काळाच्या पुढच्या स्त्रिया
ज्या काळात सर्वसामान्य भारतीय स्त्रिया स्वत:चा फोटो काढण्याची कल्पनाही करू धजत नव्हत्या, त्याकाळी होमाई व्यारावाला यांनी चक्क प्रेस फोटोग्राफर म्हणून पेशा पत्करला. त्याद्वारे एका ऐतिहासिक कालखंडाच्या त्या निव्वळ साक्षीदारच झाल्या नाहीत; तर अनेक ऐतिहासिक क्षण छायाचित्रबद्ध करून अजरामर करण्याचे भाग्य त्यांना लाभले. पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधींपासून ते लॉर्ड माऊंटबॅटन, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष आयसेनहॉवर यांच्यापर्यंत अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वे त्यांच्या कॅमेऱ्यात बद्ध झाली. त्यांच्या या व्यवसायानेच त्यांना इतरांपासून ‘हटके’ बनवले.
लोकांच्या गराडय़ात महात्मा गांधी कार्यक्रम आटोपून निघाले आणि इतक्यात त्यांच्या चेहऱ्यावर फोटोचा फ्लॅश चमकला. बापू फोटो काढणाऱ्या व्यक्तीला उद्वेगाने म्हणाले, ‘‘अच्छा! तू आहेस होय? तुझ्या फ्लॅशनी मला तू एक दिवस आंधळं करशील आणि मगच नि:श्वास सोडशील.’’ राष्ट्रपित्याची ही प्रेमळ दटावणी ऐकून घेणारी फोटोग्राफर होती- होमाई व्यारावाला.. भारतातली पहिली महिला प्रेस फोटोग्राफर. ‘डालडा १३’ हे त्यांचं टोपणनाव. कारण हे, की १३ हा त्यांचा लकी नंबर होता. १९१३ साली त्या जन्मल्या. १३ व्या वर्षी विवाहबद्ध झाल्या. आयुष्यातील पहिली गाडी घेतली ती महिन्यातल्या १३ तारखेला. धनत्रयोदशीच्या दिवशी. ‘डीएलडी १३’ अशी नंबरप्लेट असणारी.
१३ हा क्रमांक लकी मानणाऱ्या होमाई यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व- दोन्ही अतिशय अफाट असंच होतं. भारतात अनेक विलक्षण स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास ‘घडवला.’ होमाई यांनी मात्र आपल्या फोटोग्राफीच्या करिष्म्याने इतिहास ‘गोठवला.’ १९३० च्या सुमारास होमाईंनी फोटोग्राफी सुरू केली. ज्या काळात फोटो काढून घेणंसुद्धा सामान्य स्त्रीच्या कल्पनेपलीकडचं होतं, त्या काळात बिनदिक्कतपणे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे तसेच गांधी-नेहरूंचे फोटो टिपणाऱ्या होमाई म्हणजे लोकांसाठी एक अप्रूपच होतं. प्रचंड गर्दीच्या ठिकाणी पुरुषांची मक्तेदारी असणारं फोटोग्राफीचं काम अतिशय सराईतपणे, सहजपणे करणारी आपण एकुलती एक स्त्री आहोत याचं भानसुद्धा होमाईंना नसे. सायकल दामटत, सहा-सात पाऊंड वजनाचा जाडजूड कॅमेरा पेलत एका फोटोसाठी एक रुपया मानधन घेणाऱ्या होमाई लोकांसाठी नवलाईची बाब होती.
या व्यवसायात त्या तशा अपघातानेच आल्या. उर्दू-पारशी भाषेत गावागावांत नाटकं करणाऱ्या त्यांच्या वडिलांचं अकालीच निधन झालं. घरच्या जेमतेम परिस्थितीमुळे आई विणकाम वगैरे करून कसातरी चरितार्थ भागवीत असताना १२-१३ वर्षांच्या होमाईला उदरभरणासाठी काहीतरी काम करण्याशिवाय पर्यायच नव्हता. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत असताना लवकरात लवकर कमाई करता येईल, या विचाराने त्या माणेकशॉ या प्रोफेशनल फोटोग्राफर मित्राकडून कॅमेरा वापरायला शिकल्या. माणेकशॉ आणि कॅमेरा दोन्हींच्या प्रेमात पडलेल्या होमाईंचं आयुष्यच त्याने बदलून गेलं.
