सबका साथ सबका विकास या घोषणेवर स्वार होत नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आले. वर्षभरात अनेक वेळा सहकारी मंत्री, खासदार तर कधी संघपरिवारातील व्यक्तींच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची पंचाईत झाली. अगदी मोदींना पुढे येऊन या साऱ्यांना समज  द्यावी लागली. मात्र सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच खुद्द पंतप्रधानांनाच समाजमाध्यमांवरून टीकेचे धनी व्हावे लागले. चीन दौऱ्यात त्यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीने जगात भारतीयांची मान उंचावल्याचे सांगताना, यापूर्वी तुम्हाला भारतीय असल्याची लाज वाटत होती असे वक्तव्य तेथील भारतीय समुदायापुढे केले होते. त्यामुळे काँग्रेसने मोदींवर टीका करत परराष्ट्र भूमीवरून राजकीय भाषणबाजी करू नका अशी टीका केली. यापूर्वी मोदींनी परदेशी दौऱ्यावेळी पूर्वीच्या सरकारवर टीका केली होती. त्यामुळे मोदींच्या परदेशवारीबरोबर भाषणावरून मोदी समर्थक-विरोधकांमध्ये समाजमाध्यमांत जुंपली.  
केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने अडचण- केवळ संघपरिवारातीलच नव्हे तर अगदी सहकारी मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी मोदी सरकारची संसदेत व संसदेबाहेर कोंडी झाली. केंद्रीय अन्नप्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘रामजादे व हरामजादे’ याच्यातून निवड करायची असल्याचे सांगत वाद ओढवून घेतला. अखेर पंतप्रधानांनी सदनात स्पष्टीकरण दिल्यावर वादावर पडदा पडला.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी तर वादग्रस्त वक्तव्य करून सरकारची कोंडी केली. राजीव गांधी यांनी ‘गौरवर्णीय’ सोनिया गांधी यांच्याऐवजी नायजेरियन महिलेशी विवाह केला असता पक्षाने काँग्रेस अध्यक्ष म्हणून स्वीकारले नसते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसबरोबरच नायजेरियन उच्चायुक्तालयानेही आक्षेप घेतला. चार अपत्यांवरून वाद- भाजप नेत्या साध्वी प्राची यांच्या वक्त्यावरून सरकार वेळोवेळी अडचणीत आले. हिंदूंनी चार अपत्ये जन्माला घालावीत असे वक्तव्य केल्यावर पुन्हा त्याच्या समर्थनार्थ, चार अपत्ये म्हणाले ४० कुत्र्याची पिल्ले नव्हे, असे भडक वक्तव्य केले. उत्तर प्रदेशातील उन्नावचे खासदार साक्षी महाराज तर चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त वक्तव्ये करत राहिले. त्यांच्या वक्तव्याचा कळस म्हणजे नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाला त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जबाबदार धरले. त्यासाठी कारणही रंजक दिले. साक्षी महाराजांच्या मते राहुल यांनी काठमांडूला नुकतीच भेट दिल्याने हा प्रकोप झाला. याशिवाय हिंदू महिलांना चार अपत्ये हवी, अशी वक्तव्ये करून वाद निर्माण करत राहिले. हिंदू महिला अपत्य जन्माला घालणारे कारखाने नाहीत, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी फटकारल्यावर ‘अपत्याचा’ वाद थांबला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संसदेतील कामगिरी
सरकारी वर्षपूर्ती झाली असताना मोदींचे गाजलेले भाषण २७ फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार चर्चेला उत्तर देताना होते. यामध्ये मोदींनी मनरेगाचा या योजनेचा उल्लेख काँग्रेसच्या अपयशाचे स्मारक असा केला होता. माझी राजकीय समज चांगली आहे. त्यामुळे ही योजना सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी जोरकसपणे सांगितले. त्याचबरोबर राज्यसभेतही ‘घरवापसी’वरून वाद सुरू असतानाच असदुद्दीन ओवेसी यांच्या टीकेला लोकसभेत उत्तर देताना राज्यघटना हाच सरकारचा धर्म असल्याचे उत्तर मोदींनी दिले होते.
तसेच धमक्या देऊन लोकशाही चालत नाही हे सांगत काँग्रेसने अटलबिहारी वाजपेयींच्या काळातील विविध योजनांची नावे काँग्रेसने बदलल्याची मोदींनी योजनांची नावे घेत केलेली टीका काँग्रेसला झोंबली. राज्यसभेत भाजपकडे संख्याबळ कमी असल्याने विरोधकांनी वर्षभरात येथे वेळोवेळी सरकारची कोंडी केली होती.
त्याचबरोबर काश्मीरमध्ये पीडीपी-भाजप सत्तेवर आल्यावर फुटीरतावादी मसरत आलमला सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यावर संसदेत गदारोळ झाला. अखेर पंतप्रधानांना लोकसभेत स्पष्टीकरण द्यावे लागले.

नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील कामगिरीबद्दल उत्सुकता आहे. त्यातच संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत मोदींनी भावूक सुरुवात केली होती. भाजप सरकारने संसदीय कामकाजात गेल्या दहा वर्षांचा विक्रम केला असला तरी मोदींचा विशेष उल्लेख करता येईल असा सहभाग नव्हता..

१ १ म  हि  ने..  १ ९ दे  श..
भूतान – पॅरो, थिंफू
१६-१७ जून २०१४ –
पंतप्रधानांचा हा पहिला परदेश दौरा होता. त्यासाठी भूतानसारखा शेजारी देश निवडून मोदींनी दक्षिण आशियाई क्षेत्रातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
*****
ब्राझिल – १३ / १६ जुलै २०१४-
ब्रिक्स शिखर परिषद
ब्राझीलमधील फोर्तालेझा शहरात ‘ब्रिक्स’  संघटनेची सहावी शिखर परिषद झाली. या परिषदेत सदस्य देशांनी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधी या आर्थिक संघटनांशी बरोबरी करू शकेल अशा ‘न्यू डेव्हलपमेंट बँक’ स्थापनेवर चर्चा केली. मात्र मोदी या बँकेचे मुख्यालय नवी दिल्लीत आणण्यात अपयशी ठरले.
*****
नेपाळ – काठमांडू
३-४ ऑगस्ट २०१४
नेपाळमधील जनआंदोलनानंतर तेथे रुजत चाललेल्या लोकशाही प्रक्रियेनंतर नेपाळी संसदेला संबोधित करणारे मोदी पहिले परदेशी नेते बनले. याकडे दोन्ही देशांच्या संबंधातील महत्त्वाचा बदल म्हणून पाहिले गेले. याशिवाय जलविद्युत प्रकल्प आणि अन्य विषयांवरही संबंधांना उजाळा मिळाला.
*****
जपान – क्योटो, टोक्यो (टोकियो) – ३० ऑगस्ट – ३ सप्टेंबर २०१४
या भेटीत नागरी अणुकराराविषयी काही प्रलंबित मुद्दय़ांवर चर्चा झाली. तसेच जपानकडून भारतीय नौदलासाठी ‘यूएस-२’ या प्रकारची जमिनीवर व पाण्यातही उतरू शकणारी विमाने घेण्यावरही सकारात्मक चर्चा झाली.
*****
अमेरिका – २६-३० सप्टेंबर २०१४- संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेची बैठक
संयुक्त राष्ट्रांच्या ६९व्या आमसभेला उद्देशून केलेल्या भाषणात मोदींनी भारताला सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व मिळण्याची मागणी, दहशतवाद, पाकिस्तानकडून काश्मीर प्रश्नाचे केले जाणारे आंतरराष्ट्रीयीकरण, पर्यावरणरक्षण आदी विषयांचा समाचार घेतला.  
*****
म्यानमार – नेप्यिडॉ – ११- १३
नोव्हेंबर २०१४- पूर्व आशियाई परिषद
भारत-म्यानमार-थायलंड यांना जोडणारा महामार्ग बांधणे, म्यानमारमध्ये थेट विमान सेवा सुरू करणे, तेथील विकास प्रकल्पांत भागीदारी करणे अशा विषयांवर चर्चा झाली.
*****
ऑस्ट्रेलिया – १४ / १८ नोव्हेंबर
२०१४ जी २० परिषद
ऑस्ट्रेलिया हा अणुइंधन पुरवठादार देशांच्या संघटनेतील महत्त्वाचा देश आहे आणि त्याच्याकडून भारताने अणुभट्टय़ांसाठी अणुइंधन घेण्यासाठी चर्चा केली.
*****
सेशेल्स – १०/११ मार्च ,
मॉरिशस – ११/१३ मार्च २०१५
मोदींच्या सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंका हे देश हिंदी महासागरात मोक्याच्या ठिकाणी वसले आहेत आणि तेथे चीन आपला प्रभाव वाढवू पाहत आहे. चीनच्या त्या प्रयत्नांना काटशह देणे आणि भारताचा तेथील प्रभाव वाढवणे यासाठी या भेटींना महत्त्व होते. तसेच श्रीलंकेतील राजपक्षे यांचे चीनधार्जिणे सरकार जाऊन मैत्रिपाल सिरिसेना यांचे नवे सरकार आल्यानंतर तेथे भारतीय हितसंबंधांना पुनरुज्जीवित करणे यासाठी ही भेट मोलाची होती.
