‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ म्हणजे वेगळं काही करू पाहणारे कर्तृत्ववान तरुण. ‘लोकसत्ता’ अशा तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची माहिती जगासमोर आणत आहे. आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लेखन, दिग्दर्शन, अभिनय या सगळय़ाच पातळीवर आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारा गुणी कलाकार म्हणजे अभिनेता-लेखक चिन्मय मांडलेकर. २०१८च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले. २०१९ साली प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ या चित्रपटाचे लेखन चिन्मयने केले आहे. २०२०-२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘चंद्र आहे साक्षीला’ या ‘कलर्स वाहिनी’वरील मालिकेचे लेखनही चिन्मयने केले असून या मालिकेलाही मोठय़ा चाहतावर्ग मिळाला. ‘तू माझा सांगाती’ या ‘कलर्स वाहिनी’वर चिन्मयने साकारलेली संत तुकारामांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. लेखनासह चिन्मयने आता ओटीटीवरही पदार्पण केले असून २०२० साली प्रदर्शित झालेली ‘एमएक्स प्लेअर’वरील ‘एक थी बेगम’ या गाजलेल्या वेबमालिकेतून विक्रम भोसले हे पात्र त्याने साकारले आहे. चिन्मय सध्या एका कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पावनिखड’ या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तसेच त्याने लिहिलेला ‘चंद्रमुखी’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. त्याने निर्मिती केलेली ‘सोनी मराठी’वरील ‘ज्ञानेश्वर माऊली’ ही मालिका प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात सुरू आहे. चिन्मयचा अभिनय असलेला ‘द काश्मिर फाइल्स’ हा चित्रपटही ११ मार्चला प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta tarun tejankit award winners life journey zws 70
First published on: 07-03-2022 at 01:43 IST