हर्षद कशाळकर harshad.kashalkar@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृषी क्षेत्रात यापुढे केवळ चांगले उत्पादन घेऊन चालणार नाही,तर त्या उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग उभे केले तर या व्यवसायात प्रगती साधता येईल. कोकणची ओळख असणाऱ्या आंब्याबाबतही हीच व्यथा आहे. कृषी उत्पादनांची बाजारपेठेशी योग्य सांगड घालण्यासाठीदेखील हे आवश्यक आहे.

कोकणात आंबा उत्पादन मोठय़ा प्रमाणात होत असले तरी आंबा फळप्रक्रिया उद्योग फारसे विकसित झालेले नाहीत. त्यामुळे दरवर्षी फळ उत्पादनातील ३० ते ४० टक्के उत्पादन निरनिराळय़ा कारणांनी वाया जात आहे. त्यामुळे कोकणात फळ प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याची गरज आहे. सद्य:स्थितीत फळप्रक्रिया उद्योगांचे प्रमाण हे १ ते २ टक्केच असून त्यात वाढ अपेक्षित आहे.

जगातील एकूण आंबा उत्पादनापैकी ७० टक्के उत्पादन भारतात घेतले जाते. सहाजिकच आंबा निर्यातीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. आपल्याकडून दरवर्षी मोठय़ा प्रमाणात आंबा निर्यात केली जाते. यात कोकणातील हापूस आंब्याला जास्त मागणी असते. उत्कृष्ट चव, पौष्टिकता, आकर्षक रंग यामुळे आंबा हा फळसमूहाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान असतो.

पण दरवर्षी उत्पादित होणाऱ्या आंब्यापैकी सुमारे ४० टक्के आंबा निरनिराळय़ा कारणांमुळे वाया जातो. जवळपास ५८ ते ५९ टक्के आंबा बाजारात येतो. एकूण आंबा उत्पादनाच्या १ ते २ टक्के उत्पादनावर फळ प्रक्रिया केली जाते. जगभरातील इतर फळ उत्पादक देशांच्या तुलनेत देशात फळप्रक्रियेचे प्रमाण अत्यल्प आहे.

देशात आंबा फळ प्रक्रिया प्रामुख्याने तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यात केली जाते. यात प्रामुख्याने दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. यावरून आंबा फळ प्रक्रियेतील मर्यादा स्पष्ट होऊ शकतात. अलीकडच्या काळात कोकणातही काही आंब्यावर फळ प्रक्रिया करणारे प्रकल्प विकसित झाले आहेत. यात प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधूदूर्ग जिल्ह्यातील फळ प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. पण रायगड जिल्ह्यात आंब्यावर प्रक्रिया करणारे फारसे प्रक्रिया उद्योग सुरू होऊ शकलेले नाहीत.

रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकूण क्षेत्र ४२ हजार हेक्टर आहे. यापैकी १६ हजार ५०० हेक्टर हे उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २१ हजार ४२४ मेट्रिक टन उत्पादन होत असते. पण यातील बहुतांश आंबा हा खुल्या बाजारात विक्रीसाठी पाठवला जातो, त्यावर प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे खुल्या बाजारात मिळेल त्या भावात आंबा विकण्यावर बागायतदारांचा कल अधिक असतो.

आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू होते. ही प्रक्रिया मार्च महिन्यापर्यंत सुरू राहते. फळधारणेपासून साधारणपणे ९० ते १०० दिवसांनी आंबा विक्रीसाठी तयार होतो. त्यामुळे मार्च महिन्यापासून आंबा बाजारात दाखल होण्यास सुरूवात होते. मे महिन्यानंतर आंबा मोठय़ा प्रमाणात दाखल होत असतो. बाजारात लवकर दाखल होणाऱ्या आंब्याला चांगला दर मिळतो. पण मोहोर येण्याची प्रक्रिया लांबली तर आंबा बाजारात दाखल होण्यास उशीर होतो. जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. अशा वेळी उशिराने दाखल होणारा आंबा खराब होण्याची शक्यता असते. त्याला योग्य भावही मिळू शकत नाही. त्यामुळे बागायतदारांना आर्थिक नुकसान होते. हवामानातील बदलामुळे आंबा पिकावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

अशा परिस्थितीत आंबा पिकासाठी फळ प्रक्रिया उद्योग उपयुक्त ठरू शकतात. यामुळे आंबा उत्पादकांचे अर्थकारण सुधारू शकेल, त्याचबरोबर नाशवंत मालाचे मूल्यवर्धनही होऊ शकेल. वर्षभरम् हापूसची चव ग्राहकांना चाखता येऊ शकते. त्यामुळे कोकणात प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात फळ प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याची गरज भासू लागली आहे.