*****
सिंगापूर – २९ मार्च –
सिंगापूरचे संस्थापक अध्यक्ष ली कुआन यू यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थिती.  
*****
जर्मनी – १२/ १४ एप्रिल –
या दौऱ्यात जर्मन कंपन्यांना भारतात उत्पादन करण्यास आमंत्रित करणे हाच महत्त्वाचा मुद्दा होता. हॅनोव्हर येथे त्यांनी जर्मन उद्योजकांबरोबर चर्चा केली.
*****
कॅनडा – १४-१६ एप्रिल –
या दौऱ्यात दोन्ही देशांत १.६ अब्ज डॉलरचे करार करण्यात आले. त्यात संरक्षण, अवकाश आणि हवाई उद्योग, अणुसहकार्य, ऊर्जा, शिक्षण, तंत्रज्ञान असा क्षेत्रांतील सहकार्याचा समावेश आहे.
*****
चीन –  १४/१६ मे  –
अंतराळ, व्यापार, कृषी, उद्योग, पर्यावरण, तंत्रज्ञान आदी विषयांत सहकार्याचे तब्बल २२ अब्ज डॉलरचे २६ करार या भेटीत झाले. भारताने चिनी पर्यटकांना इलेक्ट्रॉनिक व्हिसा देण्याचा प्रस्ताव ठेवला. कर्नाटक-सिचुआन, औरंगाबाद-डुनहुआंग, चेन्नई-चाँगकिंग, हैदराबाद-क्िंवगदाओ ही शहरे (व प्रांतात) ‘सिस्टर सिटी’ मानून सहकार्याचे करार झाले. मात्र दोन्ही देशांतील सीमावाद व अन्य वादाच्या मुद्दय़ांवर चर्चा पुढे सरकू शकली नाही.
*****
मंगोलिया – १६/ १७ मे –
मोदींनी या भेटीत मंगोलियाला १ अब्ज डॉलरची मदत घोषित केली. मंगोलिया एक अणुइंधन पुरवठादार देश आहे. भारताने त्याच्याबरोबर युरेनियम खरेदीचा करार केला आहे. पण तेथून भारताला अद्याप युरेनियम मिळालेले नाही. ती प्रक्रिया मार्गी लावणे हे या भेटीचे एक मुख्य उद्दिष्ट होते.
*****
द. कोरिया – १८/ १९ मे –
मोदींच्या या भेटीत भारताच्या आर्थिक विकासप्रक्रियेत दक्षिण कोरियाचे योगदान वाढवण्यावर भर होता.
फ्रान्स – ९/१२ एप्रिल २०१५
या दौऱ्यातफ्रेंच कंपन्यांना भारतात उत्पादन करण्यास आमंत्रित करणे, संरक्षणसामग्री तसेच नागरी अणुसहकार्य (जैतापूर प्रकल्प) या विषयांवर भर देण्यात आला. फ्रान्सकडून भारतीय हवाई दलासाठी रफाल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार नव्याने, थेट सरकारी पातळीवर करण्यात आला.
*****
नेपाळ – २५ ते २७
नोव्हेंबर – सार्क परिषद :
आशियाई देशांतील परस्पर सहकार्यावर भर देण्यात आला.
फिजी – १९ नोव्हेंबर २०१४
इंदिरा गांधी यांच्यानंतर ३३ वर्षांनी फिजीला भेट देणारे मोदी पहिलेच भारतीय नेते बनले.आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात फिजीचे स्थान महत्त्वाचे आहे.
******
मोदी यांनी ३ ऑक्टोबरला विजयादशमी दिवशी ऑल इंडिया रेडिओवर पहिला ‘मन की बात’ कार्यक्रम केला. याचा उद्देश खेडय़ापाडय़ातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे आहे. आतापर्यंत मोदी यांनी सात वेळा रेडिओवर देशवासियांशी संवाद साधला. यामध्ये शेतकरी, युवा वर्ग, नेपाळ भूकंप या मुद्दय़ांचा समावेश होता. २७ जानेवारीला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘मन की बात’मध्ये सहभाग घेतला होता.

