‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ म्हणजे वेगळं काही करू पाहणारे कर्तृत्ववान तरुण. ‘लोकसत्ता’ अशा तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची माहिती जगासमोर आणत आहे. आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूयॉर्क, मिलान, पॅरिस फॅशन वीक हे सगळे शोज म्हणजे फॅशनप्रेमींची पंढरीच. जगभरातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या फॅशन वीकमध्ये आपले कलेक्शन दिमाखात सादर करणारी पहिली भारतीय महिला फॅशन डिझायनर म्हणजे वैशाली शदांगुळे. फॅशन डिझायनर होण्याच्या स्वप्नासाठी वैशालीने घर सोडले, अक्षरश: शून्यातून विश्व उभारले. एकतर फॅशन उद्योगात फारसे मराठी डिझायनर्स आजही नाहीत त्यातही मराठी वस्त्रांना आणि कापडाला तर तिथे अघोषित बंदीच होती. पण वैशालीने पहिल्यांदा पैठणीला, खणाच्या कापडाला रॅम्पवर आणले. पैठणी, खण, चंदेरी, ज्यूट, खादी, महेश्वरी अशा अस्सल भारतीय धाग्यांवर काम करत तिने कायमच अनोखे कलेक्शन सादर केले. कोणाचाही वरदहस्त नसताना किंवा फॅशन उद्योगांतील कोणताही वारसा नसताना, केवळ स्वबळावर तिने वैशाली एसह्ण हा ब्रॅण्ड उभा केला. या लखलखत्या कारकीर्दीनेच तिला मिळवून दिला, तरुण तेजांकित पुरस्कार २०१७.

टाळेबंदीच्या काळातही वैशालीचे काम सुरूच होते. या काळात आपल्यावर अवलंबून असलेल्या विणकरांची जबाबदारी लक्षात घेत तिने नवनव्या कलेक्शनची वीण घातली. करोनाकाळात झालेल्या मिलान फॅशन वीकमध्ये सृता हे आपले कलेक्शन दणक्यात सादर केले. शकुंतला, अंबर, रिबर्थ अशा विविध कलेक्शन्समधून भारतीय वस्त्रप्रावरणे, धाग्यांविषयीचे तिचे काम असेच सुरू राहणार आहे.

वैशाली शदांगुळे लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१७

करोनाकाळात गर्भवतींसाठी आरोग्य सुविधा

अतिजोखीम असलेल्या गर्भवती महिलांना प्रसूतिपूर्व आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी शंतनू पाठक यांनी ‘केअरएनएक्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी स्थापन केली. शंतनू पाठक यांना २०१७च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरवण्यात आले. पाठक यांच्या कंपनीने तयार केलेल्या ‘आनंदी मां’ आणि ‘फिटोसेन्स’ हे कीट तयार केले. या कीटद्वारे अतिजोखीम असलेल्या गर्भवतींच्या विविध चाचण्या करण्यात येतात. गेल्या चार वर्षांत १.५ लाख गर्भवतींची या कीटद्वारे चाचणी करण्यात आली असून आठवडय़ाला दोन ते अडीच हजार महिलांची चाचणी करण्यात येत आहे. बांगलादेश, नायजेरिया आणि अफगाणिस्तान या देशांमध्येही या कंपनीचे उत्पादन पोहोचले असून तिथेही चांगला प्रतिसाद मिळत आहे. करोनाकाळात पाठक यांच्या कंपनीने ‘बेबी बिट’ हे उत्पादन तयार केले. करोनाबाधित गर्भवती महिलेची प्राणवायूची पातळी कमी झाल्यास त्याचा परिणाम बाळावर होत असतो. अशा वेळी बाळाचे हृदयाचे ठोके मोजणे अत्यावश्यक असते. या कीटने बाळाचे हृदयाचे ठोके मोजणे शक्य झाले. विशेष म्हणजे गर्भवती महिलांना घरी त्यांच्या चाचण्या घेणे शक्य झाले.

शंतनू पाठक लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१७

अनाथ तरुणांचे पुनर्वसन

वयाच्या १८व्या वर्षांनंतर अनाथाश्रमातून बाहेर पडणाऱ्या मुला-मुलींचे पुनर्वसन करण्याच्या हेतूने सागर रेड्डी यांनी २०१० मध्ये ‘एकता निराधार संघ’ ही संस्था सुरू केली. सुरुवातीला नवी मुंबईत भाडयमच्या खोलीतून सुरू केलेली ही संस्था राज्यभरात पसरत आहे. सागर रेड्डी यांना २०१७चा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर  त्यांच्या सार्वजनिक आयुष्यात आमूलाग्र बदल घडले. अनेक दात्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून अनेक अनाथ मुलांना दत्तक घेतले. या तीन वर्षांत २८ मुलांना दत्तक घेत त्यांचे पालनपोषण आणि शैक्षणिक खर्च उचलला आहे.  अनाथाश्रमातून बाहेर पडलेल्या तरुणांच्या समस्येवर सागर यांनी आवाज उठवल्यानंतर हा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर आला. परिणामी सरकारी नोकरीत अनाथ तरुणांना एक टक्का आरक्षण मिळालेच शिवाय ती व्यक्ती राहतो तोच पत्ता समजून कागदपत्रे बनवण्याचा नियम अमलात आला. सुमिता तांबे या लेखिकेने सागर रेड्डी यांच्या जीवनावर पुस्तक लिहिले असून त्याची चौथी आवृत्ती येत्या काही दिवसांत कोल्हापूर येथे प्रकाशित होणार आहे.

सागर रेड्डी लोकसत्ता तरुण तेजांकित- २०१७

प्रायोजक

*  मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) 

*  सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि., महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

*  पॉवर्ड बाय :  महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta tarun tejankit award winners life journey zws
First published on: 03-03-2022 at 00:52 IST