पती माणेकशॉ यांच्यासोबत ब्रिटिश हाय कमिशनसाठी व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून काम करताना अनेक सरकारी आणि खाजगी कार्यक्रमांचे छायाचित्रण त्यांनी केले. फोटो काढताना आपण भारतीय इतिहासातले अतिशय मौल्यवान क्षण चित्रित करीत आहोत याची खुद्द होमाईंनाच कल्पना नव्हती. त्यातही त्याकाळी अनेक फोटोग्राफर कार्यरत असताना होमाईंचे फोटो आगळेवेगळे ठरले. होमाईंचे छायाप्रकाशाचे, कृष्णधवल रंगसंगतीचे उपजत भान, एखाद्या गूढरम्य कवितेसारखा फोटोचा पोत आणि चेहऱ्यावरच्या अचूक संवेदना टिपण्याचे कौशल्य यामुळे त्यांची छायाचित्रे ‘असामान्य’ ठरली. सामाजिक आयुष्यात कर्तव्यकठोर असणाऱ्या अनेक नेत्यांचे विलक्षण मानवी पैलू होमाईंच्या फोटोतून समोर येतात. महात्मा गांधींच्या अनेक सभा, भारताच्या फाळणीचा निर्णय झाला ती अ. भा. कॉंग्रेस कमिटीची मीटिंग, पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण असे ऐतिहासिक क्षण.. तसेच पाकिस्ताननिर्मितीच्या आदल्या दिवशीच्या पत्रकार परिषदेतले मोहम्मद अली जिना, भारताला स्वराज्य प्रदान केल्यानंतर भारत सोडून जाणारे लॉर्ड माऊंटबॅटन, तिबेटमधून भारतात प्रवेशणारे तरुण दलाई लामा, पहिल्या गणतंत्रदिनी मानवंदना स्वीकारणारे, राष्ट्रपती भवनात पहिल्यांदा टेलिफोन लाइन लागली तेव्हा रिसिव्हर तोंडासमोर धरून हसत असणारे डॉ. राजेंद्रप्रसाद याबरोबरच जॅकलिन केनेडी, अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहॉवर, डॉ. मार्टिन ल्युथर किंग अशा दिग्गज व्यक्तींचे होमाईंनी जे फोटो काढले आहेत, त्यांचे मूल्य शब्दातीत आहे.
पण यापल्याड होमाईंच्या फोटोतले खरे नायक आहेत ते पंडित जवाहरलाल नेहरू. ते होमाईंच्या फोटोंचेच नव्हे, तर त्या युगाचेच नायक होते. राजबिंडय़ा व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे पंडितजी प्रचंड स्टाइलिश आणि फोटोजेनिक होते. होमाईंनी टिपलेल्या त्यांच्या अनेक भावमुद्रा निव्वळ लाजवाब आहेत. स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व करणाऱ्या नेहरूंपेक्षा त्यांची खूप वेगळी प्रतिमा होमाईंच्या फोटोंत उमटलेली दिसते. ब्रिटनच्या डेप्युटी हायकमिशनरच्या पत्नी मिसेस सायमन यांची सिगारेट शिलगावणारे नेहरू, आकाशात कबूतर उडवणारे नेहरू, कच्च्याबच्च्यांसोबत बागडणारे नेहरू, विजयालक्ष्मी पंडित यांना मिठी मारणारे नेहरू किंवा ‘फोटोग्राफी करना मना है’ या पाटीसमोर झक्क पोझ देणारे नेहरू.. असे अनेक फोटो होमाईंनी टिपले. सुट्टीच्या दिवशीही अनेक लोक नेहरूंना भेटायला येत. ते हौसेने नेहरूंसोबत फोटो काढून घेत. होमाई यांनी काढलेले असे अनेक फोटो पानठेले, सलून किंवा हॉटेलमध्ये आढळत.
