मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात, रुग्णांवर उपचार करणाऱ्यांपर्यंत क्षयरोग येऊन ठेपला. त्याही आधीपासून क्षयरोगाच्या नवनव्या प्रकारांची आणि हे प्रकार औषधांना दादच देईनासे झाल्याची चर्चा सुरू होती. परंतु तेव्हा जो प्रश्न एकटय़ादुकटय़ा रुग्णाच्या जीविताचा समजला गेला, तो महानगरांमध्ये समाजस्वास्थ्याचा प्रश्न आहे, हेही आता स्पष्ट झाले आहे. अशा वेळी तरी आयुर्वेद-अॅलोपॅथी हे भेद विसरले गेले पाहिजेत,
असे आत्मचिंतन करणारा हा पत्रलेख..
मल्टि-ड्रग रेझिस्टन्ट टी.बी.’ किंवा अनेकपरींच्या औषधांना न जुमानणाऱ्या ‘एमडीआर टीबी’मुळे एका डॉक्टरला व एका परिचारिकेला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी बातमी हल्लीच वाचनात आली. जागतिक आरोग्य संघटनेनुसार क्षयरोग अथवा टीबीचे भारतातील प्रमाण सतत वाढत आहे ही अतिशय गंभीर व चिंतेची बाब आहे. टीबी हा संसर्गजन्य रोग आहे व ‘एमडीआर टीबी’ने ग्रस्त रुग्णदेखील, नकळतपणे अनेक लोकांना या रोगाची लागण करू शकतात. विशेषत: त्यांच्या सतत संपर्कात येणारे वैद्यकीय व्यावसायिक, निमवैद्यकीय कर्मचारी, परिचारक व अन्य आप्त या रोगाच्या कचाटय़ात सापडण्याची शक्यता अधिक असते.
परिणामकारक औषधे व नवीन प्रतिजैविक औषधांच्या संशोधनानंतर टी.बी. आता भूतकालीन रोगांत जमा झाला, असं समजून आपण गाफील असतानाच या रोगाने अतिउग्र स्वरूपात पुन्हा डोके वर काढलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगाच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश जनता ही टीबीने ग्रासलेली आहे. हे भयावह आहे. आत्ताचे नवीन टीबीचे जिवाणू मुख्य चिकित्सा समजल्या जाणाऱ्या प्रभावी औषधांनाच दाद देईनासे झालेत आणि यामुळेच त्याची चिकित्सा करणे महाकठीण काम होऊन बसले आहे. पूर्वी विशिष्ट औषधांना प्रतिसाद न देणारे एमडीआर- टीबी जिवाणू आता बहुतांश टीबीच्या औषधांनाच दाद देत नाहीत. (‘ड्रग रेझिस्टन्स’चे इंग्रजी लघुरूप म्हणजे ‘डीआर’.) क्षयरोगाचे काही घातक प्रकार तर सध्या प्रचारात असणाऱ्या कुठल्याच औषधांना जुमानत नाहीत. याला ‘टीडीआर’ किंवा ‘टोटल ड्रग रेझिन्स्टन्स’ असे म्हटले जाते. अशा ‘डीआर’ प्रकारचा टीबी हा केवळ व्यक्तीला हानिकारक नव्हे, तर समाजस्वास्थ्यविरोधी घातक आजार होत चालला आहे.
याची कारणे शोधली गेली तर अनेक सापडतात, पण बऱ्याचदा रुग्णांवरच याचा ठपका ठेवला जातो. चिकित्सा अर्धवट सोडून देणे, अनियमित घेणे यामुळे रोग बरा न होता पुन:पुन्हा उद्भवतो. यामुळे जिवाणूंच्या जनुकीय संरचनेत बदल घडून, त्या जिवाणूंच्या प्रगत पिढय़ा किंवा ‘म्यूटेशन्स’ होऊन नवीन स्वरूपातील टीबी जिवाणूंची उपजात (जीवशास्त्रीय परिभाषेत ‘स्टेन’) उत्पन्न होत आहे.
या दुष्टचक्राला आम्ही डॉक्टरही जबाबदार आहोतच.
गेल्या ६० वर्षांत टीबीवर अधिक प्रभावीपणे व अल्पावधीत काम करणारे कमी विषाक्त असे एकही नवीन औषध बाजारात आणता आलेले नाही. रोगाबद्दलची रुग्णाला असणारी अपुरी माहिती, दीर्घकाळ घ्यावी लागणारी व उग्र उपद्रव करणारी औषधे, औषधांच्या वाढीव किमती या कारणांमुळे रुग्णांचा औषधोपचाराबाबत वाढणारा निष्काळजीपणा, याने ‘एमडीआर-टीबी’ला जन्माला घातलेले आहे.
