उत्तर कोरियाचे अमेरिकेतील माजी विशेष आण्विक दूत किम -चोल यांच्यासह पाच अधिकाऱ्यांना त्या देशाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी मार्चमध्ये मृत्युदंड दिल्याचे वृत्त दक्षिण कोरियातील ‘द चोसन इल्बो’ वृत्तपत्राने दिल्यानंतर जगभरातील बहुसंख्य माध्यमांनी ते प्रसिद्ध केले. अमेरिकेने उत्तर कोरियाची आर्थिक नाकेबंदी केल्याच्या पाश्र्वभूमीवर किम जोंग उन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात हनोई येथे फेब्रुवारीत झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्याचे खापर जोंग उन यांनी या पाच अधिकाऱ्यांवर फोडले आणि त्यांच्यावर अमेरिकेसाठी हेरगिरी केल्याचा आरोपही ठेवला होता, असे ‘द चोसन इल्बो’ची बातमी म्हणते.
..पण या बातमीची सत्यता पडताळणे अशक्य. जोपर्यंत उत्तर कोरिया अधिकृतपणे काहीच जाहीर करत नाही तोपर्यंत या बातमीवर विश्वास ठेवणार तरी कसा? कारण यापूर्वीच्या अशा बातम्यांपैकी बहुतांश खोटय़ा (फेक न्यूज) ठरल्या आहेत असे निदर्शनास आणत ‘बीबीसी’ने, ‘आपण सावधगिरी का बाळगली पाहिजे’, असा लेखच ऑनलाइन आवृत्तीत प्रसिद्ध केला आहे. माध्यमांची कथित सूत्रेसुद्धा खोटी माहिती पुरवू शकतात, असा त्याचा रोख आहे. यापूर्वी गायिका साँग-वॉल बाबतही असेच घडले होते. ‘सहकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत मशीनगन चालवून तिच्या शरीराची चाळण करण्यात आली, अशी बातमी’ याच ‘द चोसन इल्बो’ने २०१३ मध्ये प्रसिद्ध केली होती. परंतु गेल्या वर्षी ही गायिका प्रकटली. आता तर ती उत्तर कोरियातील प्रभावी आणि महत्त्वाची व्यक्ती आहे. उत्तर कोरियाचे माजी लष्करप्रमुख री याँग यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मृत्युदंड दिल्याचे दक्षिण कोरियाच्या गुप्तचरांनी जाहीर केले होते, परंतु हे महाशयही काही महिन्यांनी प्रकटले होते.
उत्तर कोरियातील कथित बातमीस्रोत वार्ताहरांसाठी मौल्यवान आहेत, परंतु ते अडचणीतही आणू शकतात, असा इशारा ‘बीबीसी’ने दिला आहे.
आपल्याला मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्याशिवाय ती प्रसिद्ध करू नये, हे पत्रकारितेचे एक तत्त्व. पण या मृत्युदंडाच्या वृत्ताची खातरजमा करण्यास आपण असमर्थ असल्याची कबुली ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिली. रॉयटर्सने दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र खात्याकडे विचारणा केली. तेथील अधिकाऱ्यांनी प्रतिक्रियेस नकार दिला. दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांचे कार्यालय- ब्ल्यू हाऊसच्या अधिकाऱ्यांनी, आम्ही अशा खात्रीलायक नसलेल्या वृत्ताविषयी प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. अमेरिकेच्या व्हॉइट हाऊसच्या प्रवक्त्या सारा सॅण्डर्स यांनीही कानावर हात ठेवून कोणत्याही प्रतिक्रियेस नकार दिला. तरीही रॉयटर्सने ही बातमी दिली, त्या वृत्तपत्राच्या हवाल्याने.
न्यूयॉर्क टाइम्सने हे वृत्त देताना कमालीची काळजी घेतली. ह्य़ोन आणि त्यांच्या पथकाचे नेमके काय झाले असेल? म्हणजे त्यांना खरोखर मृत्युदंड दिला गेला असेल की त्यांची रवानगी श्रमछावणीमध्ये करण्यात आली असेल? की त्यांना तूर्त अज्ञातवासात पाठवले गेले असेल? की त्यांची चौकशी सुरू असेल? अशा अनेक शक्यता वर्तवणारा वृत्तांत न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केला आहे. जगापासून अलिप्त पडलेल्या उत्तर कोरियात नेमके काय घडतेय, हे खात्रीपूर्वक सांगणे कठीण असले तरी त्याचा अंदाज बांधणे शक्य आहे. परंतु सध्या तरी कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोहोचणे घाईचे ठरेल, असे काही विश्लेषकांचे मत असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तांतात म्हटले आहे. एक गोष्ट मात्र सर्वच विश्लेषक मान्य करतात ती म्हणजे हुकूमशहा किम आणि ट्रम्प यांच्यातील दुसरी परिषद निष्फळ ठरली. आपल्याला आलेल्या अपयशासाठी कोणाला तरी बळीचा बकरा बनवणे आवश्यक होते. किम यांनी ह्य़ोन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या बाबतीत केले असावे. परंतु त्यांना मृत्युदंड देण्याची किंवा तुरुंगात पाठवण्याची शक्यता कमी आहे, असे निरीक्षण दक्षिण कोरियातील ‘सेयाँग इन्स्टिटय़ूट’मधील विश्लेषक चेआँग सेआँग-चँग यांनी लेखात नोंदवले आहे.
मीडियाच्या सर्वप्रथम बातमी ‘ब्रेक’ करण्याच्या स्पर्धेत माहितीची खातरजमा करण्याचे तत्त्व- काही अपवाद वगळता सर्रास पायदळी तुडवले जाते. माहितीची खातरजमाच होत नसेल तर ती जगभर गाजत असली तरीही ती प्रसिद्धच न करण्याचे तत्त्व अल् जझिरा या वृत्तवाहिनीने पाळले. एखादे वृत्तपत्र एक सनसनाटी बातमी प्रसिद्ध करते आणि मग इतर त्याची री ओढतात. अशी री ओढणे अल् जझिराने टाळले. आजच्या पत्रकारितेतील ही दुर्मीळ गोष्ट ठरावी.
(संकलन : सिद्धार्थ ताराबाई)