लोक मला विचारतात की, तुमचे ध्येय काय आहे? त्यांना सांगतो, मी चहा विकून इथवर पोचलो आहे. मी खूपच लहान माणूस आहे. त्यामुळे साध्या आणि लहान कामगिरीकडे माझे लक्ष केंद्रित केले आहे. मला छोटय़ा लोकांसाठी मोठे काम करायचे आहे.

कच्चे तेल..
*मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रती बॅरल ११२ डॉलर होती. ७ एप्रिलपर्यंत किंमत वाढून ५८ डॉलरवर गेली. यानंतर अनेक चढउतार घेत २५ एप्रिलला ती ३३ डॉलरवर होती.
*याला कारण अमेरिकेने कच्च्या तेलाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची मागणी घटली. याचबरोबर स्पर्धा वाढूनही आखाती तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी न केल्याने त्याचा परिणती किंमती घसरण्यात झाली.
*महागाई वाढण्यास काँग्रेस जबाबदार असल्याची टीका करणाऱ्या मोदींच्या कार्यकाळातही डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होतच आहे.
****
२६ मे २०१४ रोजी ५८.६६ रुपये असणारा डॉलर ३० सप्टेंबरला ६०.२१ रुपयांवर होता. तर २६ एप्रिलला हाच रुपया ६३.७७ पर्यंत घसरला. यानंतर काही अंशी वधारत ६३.६४ वर आला आहे.

विदेश यात्रा.. करार
सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीमध्ये जीडीपी ५.७ वर होता. तो दुसऱ्या तिमाहीमध्ये ५.३ वर येत चौथ्या तिमाहीमध्ये ७.५ वर आला. चौथ्या तिमाहीमध्ये काही काळ जीडीपीने ८.२ ची उंची गाठली होती.

मी तुम्हाला आश्वासन देतो. जर तुम्ही १२ तास काम करीत असाल तर मी १३ तास करीन. जर तुम्ही १४ तास काम करीत असाल तर मी १५ तास करीन. कारण मी प्रधानमंत्री नाही, मी प्रधानसेवक आहे.
नरेंद्र मोदी</strong>

समाज माध्यमांवरील छाप..
आपला देश सर्वाधिक जगातील सर्वाधिक तरुण देश आहे. मोदींनी याच तरुणाईला आपल्याकडे खेचण्यासाठी समाजमाध्यमांचा अत्यंत खुबीने वापर केला. यात त्यांनी युवा मनाला साद घातली. महत्त्वाचे प्रश्न मांडले.
माध्यमांमध्ये आपली प्रतिमा उभी करण्यासाठी खास असा ‘आयटी सेल’ निर्माण केला. यात ते यशस्वीही झाले. पंतप्रधान बनल्यानंतरही त्यांनी समाजमाध्यमांची साथ सोडली नाही. ते ट्विटर, फेसबुकवर बऱ्यापैकी सक्रिय राहिले आहेत. छोटय़ा छोटय़ा गोष्टींनाही त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. विविध योजना, संकल्पना यांची ते नेहमी आपल्या चाहत्यांशी देवाणघेवाण करत असतात. नरेंद्र मोदी आपली छबी व आपली कामे, कार्यक्रम या समाजमाध्यमांवर वेळोवेळी टाकतात. याचबरोबर मोदींना पाठिंबा दर्शविण्यासाठी  @iSupportNamo या ट्विटर खात्याचा वापर चाहत्यांकडून करण्यात येतो.
मोदी पंतप्रधान झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी पंतप्रधानांचे अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले. चार दिवसांतच याला लाखो लोकांनी भेट दिली.

नरेंद्र मोदी हेही सेल्फीच्या भलतेच प्रेमात आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदानानंतर त्यांनी काढलेली सेल्फी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र आपल्या चाहत्यांशी नाते जोडण्याचा एक नवाच मार्ग मोदी यांना सेल्फीतून सापडला आहे. विदेश दौऱ्यांदरम्यान विविध राष्ट्रप्रमुखांबरोबर सेल्फी काढून आंतरराष्ट्रीय संबंधांना वैयक्तिक सौहार्दाची झालर लावण्याचे त्यांचे कसबही वाखाणण्याजोगेच म्हणावे लागेल..

संकलन आणि लेखन
दिनेश गुणे, संतोष प्रधान, मधु कांबळे, उमाकांत देशपांडे, टेकचंद सोनवणे,  सचिन रोहेकर, हृषिकेश देशपांडे, अभय जोशी, सचिन दिवाण, हेमंत बावकर. मांडणी, ग्राफिक्स – किशोर अडसड

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One year of modi government a look at what government promised and what they delivered
First published on: 24-05-2015 at 03:11 IST