scorecardresearch

ऑपरेशन ‘लोटस’ कोणाचे?

आगामी सोलापूर राखीव लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून काँग्रेसने लढवायची की राष्ट्रवादीने यावरून सोलापुरात दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू झालेले वाक्य़ुद्ध अखेर  थांबले आहे.

gulabrao patil chavadi

आगामी सोलापूर राखीव लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून काँग्रेसने लढवायची की राष्ट्रवादीने यावरून सोलापुरात दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू झालेले वाक्य़ुद्ध अखेर  थांबले आहे. दोन्ही काँग्रेसचे नेते, प्रमुख कार्यकर्त्यांनी एका हॉटेलात एकमेकांचे हात हातात घेत उंचावून ऐक्याची द्वाही दिली. हे ऐक्य दर्शन ज्या  हॉटेलात झाले, त्याचे नाव लोटस ! म्हणजे दोन्ही काँग्रेसचे ऑपरेशन लोटस  झाले म्हणायचे ! या ऑपरेशन लोटसमधून खरोखर दोन्ही काँग्रेसमध्ये ऐक्य जोडून भाजपशी दोन हात केले जाणार की भाजपचे कमळच पुन्हा उगवणार, हे नजीकच्या काळातच दिसून येईल. पण आता दोन्ही काँग्रेसमध्ये झालेल्या वाक्य़ुद्धातून प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांचा हकनाक बळी घेण्यात आला.

‘काकां’चे गोष्टीवेल्हाळ भाषण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर साधारणपणे शेती, शेतकरी, सहकार, साखर कारखानदारी आदी विषयांची मांडणी करणारे वक्तव्यच अधिक ऐकायला मिळते. पौराणिक, धार्मिक संदर्भ देणारे गोष्टीवेल्हाळ भाषण  क्वचितच आढळते. पण वैजापूरच्या सभेत वेळेची मर्यादा पाळत पूर्वाश्रमीचे संघप्रचारक, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, पुन्हा भाजप व आता परत एकदा राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड अर्थात काकांनी ख्रिस्त काळातील गाढवाची कथा ऐकवली. लोक जेव्हा ख्रिस्तांच्या मागे जाऊ लागले तेव्हा गाढवाला आपली जागा समजून आली. एखादा नेता समाजात मिळणारा मानसन्मान हा स्वत:चे कर्तृत्व समजत असेल तर त्याच्यामध्ये आणि गाढवातला फरक दर्शवून देणारे अंतर लोकच दाखवून देतात, अशा गोष्टीवेल्हाळ शैलीत सांगत काकांनी प्रचारकी भाषणाची छाप सोडली. हा संदर्भ वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी पक्ष सोडल्याशी जोडणारा होता. पण त्यातील उपमांपेक्षाही जयसिंगराव यांच्या गोष्टीवेल्हाळ भाषणातून निष्कर्ष एकच निघाला, शेवटी पक्ष कोणताही असला तरी विचारांचा संस्कार समोर येतोच !

सारे करूनही मंत्री बदनाम 

साताऱ्यात विविध पाणीपुरवठा योजनांचा ई- भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.  नेता म्हणजे बदनाम, पुढारी म्हणजे बदनाम जात. चांगल्या कलाकाराने आमच्यासारखी  भूमिका करून दाखवावी, असे जणू काही आव्हानच दिले. आम्ही लग्नात गेलो की हसतो. जत्रेत गेलो की आनंद व्यक्त करतो. मयतला गेल्यावर दु:ख व्यक्त करतो. वाढदिवसाला गेलो तर आनंद व्यक्त करतो. जसा कार्यक्रम तशी आमची भूमिका ठरलेली असते. हे सारे करूनही आम्ही बदनाम.. ही व्यथा त्यांनी व्यक्त केली.

 फसवा प्रचार

सहकारी साखर कारखाना म्हणजे राजकारणाचे एक संस्थानच. यामुळे ही सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याचे प्रयत्न सत्तारूढ आणि विरोधी पॅनलकडून होत असतात. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. आपल्याला बडय़ा नेत्यांचा पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठी काही अनोखे आणि तितकेच फसवे फंडे वापरण्यात आले. साखर कारखानदारीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मोठा प्रभाव. ही बाब हेरून कोणीतरी शरद पवार यांच्या नावे  ‘कुंभी मध्ये कोणी लुडबुड करू नये. नरकेंनी उत्तमरीत्या कारखाना चालवला आहे – शरद पवार’ अशा आशयाचे   छायाचित्र प्रसिद्ध केले.  मग सारवासारव करण्यात आली. आता याचा उपयोग किती झाला हे मंगळवारी मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

(सहभाग : एजाज हुसेन मुजावर, बिपीन देशपांडे, दयानंद लिपारे, विश्वास पवार)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-02-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या