अशा असंख्य सेलिब्रेटींचे फोटो काढताना होमाई त्यांच्यात आपली भावनिक गुंतणूक कधीच होऊ देत नसे. स्त्री असल्याने व्यवसायात हे भान त्यांनी अखंड जपले. तथापि नेहरूंच्या अंत्यविधीचे फोटो काढताना मात्र त्यांना रडू आवरले नव्हते. या बडय़ा नेतेमंडळींचे फोटो काढत असताना फारसे दडपण होमाई यांनी कधीच बाळगले नाही. अर्थात तेव्हा नेतेसुद्धा आपल्या मोठेपणाचं ओझं बाळगत नसत. दांभिकता, भंपकपणा यापेक्षा साधेपणाला महत्त्व असणारे ते दिवस होते.
या साऱ्या धकाधकीच्या कालखंडात होमाईंच्या आयुष्यात काही हळुवार क्षणसुद्धा या व्यवसायाने बहाल केले. आग्य््रााला ताजमहाल बघण्यासाठी आलेल्या अमेरिकन चीफ जस्टिस वॉरन आणि त्यांच्या पत्नीचे नेमके शॉट मिळावेत म्हणून होमाई ताजमहालासमोरच्या एका भिंतीवर चढल्या. फोटो काढताना तोल जाऊन त्या नेमक्या खालच्या पाण्याच्या टाकीत पडल्या. काढलेले फोटो वाया जाऊ नयेत म्हणून कॅमेरा पाण्याच्या वर ठेवून टाकीबाहेर येण्याच्या प्रयत्नात असताना खुद्द जस्टिस वॉरन यांनीच त्यांना मदतीचा हात दिला. पुरुष फोटोग्राफरच्या गर्दीत, त्यांच्या सोबतीने फोटो काढताना त्यांना बघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले, ‘या रफ क्राऊडमध्ये तुम्ही काय करत आहात?’ एकदा त्यांच्या ओठाला काहीतरी लागले होते. त्यावर मलमपट्टी करूनच त्या डॉ. राधाकृष्णन् यांचा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यावर निघता निघता डॉ. राधाकृष्णन् यांनी मिश्किलपणे हात आपल्या ओठाकडे नेले आणि म्हणाले, ‘काय झालं? नवऱ्याने मारलं का?’
पंडितजींची तर बात काही औरच होती. प्रत्येक समारंभात भेटणाऱ्या होमाईंना बघून आश्चर्य वाटल्याचा आविर्भाव करत ते म्हणत, ‘अरेच्चा, तुम्ही इथेसुद्धा आलात का?’ इंदिराजींची आठवण तर अत्यंत स्त्रीसुलभ! केसांचा बॉबकट करून आलेल्या होमाईंच्या हेअरस्टाईलचं त्यांनी जवळ येऊन कौतुक केले. चार-पाच महिन्यांनंतर इंदिराजींनीही स्वत: तशीच हेअरस्टाईल करून घेतली. आणि शेवटपर्यंत ती तशीच ठेवली. इंदिराजींच्या नावे ही स्टाईल लोकप्रियही झाली.
होमाई यांचा करिष्मा फक्त राजकारणी आणि नेत्यांच्या फोटोंपुरताच मर्यादित नव्हता. इलस्ट्रेटेड वीकलीच्या कव्हरवर लेडी इरविन कॉलेजचा होमाई यांनी काढलेला फोटो बघून एक परदेशी महिला इतकी प्रभावित झाली, की आपले घरदार सोडून इथल्या कुतूहलापोटी ती लेडी इरविन कॉलेजमध्ये शिकायला आली. वर्सोव्याच्या किनाऱ्यावरील कोळीलोकांचे दैनंदिन जीवन, कापूस पिकविण्यापासून तर तो जिनिंगमध्ये नेईपर्यंत त्यावर होणाऱ्या विविध प्रक्रियांवर काढलेल्या फोटोंच्या त्यांच्या शृंखलाही प्रचंड गाजल्या. त्या काळात हा प्रकार नावीन्यपूर्ण असाच होता. अशा विविध विषयांवरचे त्यांचे अनेक फोटो सरकारने विकत घेऊन संग्रही ठेवले आहेत. क्रिकेट आणि चित्रपट क्षेत्रातल्या लोकांबद्दल मात्र त्यांनी फारसं स्वारस्य दाखवलं नाही.
