प्रदीप नणंदकर

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यभरात उन्हाळी सोयाबीनच्या लागवडीत चौपट वाढ झाली आहे. गत वर्षी १२ हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनचा पेरा झाला होता. तो यावर्षी चक्क ४८ हजार हेक्टरवर जाऊन पोहोचला आहे. या विक्रमी वाढीव पेरणीचा हा वेध..

Loksatta lokshivar Agriculture Business Milk business animal husbandry
शेती नसणाऱ्याची धवलक्रांती!
Successful experiment of pistachio farming in Solapur
सोलापुरात पिस्ता शेतीचा यशस्वी प्रयोग!
famous personalities who win tarun tejankit award
तरुण तेजांकित
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. बियाणांचा तुटवडा भरून काढण्यासाठी गतवर्षी राज्यभरात कृषी विभागाच्या वतीने उन्हाळी सोयाबीन घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. राज्यातील १२ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक घेतले. त्यातून खरीप हंगामातील बियाणांची गरज काही प्रमाणात भागवली गेली, तसेच शेतकऱ्याचा बियांणावरील खर्चही कमी झाला. त्यामुळे यावर्षी उन्हाळी सोयाबीनच्या पेरणीमध्ये राज्यात चक्क चौपट वाढ झाली आहे.

गेल्या वीसेक वर्षांपासून राज्यभरात सोयाबीनचा पेरा हळूहळू वाढतो आहे. सोयाबीनचे पीक हे शेतकऱ्यासाठी हितकारक असल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात येऊ लागले आहे. खरीप हंगामातील उडीद, मूग, ज्वारी या पिकापेक्षा हमखास उत्पन्न देणारे व अन्य पिकांपेक्षा तुलनेने उत्पादकता अधिक व बाजारपेठेत दोन पैसे जास्त येणारे हे पीक ठरत असल्याने नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाऊ लागले व पाहता पाहता सोयाबीनचा पेरा अतिशय वेगाने वाढू लागला.

गतवर्षीपर्यंत मध्यप्रदेश हा देशात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा असणारा प्रांत होता. मात्र या वर्षी मध्य प्रदेशला मागे टाकत महाराष्ट्राने ही जागा घेतली आहे .राज्यात लातूर जिल्हा सोयाबीनची सर्वाधिक पेरणी करणारा क्रमांक एकचा जिल्हा आहे .खरीप हंगामात सुमारे चार लाख ७५ हजार हेक्टपर्यंत सोयाबीनचा पेरा केला जातो. हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. गेल्या दोन वर्षांत हमीभावापेक्षा अधिक भाव सोयाबीनला मिळतो आहे. गतवर्षी सोयाबीनचा भाव हा दहा हजार रुपये क्विंटलपर्यंत वाढलेला होता. खरीप हंगामातील सोयाबीन काढणीला जेव्हा येतो त्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये परतीचा मान्सून सुरू होतो. ऐन काढणीच्या वेळी पाऊस आल्याने सोयाबीनची गुणवत्ता म्हणावी तशी राहत नाही.

सोयाबीन मधील ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याने बाजारपेठेत शेतकऱ्याला ते विकावे लागते. पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून शेतात निघालेले सोयाबीन शेतकऱ्याला ठेवता येत नाही अशी स्थिती उद्भवते. परिणामी दरवर्षी शेतकऱ्याला पेरणीसाठी बाजारपेठेत उपलब्ध असणारे व चढय़ा भावाने बियाणे खरेदी करावे लागते. गतवर्षी कृषी विभागाच्या वतीने बियाणाची ही अडचण दूर व्हावी, शेतकऱ्याला आपल्या शेतात पिकवलेले सोयाबीनचे बियाणे म्हणून वापरता यावे यासाठी उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग शेतकऱ्यांनी करावा यासाठी आग्रह धरला गेला.

२० डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत सोयाबीनची पेरणी केली तर साधारणपणे ४५ ते ५० दिवसात सोयाबीनला फुले लागतात व जेव्हा फुले असतात तेव्हा तीस सेल्सिअस तापमान राहिले तर फुलगळ होत नाही. त्यामुळेच १५ जानेवारीनंतर सोयाबीनची पेरणी टाळावी असा सल्ला कृषी विभागाने दिला होता. गतवर्षी मार्च, एप्रिल या दोन महिन्यात तापमानात वाढ न झाल्याने ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन घेतले त्यांच्या शेतात फुलगळ झाली नाही व उत्पन्न चांगले निघाले. उन्हाळी सोयाबीन जवळपास ९५ टक्के जसेच्या तसे बियाणे म्हणून वापरता येते. गतवर्षी राज्यात बारा हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा पेरा केला, त्यामुळे शेतकऱ्याचा बियाण्याचा खर्चही वाचला. यावर्षी गेल्या वर्षीप्रमाणेच खरीप हंगामातील सोयाबीन काढणीला आल्यानंतर पाऊस सुरू झाला. त्यामुळे सोयाबीनचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. लातूर जिल्ह्यात तर जिल्ह्यातील साठही मंडळात अतिवृष्टी झाली. तसा अहवालच जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला दिला.

