राज्यात सर्वच थरांत वाढणारी व्यसनाधीनता पाहून अवचट दाम्पत्याने मुक्तांगणया संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे मोठे कार्य चालू आहे. आता तर संस्थेचा व्याप वाढत आहे. मुक्तांगणच्या स्थापनेला तीन दशके होत असल्याबद्दल संस्थेच्या कामाचा आढावा..

माझी आई डॉ. अनिता अवचट. ती  १९७१ पासून पुण्यातल्या मनोरुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करत होती. तेव्हा मनोरुग्णांबरोबर दारू, चरस, गांजा यांचं व्यसन असणारे व्यसनी तिथं उपचारासाठी आणले जायचे. कारण तेव्हा महाराष्ट्रात स्वतंत्र असं व्यसनमुक्ती केंद्र नव्हतं. १९८०च्या दशकात महाराष्ट्रात ड्रग्जची समस्या हळूहळू वाढायला लागली. त्याच दरम्यान झालं असं की तिच्या मत्रिणीच्या मुलाला ड्रग्जचं व्यसन लागलं आणि ती मत्रीण त्याला आईकडे घेऊन आली. मग आई-बाबांनी त्याला घरीच ठेवलं. बाबा  (डॉ. अनिल अवचट ) त्याच्याशी खूप बोलायचे. त्याच्याशी चर्चा करताना लक्षात यायचं की ही फक्त वैयक्तिक समस्या नाही तर ही एक सामाजिक समस्या आहे. या विषयात मुंबईला डॉ. आनंद नाडकर्णी काही काम करताहेत, असं आई-बाबांच्या लक्षात आलं. मग त्यांनी मुंबई गाठली. तिथं राहून त्यांचं काम पाहिलं. व्यसनी मुलांशी, त्यांच्या कुटुंबीयांशी कसं बोललं जातं ते पाहिलं. त्यातूनच बाबांनी ‘गर्दच्या जाळ्यात’ अशी लेखमाला लिहिली. ती  वाचून आई-बाबांना पुलं आणि सुनीताबाईंनी बोलावून घेतलं आणि पुलंच्या आर्थिक मदतीतून मग २९ ऑगस्ट १९८६ रोजी मनोरुग्णालयातील एका  वॉर्डमध्ये ‘मुक्तांगण’ सुरू झाले. ‘मुक्तांगण’ हे नावसुद्धा पुलंनीच दिलं.

senior scientist dr anil kakodkar
अग्रलेख : सुरक्षित सपाटांचे साम्राज्य!
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती

‘मुक्तांगण’ची रचना आश्रमासारखी करण्यात आली आहे. इथं साधेपणा आहे. समानता आहे. रुग्णांमध्ये डॉक्टर, इंजिनीअर, बेरोजगार, शेतकरी असं कुणीही असलं तरीही इथं आलेल्या सगळ्या रुग्णांना पांढरे कपडेच वापरावे लागतात. ते ३० दिवस इथं राहतात. त्यांना बाहेर जाऊ दिलं जात नाही. पण तरीही त्यांना जेलसारखं फिलिंग येणार नाही, अशी रचना करण्यात आली आहे.

‘मुक्तांगण’चं हे मॉडेल तुम्ही आम्हाला द्या, आम्ही ते बाकीच्यांना फॉलो करायला सांगू, असं म्हणत व्यसनमुक्तीसाठीचं ‘मुक्तांगण’ मॉडेल भारत सरकारनं स्वीकारलं. मग पुढे १९९९ मध्ये महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि गुजरात या पाच राज्यांतील व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ‘मुक्तांगण’वर सोपवली. त्यातूनच ‘रिजनल रिसोर्स अ‍ॅण्ड ट्रेिनग सेंटर’ तयार झाली. आज पाच राज्यांमध्ये १००हून अधिक केंद्रे आहेत. एखाद्याला व्यसनमुक्ती केंद्र सुरू करायचं असेल, तर मार्गदर्शक होईल असं ‘मिनिमम स्टॅण्डर्ड ऑफ केअर’ नावाचं मॅन्युअल सरकारनं करायला सांगितलं. ते करण्यातही ‘मुक्तांगण’चा मोठा वाटा होता. भारतात जी ४००हून अधिक केंद्रे व्यसनमुक्तीसाठी काम करत आहेत, त्यांना ते वापरणं बंधनकारक आहे.