आंब्यावर फळ प्रक्रिया करून आंबा लोणचे, चटणी, आमचूर पावडर, पन्हे, आंबा पोळी, आंबा वडी, जॅम, मुरंबा आणि डबाबंद आमरस, ज्यूस यासारखे घटक आंब्यावर प्रक्रिया करून तयार करता येऊ शकतात. त्याला खुल्या बाजारात चांगली मागणीही असते. रायगड जिल्ह्यात दिवेआगर आणि नागाव मधील किरकोळ अपवाद सोडले तर जिल्ह्यात आंबा पिकावर फळ प्रक्रिया उद्योग फारसे विकसित होऊ शकलेले नाहीत.

राज्यात १.८२ लाख हेक्टर आंबा लागवडीखालील क्षेत्र आहे. त्यापासून ५ लाख टन आंबा उत्पादन घेतले जाते. राज्यात बहुतांश भागात आंबा लागवड होत असली यातील ९० टक्के उत्पादन हे एकटय़ा कोकणातून होते. हापूस, पायरी, रत्ना, सिंधू, केसर, राजपुरी आणि वनराज यासारख्या आंब्याच्या प्रजातींचे उत्पादन कोकणातून केले जाते. यातील हापूस आंब्याला देशविदेशातून मोठी मागणी असते.

आंबा फळ प्रक्रिया उद्योगाला जिल्ह्यात चांगला वाव आहे. मात्र सध्या तसे पर्याय जिल्ह्यात फारसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे इच्छा असूनही आम्ही फळप्रक्रियेसाठी आंबे देऊ शकत नाही. त्यामुळे जिल्ह्यात आंबा कॅिनग प्रक्रिया प्रकल्प जर सुरू झाले तर बागायतदारांचाही त्यातून फायदा होऊ शकेल. आंबा वाया जाण्याचे प्रमाणही कमी करता येऊ शकेल. – डॉ. संदेश पाटील, आंबा बागायतदार.

कोकणात आंबा, काजू, करवंद, फणस, कोकम, जांभूळ, नारळ अशी विविध फळे हमखास होतात. पण त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नगण्य आहेत. सद्य:स्थितीत असलेले फळ प्रक्रिया उद्योग केवळ ५० टक्केच क्षमता वापरतात. भारतात समाधानकारक फळांचे उत्पादन होत असतानादेखील फक्त १ ते २ टक्के फळांवर प्रक्रिया केली जाते. फळांचे पृथक्करण करून प्रक्रियायुक्त पदार्थ केल्यास प्रचंड प्रमाणात आर्थिक फायदा होऊ शकतो. फळांत मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे व खनिजे असतात. त्यामुळे त्यापासून तयार केलेल्या पदार्थाना वर्षभर मागणी असते. फळांवर प्रक्रिया केल्यास मोठय़ा प्रमाणावर फायदे होऊ शकतात. फळांची नासाडी होणार नाही. दर्जा व किमतीमध्ये स्थिरता आणता येईल. – डॉ. रवींद्र मर्दाने, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत.

जगात दरवर्षी जवळजवळ ३०० दशलक्ष टनांपेक्षा जास्त फलोत्पादन होते. सद्य:स्थितीत फलोत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. वाढत्या लोकसंख्येची फळांची गरज भागविण्यासाठी आपल्याला फलोत्पादन ४५ दशलक्ष टनांपर्यंत वाढविणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात २०१९-२० साली फळबाग लागवडखाली एकूण अंदाजे ५,१०,७५४ हेक्टर क्षेत्र होते त्यातून अंदाजे ७९,८०,८९९ मेट्रिक टन उत्पादन झाले.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need of mango processing industry in konkan region zws
First published on: 26-04-2022 at 00:02 IST