सोयाबीन पेरणीसाठी ठेवता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ते विकणे पसंत केले. यावर्षी सोयाबीनचा भाव बाजारपेठेत चांगला आहे. फेब्रुवारी महिन्यात ६५०० रुपये क्विंटल सोयाबीनचा भाव होता ,मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ७००० चा टप्पा सोयाबीनने गाठला व एप्रिल महिन्यात तो आठ हजाराचा टप्पा ओलांडेल असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे . सोयाबीनचा हमीभाव हा ३९५० रुपये आहे. त्याच्या दुप्पट भाव बाजारपेठेत शेतकऱ्याला सध्या मिळतो आहे .यावर्षी उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग गतवर्षी शेतकऱ्यांना झालेल्या लाभामुळे अनेक जणांनी करण्याचे ठरवले कारण खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्याने शेतात पाणी उपलब्ध होते.

उन्हाळय़ात भाजीपाला, टरबूज, खरबूज अशी फळे किंवा कोिथबीर घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो, मात्र यापैकी कोणत्या वाणाला नक्की चांगला भाव मिळेल याचा अंदाज बांधणे अवघड आहे. बाजारपेठेत येणाऱ्या आवकीवर भाव ठरतो. त्यामुळे शेतकऱ्याला कधीकधी तोटा सहन करावा लागतो. सोयाबीनला चांगला भाव असल्याने शेतकऱ्याने उन्हाळी सोयाबीनला चांगली पसंती दिली आहे.

यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत राज्यभरात उन्हाळी सोयाबीनच्या लागवडीत चौपट वाढ झाली आहे. गत वर्षी १२ हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनचा पेरा होता, तो यावर्षी चक्क ४८ हजार हेक्टरवर जाऊन पोहोचला आहे. या वर्षीची सर्वात चांगली बाब म्हणजे राज्यातील कृषी विभागाने चाळीस हजार ९४५ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होईल असे नियोजन केले होते. मात्र ते प्रत्यक्षात ४७ हजार ९६४ हेक्टरवर झाले आहे .कोल्हापूर विभागात तीन हजार ७२७ ,नाशिक २५३३ ,पुणे ३३३५ ,औरंगाबाद १४ हजार ६३६, लातूर १५२३३ ,अमरावती चार हजार ८४३ ,नागपूर ३०५८ असे पेरणीचे क्षेत्र आहे. लातूर विभागाने राज्यभरात सोयाबीनच्या पेरणीत पहिला क्रमांक पटकावला आहे .सोयाबीनचा मिळणारा भाव हा चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल वाढला आहे.

गतवर्षी ‘फुले संगम केडी ७२६’ या वाणांचा पेरा शेतकऱ्यांनी केला होता. या वर्षी उन्हाळी सोयाबीन याच वाणाचे घ्यावे असे शेतकऱ्यांनी ठरवले होते. प्रत्यक्षात पेरणीच्या वेळी बियाण्यांचा तुटवडा झाला, तेव्हा कृषी विभागाने मिळेल ते बियाणे पेरण्याचे शेतकऱ्याला आवाहन केले व त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरा केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनची उत्पादकता कमी होण्याचा धोका काही भागात आहे, कारण वातावरणात बदल झाला आहे. तापमानात वाढ झाली आहे. दहा मार्चपासून वातावरणात बदल झाल्याने व ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आहे. गतवर्षी खरीप हंगामात १४० रुपये किलोने सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्याला विकत घ्यावे लागले होते व त्यामुळेच उन्हाळी सोयाबीनची लागवड वाढली आहे. शेतकऱ्यांमध्ये दरवर्षी बियाणे बदलले पाहिजे असा एक समज आहे. प्रत्यक्षात तीन वर्ष एकच बियाणे वापरता येते म्हणजे शेतात उत्पादित झाले ते बियाणे शेतकऱ्याला घेता येते. याचे प्रबोधन होण्याची गरज अनेक कृषी विभागातील तज्ज्ञ मंडळी सांगतात.

उन्हाळी सोयाबीन चळवळ

राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी सोयाबीन घेत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे. एका अर्थाने शेतकऱ्यांची ही चळवळ बनली आहे. कालानुरूप शेतकऱ्यांनी केलेला हा बदल निश्चितच शेतकरी हिताचा आहे .शेतकऱ्याच्या उत्पादकतेसाठीचा भांडवली खर्च यामुळे वाचणार आहे. अन्य उन्हाळी पिके घेण्याऐवजी सोयाबीन घेतले तर शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होतो हा गतवर्षीपासूनचा अनुभव आहे . – एकनाथ डवले, कृषी सचिव, महाराष्ट्र