|| प्रदीप आपटे

संस्कृत आणि अन्य भाषा यांचा तौलनिक अभ्यास कसा करावा याचा वस्तुपाठ घालून देणाऱ्यांमध्ये विल्यम जोन्सचे नाव मोठेच! पण या ‘इंडो-युरोपियन’ भाषाकुळाचा अभ्यास पुढे वंशविज्ञानाला जोडू पाहण्याचे त्याचे लक्षण खोटे…

Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…

परकी भाषेचा पुसट अर्थबोध होताना काही साम्ये नजरेस भासू लागतात. दोन परस्परांना अपरिचित असणाऱ्या भाषांमध्ये काही वस्तूंची नावे किंवा हरघडी वापरतील साधे शब्द आणि उद्गारांमधील साम्याचा विस्मय वाटतो. परकेपणाच्या धगीवर शांत शिंतोडे आल्यागत वाटते. हिंदुस्तानाला भेट देणाऱ्या अनेक प्रवाशांनी असे विस्मयी शब्द मोठ्या उत्साहाने नोंदले आहेत. यामध्ये फ्लोरेन्समधला फिलिपो सास्सेट्टी सर्वात आधीचा असावा. १५७८ साली तो व्यापारी कारकून म्हणून कोची आणि गोवा या भागात काम पाहात असे. अखेरपर्यंत (१५८८) तो गोव्यातच राहिला. त्याने आपल्या व्यापारी सग्यासोयऱ्यांना आणि टस्कनीच्या सरदाराला लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत. इथल्या लोकांची राहणी, वागणे, बोलणे याबद्दल बारकाईने केलेली निरीक्षणे त्या पत्रांत आहेत. संस्कृत आणि इटालियनमधले साम्य असणारे शब्द त्याने नोंदले: देव- दिओ , सर्प- सेर्प , सप्त- सेप्त, अष्ट- ओट्टो, नव- नोवे. हिंदी सिनेमाच्या धाटणीत सांगायचे तर एकसारखे दिसणारे ‘राम और शाम’! हे लहानपणी जत्रेत हरवलेले भाऊबंद आहेत ही पुढची कथा, इतर प्रवाशांनी आणि विद्वानांनी लिहिली. काहींनी विस्मयपूर्वक पण दबकत तर काहींनी खोलवर अध्ययन करून. (बऱ्याच अगोदर म्हणजे चौदाव्या शतकापासून ‘बा कोते, गिराल्ड्यस काम्ब्रेनिस, दान्तेसारख्या लेखकांनी लॅटिन ग्रीक आणि अन्य युरोपीय भाषेचे संस्कृतशी असलेले साधर्म्य नोंदलेले आढळते. ख्रिस्तपुराण रचणारा फा. थॉमस स्टीफन, संस्कृत अध्ययनकर्ता फ्रेंच ज्यां फ्रान्स्वां पोन, बेंजामिन शूल्ट्झ या भारतविद्या विद्वानांनी अशी साधर्म्यस्थळे नोंदली आहेत.)

अठराव्या शतकाच्या अखेरीपासून या साधम्र्याला नव्याने उजळा आला; त्याचे श्रेयदेखील विल्यम जोन्सच्या खात्यावर जमा आहे. त्याच्या बहुभाषिकपणामागे आवड, क्षमता, जिज्ञासा आणि कर्तव्य या सगळ्याचे बळ होते. संस्कृत आणि अरबी भाषा पारंपरिक पठडीने तो शिकला. त्याला हा भाषासाधम्र्याचा भुंगा सतावणे अपरिहार्य होते. त्याने या विषयावर १७८४ ते १७९४ या काळात जवळपास दरवर्षी एक स्वतंत्र निबंधाख्यान लिहिले. त्यातले १७८६ सालचे आख्यान अधिक प्रसिद्ध आहे. त्यात संस्कृत भाषेची भलामण तर आहेच. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यात नोंदलेल्या अनेक बाबी व त्याची टिप्पणी आधुनिक ‘तौलनिक भाषाविज्ञाना’ची मूहूर्तमेढ समजली जाते. या शाखेचा जोन्स हा प्रथम उद्घोषकर्ता असल्याची साधारण प्रतिमा आहे. ते मर्यादित अर्थाने खरेदेखील आहे. अगोदर माहीत असलेल्या किंवा प्रचलित धारणा समजुतींना जर मोठी नवी चौकट लाभली तर त्यातून निराळेच समर्थ दर्शन उपजते. अ‍ॅडम स्मिथच्या लिखाणात त्याच्या अगोदर मांडल्या गेलेल्या अनेक विचारांना अनपेक्षित असे कोंदण लाभले. गॅलिलिओ आणि केपलर यांना गवसलेल्या तथ्यांना न्यूटनने निराळे भव्य कोंदण दिले. तसे काहीसे जोन्सच्या भाषासाधम्र्याबद्दलच्या विचाराने झाले. या अर्थाने त्याची ही ख्याती सार्थ आहे. अनाठायी नाही. पण जोन्ससारख्या समतोल प्रज्ञावंताचीदेखील झालेली अनाहूत फसगत बऱ्याचदा ठाऊक नसते. जॉन मेनर्ड केन्सने एकदा म्हटले आहे की, ‘अनेकदा मोठे विचारवंत एखाद्या कालगत कल्पनेचे नकळत दास झलेले असतात’. जोन्सची सगळी व्याख्याने एकत्र वाचली तर केन्सच्या तिरकस शेऱ्याचा मासला पाहायला मिळतो.

