|| प्रदीप आपटे

पेशावरनजीक पहिले ‘रीतसर’ उत्खनन करणारा कर्झननियुक्त अधिकारी जॉन मार्शल आणि दूर तिबेटात स्वत:हून गेलेला ऑरेल स्टाइन यांचा काही संबंध नव्हता. पण ही दोन उत्खनने, बुद्धकाळाची बंद दारे उघडणारी ठरली!

After the Kanker encounter in Chhattisgarh the police claim that the Naxalites supply system has been hit
नक्षलवाद्यांच्या पुरवठा यंत्रणेला धक्का; छत्तीसगडमधील कांकेर चकमकीनंतर पोलिसांचा दावा 
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Why did Nitin Gadkari say that blockade the forest officials in Gadchiroli
“वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’; त्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला”, नितीन गडकरी गडचिरोलीत असे का म्हणाले…
South Central Mumbai
दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांत धुसफूस, शिवसेनेकडून प्रचार फेऱ्यांना सुरुवात

जॉन मार्शलच्या हाती भारतातली पुरा-संशोधनाची धुरा जाणे हे मोठे स्थित्यंतर होते. फेब्रुवारी १९०२ मध्ये मार्शल भारतात दाखल झाला. जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याने एक वर्षभर सर्व परिस्थितीचा नव्याने आढावा घेतला. त्याच्या हाती आलेली यंत्रणा अस्थायी होती. त्या-त्या काळातल्या जाणकार कर्तबगार अधिकाऱ्यांच्या सावलीत तग धरून होती. अलेग्झांडर कनिंगहॅम, जेम्स बर्गेस यांच्या उत्साही धगीवर गाडा चालत राहिला होता. त्याला कायदेशीर चौकट नसल्याने कायमस्वरूपी प्रशासकीय यंत्रणाही नव्हती. प्राचीन वारसा आणि इतिहास धुंडाळणे आणि त्याचे अवशेष, पुरावे शाबूत ठेवणे या दोन्ही वाटा एकदम हाताळाव्या लागतात. त्यातला तोल सांभाळणारी चाकोरीच निर्माण करायची होती. दोन्ही कामांना साजेशी आणि पुरेशी घडी रचणे गरजेचे होते. आरंभीच्या वर्षांमध्ये कर्झनच्या भक्कम पाठिंब्यामुळे यातल्या अनेक बाबतीत गती मिळाली.

या धडपडीला आलेले एक महत्त्वाचे फळ म्हणजे १९०४ साली ‘प्राचीन वारसा वस्तू जतना’चा कायदा अस्तित्वात आला. प्राचीन वास्तू आणि वस्तूंचे जतन निगराणी आणि मूळ रूप न बिघडवता जरुरीपुरत्या दुरुस्ती करण्याची सक्ती आली. धार्मिक वापरातील वगळता खासगी मालकीतल्या वास्तूंनाही या कायदाच्या तरतुदी लागू झाल्या. व्यक्तिगत हौस आणि लोभापोटी होणारी अडाणी खोदकामे बेकायदा ठरली. त्यांची हेळसांड थोपवण्याचे कायदेशीर अधिकार सरकारला मिळाले. जतन करणे म्हणजे काय? कसे? किती प्रमाणात? कोणती दुरुस्ती निकडीची? मूळ ठेवणीला धक्का न देता कमीतकमी दुरुस्ती कशी करावी? अशा निरनिराळ्या प्रश्नांबद्दल तत्त्वे आणि सूचना अस्तित्वात आल्या.

अनेक ऐतिहासिक वास्तूंचा नवनवीन उपयोग जन्माला आला होता! उदा. आग्रा किल्ल्यात लष्करी छावणी पडली होती. छत सांभाळणारे स्तंभ मोडकळले होते. वास्तूंमध्ये किंवा त्यांच्या परिसरात कुठे ‘वस्ती’ झाली होती. कुठे दुकाने थाटली होती. जुन्या वास्तूंवर आधुनिक ठेवणीच्या बांधकामाचे कलम लावले गेले होते. कोणार्कसारख्या अद््भुत मंदिराचे काही भाग बांधकामाचे दगड सुटून आणि भवतालची निसटती वाळू सरकून अनेक वर्षे पुरल्यागत दिसेनासे झाले होते. त्याच्या जोत्यावरील कोरलेले अश्व आणि रथाची चाके लुप्त झाली होती. या जतनाच्या मोहिमेने त्यांना पुनर्जन्म मिळाला.

