गांधीजी फाळणीला विरोध करत राहिले; तर काँग्रेस ठेचकाळत का होईना, फाळणीच्या दिशेने चालत राहिली. गांधीजींनी नेहरू व पटेल यांना पत्र लिहून असा विचित्र ठराव कसा केला, याचा जाब विचारला. एकूण खुलासा असा झाला की, ‘पंजाबच्या फाळणीची मागणी करून लीगने केलेल्या देशाच्या फाळणीच्या ठरावाला ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा हा प्रयत्न होता! ‘जर देशाची फाळणी हवी असेल तर पंजाब (व बंगाल) यांचीही फाळणी करावी लागेल व फाटकेतुटके पाकिस्तान तुम्हाला स्वीकारावे लागेल’ असा हा इशारा होता. समजा, लीगने पंजाब व बंगालची फाळणी पत्करली तर निदान या दोन प्रांतांतील िहदू बहुसंख्याक प्रदेश वाचविल्याचे समाधान मिळेल असाही काँग्रेसचा दावा होता. गांधीजींना हा सर्वच लबाडीचा खेळ वाटला.
फाळणी टाळण्याचा अगदी शेवटचा प्रयत्न गांधीजींनी अगदी शेवटच्या क्षणी- म्हणजे एप्रिल १९४७ मध्ये केला. त्यांनी माउंटबॅटनना सुचवले की, सर्व सत्ता (काही अटी घालून) जीनांच्या हातात सोपवावी. काँग्रेसने सत्तेबाहेर राहून लीगला राज्य चालविण्यास पािठबा द्यावा. जीनांनी हा प्रस्ताव नाकारल्यास तोच प्रस्ताव काँग्रेसपुढे ठेवावा. परंतु माउंटबॅटनना हा प्रस्ताव मान्य झाला नाहीच व नेहरूंनीही तो मान्य केला नाही. त्यामुळे गांधीजींचा प्रयत्न फसला. (Gandhi : The Last Phase, pg.79)
यानंतर वेगाने घटना घडत गेल्या. प्रथम काँग्रेसने फाळणीची योजना मान्य केली. नंतर लीगनेही तिला संमती दिली व ३ जून १९४७ रोजी व्हाइसरॉयने रेडिओवरून भाषण करून देशाची फाळणी करण्याचे जाहीर केले. ४ जूनला व्हाइसरॉयने गांधीजींची भेट घेतली व ‘फाळणीला विरोध करू नका’ असे विनवले. त्यापूर्वी २ जूनला काँग्रेस कार्यकारिणीची बठक होती. तेथेही गांधीजींनी हे स्पष्ट केले होते की, ‘फाळणीचा प्रस्ताव मला मान्य नसला तरी काँग्रेसने फाळणी स्वीकारण्यास माझा विरोध नाही.’ काँग्रेसविषयी गांधीजींना जी निष्ठा वाटत होती तिच्यामुळेच गांधीजींनी फाळणीचा कडवट घास गिळला. पुढे त्यांनी जाहीर केले की, काँग्रेसच्या विरोधात सत्याग्रह करण्याचा विचारही त्यांच्या मनात नाही. त्यानंतर जूनच्या मध्याला अ. भा. काँग्रेस समितीची बठक झाली तेव्हा गांधीजींनी काँग्रेस कार्यकारिणीच्या निर्णयाला संपूर्ण पािठबा दिला. अखेरीस फाळणीचा ठराव २९ विरुद्ध १५ मतांनी मंजूर झाला. फार मोठय़ा संख्येने सभासद तटस्थ राहिले. (India Wins Freedom, pg.)
या हकिगतीवरून कळून येते की, गांधीजींची फाळणीविषयक भूमिका अनेक टप्प्यांनी बदलत गेली. फाळणी होताच कामा नये अशी त्यांची मूळ भूमिका होती. जीनांशी वाटाघाटी करताना ‘इंग्रजी राज्य असताना फाळणी नको; पुढे स्वातंत्र्यानंतर नक्की फाळणी करू’ असा प्रस्ताव त्यांनी ठेवला. फाळणी जवळ आली तेव्हा अखेरचा उपाय म्हणून त्यांनी माउंटबॅटनना सुचवले की, जीनांच्या हाती राज्य सोपवावे. अखेर काँग्रेसनेच फाळणी स्वीकारल्यानंतर केवळ काँग्रेसवरील निष्ठेमुळेच त्यांनी फाळणीविरुद्ध लढा उभारला नाही. (177Gandhi : Prisoner of Hope, pg.371)
१९४७ च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानातील टोळीवाल्यांनी काश्मीरवर चढाई केली, तेव्हा काश्मीरला सैन्य पाठवायला गांधीजींनी विरोध केला. परंतु तद्नंतर सैन्याने जेव्हा उत्तम कामगिरी केली तेव्हा त्यांनी सैन्याला शाबासकी दिली. लोकांनी अर्थातच गांधीजींना याबाबत प्रश्न विचारले, तेव्हा गांधीजी म्हणाले की, ‘‘सैनिकी कारवाईला माझा विरोध आहेच. पण एकदा सैन्याकडे काम सोपवल्यावर त्यांनी ते चांगल्या रीतीने पार पाडल्यास त्यांचे कौतुक केलेच पाहिजे!’’ यावरून गांधीजी अहिंसा, सत्य इत्यादी तत्त्वांच्या बाबतीत आदर्श आणि व्यवहार यांच्यातील सूक्ष्म फरक किती चिकित्सेने वापरत असत हे कळून येते.