सौजन्य – खाणं म्हणजे नुसतं उदरभरण नव्हे. तो रंग, रूप, रस, गंध, चव या सगळ्या संवेदनांना तृप्त करणारा अनुभव असतो. एकदा घेतल्यावर पुन:पुन्हा हवासा वाटणारा.. म्हणूनच खाण्यावर प्रेम करणं म्हणजे जगण्यावर मनापासून प्रेम करणं..
वजनाच्या काटय़ावर उभं राहणं ही गोष्ट तमाम स्त्री जातीला एक भयानक शिक्षा वाटत आलेली आहे आणि अर्थात मीदेखील त्याला अपवाद नाही. पण दर आठवडय़ाला माझी जीम इन्स्ट्रक्टर नेमाने मला त्या इलेक्ट्रॉनिक काटय़ावर उभं करते आणि मला तिच्या प्रश्नाच्या सरबत्तीसह या शिक्षेला सामोरं जावं लागतं. आता मागच्याच पंधरवडय़ातली गोष्ट.. सकाळी सकाळी वजन काटय़ावर माझं वजन २०० ग्रॅमहून जास्त आलं. बस्स!.. अगदी मोठे डोळे करून कटाक्ष टाकत कुत्सितपणे ती बया म्हणे- ‘‘गणपतीत चांगलं साजूक तूप घालून उकडीचे मोदक चापलेले दिसतायत तुम्ही.’’
आता तुम्हीच सांगा.. गणपतीत उकडीचे मोदक साजूक तुपासह नाही ओरपायचे तर काय?
समस्त खाद्यप्रेमी लोकांप्रमाणे मीदेखील तिच्या या कुत्सित प्रश्नाकडं दुर्लक्ष केलं. मला तर वाटतं खाद्यप्रेमी लोकांच्या शत्रूगणांच्या यादीमध्ये डायटिशन, फिटनेस तज्ज्ञ या सगळ्यांचा समावेश आवर्जून होत असावा. ८४ लक्ष योनींमधले सगळे जन्म भोगून झाल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो असं म्हणतात. अशा इतक्या सायासाने मिळालेल्या या जन्मी एवढे वेगवेगळे पदार्थ खाण्याचा छानपैकी आनंद घ्यावा तर डायटिशियन, फिटनेस एक्स्पर्ट नावाचे राहू-केतू तुम्हाला आडवे येतात.. आणि तुमचे आवडते खाद्यपदार्थ तुमच्यापासून हिरावण्याचे पापी विचार तुमच्या डोक्यात पेरतात (कुठे फेडतील ही डाएट फुडची पापं?)
माझं खाद्यप्रेम वयाच्या आठव्या वर्षांपासून सुरू झालं असावं बहुधा! माझी आजी खूप सुगरण होती. दिवाळीच्या दिवसात १५-२० पदार्थ ती निगुतीने करे, बुंदीचे मोतीचूर लाडू बुंदी पाडून साजूक तुपात तळून वळण्याचे कौशल्य ती लीलया पार पाडायची. पुढे वयोमानानुसार स्वयंपाकघरातून निवृत्ती घेतल्यावरही घरातल्या मुली, सुना यांना तितकाच चविष्ट स्वैपाक यावा याकडे तिचा खूप कटाक्ष होता आणि नुसतं दिवाणखान्यात सोफ्यावर बसून समोर आलेला पदार्थ वास आणि चवीवरून बरोबर जमला की नाही हे ती अगदी परफेक्ट ओळखायची. या सर्व पदार्थाबरोबर आमच्या घराची खासियत होती ‘करंजी’. घरातील प्रत्येक मुलीला आणि घरात येणाऱ्या प्रत्येक सुनेला ती तशीच टेस्टी बनविता आली पाहिजे, हा तिचा दंडक असायचा. खरं तर करंजी निगुतीने बनवणं हे अत्यंत कष्टाचं काम.. तेदेखील तिने शिकवलेल्या पद्धतीने पीठ कुटा, मग लाटय़ा बनवा, त्या सुकू नयेत म्हणून लवकर कातणीने कापा, त्याचं सारणदेखील तेवढंच चविष्ट पाहिजे आणि मग त्या करंज्या साजूक तुपात तळा. या दिव्यावरून मोठ्ठं दिव्य असायचं ते म्हणजे ‘आजीची चव परीक्षा’. तळलेल्या सर्वात पहिल्या करंज्यांच्या घाण्याची थाळी तिच्यासमोर ठेवली जायची.