टीबीच्या औषधांच्या संशोधनानंतर अल्पावधीतच ‘ड्रग रेझिस्टन्स’देखील आढळून आला होता; परंतु रिसर्चचे काम पाहाणारे विकसित देश व काही संस्था यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने सध्याची ही समस्या उद्भवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर १९९३ सालातच या समस्येला ‘जागतिक आरोग्याची आणीबाणी’ (ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी) म्हणून जाहीर केले होते. नवनवीन औषधांवर संशोधन चालू आहे. नजीकच्या काळात एखादे नवीन त्वरित काम करणारे प्रभावी औषध बाजारात येईलच, पण आपणही आता यावर उपाय शोधण्यावर भर द्यावयास हवा.
वैद्यकीय संघटनांनी निवासी डॉक्टरांच्या सकस पोषक आहार व स्वच्छ निवासी संकुलांची मागणी उचलून धरलीच आहे व वैद्यकीय व्यावसायिकांच्या मूलभूत गरजांच्या गलथानपणा विरोधात आवाज उठविल्याचे वाचनात आले आहे. महानगरपालिकेनेही वैद्यकीय व्यावसायिकांची नियमित टीबी चाचणी (स्क्रीनिंग) राबविण्याचा संकल्प केला आहे, पण एवढे केल्याने आपण टीबीपासून आपले संरक्षण करू शकतो का, हा मोठा यक्षप्रश्न आहे. या समस्येकडे अधिक सखोल व गांभीर्याने बघायला हवे! कारण टीबीचे जिवाणू तर केवळ रुग्णालयातच नसून आपण श्वास घेतो त्या हवेत कमीजास्त फरकाने सर्वत्र आहेत; परंतु काहीच माणसे याला बळी पडताहेत याचा अर्थ या रोगाला थोपवून धरणारी ‘रोगप्रतिकारक्षमता’ ही शक्ती आपल्यापैकी अनेकांमध्ये काम करते आहे. ही शक्ती जोपर्यंत अबाधित आहे, तोवर ठीक. जेव्हा प्रतिकारशक्ती कमजोर ठरते, तेव्हाच आपल्या सभोवतालच्या जिवाणू, विषाणूंचे पारडे जड होऊन ते आजार उत्पन्न करण्यास प्रभावी होतात.
पूर्वीसारखा टीबी हा गरीब, गांजलेल्या लोकांपुरताच मर्यादित आजार न राहता, उच्चभ्रू, सधन लोकांमध्येही या आजाराची पाळेमुळे पसरू लागली आहेत. आधुनिक काळातील जीवघेणी तीव्र स्पर्धा, धकाधकीचे जीवन, प्रचंड मानसिक ताणतणाव, पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे सकस आहाराला दिला जाणारा फाटा, हवेशीर स्वच्छ-निवास व्यवस्था इ. सर्व काही असूनही नवीन पिढी आजारांना सहज बळी पडत चाललेली रोजच्या प्रॅक्टिसमध्ये अनुभवायला मिळतेय. पावसाळा सुरू होताच मलेरिया, डेंग्यू इ साथींनी गलितगात्र रुग्ण व अशा रुग्णांनी भरलेली रुग्णालये हेच स्पष्ट करतात. नवनवीन महागडी औषधे, उच्च प्रतीची चिकित्सीय सुविधा उपलब्ध असूनही आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या सर्वावरून एक सहज अनुमान काढता येते ते असे की, आपण आपली प्रतिकारक्षमताच गमावत चाललो आहोत. ही शक्ती बदललेल्या जीवनशैलीच्या रेटय़ामुळे दबते आहे की लहानपणापासूनच होणारा औषधांचा चुकीचा व अनाठायी मारा या शक्तिपाताला कारणीभूत आहे, अशा चर्चेपेक्षा या दोन्ही कारणांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. औषधांना दाद न देणारे रोगांचे नवे प्रकार, हेदेखील त्याचे एक दृश्य लक्षण.