वेगवेगळी नवी ठिकाणे धुंडाळणे, हेरणे आणि उत्खनन करून पाहणे ही तेवढीच महत्त्वाची जबाबदारी होती. मार्शलच्या नेमणुकीमागे त्याने ग्रीसमध्ये क्रीट बेटावर केलेल्या उत्खनन रीतींचा भारतात वापर करावा ही इच्छा प्रबळ होती. कर्झन आणि मार्शल दोघेही अविचारी खोदकामांच्या विरुद्ध होते. भारत खंडात अशी अनेक खोदकामे झाली होती. त्याबद्दल टीकेचा भडिमार झाला होता. प्राच्य संशोधकांच्या अकराव्या परिषदेत तर भलताच टोकाचा प्रस्ताव आला होता. त्या प्रस्तावानुसार भारत सरकारने ‘इंडियन एक्सप्लोरेशन फंड’ स्थापन करावा आणि प्रशिक्षित अनुभवी युरोपीय तज्ज्ञांमार्फत उत्खनन मोहिमा हाती घ्याव्या असा बूट निघाला होता. मात्र कर्झनने त्याला ठाम नकार दिला. त्याने म्हटले आहे  ‘‘युरोपीय तज्ज्ञांहाती फावडे देऊन काम करून घेण्याची आम्हाला बिलकुल गरज भासत नाही. आमची ठिकाणे आम्हीच हाताळू.’’

आताच्या पाकिस्तानात उत्तरेला खैबर पख्तुन भागात आता चारसद्दा जिल्हा आहे. पूर्वी हा पेशावर महानगराचा भाग होता. येथे रामायणानुसार भरताचा पुत्र पुष्कल याने पुष्कलावती हे नगर वसविले. येथे पूर्वीच्या गंधार राज्याची पुष्कलावती राजधानी होती. मार्शलच्या कारकीर्दीतले पहिले उत्खनन या परिसरात झाले. डॉ. जे. पी. फोगेल हे मार्शलचे सहसंशोधक होते. ‘हिन्दी-ग्रीक’ संस्कृतीचे हे मुख्य स्राोत-केंद्र मानले जाते. या उत्खननाने एका नवा पर्वाचा आरंभ झाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशी लक्षणीय उत्खननांची मालिका अवतरली. सारनाथ, कासिया, बसराह, राजगृह, लोरिया नंदगृह अशी बुद्धधर्मीय वारशाची अनेक स्थळे, कुशाणांच्या आरंभकाळापासून दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य काळापर्यंतचे निर्देश देणारी अनेक तथ्ये यातून उघडकीला आली. बुद्धाचे भग्नशिल्प, दुसऱ्या चंद्रगुप्तकाळची सुवर्णमुद्रा आणि अन्य नाणी सापडली. या महत्त्वाच्या उत्खननाचा वृत्तांत मार्शलने लिहिला आहे. १९०७ च्या ‘रॉयल एशिआटिक सोसायटी ऑफ ब्रिटन अँड आयर्लंड’च्या नियतकालिकात तो छायाचित्रांसह छापलेला आहे.

याच काळात आणखी एक दिमाखदार संशोधन घडले. ते वरपांगी अगदी निराळ्या प्रदेशासंबंधी होते. त्याचा कर्ता सर ऑरेल स्टाइन. हा विलक्षण संशोधक मूळचा हंगेरीतला. त्याचे बरेचसे प्रगत शिक्षण झाले व्हिएन्ना, लाइप्झिश आणि ट्यूबिन्गेनमध्ये. त्याला ग्रीक, लॅटिन, फ्रेंच या भाषा अवगत होत्याच. ट्यूबिन्गेनमध्ये त्याने संस्कृत आणि फारसी भाषेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. ट्यूबिन्गेन विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी मिळाल्यावर तो प्राच्यविद्या आणि प्राच्यपुराशोधासाठी १८८४ मध्ये इंग्लंडला गेला. परंतु १८८६ साली एका प्राच्यविद्या परिषदेत रुडॉल्फ ह्योर्नेल या प्राच्यपंडिताशी त्याची गाठ झाली. (ह्योर्नेल हा भारतात जन्मलेला, स्वित्झर्लंडमधे शिक्षण घेतलेला आणि इंग्लंडात संस्कृत शिकलेला भारतविद्या तज्ज्ञ होता. त्याच्याबद्दल नंतर स्वतंत्र लिहिणे श्रेयस्कर! ) स्टाइनला ह्योर्नेलकडून, गणिताविषयीच्या बख्शाली भूर्जपत्री हस्तलिखिताची माहिती झाली. १८८७ साली स्टाइन पंजाब विद्यापीठाचा कुलसचिव म्हणून भारतात आला. स्वीडिश संशोधक स्वेन हेडिन च्या ‘थ्रू एशिया’ या ग्रंथाने स्टाइन खूपच प्रभावित झाला होता. त्याने मध्य आशियातल्या प्राचीन इतिहासाबद्दल ह्योर्नेलसह संशोधनासाठी संधान बांधले. ह्योर्नेलच्या सूचनेनुसार त्याने चिनी तुर्कस्तानाची यात्रा करावी, तिथल्या स्थळांची पाहणी टेहळणी करावी आणि काही वास्तू वस्तू भूर्जपत्रे सापडतात का हे शोधावे; हे त्याने मान्य केले. त्याच्या या मोहिमेला पंजाब सरकारने पाठबळ दिले.