़ करंजीचा रंग गुलाबी पांढरा आहे का ते ती आधी पाहायची. नंतर ती तोडून आतमध्ये व्यवस्थित सात पदर सुटलेले आहेत का? ते सारण व्यवस्थित गच्चं भरलंय का? (कमी सारणाच्या करंज्यांना ती खुळखुळा म्हणायची) त्यानंतर ती करंजी क्रिस्पी झाली आहे का? आणि ती तोंडात टाकल्यावर पटकन विरघळते का? हे सर्व ‘पर्र्रफेक्ट’ जमलं तर तुम्ही परीक्षेत पास, नाही तर तुमच्या माथी तुम्ही कितीही शिकलात तरी किती पाककलेत अशिक्षित आहात हे लेक्चर ठरलेलं आणि नुसतंच लेक्चर नाही. तर परफेक्ट करंजी तुम्हाला शिकून करावीच लागणार हे ठरलेलं, पण त्यामुळे सर्व आत्या, काकी, आई कमालीच्या सुगरण बनल्या.
ही झाली स्पेशल रेसीपीची गोष्ट.. पण रोजच्या साध्या स्वैपाकातदेखील परंपरागत पदार्थ, भाज्या मसाले हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तसेच्या तसे कसे देता येईल याकडे तिचे विशेष लक्ष.. कॉलेजमध्ये गेल्यावर मी एकदा वैतागून तिला म्हणाले, ‘‘एवढे सगळे पदार्थ दिवाळीला कशाला गं करत बसायचे? आता सगळं रेडीमेड मिळतं, ते घेऊन यायचं..’’ त्यावर तिचं उत्तर खूप मार्मिक होतं, ‘‘बाजारात सगळंच मिळतं गं, पण घरी बनवलेल्या या पदार्थात तो करण्याकरिता ओतलेला जीव आणि त्यामागचा प्रेमाचा ओलावा हा कुठल्याही बाजारात मिळत नाही. आज तू बाजारातून पदार्थ आणून दिवाळी साजरी करशील. पण ती खूप कृत्रिम होईल.. लग्न करून उद्या तू जेव्हा सासरी जाशील आणि एखादा पदार्थ स्वत: बनवून घरच्यांना खायला देशील, मुलांना भरवशील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हे तुझ्यामुळे असेल.. आणि त्याची किंमत, आईच्या, आजीच्या हातची चव, त्यांचे प्रेम बाजारात नाही मिळणार.’’
याच्यापुढे काही आहे बोलण्यासारखं? माझी बोलती तर बंद झालीच, पण फक्त खाण्याचंच नाही तर आपण एखादा पदार्थ बनवून दुसऱ्याला खायला घालण्याचं महत्त्वही माझ्या मनात आपोआपच बिंबवलं गेलं.
माझ्या खाद्ययात्रेची सुरुवातदेखील तिच्यामुळेच झाली. दर महिन्याला तिची पेन्शन घेण्यासाठी बँकेत तिच्यासोबत जावं लागायचं. खरं तर सत्तरी पार केल्यावर ती तशी थकली होती. पण उत्साह, रसरसून जगण्याची उमेद आणि खाद्यप्रेम तसूभरही कमी झालं नव्हतं. दर महिन्याच्या दहा तारखेला आमची बँकेचं काम झाल्यानंतरची खाऊट्रिप ठरलेली असायची.