प्रतिकारशक्तीला बळकट करण्याचे काही उपाय आहेत का याचा शोध घेतला तर लक्षात येते की, भारतीय वैद्यकशास्त्राने- आयुर्वेदाने याचे अनेक उपाय काही हजार वर्षांपूर्वी नोंदवून ठेवले आहेत. रोग उत्पन्नच होऊ नयेत यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक चिकित्सेवर आयुर्वेदाने नेहमीच भर दिलेला आहे. निरोगी व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे हा आयुर्वेदाचा एक मुख्य उद्देश आहे. यासाठीच दैनंदिन, ऋतुमानानुसार करण्याचे अनेक उपाय व विशेष चिकित्सा आयुर्वेदात सांगितल्या आहेत. आयुर्वेद चिकित्सकांना या उपचारांच्या परिणामकारकतेची खात्री अनेकदा पटली आहे. आधुनिक वैद्यकीय औषधांसोबत, रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या विशिष्ट रस-रसायनांच्या वापराने टीबीसारख्या अनेक गंभीर आजारांतून रुग्ण लवकर बरे होताना अनुभवले आहे.
व्याधी प्रतिकारक्षमता जन्मजातच आपल्यामध्ये असते व काही प्रमाणात ती जन्मानंतर विकसित केली जाते. यालाच वैद्यकीय भाषेत सह-ज व जन्मोत्तर असे म्हणतात. विविध लसींद्वारा किंवा एखादय़ा रोगाच्या संपर्कानंतर शरीराद्वारेच ती विकसित केली जाते. आयुर्वेदाने या दोनही प्रकारची रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासंबंधात सखोल शास्त्रीय विवेचन केले होते. पंचकर्मासारख्या शोधन प्रक्रियेद्वारे आणि आयुर्वेदात सांगितलेल्या विविध रसायन चिकित्सांद्वारे शरीरास सक्षम बनविले जाते. एखादे विशिष्ट शरीरसंस्थान उदा. श्वसनसंस्थेची (रेस्पिरेटरी) संरक्षणशक्ती वाढविण्यासाठी विशिष्ट औषधांची योजना केली आहे. शरीरातील कमजोर अशा संस्थानांवर काम करणाऱ्या खास रस-रसायन औषधांचा वापर केला गेलेला आहे. यांचा उपयोग निरोगी व्यक्तींच्या आरोग्य रक्षणासाठी व रोग झालाच तर तो बरा करण्यासाठी, पुन्हा उद्भवू नये यासाठीही केला जातो.
वाजीकरणासारख्या उपायांनी उत्पन्न होणारी संततीच सुदृढ व निरोगी कशी बनेल यावर विशेष भर दिला आहे. गर्भधारणेपूर्वीच केल्या जाणाऱ्या या उपायांनी स्त्री व पुरुष बीज दोषरहित व श्रेष्ठ प्रतीचे कसे बनेल या प्रकारची औषधी उपाययोजना करून भविष्यकालीन पिढी निरोगी व उत्तम प्रतिकारक्षम बनवण्याचे उपाय सांगितले गेलेले आहेत.
अशा शास्त्रीय उपायांनी आपण आपली रोगप्रतिकारशक्ती निश्चित बळकट करू शकतो आणि त्यासाठी आयुर्वेदाचा संपन्न वैद्यकीय वारसा आहेच. पॅथी-पॅथींमधील भेदभाव विसरून या प्रकारच्या घातक आजारांना सर्व तऱ्हेच्या उपायांनी नेस्तनाबूत कसे करता येईल व समाजाचे आरोग्य कसे टिकवता येईल याचा व्यापक विचार झाला पाहिजे. विविध सामाजिक व वैद्यकीय संघटनांनी आयुर्वेदाच्या या उपयुक्त पलूकडे लक्ष देऊन याचा प्रचार व प्रसार करावयास हवा. रिसर्च संस्थांनीही रोगांवर नवनवीन औषधे शोधण्यात वेळ व पसा हे दोन्ही खर्च करताना, शरीराची स्वत:ची संरक्षण शक्ती मजबूत करणारी ही औषधेही व्यापक प्रमाणात संशोधित करण्याची गरज आहे. समाजस्वास्थ्य टिकवण्यासंबंधातील उपाययोजनांत आयुर्वेदालाही अग्रक्रम मिळायला हवा. ‘औषधोपचारांपेक्षा प्रतिबंध उत्तम’ (प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर) असे नुसते म्हणण्यापेक्षा त्या दिशेने ठोस पावले उचलायला हवीत.. औषधोपचारांना रोग दाद देईनासे झाले असतील, तर प्रतिबंधाचे महत्त्व विशेषच लक्षात घ्यावयास हवे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2013 रोजी प्रकाशित
टीबी.. एक वैद्यकीय आत्मचिंतन
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात, रुग्णांवर उपचार करणाऱ्यांपर्यंत क्षयरोग येऊन ठेपला. त्याही आधीपासून क्षयरोगाच्या नवनव्या प्रकारांची आणि हे प्रकार औषधांना दादच देईनासे झाल्याची चर्चा सुरू होती.
First published on: 26-07-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tb a medical self analysis