१९८० वा १९९० च्या दशकात ‘सियाराम शर्ट्स’च्या जाहिरातींमध्ये दिसणारा देखणा तरुण. हा तरुण पुढे अध्यात्माकडे वळला. म्हणता म्हणता तो आध्यात्मिक गुरू बनला. राज्यकर्ते, राजकारणी, उद्योगपती त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावू लागले. त्यांच्याकडे गेल्यावर अनेकांना ‘चांगला’ अनुभव येऊ लागला. हे आध्यात्मिक गुरू म्हणजे उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यू महाराज. मध्य प्रदेशमधील इंदौरजवळ भय्यू महाराजांचा मोठा आश्रम आहे. ‘सद्गुरू दत्त धार्मिक ट्रस्ट’ या महाराजांच्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कामे राबविली जातात. विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांचा सांभाळ करणे किंवा त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी या संस्थेच्या माध्यमातून घेतली जाते. राज्यात कोणत्याही पक्षांचे सरकार असो, भय्यू महाराजांचे महत्त्व अबाधित असते. महाराजांच्या भक्तांची यादीही मोठी. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राजकारणातील अनेक दिग्गज त्यांचे भक्त. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, लता मंगेशकर, नितीन गडकरी, सुशीलकुमार शिंदे आदीही महाराजांना मानतात. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस प्रायश्चित म्हणून उपवास केला होता. तेव्हा त्यांचा उपवास सोडविण्याकरिता साधूसंत किंवा महाराजांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात भय्यू महाराजांचा समावेश होता. भय्यू महाराजांच्या संस्थेच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये मोदींना रस भरवितानाचे भय्यू महाराजांचे छायाचित्र प्रामुख्याने झळकत असते. मागे भय्यू महाराजांच्या वाहनाला नाशिकजवळ अपघात झाला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरिता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आदींनी भेट दिली होती. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारमध्ये भय्यू महाराजांचा शब्द अंतिम असे. त्यांच्या संस्थेला सारी मदत करण्याचे फर्मान तेव्हा मंत्रालयातून निघाले होते. अनेक सरकारी अधिकारी आपल्याला चांगल्या पदावर नियुक्ती मिळावी म्हणून भय्यू महाराजांकडे आशीर्वाद घेण्याकरिता जातात. विधानसभेची उमेदवारी देण्यातही महाराज म्हणे महत्त्वाची भूमिका बजावितात, असे बोलले जाते. काही जणांना तशी अनुभूतीही आली म्हणे. काँग्रेस आघाडी सरकारमध्येच भय्यू महाराजांचे प्रस्थ होते असे नाही तर विद्यमान सरकारमध्येही महत्त्व कायम आहे. कोपर्डीच्या दुर्घटनेनंतर मराठा समाजाचे मोठाले मोर्चे निघाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. तेव्हा भाजप सरकारने भय्यू महाराजाचींच मदत घेतली होती. भय्यू महाराजांनी कोपर्डीला भेट दिली होती. मराठा समाजाची नाराजी दूर करण्याकरिता मुख्यमंत्री फडणवीस यांनी भय्यू महाराजांची ढाल पुढे केली होती, असे म्हणतात. मराठा समाजाचे आंदोलन सुरू असतानाच शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रामुळे चांगलाच वाद उद्भवला. शिवसेनेला धडा शिकविण्याचे इशारे मराठा समाजाच्या नेत्यांकडून देण्यात आले. वातावरण शिवसेनेच्या विरोधात तापू लागले. तेव्हा आपले शिष्य उद्धव ठाकरे यांना वाचविण्याकरिता भय्यू महाराज मदतीला धावून गेले. महाराजांनी तोडगा काढला आणि उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली तसा वादावर पडदा पडला. मध्यंतरी भय्यू महाराजांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती पत्करण्याची घोषणा केली होती. सरकार कोणत्याही पक्षांचे असो, भय्यू महाराजांचा दबदबा तसाच कायम असतो. त्याचे गूढ भल्याभल्यांना अद्यापही उमगलेले नाही.