अगदी छानपैकी साडी नेसून पावडर लावून ती तयार व्हायची. बँकेचं काम संपलं की तिच्या आवडीच्या हॉटेलमध्ये जाऊन ‘पार्टी’.. मग कधी हैदराबादी बगारा बैंगण किंवा बिर्याणी, कधी कॅरमल कस्टर्ड, कधी केक.. अशा अनेक चांगल्या चांगल्या पदार्थाची सैर आम्ही एकत्र केली. खर तरं प्रकृतीमुळे फारसं खाणं तिला जायचं नाही आणि त्यात डॉक्टर्सची रिस्ट्रिक्शन! पण त्या दिवशी ते सर्व झुगारून ती आवडीने पदार्थ टेस्ट करायची. तिचं मनापासून जगणं, मनापासून खाण्यावर प्रेम करणं आजही माझ्या मनाच्या कप्प्यात कोरलं गेलंय! या सर्व भ्रमंतीत माझं आवडलेलं पहिलं ठिकाण म्हणजे ग्रँटरोड स्टेशन समोरची ‘मेरवान बेकरी’. १९१४ साली सुरू झालेली ही बेकरी जवळजवळ शंभर वर्षे त्याच अप्रतिम चवीचे मावा केक सव्र्ह करणारी.
या भ्रमंतीत ती इतिहासही समजून सांगायची. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कम्युनिस्ट चळवळ, आणीबाणी या सर्व आठवणी जशा जशा तिला आठवायच्या त्याची उजळणी या खाद्यभ्रमंतीत व्हायची. पुढे माझी आणि मेरवान बेकरीची छान गट्टी जमली. सकाळी ब्रेकफास्टला जायचं असेल तर मोठा ब्रून पाव मस्का लावून चहाबरोबर सव्र्ह केला जायचा. त्याबरोबर डबल ऑम्लेट आणि मेरवान स्पेशल मावा केक Awasom!! दिवसाची अशी सुनहरी सुरुवात झाल्यावर दुसरं काय हवं…
मेरवानबरोबर इराणी रेस्टॉरंटची जमलेली गट्टी पुढे कयानी, ब्रिटानिया, रिगल, अशी विस्तारत गेली.
कॉलेजमध्ये असताना इंग्लिश सिनेमा पाहण्यासाठी दक्षिण मुंबईत आलो असताना आमचा कॉलेजचा सर्व ग्रुप कॅफे बस्तानीमध्ये गेला. कॉलेजचं पहिलं र्वष त्यामुळे जवळ फारसे पैसे नव्हते. चहा आणि केक मागविल्यानंतर पुढय़ात क्रिम केक, काजू केक इत्यादीच्या २-३ थाळ्या समोर आल्या. आम्ही सगळेच जण घाबरलो. आता या सगळ्या केक्सचे पैसे द्यावे लागणार म्हणून सर्वाची चाचपणी सुरू झाली. इतक्यात आमच्यापैकी एकाने धीटपणे विचारले, ‘‘हमने तो सिर्फ ३ केक मंगाये है..’’ यावर त्या वेटरने हसून सांगितलं, तुम्हाला त्यातले जेवढे घ्यायचेत तेवढेच घ्या. आम्ही त्याचेच फक्त पैसे चार्ज करू.. आणि सगळ्यांचा जीव भांडय़ात पडला. पण मला त्यांची सव्र्ह करण्याची पद्धत मात्र जाम आवडली. तीच एका इराणी कॅफेच्या प्रवेशद्वाराची गोष्ट.. त्या प्रवेशद्वारापाशी अगदी मजबूत रोप आहे. त्यांच्या टोकाला बेल आहे. आपल्याला एखाद्या पदार्थाची चव आवडली की, ती बेल वाजवून तुम्ही आनंद व्यक्त करायचा.. किती छान ना.. आनंदाने या, आनंदाने निरनिराळ्या डेलिकसी ट्राय करा.. आणि तुमचा आनंद शेअर करा. (या सर्व इराणी कॅफेमध्ये सोप, टुथपेस्ट, हेअर ऑईल, माचिस अशा सर्व वस्तूंचा काउंटर असतो. मोठमोठय़ा काचा आणि पारसी चित्रांबरोबर गल्ल्यांवर बसलेला ‘मिस्कील बाबाजी’ तुमची आणि त्याची केमिस्ट्री छान जुळली की ‘डिकरा केम छे!’च्या आपुलकीने तुमचं स्वागत करतो आणि त्या दिवशीची एखादी स्पेशल डिश नाही तर केक तुम्हाला आवर्जून खिलवतो) इराणी रेस्टॉरंटचं अजून एक वैशिष्टय़ म्हणजे तुम्ही कितीही वेळ तिथे बसू शकता, कोणत्याही उडपी कॅफेसारखं वेटर येऊन बाजूला थांबणार नाही. या सगळ्या इराणी कॅफेचं इंटीरियर जवळपास सेम.. जुन्या जमान्यातलं फिलिंग देणारं.. पांढरे मार्बल टेबल, लाकडी नक्षीच्या खुच्र्या आणि खास ‘दुधाळ’ इराणी चहा, वर्षांनुवर्षे ज्याप्रमाणे मेरवानच्या ‘मावा’ केक्सची चव बदलली नाही, त्याचप्रमाणे इराणी दुधाळ चहाचीदेखील चव तीच आहे. त्यासोबत तुमचे दात मजबूत असतील तर ब्रून मस्का नाहीतर मऊसूत आणि भरपूर लोणी लावलेला बन मस्का उनेज!!! बरं महागाई वाढली म्हणून मस्का लावण्यात कंजुषी नाही. उगाचच मस्क्याच्या नावाखाली पांढरा पातळसा थर नाही आणि हे सर्व ताजं लुसलुशीत..
