दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या हंगामात द्राक्षामध्ये साखरेचे प्रमाणच अत्यल्प आल्यामुळे बाजारात ग्राहकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याने बेदाणा निर्मितीकडे ओघ वाढला. परिणामी यंदा विक्रमी बेदाणा उत्पादन झाल्याने त्याच्या साठवणुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. हवामान बदलाचा द्राक्षाच्या प्रतवारीवर जसा परिणाम झाला, तसाच बेदाण्यावरही परिणाम झाला असून, यंदाचा द्राक्ष हंगाम उत्पादकांना आंबटच ठरला आहे. विक्रमी बेदाणा उत्पादन होऊनही प्रतवारी खालावल्यामुळे बाजारात दरही कमी झाला असून, आर्थिक गणित बिघडले तर आहेच, पण उत्पादित बेदाणा कुठे ठेवायचा हाही प्रश्न निर्माण झाला आहे.

दीर्घकाळ रेंगाळलेला पाऊस, अपुरी थंडी आणि अवकाळीसह धुके यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम उत्पादकांना कडूच ठरला आहे. हवामान बदलामुळे द्राक्षामध्ये साडेचार महिने पूर्ण झाले, तरी साखरेचे प्रमाण वाढले नाही. परिणामी द्राक्ष आंबटच राहिल्याने बाजारात ग्राहकांनी पाठ फिरवली. यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी मोठय़ा प्रमाणात बेदाणा उत्पादनाकडे शेतकरी वळल्याने उदंड झाला बेदाणा, ठेवायला जागा मिळेना अशी गत यंदा झाली आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यातील शीतगृहे तुडुंब भरल्याने बेदाण्याची साठवणूक कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहेच, पण याचबरोबर अतिरिक्त बेदाणा तयार झाल्याने दराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रामध्ये द्राक्ष क्षेत्र वाढल्याने यंदा द्राक्षाचे उत्पादन विक्रमी झाले. मात्र त्या तुलनेत यंदा द्राक्षाची निर्यात झाली नाही. दुसरीकडे यंदा द्राक्षांना कवडीमोल दर मिळाल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांची द्राक्षे निर्यात होण्यास अडचणी आल्या. द्राक्ष व्यापाऱ्यांनी सांगितलेला कवडीमोल दर यामुळे द्राक्ष बागायतदारांनी मोठय़ा प्रमाणावर बेदाणे करण्यावर भर दिला. अद्याप काही शेतकऱ्यांच्या बागेत द्राक्ष असल्याने त्याचा ही शेतकरी बेदाणा करण्याच्या मन:स्थितीत आहे. त्यामुळे यंदा विक्रमी बेदाणा उत्पादन होण्याची शक्यता असून, इतका बेदाणा ठेवता येईल इतकी शीतगृहे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची विक्री होईपर्यंत तयार बेदाण्याची साठवणूक कशी आणि कुठे करायची, असा प्रश्न उत्पादकांसमोर पडला आहे.

ज्यात यंदा द्राक्ष बागायतदारांच्या समोर संकटाचा शुक्लकाष्ट उभे ठाकले. एकीकडे अवकाळी, अपेक्षित द्राक्षांची न झालेली निर्यात आणि द्राक्ष व्यापाऱ्यांनी देऊ केलेला कवडीमोल दर यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. गेली दोन वर्षे करोना संकटामुळे बाजार व्यवस्था अडचणीत होती. यंदा यातून बाहेर पडण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, लांबलेल्या पावसाने द्राक्ष शेतीचे गणितच यंदा बिघडले. फळछाटणीपासून १३० ते १४० दिवस झाल्यानंतर मण्यामध्ये सर्वसाधारण २२ ते २४ ब्रिक्स साखर तयार होते. यंदा तेवढाच कालावधी देउनही द्राक्षामध्ये साखर १८ ब्रिक्सपर्यंतच पोहचली. परिणामी द्राक्षे चवीला आंबट वाटल्याने बाजारात ग्राहकांनीही अपेक्षित दराने खरेदी करण्यास हात अखडता धरला. परिणामी व्यापाऱ्यांनीही दर पाडले. अगदी दहा रुपये किलो दरानेही द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी बागेकडे फिरकत नव्हते. यामुळे हा नाशवंत माल व्यापाऱ्यांच्या गळी मारण्याचे प्रयत्नही तोकडे ठरले. यामुळे अनेक शेतकरी नाईलाज म्हणून बेदाण्यासाठी बाग सोडलेली नसताना बाजारपेठ समोर ठेवून तयार केलेला माल बेदाणा निर्मितीसाठी वळवला. त्यामुळे बेदाण्याचे उत्पादन जास्त झाले. बेदाणा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे, अशात अजूनही शेतात असलेल्या द्राक्षाचा शेतकरी बेदाणाच करण्याची शक्यता आहे.