पहिली शोधमोहीम स्टाइनने १९००-०१ साली केली. नंतर पुन्हा १९०६-१९०८ साली केली. पहिल्या मोहिमेतच त्याने दांडानव्युल्क हे ठिकाण पुन्हा एकदा धुंडाळले. हे ताक्लामाकन वाळंवटातले एक ओअ‍ॅसिस होते. ते प्रख्यात रेशीममार्गाच्या दक्षिण फाट्यावर होते. त्या ओअ‍ॅसिसमध्ये एक नगरही होते; पण काळाच्या ओघात ते लुप्त झाले होते. आठव्या शतकानंतर, तिबेटी आक्रमणानंतर ते उजाड झाले, हे अगोदर स्वेन हेडिनने धुंडाळले होते. त्याला अनेक लाकडी घरे दिसली होती. मातीने लिंपलेल्या बांबूच्या भिंतींचे ‘बुद्ध-आलय’ आणि अन्य भित्तिचित्रे आढळली होती. चित्रांमध्ये पर्शियन वेशभूषेतील पुरुष, लाटेवर आरूढलेल्या नावा आणि बुद्धप्रतिमा आढळली होती. त्यात अनाकलनीय लिपीतले लिखाणदेखील होते. पण वाळवंटी वाळूचा धबधबा उत्खननाला पार आळा घालत होता. स्टाइनने या सगळ्याचा पुन्हा छडा घेतला. दोन स्थानिक ‘खजिनाबाज माहीतगारां’ना हाती धरले. त्यांनी दांडानव्युल्क मधली ब्राह्मी लिपीतल्या मजकुरासह असलेली दोन भित्तिचित्रे, भिंतीवरचे लेपलेले चित्रांचे पोपडे आणि भूर्जपत्री लेखन तुकडे दाखविले. स्टाईनने हे दोन खबरे आणि तीस खोदकामगार सोबत घेतले. या उत्खननात त्याला बांधलेल्या वास्तूंची अवघी मालिका आढळली. एका आयताकृती चौथऱ्यावर कमळाकृती पाया आढळला. स्टाईनच्या मते त्या भोवतालची वाट परिक्रमा मार्ग होता. लगतच्या वास्तूत शिरविहीन बनलेली ‘बुद्धमूर्ती’ होती. स्टाईनने ती खेचरावर लादून आणली. (ती अर्थातच आता ब्रिटिश म्युझिअममध्ये आहे! राणीचा माल आणि ‘माल’की) बुद्धचित्रांबरोबर अन्य चित्रात घोड्यावरील स्वार, छोट्या तळ्यातली कमळे आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर तळ्यात नाहणाऱ्या, सालंकृत द्राक्षपर्णाने लज्जारक्षण करणाऱ्या नग्न स्त्रियादेखील होत्या. याखेरीज एका शिल्पात तुर्क ठेवणीचे बुटासारखे पादत्राण घातलेला, कुणाला तरी पायी तुडविणारा चिलखतधारी वीरदेखील आहे. शिवाय लाकडी पटांवर चपट्या काड्यांवर आणि कागदावर लिहिलेला मजकूर होता. तो बुद्ध वाङ्मयातला होता. पण एवढ्याने काय भागते? व्यापारी उलाढालीने उजळलेल्या रेशीम मार्गावरचे हे ठिकाण! त्यात काही अर्जदेखील होते. एक अर्ज होता गाढवांच्या खरेदीबद्दल! खरेदी करून दहा महिने लोटले तरी त्याचे पैसे पावले नव्हते म्हणून केलेला तक्रारअर्ज! दुसरा होता लुटारूंनी धान्य लुटले आणि सक्तीने फुकटमजुरी करून घेतली त्याच्या परतफेडी भरपाईबद्दल. आणखी काही मागणी-अर्ज होते. ढोलवाद्याच्या कातड्यासाठी आणि बाण तयार करायला पक्ष्यांची पिसे पाहिजेत म्हणून! आणखी एक दस्तऐवज होता ज्यू-फारसी व्यवहारामधला. त्याचा मुख्य विषय आहे मेंढ्यांची खरेदी-विक्री आणि अन्याय वागणुकीबद्दलच्या तक्रारी.

बुद्ध धर्म भारतातून चीनपर्यंत पसरला हे दर्शविणारे असे हे मौलिक पुरातत्त्वी उत्खनन ठरले!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com

पानाची रचना आजपुरती बदलली गेल्याने अन्वयार्थ, व्यक्तिवेध, उलटा चष्मा ही नेहमीची सदरे आजच्या अंकात नाहीत.