‘मुक्तांगण’च्या कामाचा विस्तार होत होता आणि कामाची एक चांगली व्यवस्थाही तयार झाली होती. त्याचीच पावती म्हणून ‘मुक्तांगण’ला ‘आयएसओ’ मानांकन मिळालं. ‘मुक्तांगण’मध्ये रुग्णमित्राला आनंद कसा मिळेल, ते आजारी आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे, याच भावनेतून उपचार केले जातात. शिवाय उपचारात कुटुंबीयांना सामावूनसुद्धा घेतलं जातं.  दरम्यान, मला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं फ्रान्सला पाठवलं होतं. तिथं व्यसनमुक्तीची खूप सेंटर्स पाहिली. सोयीसुविधा हव्या त्या; पण तरीही रुग्ण बरे होण्याचं प्रमाण खूच कमी. त्याच्या मुळाशी जाऊन जेव्हा मी शोध घेतला तेव्हा जाणवलं की, या उपचारात कुटुंबीयांचा सहभाग नाही. पण आईनं ‘मुक्तांगण’च्या मॉडेलमध्ये हा महत्त्वाचा भाग समाविष्ट केला होता. रुग्णमित्र आणि त्यांच्या कुटुंबीयांच्याही एकत्र सभा व्हायच्या. आईनं जेव्हा या सभा सुरू केल्या तेव्हा तिला असं जाणवलं की, रुग्ण जर विवाहित असेल तर त्याचा जोडीदाराशी संवाद नसतो. जो असेल तो फक्त भांडणाच्या स्वरूपात असतो. मग तिनं नवरा-बायको असं एकत्रित ‘सहजीवन सभा’ सुरू केल्या. पण त्यातही असं लक्षात आलं की, नवरा असल्यावर बाई मनमोकळं बोलत नाही. तिला दडपण येतंय. मग आईनं सहचरी सभा सुरू करायचं ठरवलं. पण दुर्दैवानं आईचं निधन झालं. पण मग तिच्या मृत्यूनंतर १० मार्च १९९७ला या सहचरी सभा सुरू झाल्या. नवरा किंवा मुलगा व्यसनाच्या आहारी गेला असेल, तर अशा स्त्रियांना या सहचरी सभेत सहभागी करून घेतलं जातं. सहचरी सभांचा खूप फायदा झाला. सहचरींना आत्मविश्वास मिळाला. बोलण्याची हक्काची एक जागा मिळाली.  मग पुढं असं लक्षात आलं की पुरुषांप्रमाणे महिलांचंही व्यसन वाढत आहे, मग महिलांसाठी एक ओपीडी होतीच. पण महिलांसाठी वेगळं केंद्र सुरू करण्यासाठी विचारणा होऊ लागली. त्यामुळं जानेवारी २००७ला महिलांसाठीचं वेगळं व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं. महिलांसाठी स्वतंत्र असं हे भारतातलं पहिलं केंद्र ठरलं.  पंजाबमध्ये व्यसनाचं प्रमाण खूप वाढत आहे. तिथं एकही व्यसनमुक्ती केंद्र नाही. त्यामुळं तिथल्या ‘डॉर्स कॅटल’ या कंपनीनं डिसेंबर २०१५ मध्ये ‘आम्ही निधी दिला तर तुम्ही केंद्र सुरू कराल का?’ याबाबत विचारणा केली. मग ‘मुक्तांगण’ची एक टीम पंजाबमधल्या तरणतारण जिल्ह्य़ात गेली. तिथं सव्‍‌र्हे केला. त्यात असं लक्षात आलं की तो सीमावर्ती जिल्हा असल्यामुळं तिथं अमली पदार्थाचा खूप शुद्ध माल येतो. तिथल्या प्रत्येक कुटुंबात किमान एक व्यसनी असल्याचं लक्षात आलं. तिथं केंद्र सुरू करण्याची गरज लक्षात आली आणि स्थानिक लोक गोळा करून त्यांना प्रशिक्षण देऊन तिथं केंद्र सुरू केलं. फत्तेह फाऊंडेशन या स्थानिक संस्थेच्या सहकार्यानं तिथं केंद्र सुरू झालं. पंजाबमध्येच काम करण्यासाठी इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांनी विचारलं. मग येत्या ऑक्टोबरमध्ये पंजाबमध्ये ‘इन्फोसिस- मुक्तांगण डीअ‍ॅडिक्शन सेंटर’ची सुरुवात होत आहे. हे केंद्र म्हणजे ‘मुक्तांगण’ची पहिली शाखा असेल.

