हास्यचित्रे तसेच राजकीय व्यंगचित्रांना मराठी दैनिकांतून, मासिकांतून विशेष स्थान मिळू लागले, त्याला आता बराच काळ उलटून गेला. मराठी वाचकांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा फुलविण्याचे काम प्रदीर्घ काळ ज्यांनी केले त्या बाळ राणे यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. त्यानिमित्त..
गेल्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मराठी हास्यचित्रकलेची तसेच राजकीय व्यंगचित्रकलेची बीजे शंकरराव किलरेस्कर यांनी पेरली. त्यानंतरच्या दोन-तीन दशकांत मराठी हास्यचित्रं तसेच राजकीय व्यंगचित्रांना मराठी दैनिकांतून तसेच मासिकांतून विशेष स्थान मिळू लागले. याला कारण अर्थातच तत्कालीन संपादक होते, ज्यांना ही कला वाचकांना आवडू शकेल हे पटले होते, तसेच त्यांना या कलेच्या सुप्त सामर्थ्यांची जाणीवही झाली होती. याचाच परिणाम म्हणून अनेक नवे हास्यचित्रकार आपापल्या शैलीने ही नवकला हाताळून पाहू लागले.
या हास्यचित्रकारांच्या पहिल्या पिढीचे नायक होते हरिश्चंद्र लचके. अर्थातच त्यांच्यासोबत इतरही अनेक हास्यचित्रकारांनी मराठी वाचकांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा फुलविण्याचे काम सुरू केले होते. त्यात होते नागेश आर्डे, द. बा. केळकर, अभ्यंकर, हत्तंगडी आणि बाळ राणे!
वर्तमानपत्रांपेक्षाही मासिकांतून हास्यचित्रांना खूप प्राधान्य मिळत असे. त्यामुळे सदैव टवटवीत अशा विषयांवर आधारित ‘ह्य़ुमर’ निर्माण करण्यावर या चित्रकारांचा भर असायचा. शांत जीवन, साधी काटकसरीची राहणी, मोठे एकत्र कुटुंब, आर्थिक ओढाताण, बंदिस्त सामाजिक वातावरण जे हळूहळू सैल होत होते. या साऱ्या पाश्र्वभूमीवर बाळ राणे यांनी चित्रं काढायला सुरुवात केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या कणकवलीजवळील जानवली गावातून मॅट्रिक पास झाल्यावर रीतीनुसार ते मुंबईला उपजीविकेसाठी आले. पोटापाण्यासाठी त्यांनी पोलीस खात्यात कारकुनी सुरू केली तरी मनाच्या समाधानासाठी चित्रकलेचा आधार त्यांना वाटू लागला. चित्रकार हळदणकरांकडे चित्रकलेचे शिक्षण त्यांनी घेतले व नोकरीनंतरच्या वेळात हास्यचित्रकलेला जवळ केले.
आजूबाजूच्या वातावरणाकडे िंकंवा घटनांकडे मिश्कील पद्धतीने बघितल्यावर त्यांना अनेक कल्पना सुचत आणि हास्यचित्र जन्माला येत असे. अल्पावधीतच बाळ राणे यांनी स्वत:ची रेखाटनाची शैली विकसित केली आणि त्यांची चित्रे वाचकांचं लक्ष वेधून घेऊ लागली. राणे यांच्या हास्याचित्रांतून त्या काळातील मराठी मध्यमवर्गीय समाज कसा होता याची झलक पाहावयास मिळते.
चोर, मोलकरीण, अधिकारी, कैदी, डॉक्टर, गवळी, शिंपी, वेटर, बूटपॉलिशवाला, शेतकरी, गृहिणी, कनिष्ठ मध्यमवर्गीय नवरा, शिक्षक अशी अनेक पात्रे आपापल्या भोवतीचे वातावरण घेऊन त्यांच्या चित्रात उतरत, आश्चर्य, संताप, आनंद, छद्मीपणा, उत्सुकता, मख्खपणा इत्यादी भाव दाखवत एखादा विनोदी प्रसंग उभा करत.
