प्रत्येक आव्हान ही नवी संधी असते
अदिती कारे-पाणंदीकर, व्यवस्थापकीय संचालिका, इंडोको रेमिडीज
प्रत्येक गोष्टीला ‘आव्हान’ हे असलेच पाहिजे. उद्योगांच्या बाबतीत बोलायचे झाले तर या आव्हानांवरच उद्योगाचे यश-अपयश अवलंबून असते. येथे प्रत्येक आव्हान एक संधी असते. मी तिसऱ्या पिढीची उद्योजिका आहे. मी जेव्हा कंपनीत काम करण्यास सुरुवात केली तेव्हा कंपनीचा व्यवसाय ३५ कोटींचा होता. गेल्या २० वर्षांमध्ये माझ्या प्रवासात अनेक आव्हाने आली आणि यातून खूप शिकत गेले आणि घडतही गेले. आज कंपनीची उलाढाल ही ७५० कोटींची आहे. कंपनीत ५५०० कर्मचारी काम करतात. मागे पाहिले तर खूप काम केले असे वाटते आणि भविष्यात पाहिले तर खूप काम करावयाचे आहे असे वाटते. आमची कंपनी ही औषध क्षेत्राशी संबंधित आहे. हे क्षेत्र देशात आयटीच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिकीकरणानंतर या क्षेत्रातील निर्यात मोठय़ा प्रमाणावर वाढली. आमच्या कंपनीची निर्यात सुरू करताना त्यासाठी आवश्यक ते विभाग सुरू करण्याबरोबरच विविध आव्हाने आमच्यासमोर होती. पण ही आव्हाने पेलत आणि त्यातून मार्ग काढत आम्ही पुढे जात राहिलो. गेल्या दशकभरात महिलांनी खूप क्षेत्रांत आपला ठसा उमटविल्याचे दिसते.
सरकारी योजनांपर्यंत आपण पोहोचले पाहिजे..
मीनल मोहाडीकर, उपाध्यक्षा, एमईडीसी
महिलांसाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. महिला उद्योजिकांसाठी विशेष ‘क्लस्टर्स’ होणे गरजेचे आहे. इचलकरंजीसारख्या भागात महिला उद्योजिकांनी क्लस्टरचा प्रयोग केला आहे. यामध्ये केंद्र सरकारतर्फे ९० टक्क्यांपर्यंत निधी उपलब्ध होतो. राज्यातील महिला उद्योजिकांनी एकत्रित येऊन या योजनेचा फायदा घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. उद्योजिका होण्यासाठी महिलांना मार्गदर्शन करण्याचे कामही आमच्याकडून केले जाते.  अनेकदा योजना महिलांपर्यंत पोहोचत नाहीत असे म्हटले जाते. मात्र योजना पोहोचतीलच असे नाही, आपण योजनांपर्यंत पोहोचले पाहिजे. याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलतेबाबत जागरूकतेसाठी महाविद्यालयीन तरुणांसाठी एका विशेष स्पध्रेचे आयोजनही आम्ही करतो. सरकारच्या खूप योजना आहेत. या योजनांचा पुरेपूर फायदा घेऊन आपली वाटचाल सुरू करण्यास हरकत नाही.
संधींचा शोध घ्या.. यशाचा मार्ग आपसूक सापडेल
कल्पना सरोज, अध्यक्ष, कमानी टय़ूब्स लि.  
उद्योग क्षेत्रातील संधींचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा असेल, एक यशस्वी उद्योजिका बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले असेल तर त्यासाठी ज्या योजना अस्तित्वात आहेत त्यांचा शोध घेण्याची, अभ्यास करण्याची वृत्ती महत्त्वाची आहे. या क्षेत्रात पाऊल ठेवायचे तर मेहनत-परिश्रम घेण्याच्या तयारीबरोबर, सहनशीलताही तेवढीच गरजेची आहे. अशी तयारी असेल तर यशाचा मार्ग आपसूक सापडतो.
कमानी टय़ूब्सच्या कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी आपल्याला साद घातली आणि या क्षेत्राचा काहीही अनुभव नसतानाही आपण या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना उपाशी मरू द्यायचे नाही म्हणून हे शिवधनुष्य पेलण्याचे मी ठरविले. कंपनीची सूत्रे हाती घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा कंपनीवर १६५ कोटींचे कर्ज होते, १४० हून अधिक दावे न्यायालयात दाखल होते, कंपनीच्या दोन युनियनमध्ये वाद सुरू होता, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होते.केवळ कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न म्हणून पुढाकार घेतला आणि कंपनी कशी वाचवायची याचा धनको बँकांचे संचालक मंडळावरील प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील दहा तज्ज्ञांना हाताशी घेऊन योजना आखली. २००० साली कंपनीची सूत्रे हाती घेतली आणि २००५ साली सर्वोच्च न्यायालयाने कंपनीला वाचविण्याची योजना मंजूर करीत मालक म्हणून कंपनी ताब्यात देण्याचा आदेश दिला. कर्ज फेडून कर्मचाऱ्यांची देणी परत करण्यासाठी न्यायालयाने मुदत दिली होती. टप्प्याने कर्ज फेडत आणि न्यायालयाच्या आदेशानंतर अवघ्या एका महिन्यात कर्मचाऱ्यांचीही देणी परत केली. कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आणि आज कंपनी दिमाखात सुरू आहे. संधींना परिश्रम-अभ्यासाची जोड दिली तर काहीच अशक्य नाही.
या कार्यक्रमाचे व्हिडीओ
पाहण्यासाठी http://www.youtube.com /LoksattaLive  येथे भेट द्या.
शब्दांकन : उमाकांत देशपांडे, संजय बापट, ऋषीकेश देशपांडे, वैशाली चिटणीस, जयेश सामंत, सुहास जोशी, संदीप नलावडे, प्राजक्ता कदम, रेश्मा शिवडेकर, नीरज पंडित  
छाया: प्रदीप कोचरेकर, गणेश शिर्सेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta badalta maharashtra we businesswomen
First published on: 29-06-2014 at 03:38 IST