वाढत्या व्यसनाच्या प्रमाणामुळं दुर्दैवानं ‘मुक्तांगण’चा विस्तार करावा लागत आहे. या क्षेत्रातली आव्हानंही खूप वाढली आहेत.  व्यसनी महिलांचं प्रमाण वाढतं आहे. शिवाय व्यसन करणाऱ्यांचा वयोगटही कमी होतो आहे. पूर्वी जास्त व्यसनी हे तिशीच्या आसपासचे असायचे, आता ते १४-१५ वयोगटांतली मुलं व्यसनी होण्याकडे जास्त कल दिसून येतो आहे. ही सगळी परिस्थिती बदलायची असेल, व्यसनाची गरज कमी करणं आणि व्यसनाची उपलब्धता कमी करणं या दोन गोष्टींवर भर द्यावा लागणार आहे. शिवाय व्यसनाला मिळणारी प्रतिष्ठा कमी करणं, त्याचं उदात्तीकरण थांबवणं यावरही काम करावं लागणार आहे. याबरोबर सध्या जी व्यसनं आहेत त्याला चांगल्या व्यसनांचे पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत.  संगीत, वाचन, खेळ ही अशी व्यसनं आहेत की ज्यामुळं कोणाचं नुकसान होत नाही. शिवाय त्यातून मिळणारा आनंद स्वत:बरोबर इतरांनाही वाटता येतो. ही अशी चांगली व्यसनं लावून समाजाला व्यसनमुक्त करणं हेच ‘मुक्तांगण’चं ध्येय आहे.  ‘मुक्तांगण’ जेव्हा सुरू झालं तेव्हा ‘या केंद्राची भरभराट होऊ दे, अशा शुभेच्छा मी देणार नाहीत. तर हे केंद्र लवकरात लवकर बंद करावं लागेल, अशी वेळ येऊ दे,’ असं पुलं म्हणाले होते. पण दुर्दैवानं व्यसनांची विविधता वाढते आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर रूप धारण करतो आहे. त्यामुळं ‘मुक्तांगण’चंही काम वाढवत न्यावं लागत आहे. जेव्हा ‘मुक्तांगण’ सुरू झालं तेव्हा त्यात फक्त १५ बेड्स होते, आता ही संख्या १५० बेडपर्यंत पोहोचली आहे. यात आम्हाला कसलाही अभिमान वाटत नाही.   व्यसनमुक्तीच्या ‘मुक्तांगण’च्या कामाला प्रतिसाद मिळतो आहे; पण व्यसनाचं वाढतं प्रमाण पाहता व्यसन करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात आम्ही कमी पडतो आहोत. त्यामुळंच समाजाला आम्ही साद घालतो आहोत : या आणि ‘मुक्तांगण’ बंद करायला आम्हाला मदत करा..

 

मुक्ता पुणतांबेकर