कधी मोलकरीण गृहिणीवर ओरडते, कधी खिसेकापूवाला गिऱ्हाइकाच्या फाटक्या खिशात हात घालतो, कधी तुरुंगातून सुटणाऱ्या कैद्याला त्याचे इतर कैदी अनवधानाने लवकर परत ये, अशा शुभेच्छा देतात, तर कधी केस कापणारा कारागीर विचित्र केस कापून नवी फॅशन रूढ करतो! कधी गृहिणी स्वयंपाकासाठी इतका पसारा मांडते की पदार्थाची रेसिपीच विसरते तर कधी नर्स औषध देतानाच पेशंटला घाबरवून सोडते असे कितीतरी प्रसंग राणे खुलवतात व निश्चितपणे वाचकांना खूश करतात.
उदाहरणार्थ पाहुणे हे कितीही प्रिय असले तरी कुटुंबातील आर्थिक ओढगस्तीमुळे ते लवकर गेले तर बरं! असं वाटावं अशी परिस्थिती. त्यावर राणे यांचं चित्र मजेशीर आहे. कुटुंबप्रमुखाला संसर्गजन्य रोग झाल्याचं ठळक अक्षरात लिहिल्यावर कोण कशाला थांबेल? पण पाहुण्यांचं स्वागत, महत्त्व सांगणारं सुभाषित मात्र मानभावीपणे भिंतीवर लावलेलं आहे!
दुसरं एक चित्रही लक्षणीय आहे. साठ-सत्तर वर्षांपूर्वी घरात एका बाईला सहा-सात मुलं असणं स्वाभाविक मानलं जायचं. इतक्या बाळंतपणानंतर त्या बाईचं तरुणपणीच अक्षरश: चिपाड होऊन जायचं! अशात एका कनिष्ठ मध्यमवर्गीय बाईची सातव्या-आठव्या बाळंतपणादरम्यानची अवस्था पाहून डॉक्टर तिला संतती-नियमनाचा सल्ला देतात. या संबंधातलं हे हास्यचित्र हसवण्यापेक्षा खरंतर त्या वेळची सामाजिक कौटुंबिक अवस्था पाहून अंतर्मुख अधिक करतं. (कदाचित हे हास्यचित्र पाहूनच सरकारने पुढे कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम अधिक यशस्वीपणे राबवायला सुरुवात केली असावी, इतकं हे चित्र प्रभावी आहे!)राणे यांनी नुसतीच मासिकांसाठी हास्यचित्रे काढली नाहीत तर दैनिक तरुण भारतमध्ये रोजच्या घडामोडींवर आधारित पॉकेट कार्टून्सचं सदर त्यांनी ‘बाळू काका’ या नावाने तब्बल पस्तीस र्वष चालवलं. त्याचबरोबर ते नुसतेच हास्यचित्रकलेत रमले नाहीत तर संगीतातही त्यांना गती होती. व्हायोलिन, बासरी, पेटी इत्यादींवर त्यांचा हात सफाईदारपणे चालत असे. इतकंच नव्हे तर शिकार करणंही त्यांना आवडत असे.
त्या काळात म्हणजे साधारण १९४५ ते १९८० या तीस-पस्तीस वर्षांच्या कालावधीत हंस, वाङ्मयशोभा, मनोहर, वसंत, मोहिनी, आवाज, किलरेस्कर, उद्यम या नियतकालिकांचा सुसंस्कृत, मध्यमवर्गीय वाचकवर्ग बाळ राणे यांच्या साध्या, सज्जन, कौटुंबिक विषयांवरच्या हास्यचित्रांना मनापासून दाद देत असणार हे नक्की. आता साठीच्या पुढे असलेल्या कितीतरी वाचकांना ‘बाळ राणे’ ही सही पाहिल्यावर त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतील आणि सोबतची हास्यचित्रे पाहिल्यावर पुन:प्रत्ययाचा आनंद त्यांना होईल हे निश्चित.
त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांच्या निवडक हास्यचित्रांचा संग्रह प्रकाशित झाला तर मराठी वाचक त्याचे स्वागतच करतील हेच यानिमित्ताने सुचवावेसे वाटते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2013 रोजी प्रकाशित
बाळ राणेंची हास्यचित्रे पाहिली आणि..
हास्यचित्रे तसेच राजकीय व्यंगचित्रांना मराठी दैनिकांतून, मासिकांतून विशेष स्थान मिळू लागले, त्याला आता बराच काळ उलटून गेला. मराठी वाचकांच्या
First published on: 24-11-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saw bal rane info and cartoons and