बेदाण्यासाठी सांगली, तासगाव, पंढरपूर या बाजारपेठा आहेत. यंदाही बाजारात चांगल्या बेदाण्याला दीडशे ते दोनशे रुपये किलो दर आहे. मात्र, यासाठी फुगीर, साखरयुक्त बेदाणाच आवश्यक आहे. बाजारपेठेसाठी तयार केलेल्या द्राक्षाचा बेदाणा तयार करण्यात आला असला, तरी तो पांचट द्राक्षामुळे गोडीला कमी, रसहीन तयार झाला असून त्याचा टिकाऊपणाही कमी असल्याने दर मिळत नाही असे बेदाणा व्यापारी सुशील हडदरे यांनी सांगितले.

शीतगृहांची संख्या

सांगली ९०, सोलापूर ३९ आणि पंढरपूर १२ याशिवाय विजापूर परिसरातही काही शीतगृहे तयार आहेत. गेल्या वर्षी बेदाणा उत्पादन १ लाख ८० हजार टन इतके होते. यंदा २ लाख ३० हजार टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. यामुळे अतिरिक्त ठरलेला ४० ते ५० हजार टन बेदाणा कोठे ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षी राज्यात बेदाण्याचे १ लाख ८० हजार टन उत्पादन झाले होते. यंदाच्या हंगामात ते सुमारे २ लाख ३० हजार टन इतके होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात जवळपास ९० इतकी शीतगृहे असून याची क्षमता दीड लाख टन इतकी आहे. यामुळे अतिरिक्त बेदाणा कुठे ठेवायचा असा प्रश्न आहे.

– सुशील हडदरे, हडदरे ट्रेडिंग कंपनी, सांगली

बेदाण्याला द्राक्षाचा दर वगळून प्रति किलो साधारणत ३० ते ४० रुपये उत्पादन खर्च आहे. चार किलो द्राक्षातून एक किलो बेदाणा तयार होतो. बेदाण्याला बाजारात सध्या प्रतिकिलो ८० ते २०० रुपये दर आहे. यामधून बेदाणे तयार करण्याचा खर्च वजा केला तर द्राक्षाला मिळणारा दर हा केवळ किलोला १० ते ४० रुपयेच मिळणार आहे. भांडवली गुंतवणूक, उत्पादन खर्च विचारात घेतला तर हा दर परवडणारा नाही.

– विनायक कदम, द्राक्ष उत्पादक, तासगाव.

बाजारात पडलेला दर पाहून, व्यापारी वर्गाच्या मागे न लागता शाश्वत दर मिळेल म्हणून बेदाणा तयार केला. आता तयार बेदाण्याची प्रत खालावू नये म्हणून शीतगृहात ठेवणे गरजेचे आहे. मात्र शीतगृहामध्ये जागाच नसल्याने बेदाणा खराब होण्याची भीती तर आहेच पण यामुळे दरही कमी मिळण्याचा धोका दिसत आहे. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे

– प्रमोद देशमुख, कवठे महांकाळ.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raisins grapes season in the market customers response is not ysh
First published on: 09-05-2023 at 00:01 IST