जितेंद्र पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खान्देशातील केळी ही देशभर प्रसिद्ध आहेत. सध्या मात्र विविध कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने ही केळी चर्चेत येत आहे. यामुळे केळीची गुणवत्ता धोक्यात आली असताना, शेतकरी वर्गाने यापासून रक्षण करण्यासाठी थेट घड  झाकण्यास सुरुवात केली आहे. सध्या प्लास्टिक पिशव्यांनी हे  घड झाकले जात आहेत.  आणि त्याचा परिणामही चांगले दिसून येत आहेत.

केळी हे उष्ण व दमट हवामानात घेतले जाणारे फळपीक असून आंबा पिकानंतर केळीचा उत्पादनाच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. देशात सुमारे पाच लाख हेक्टर तसेच महाराष्ट्रात ५० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. विविध कारणांनी कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने केळीची गुणवत्ता धोक्यात आली असताना, शेतकरी वर्गाने घड  झाकण्यासाठी अलीकडे वैविध्यपूर्ण प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढवला आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.

साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते. त्याच वेळेस हवेतील आद्रतेचे प्रमाण कमी होऊन वाऱ्याचा वेग वाढण्यास सुरुवात होते. जमिनीचे तापमान वाढते. तसेच सूर्यप्रकाशाचे एकूण तास व तीव्रता वाढीस लागते. विशेषत: एप्रिल ते जूनच्या कालावधीत चक्रीवादळे येऊन नुकसान होते. उन्हाळ्यात तापमान ३५ अंशापेक्षा जास्त असते आणि वाऱ्याचा वेग हा २० किलोमीटर प्रती तास पेक्षा जास्त असतो. विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी खोलवर जाते. केळीबागांमधील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आच्छादन, बाष्परोधकाचा वापर शेतकऱ्यांना करावा लागतो. सूर्यप्रकाशाचा अधिकतम कालावधी तसेच तीव्रतेमुळे झाड, पाने, फळांवर, फळ दांडय़ांवर चट्टे पडून नुकसान होते. अशा वेळी घड  झाकण्यासाठी पिशव्यांचा वापर केल्यानंतर फळांचे उष्णतेपासून होणारे नुकसान टाळता येते. केळफूल कापणी, फण्यांची विरळणी, कीटकनाशके व संजीवकांची फवारणी असे सर्व संस्कार झाल्यानंतर केळी घड ०.५ मिलीमीटर किंवा १०० गेज जाडीच्या ४५ बाय १०० सेंटीमीटर आकाराच्या पांढऱ्या दोन टक्के सच्छिद्रता असलेल्या प्लास्टीक पिशव्यांनी झाकतात. पिशवी बांधतांना दांडय़ाचा अधिकाधिक भाग बांधण्याचा प्रयत्न करून पिशवीचे खालील तोंड मोकळे सोडले जाते.

केळीबागांवर बऱ्याचवेळा ‘कुनट सिगार एन्डरॉट’ किंवा काळी बोंड या रोगाची लागण ‘ट्रँकिस्पेरा फुक्टिजीना’ आणि ‘व्हर्टीसिलियम थिओब्रोमी’ या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार केळीबागांमध्ये अलीकडे जास्त प्रमाणात होत आहे. रोगाची लागण झालेली केळीची फळे ही जळक्या चिरुटाच्या टोकासारखी दिसतात. फळांवर पांढऱ्या बुरशीची वाढ  झालेली दिसते. तसेच ती गुलाबी किंवा तपकिरी रंगाची होतात. फळातील गर कुजतो. या बीजाणूंचा प्रसार वाऱ्यापासून प्रामुख्याने होतो. ही बुरशी ओलसर व दमट हवामानात विशेषकरून वाढते. केळी घडांवर प्लास्टिकच्या पिशव्या बांधल्यामुळे फळांच्या बाह्य़ आवरणावर ओरखडे पडत नाही व फळात बुरशीचा प्रवेश होत नाही.

दुष्परिणामापासून बचाव

बागेतील घडावर ‘स्कर्टिंग बॅग’ अर्थात प्लास्टिक पिशवी घातल्यानंतर फळांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम जाणवत नाहीत. केळीच्या घडांवर रस शोषक किडींनी डंख मारल्यामुळे काळे डाग पडतात आणि केळीची गुणवत्ता कमी होते. घडांभोवती प्लास्टिकच्या मोठय़ा आकाराच्या पिशव्या गुंडाळल्यास फळांची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. चांगल्या दर्जाच्या केळीला व्यापारी मनाजोगते भाव देखील देतात. बाजारात अतिनील सूर्य किरणांना प्रतिकारक, अशा प्लास्टिकच्या पिशव्या उपलब्ध आहेत. एकसारखी व डाग विरहीत फळे आणि घड  लवकर काढणीस तयार होणे, हे मुख्य फायदे या पिशवीचे आहेत. या पिशव्यांची व्यवस्थित हाताळणी केल्यानंतर साधारणत: दोन ते तीनवेळा सहजपणे वापरता येतात.

फळाच्या वाढीस मदत

घडावर प्लास्टिकपिशवी बांधल्याने त्याचे ऊन, वारा, पाऊस, फुलकिडी, थंडी, धूळ यापासून संरक्षण होते. घडाभोवती पोषक सूक्ष्म वातावरण निर्माण होऊन घडांच्या वाढीस मदत होते. घड लवकर पक्वसुध्दा होतो. फण्यांसोबत घडाचा दांडा झाकल्याने तीव्र सूर्य प्रकाशापासून संरक्षण होऊन घड तुटण्यासही अटकाव होतो.

– प्रा. एन. बी. शेख (प्रमुख, केळी संशोधन केंद्र, जळगाव)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protecting bags for banana peas abn
First published on: 03-09-2019 at 01:11 IST