त्यामुळेच इराणी कॅफे मला मुंबईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग वाटतात. रिगल, कयानी, बस्तानी कॅफेनंतर ब्रिटानियाचा नंबर लागतो. ब्रिटानियाचा ‘बेरी पुलाव’ ही एक अफलातून डिश आहे. या इराणी डिशची ओळख खवय्या मुंबईकरांना ब्रिटानिया अॅण्ड कं.मुळे झाली.
१९२५ मध्ये व्ही. टी.च्या हॉर्निमन सर्कल परिसरात ‘ब्रिटानिया अॅण्ड कं.’चं रेस्टॉरंट उघडण्यात आलं. त्या काळी ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय असलेलं हे रेस्टॉरंट आजही पाऊण दशकानंतर या परिसरात आपली लोकप्रियता टिकवून आहे. बेरी पुलाव, बिर्याणी व चिकन ग्रेव्हीच्या पॉप्युलर डिशेसनंतर इकडची Parasi Authentic सल्ली बोटी, धनसाक आणि कॅरमल कस्टर्ड.. यांचं साग्रसंगीत जेवण म्हणजे तुमची दुपार सुफळ संपूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही.
या सर्व इराणी कॅफेनंतर आमच्या कॉलेजच्या खाद्यप्रेमी ग्रूपची वर्षांतून ठरलेली यात्रा म्हणजे महमद अली रोड. तोही रमजानच्या काळात. एरवीदेखील शालिमारची बिर्याणी, नल्ली नहारी आणि इतर डेलिकसी टेस्ट करण्यासाठी जरूर जावं. पण रमजानच्या काळात या भागातला उत्साह आणि विविध पदार्थाची रेलचेल, खाद्यपदार्थाचा घमघमाट ही अनुभवण्याची गोष्ट आहे. अस्सल खवय्यांनी रमजानच्या काळात येथील खाऊ गल्लीची वारी जरूर करावी. पण एक वैधानिक इशारादेखील आहे बरं का! तुम्ही डाएट फूड, लोकल फूड किंवा कॅलरी कॉन्शस असाल तर या वारीत चुकूनदेखील जाऊ नका. इथं कॅलरी कॉन्शस व्यक्तींचे काम नोहे. इथल्या वारीची सुरुवात होते ती सुलेमान उस्मान मिठाईवाल्यापासून. निरनिराळय़ा प्रकारच्या स्पेशल बर्फी, मालपुवा, खाजा, शाही हलवा, फिरनी, अफलातून.. यादी न संपणारी आहे. खरं सांगायचं तर इथे भेट देण्याआधी दिवसभर उपवास करणं मस्ट!!! अन्यथा तुम्ही महमद अली रोडवरील या खाद्यजत्रेला न्याय देऊ शकणार नाही. तुम्ही पट्टीचे ‘गोड’ खाऊ असाल तर ‘साखरेचे खाणार त्याला देव देणार’ या उक्तीप्रमाणे अनेकविध गोडाचे, अत्यंत सुबक आणि आकर्षक रंगात तुमच्यासमोर हाजीर असतील.
