गेल्या आठवडय़ात उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केल्याने जगभरात खळबळ उडाली. उत्तर कोरियासारख्या बेजबाबदार देशाच्या हाती अशी महाविध्वंसक अस्त्रे पडणे हा जागतिक शांततेसाठी मोठा धोका समजला जात आहे..
अण्वस्त्रांचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत
१. अणुबॉम्ब- यात युरेनियम-२३५ किंवा प्लुटोनियम-२३९ यांसारख्या किरणोत्सारी मूलद्रव्याच्या अणूंवर मंदगती न्यूट्रॉन्सचा मारा करतात आणि अणूंचे विखंडन (न्यूक्लियर फिशन) केले जाते. त्यातून मोठय़ा प्रमाणात बाहेर पडणाऱ्या ऊर्जेने प्रचंड विध्वंस घडवून आणता येतो.
२. हायड्रोजन (थर्मोन्यूक्लियर) बॉम्ब- यामध्ये अणुभंजनाऐवजी अणू सम्मीलनाची (न्यूक्लियर फ्यूजन) अभिक्रिया घडवली जाते. हायड्रोजनच्या डय़ुटेरियम किंवा ट्रिटियम या हलक्या समस्थानिकांच्या अणूंवर प्रचंड दबाव देऊन त्यांचे मीलन घडवून आणले जाते. त्यातून हेलियमसारख्या तुलनेने जड मूलद्रव्याचे रेणू घडतात. या प्रक्रियेत विखंडनापेक्षा खूप अधिक ऊर्जा बाहेर पडते. त्यामुळे हायड्रोजन बॉम्ब तितक्याच क्षमतेच्या अणुबॉम्बपेक्षा किमान तिप्पट विध्वंसक असतात. यात प्राथमिक स्फोट अणुबॉम्बसारखा होतो आणि नंतर त्याच्या प्रभावाने अणुसम्मीलन घडून येते.
३. न्यूट्रॉन बॉम्ब- या प्रकारच्या अण्वस्त्रामध्ये स्फोटाचा परिणाम काहीसा कमी करून प्राणघातक किरणोत्सर्गाची मात्रा वाढवलेली असते. त्यामुळे वित्तहानी कमी होऊन प्राणहानी जास्त होते.
अण्वस्त्रांची क्षमता मोजण्याची पद्धत
’ अण्वस्त्रांची क्षमता किलोटन किंवा मेगॅटन या एककात मोजतात. या पद्धतीत अण्वस्त्राच्या स्फोटातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेची तुलना ट्रायनायट्रोटोल्यून (टीएनटी) या पारंपरिक स्फोटकाच्या स्फोटातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेशी केली जाते.
’ एक किलोटन क्षमतेच्या अण्वस्त्राच्या स्फोटातून १००० टन टीएनटीच्या स्फोटाइतकी ऊर्जा बाहेर पडते.
’ एक मेगॅटन क्षमतेच्या अण्वस्त्रातून एक दशलक्ष टन टीएनटीच्या स्फोटाइतकी ऊर्जा बाहेर पडते.
’ हिरोशिमा, नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बची क्षमता साधारण २० किलोटनच्या आसपास होती. आजच्या बॉम्बची क्षमता शेकडो मेगॅटनपर्यंत वाढली आहे. त्यांच्या वापरातून पृथ्वीचा कित्येक वेळा विध्वंस होऊ शकतो.
अण्वस्त्रांचा इतिहास आणि प्रसार
जगातील पहिल्या अणुबॉम्बची चाचणी अमेरिकेने न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात १६ जुलै १९४५ रोजी घेतली. या मोहिमेचे नाव ट्रिनिटी असे होते. अणुबॉम्ब निर्मितीच्या प्रकल्पाचे सांकेतिक नाव प्रोजक्ट मॅनहटन असे होते आणि रॉबर्ट ओपेनहायमर हे त्यांचे प्रमुख होते. त्याच्यासोबत बनवलेले आणखी दोन बॉम्ब ‘लिटल बॉय’ आणि ‘फॅट मॅन’ म्हणून ओळखले जातात आणि ते ६ ऑगस्ट १९४५ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकण्यात आले. सोव्हिएत युनियनने २९ ऑगस्ट १९४९ रोजी त्यांच्या पहिल्या अणुबॉम्बचा स्फोट घडवला. अमेरिकेने १ नोव्हेंबर १९५२ रोजी पहिला हायड्रोजन बॉम्बस्फोट घडवला. तर सोव्हिएत युनियनने १२ ऑगस्ट १९५३ रोजी पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली. त्यानंतर अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन हे देश प्रमुख अण्वस्त्रधारी देश म्हणून उदयास आले आणि त्यांच्याकडील अण्वस्त्र भांडारात हजारो बॉम्ब एकवटले. त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि इस्रायल यांनीही ही क्षमता मिळवली. त्याचबरोबर इराण, उत्तर कोरिया, दक्षिण आफ्रिका आदी देशही त्या प्रयत्नात आहेत.
अनियंत्रित अण्वस्त्रप्रसार रोखण्यासाठी प्रमुख देशांत अण्वस्त्र प्रसारबंदी करार (एनपीटी), र्सवकष चाचणीबंदी करार (सीटीबीटी), स्ट्रॅटेजिक आम्र्स लिमिटेशन किंवा रिडक्शन ट्रिटी (सॉल्ट आणि स्टार्ट) असे काही करार अस्तित्वात आले आहेत. पण सर्वच देश त्याला बांधील नाहीत.
भारताच्या अणुचाचण्या
राजस्थानमधील पोखरण येथे भारताने प्रथम १८ मे १९७४ रोजी स्मायलिंग बुद्ध सांकेतिक नावाने अणुचाचणी घेतली. त्यानंतर ११ आणि १३ मे १९९८ रोजी दुसऱ्यांदा अणुचाचण्या घेतल्या. त्यात हायड्रोजन बॉम्बचाही समावेश होता. पण त्याचा अपेक्षित क्षमतेने स्फोट झाला नाही.
– सचिन दिवाण