खरे तर एक व्यवसाय म्हणून त्या या क्षेत्रात आल्या. पण त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांच्या हातून जे काम झालं ते अलौकिक, असामान्य ठरलं. हे काम करत असताना आपण काहीतरी भव्यदिव्य करत आहोत असा कोणताच अभिनिवेश त्यांच्या ठायी नव्हता. त्याबद्दल त्यांनी कधी अभिमानही बाळगला नाही. ‘उत्तम फोटो काढण्यासाठी फोकल लेन्थ किती घ्यायची, हेसुद्धा मला समजत नस. पण नेमका क्षण कॅमेऱ्यात पकडण्यासाठी केव्हा क्लिक करायचं, हे मला नक्कीच ठाऊक होतं. पुढे त्याचं सगळं प्रोसेसिंग माझे पती करीत,’ असं त्या अत्यंत निरागसतेने सांगत.
सत्तरच्या दशकात एकुलत्या एका मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर त्यांनी अतिशय स्थितप्रज्ञतेने या क्षेत्रातून निवृत्ती घेतली आणि उरलेले आयुष्य दिल्ली शहर सोडून बडोद्यात निवांतपणे घालविले. काळाच्या ओघात प्रत्येकच क्षेत्रात अनेक वाईट गोष्टी घुसल्यात. त्या त्यांच्यासारख्यांना मुळातच मानवणाऱ्या नव्हत्या. ९८ वर्षांचं आयुष्य समृद्धरीत्या जगताना शेवटच्या ४० वर्षांत त्यांनी कधीही कॅमेऱ्याला हात लावला नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात पद्मविभूषणसारख्या अत्यंत प्रतिष्ठित सन्मानासह अनेक गौरव त्यांच्या वाटय़ाला आले. शेवटच्या श्वासापर्यंत स्वयंपाक, सुतारकाम, प्लंबिंग, आपली आवडती फियाट चालवणं यांसारखी कामे करत अतिशय निर्भर आणि स्वतंत्र आयुष्य त्या तृप्तपणे जगल्या. शल्य एकच होतं- दिल्लीला ३० जानेवारी १९४८ रोजी बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधींची प्रार्थनासभा त्यांना कव्हर करायची होती. निघता निघता नवऱ्याचा फोन आला- दुसरीकडे जाण्यासाठी. आजऐवजी उद्याची सभा कव्हर करण्याचं ठरलं. आणि थोडय़ाच वेळात बातमी आली.. महात्माजींची हत्या झाली. गांधीजींना गमावण्याचं दु:ख तर त्यांना होतंच, पण एक व्यावसायिक फोटोग्राफर म्हणून कारकीर्दीतला अत्यंत मूल्यवान असा ऐतिहासिक क्षण टिपण्याची संधीही त्यांनी गमावली होती. ही हुरहूर त्यांना जन्मभर लागून राहिली.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2014 रोजी प्रकाशित
होमाई व्यारावाला आऊट ऑफ द फ्रेम
<span style="color: #ff0000;">काळाच्या पुढच्या स्त्रिया</span><br />ज्या काळात सर्वसामान्य भारतीय स्त्रिया स्वत:चा फोटो काढण्याची कल्पनाही करू धजत नव्हत्या, त्याकाळी होमाई व्यारावाला यांनी चक्क प्रेस फोटोग्राफर म्हणून पेशा पत्करला. त्याद्वारे एका ऐतिहासिक कालखंडाच्या त्या निव्वळ

First published on: 17-01-2014 at 03:09 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homai vyarawalla