इकडचा एक मालपुवा रिचवायला फार वेळ लागतो. तुमच्यासमोर अवाढव्य कढईत सोनेरी रंगात तळून तो गरमागरम मालपुवा तुमच्या प्लेटमध्ये अवतरेल.. पण खरे खवय्ये तो मालपुवा तसा खाणार नाहीत. ते तिथेच ऑर्डर देतील. ‘‘एक स्पेशल मालपुवा मलाई मारके’’ आणि तो मग सोनेरी रंगाचा मालपुवा त्यावर २०० ग्रॅम मलईची पांढरी पखरण लेऊन तुमच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी तयार असेल. अफलातून! अफलातून म्हणजे शब्द नव्हे, हा आहे मिठाईचा एक प्रकार. साजूक तुपात माखलेली, पिस्ते आणि बदामाचे काप लावलेल्या चांदीच्या वर्खातलं ‘‘अफलातून’’! अगदी नावाप्रमाणे अफलातून. तोंडात टाकल्यावर क्षणार्धात विरघळणारे हे दोन पदार्थ खाऊन अगदीच तोंड गोडमिट्ट झालं असेल तर थोडी कमी गोड, थंड मातीच्या मटक्यातून समोर येणारी ‘फिरनी’.. त्यातही प्रकार आहेत. केसर, मँगो, स्ट्रॉबेरी.. त्या त्या फिरनीच्या चवीबरोबर त्या मातीच्या भांडय़ाची येणारी चव.. अहाहा.. वर्णन करण्याकरिता शब्दच अपुरे आहेत. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर वेगवेगळ्या प्रकारचे कबाब, चिकन टिक्का, कुर्मा, शिग कबाब यांचे स्टॉल सर्वत्र दिसतील. त्यातील ‘चिकन लाहोरी’ ही डिश तर खास याच भागाची खासियत आणि या ठेल्यांची मांडणी पण खूप वेगळी. गाडीवर एका बाजूला धगधगती शेगडी आणि त्यावर खरपूस भाजले जाणारे निरनिराळे कबाब आणि दुसऱ्या साइडला बर्फाची एक लादी आणि त्यावर पसरलेला कांद्याचा थर, त्यावर नजाकतीने डोकावणारे पुदिन्याचे गुच्छ..
रमजानच्या काळात तुम्ही अख्खी रात्र चविष्टपणे वेगवेगळे पदार्थ टेस्ट करण्यात घालवू शकता, एवढे खाण्याचे विविध प्रकार इथे उपलब्ध असतील. रमजानच्या आणि ईदच्या माझ्या या खास पदार्थासाठी मला अजून एक ठिकाण आवर्जून आठवतं.. भिवंडी. जवळपास सात वर्षे भिवंडी शहरात राहिल्याने या शहराशी एक वेगळे ऋणानुबंधाचे नाते आहे. भिवंडीतील लोक मनापासून आदर करणारे, प्रेम करणारे.. भिवंडीमध्ये दर ईदला सर्व अधिकाऱ्यांनी मोहल्ला कमिटी तसेच इतर प्रतिष्ठित नागरिकांच्या घरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जाण्याचा रिवाज आहे. सुरुवातीच्या काळात एका घरी मी असंच उपवास आहे म्हणून सांगितलं आणि पाच मिनिटांत त्यांनी मला उपवासाचा चिवडा खाण्यास दिला. बटाटय़ाच्या सळ्यामध्ये काजू, किसमिस, मनुके, खारावलेले बदाम आणि पिस्त्याची एवढी रेलचेल होती की, प्रथमच मी असादेखील उपवासाचा चिवडा असू शकतो हे अनुभवलं. दुसरी अगदी आवर्जून भिवंडीच्या बाबतीत सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे कित्येक घरामध्ये सुग्रास जेवण करणाऱ्या दादी, नानी, फुफी, अम्मा आहेत आणि त्यांच्या हातच्या वेगवेगळ्या डेलीकसीज ना कुठलीही तोड नाही. असंच एकदा एका परिचिताकडे ईद दरम्यान गेले असता मी व्हेज खाणार हे सांगितले तर केळ्याचा अप्रतिम हलवा माझ्यासमोर आला. भारतातल्या सगळ्या प्रांतातून आलेले लोक भिवंडीत राहत असल्याने तुम्ही संपूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही चाखू शकता. मी बऱ्याच वेळा इकडच्या दादी, नानीकडून पदार्थ शिकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आपल्या हाताच्या मापाने ‘इतनुसा लेना’ म्हणत सांगितलेली परिमाणे वापरूनदेखील त्यांच्या पाककलेची सर माझ्या प्रयोगात काही उतरली नाही. अजूनदेखील ईदच्या दिवशी ‘शिरकुर्मा’ बनवताना त्या पाक कौशल्याची नजाकत काही त्यात उतरत नाही.