गाजावाजा झालेल्या तिसऱ्या व्याख्यानात जोन्स म्हणतो: ‘‘संस्कृत किती पुरातन असायची ती असो पण त्याची बांधणी (संरचना) अद्भुत आहे. ती ग्रीकपेक्षा अचूक आणि निर्दोष आहे. लॅटिनपेक्षा समृद्ध आहे आणि दोन्ही भाषांपेक्षा परिष्कृत आहे. तरी संस्कृतचा या दोन्ही भाषांशी लिप्ताळा आहे. व्याकरणाची ठेवण, क्रियापदाची ‘मुळे’ ( मूळ रूपे) या बाबतीत त्यांच्यामधला सारखेपणा लक्षणीय आहे! इतका की तो अपघाताने निपजला आहे असे कोणताही भाषाभिषग म्हणणार नाही.’’

‘‘इतका बलवत्तर असलेला त्यांचा उगम कोठल्या तरी एकाच मूळ स्रोतातून झाला असावा. आणि ती मूळ उगमाची भाषा आता नामशेष झाली असावी. या भाषांइतके नसले तरी केल्टिक आणि गोथिक भाषादेखील संस्कृत उपजली त्याच स्रोतातून उद्भवत्या असाव्यात. पण त्यांचा निराळ्या बोलींशी मेळ झाला. हेच फारसीबद्दल म्हणता येईल!’’- या वैखरी भावंडाच्या कुळाला त्याने नाव दिले ‘इंडो युरोपीय भाषाकुल’! आणि लुप्त झालेल्या मूळच्या कूळरूपाला म्हणतात प्रोटोइंडो युरोपीय! जोन्सने निव्वळ उच्चारी साम्यावर समाधान मानले नाही. साम्याचे शिंपले आणि मोती वेगवेगळ्या थरांतून संकरत वाहतात. याची त्याला चांगली जाण झाली होती. व्युत्पत्तीचे बेलगाम पतंग किती निसरडे आणि बेभरवशाचे असतात हे त्याने परखडपणे नोंदले आहे. त्याच्या व्याख्यानात चार ‘पथ्यां’चा उल्लेख आहे. विश्लेषण करणारा संबंधित भाषांचा जाणकार असावा. ज्या शब्दांचे साधर्म्य जोखायचे त्यांचे अर्थ आणि वापर पुरेसे आप्त म्हणावे इतपत जवळचे असावे. शब्दांतील ‘स्वरां’ना अव्हेरू नये वा मिटवू नये. आणि बळेबळे व्यंजने भेटवू नयेत. निखळ उच्चार साम्यावर संबंध जोडू नये. वस्तूंची नामे, वस्तुरूप वर्णिणारे शब्द आणि विशेषणे, नैसर्गिक वस्तूंची नावे, मनोविकार /हावभावदर्शक शब्द, नातेसंबंधदर्शक शब्द यांवर अधिक भर आणि भरवसा असावा. त्याचबरोबरीने दुसऱ्या भाषेतील उधार-उसनवारी कशी होते, कशामुळे होते याकडे नजर असावी. त्या काळी गवसलेल्या अर्थोच्चारी साम्ये आणि क्रियापदांची मुळे यावर उभे असलेल्या तथ्यांभोवती हे विवेचन आहे.

याखेरीजही जोन्सच्या काही धारणा भलत्या वेगळ्या आहेत. संस्कृत- ग्रीक- लॅटिन यांमधले साम्यभेद, धातू चालविण्याच्या शैली, शब्दांची विभक्ती रूपे त्याला चपखलपणे जोखता आली. पण ज्या भाषांमध्ये हे धागे बदलले, रूपे पालटली तिथे जोन्सची रीत आणि अनुमानधपके अपेशी ठरले. त्याचे धक्कादायक उदाहरण म्हणजे हिंदुस्तानी आणि संस्कृत. जोन्सच्या आधी हालहेड्ने त्याचे अध्ययन केले होते. तो म्हणतो : शब्दांचे विभक्तीरूप प्रत्यय आणि धातूंचे विकार अगदी निराळे भासले तरी हिंदुस्तानीतले ऐंशी टक्के शब्द संस्कृतरूपाशी बांधलेले आहेत. पण जोन्सने नेमका उलटा युक्तिवाद केला आहे. ‘भले हिंदुस्तानीतील ऐंशी टक्के शब्द संस्कृतोद्भव असतील पण विभक्ती आणि धातूचे चलन भिन्न आहे; त्याअर्थी ही मूळ भाषा निराळी असली पाहिजे. संस्कृतातील अतोनात आयातीच्या माऱ्यामुळे ती वरपांगी संस्कृतोद्भव वाटते एवढेच!’’