इथे मी मुस्लीम चविष्ट पदार्थाची खाद्ययात्रा केली तितकेच मनापासून आंध्र प्रदेशाचे पदार्थही चाखले. ‘पप्पू-चारू’ ही नावं कोणा मुलांची नाही. हा आहे आंध्र गृहिणीच्या हातचा एक स्पेशल डाळ-भात. सोबत तिखट लोणचं, हैदराबादी प्रकारचे चिकन, हैदराबादी बिर्याणी, चिकन रोस्ट आणि कोळंबीच्या वेगवेगळ्या आंध्र प्रदेशच्या डिशेस.. Just Yummy!!! गरारे, मुरक्कू, वेगवेगळ्या प्रकारचे वडे, गरेलू आणि पेसारट्टू नावाचा मूंग डाळ डोसा मला माझ्या या खाद्य प्रवासात चाखायला मिळाला. तिखट, स्पायसी आणि चिंचेचा कोळ घातलेले आंध्र जेवण म्हणजे तिखट खाणाऱ्यांसाठी पर्वणीच.. आतापर्यंत कांदा भजी हा प्रकार मला माहीत होता. परंतु स्पेशल आंध्र चिकन भजी मी भिवंडीत टेस्ट केली. बाकीच्या स्वीट डिशेससह ‘ओबाटुट’ आणि ‘अरिसेलु’ या दोन आंध्रच्या खास स्वीट डिश खूप छान असतात.
आंध्रच्या खाद्य संस्कृतीत सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, पुन्हा संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण असे चारीठाव वेगवेगळे पदार्थ केले जातात आणि प्रेमाने खिलवले जातात.
माझी ही खाद्ययात्रा इंदोरच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण राहील. इंदोरी माणूस खवय्या आणि रसिक तिथे सकाळी सकाळीदेखील जागोजागी ठेले लावलेले दिसतील आणि लोक सकाळच्या इंदोरी पोह्य़ांचा ब्रेकफास्ट रस्त्यावर उभे राहून करताना दिसतील. इंदोरी कांदे पोहे आपल्या कांद्यापोह्य़ापेक्षा थोडे वेगळे असतात. काही ठिकाणी पोह्य़ांवर कच्चा कांदा घातला जातो, मग शेव पेरली जाते. इंदोरी खवय्या त्याचे पिवळे धमक पोहे लसुणी इंदोरी शेव, कोथिंबीर आणि लिंबू यांचे मिश्रण पेरून खातो आणि त्यासोबत गरमागरम जिलेबी. याच इंदोरी खवय्याची रात्रीची सैर होते ती राजवाडा सराफा भागात, दिवसा ही गल्ली सराफा गल्ली म्हणून प्रसिद्ध आहे, पण रात्री या गल्लीचे अख्खं रूप पालटून जाते. ही गल्ली बदलते ती अस्सल खाऊ गल्लीत! इथे चायनीज, मेक्सिकन, साउथ इंडियन सर्व प्रकारचे पदार्थ चाखायला मिळतील. त्यातल्या इंदोरी स्पेशालिटीज आहे इंदोरी साबुदाणा, फराळी खिचडी, मावा बाटी, वेगवेगळ्या प्रकारच्या तिखट गरमागरम कचौच्या, आलुचाट पॅटिस, पाणीपुरी, मुंग डाळ हलवा आणि मावा जिलेबी. विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ गरमागरम तुमच्यासमोर तयार असतात. रात्री दोन वाजता थंडीत कुडकुडत गरम मावा जिलेबी आणि मुलायम रबडीची चव तुमची रात्र अविस्मरणीय बनवते.
माझ्या खाद्ययात्रेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे कोलकात्याचा. कोलकाता किंवा पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या दिवसांत मिळालेलं बंगाली सुगृहिणीच्या हातचं आमंत्रण चुकूनही चुकवू नये असं. बंगाली लोक, बंगाली संस्कृती अगदी मिष्टी दोईइतकी गोड. सुंदर बंगाली ललना तिच्या परंपरागत बंगाली साडीत, किणकिणणाऱ्या बांगडय़ांसह पूर्ण बंगाली साजशृंगारात ‘रोशोगुल्ला’ वाढते तेव्हा तो ‘भीषोण शोंदोर’ लागतो आणि आपण ‘आमी तुमाके भालो बाशी’ म्हणत बंगाली मिठाया गट्टम करत राहतो. आपल्याकडे जसे पाणीपुरीचे ठेले असतात, तसे कोलकात्यात रोशोगुल्लाचे ठेले दिसतात आणि बंगाली रसिक पानाच्या द्रोणामध्ये त्याचा आस्वाद घेताना दिसतात.
अस्सल बंगाली खवय्या रोशगुल्ला खातो तो खजुराचा गूळ म्हणजेच नोलेन गुडपासून बनलेला. त्यामुळे नोलेन सोंदेश, पायेश, रोशोगुल्ला हा हेल्थ-कॉन्शस लोक बिनधास्त खाऊ शकतात. ‘साखरेचे खाणार त्याला देव देणार’ या म्हणीतील देव बहुधा बंगाली असावा असे वाटावे, एवढे अप्रतिम बंगाली मिठायांचे एक से बढकर एक प्रकार तुमच्यासमोर येतील. मातीच्या छोटय़ा मटक्यातील घट्ट ‘मिष्टी दोई’ची चव तुमच्या जिभेवर रेंगाळत असतानाच रोशोगुल्ल्याने संपूर्ण भरलेला मटका तुमच्यासमोर येतो. सोंदेश, पायेश, पंतुआ, चोमचोम, सीताभोग, खीर कोदम, लवंगो लतिका, मलाई चॉप, खीर चॉप, कलाकंद, राजभोग, भापा पीठा, रोश मलाई, लाडूचे प्रकार.. अहाहा..
बंगाली मासा हिल्सा किंवा इलिशचे प्रकार चाखण्यासाठी मात्र आपल्याला आपली टेस्ट थोडी डेव्हलप करावी लागते. सर्वसाधारणपणे आपल्याकडे गोडय़ा पाण्यातील मासे खात नाहीत. त्यातही हे मासे मोहरीच्या तेलात किंवा मोहरीची पेस्ट वापरून बनवले जातात. त्यामुळे याची चव थोडी तिखट, उग्र वाटू शकते, पण एकदा ही ऑथेंटिक बंगाली टेस्ट तुमच्या जिभेवर रुळली की तुम्ही इलिश माछ, मलई चिंगोर (कोळंबी), शोरशे इलिश, भापा रुई हे माशाचे प्रकार मनसोक्त खाऊ शकाल. एकटा इलिश हा मासा बनवण्याचे पश्चिम बंगालमध्ये १०८ वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक बंगाली सुगरण आपल्या खास पाहुण्याचे स्वागत तिच्या स्पेशल इलिश रेसिपीने करते. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे चिकन आणि मटणाचे काठी रोल कबाब, कच्ची बिर्याणी, रोस्टेड मटण, अशी खास नॉनव्हेज व्हरायटी तुम्ही चाखू शकता. शाकाहारी लोकांसाठीदेखील बंगाली मिठायांखेरीज वेगवेगळ्या भाज्या बंगाली मसाल्यांमध्ये दही वापरून शिजवल्या जातात. शुक्तो, शाक, बैंगन भांजा, आलू भोरता, व्हेज चोरचोरी, कोरमा, झोल (व्हेज स्टय़ू) कोफ्ता यांसारख्या अनेक व्हरायटी असतात. माझी आवडती बंगाली व्हेज आहे आलू-लुचि, म्हणजेच आपल्याकडच्या पुरी आणि बटाटय़ाच्या भाजीचे बंगाली व्हर्जन. याचा भरपेट नाश्ता झाल्यावर पुढचे चार-पाच तास तरी तुमच्या पोटात कावळे कोकलणार नाहीत. बंगाली खाद्ययात्रेत अनेक लज्जतदार प्रकार आहेत. त्यात आणखी एक म्हणजे ‘झालमुरी’. आपल्याकडच्या भेळेसारखा हा अत्यंत चविष्ट प्रकार. संध्याकाळी चारच्या सुमारास कोलकात्याच्या खाऊगल्लीत झालमुरीच्या गाडय़ा लावलेल्या दिसतील आणि बंगाली खवय्ये शांतपणे तिचा आस्वाद घेताना दिसतील.