पण या एकसमान उगमस्राोताचा दुसरा अधिक जटिल अन्वय आणि अर्थ आहे. माणसांची भाषा ही काही झाडांच्या बिया किंवा परागकणांसारखी वाऱ्यावर, पाण्यावर ,पक्ष्यांच्या मार्फत चिकटून पसरत नसते. दुसऱ्या मनुष्यवस्तीत शरीराने मिसळावे तरच एकमेकांचे बोलणे ऐकले जाणार. कालांतराने उमगले जाणार आणि परस्परांत शोषले जाणार! ही वाणीसंकराची पूर्वअट! निमित्त भले लढायांचे असो, दुष्काळी स्थळांतराचे असो किंवा व्यापाराचे असो. आत्मा असो वा बोली… देहाची कुडी हाच दोन्हीचा वास! भाषा सारख्या असतील तर त्यांचे देहधारीपण एकाच स्थळातले एकाच वंशाचे असणार. वंश पसरले तर भाषा पसरेल! वंश मिसळले तर भाषा मिसळेल. म्हणजे भाषांच्या इतिहासात माणसांचे थवे एकमेकांना भिडत नांदण्याचा इतिहास असला पाहिजे. इतिहास म्हटले की त्या सुट्या आणि एकत्र नांदण्या-गाजण्याला स्थळ-काळाचे मखर पाहिजे.

जोन्सला या साधम्र्याच्या डोंगरावरून ही झेप घेण्याचा मोह झाला. त्या काळी असा इतिहास मोठ्या भरवशाने रेखाटावा अशी माहितीची पेवे नव्हती. आजदेखील ती तितकीच तुटपुंजी भासतात. तेव्हा तर हाती असलेल्या तुटपुंज्या सांगोवांगी कहाण्यांवर गुजराण करणे त्याला भाग होते. एवढी स्थळांतरी आणि भाषांतरी उलाढाल घडायला लागणारा काळदेखील उदंड मोठ्ठा असायला पाहिजे. जोन्स सृष्टीनिर्मितीच्या कथा ज्या परंपरेत ऐकत वाढला त्या संस्कारांचे वेढे उफाळून आले. ती म्हणजे जुन्या करारातील कथा।

मुळात नोहाची तीन बाळे! ‘शोम’, ‘हाम’ आणि ‘यापेथ’! हे भाऊ नंतर वेगवेगळ्या दिशांना पांगले. तिथे त्यांची प्रजा वाढली ती अजून पुढे पांगत पांगत अनेक भूभागांत पसरली. त्यातील यापेथाची शाखा विस्तृत! अवघी मानवजात निरनिराळ्या भूभागांत पसरण्याची ही कथा यहुदी, खिश्चन आणि इस्लामी परंपरेत आहे. ‘बऱ्याच लोकांना आपला राजवंशाशी संबंध आहे अशी प्रौढी मिरवायची असते! तसा संबंध जोडता आला नाही, तर ते यापेथच्या कुळाला कसेतरी जाऊन लटकतात’ असा उपरोधिक शेरा शेक्सपीअरने लिहिला आहे! जोन्सने तो वाचला असेलच पण तरी त्याने तेच केले! विल्यम जोन्सने हीच जुना करार कथा पसरत्या बदलत्या भूभागामध्ये विखुरलेल्या वंशांना आणि त्याच्या भाषांना ओढूनताणून लावली! अशा कल्पनांच्या भरारी रंगविताना त्याने अनेक भलभलत्या चुका केल्या! कुठली? तर, एक वंशमाळ तिच्या विस्तारण्याची आणि विखुरल्याची कथा सगळ्या भाषांचा अवघा बदलता संसार उलगडण्यासाठी बळेच जुंपली गेली! अनेक तुलनात्मक भाषा विज्ञान शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्यांना जोन्सचा हा अचाट सिद्धांत माहीत नसतो. (याचे कारण सोपे आहे. साधम्र्याबद्दलचे तीनचार परवलीचे उतारे वगळले तर ही त्याची सगळी व्याख्याने वाचण्याच्या फंदात कोण पडतो!) केन्सप्रणीत ‘थोर लोक कालगत मृतकल्पनांचा दास असण्याचा’ हा एक नमुना!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com