ऑथेंटिक बंगाली खाण्यासाठी बंगाली मित्रमैत्रिणीच्या घरची दुर्गापूजा आठ दिवस अटेंड करणं मस्ट..
मला तर वाटतं तिखट, गोड, आंबट असे प्रत्येक चवीचे पदार्थ कोणताही भेदभाव न करता चाखावे. खाण्याच्या बाबतीत काश्मीरच्या रोगन जोशपासून केरळच्या अवियल आणि पायसमपर्यंत, राजस्थानच्या दालबाटी, चुरमापासून मेघालयाच्या मोमोजपर्यंत, पंजाबच्या पंजाबी लस्सी, पालक पनीर, सरसोदा सागपासून गोव्याच्या फिश फ्राय, कोलंबी करी, चिकन विंदालु आणि सोलकढीपर्यंत. गुजरातच्या उंधियो, खमण, कढीपासून कोलकाताच्या मिश्टी दोई, संदेश, रसमलाई आणि बैंगन भाजा, ईलिश मास आणि लुची सब्जीपर्यंत अगदी प्रत्येक प्रांताच्या प्रत्येक खाद्यप्रकारावर मनापासून प्रेम करावं. अगदी आपल्या महाराष्ट्रातदेखील खाण्याचं किती वैविध्य आहे. वऱ्हाडी वडा भात, सावजीचं मटण, खानदेशी वांग्याचं भरीत, खापरावरचे मांडे, कोकणातले माशाचे विविध प्रकार, आमरस पुरी, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि पुरणपोळी, मुंबईची पाणीपुरी, भेळपुरी आणि पावभाजी, वडापाव. जेवढे जिल्हे तेवढय़ा वेगवेगळ्या पाककृती आणि त्या पाककृती करणारे कौशल्यपूर्ण हात! असं म्हणतात पुरुषाच्या हृदयाचा मार्ग पोटातून जातो. पण मला वाटतं केवळ पुरुषांच्याच नाही तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयाचा मार्ग पोटातून जातो आणि म्हणूनच आपण जेव्हा दूरदेशी जातो आणि बऱ्याच दिवसांनी परत येतो तेव्हा आपल्याला जेवणाच्या ताटातली आपली आवडती डिश सुखावते आणि आपण आडवा हात मारतो.
माझ्या या खाद्ययात्रेत आजी, आत्या, काकी, सासुबाई, माझ्या सर्व मित्र-मैत्रिणीच्या आया, वहिन्या आणि अनेक नानी, दादी, मावशी, मामी या सर्वाचा खूप सहभाग आहे. त्यातील प्रत्येकीने मला त्यांची खासियत प्रेमाने बनवून खाऊ घातली. कित्येक वेळा शिकवली आणि मनापासून खाण्याचा आणि खिलवण्याचा आनंद दिला. आणि या तमाम आनंददायी खाद्ययात्रेतून मला एकच साधी सोप्पी फिलॉसॉफी समजली.. ‘‘या जन्मावर, या चविष्ट खाण्यावर शतदा प्रेम करावे.’’
संग्रहित लेख, दिनांक 21st Oct 2013 रोजी प्रकाशित
खाण्यावर शतदा प्रेम करावे…
खाणं म्हणजे नुसतं उदरभरण नव्हे. तो रंग, रूप, रस, गंध, चव या सगळ्या संवेदनांना तृप्त करणारा अनुभव असतो. एकदा घेतल्यावर पुन:पुन्हा हवासा वाटणारा.. म्हणूनच खाण्यावर प्रेम करणं म्हणजे जगण्यावर मनापासून प्रेम करणं..

First published on: 21-10-2013 at 02:19 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love your food