चहूबाजूंनी घुमणारी पॅसिफिक सागराची गाज, हिरव्या रानातून बागडणारा उनाड वारा, हिरव्याकंच डोंगर-टेकडय़ा आणि निळ्याशार पाण्याची नयनरम्य सरोवरे यांनी नटलेली, पृष्ठभागावर नीरव शांतता आणि पोटात ज्वालामुखी वागवणारी न्यूझीलंड बेटे, ख्राइस्टचर्च शहरात ज्वालामुखीच्या उद्रेकाप्रमाणे उफाळलेल्या श्वेतवर्णी दहशतवादाने अस्वस्थ आहेत. न्यूझीलंड हा दहशतवादी हल्ल्याचा कमी धोका असलेला देश होता; पण कालपर्यंत. आज त्याच्या हिरव्यागार भूमीवर रक्ताचे ओघळ आहेत. तिथली शांतता ख्राइस्टचर्चच्या समूह हत्याकांडाने भेदली गेली.
श्वेतवर्णीय दहशतवाद्याने नमाजासाठी जमलेल्या ५० लोकांचा बळी घेतला; परंतु या हल्ल्याला ‘दहशतवादी हल्ला’ म्हणावे का, असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा या कृत्याचे स्वरूप आणि त्यामागची हल्लेखोराची विचारसरणी समजल्यावर तो श्वेतवर्णीय दहशतवादच आहे, यावर शिक्कामोर्तब केले गेले. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र, ‘या कृत्यातून आपल्याला श्वेत राष्ट्रवाद किंवा कट्टरतावादाचा धोका वाढत असल्याचं दिसत नाही,’ असे वक्तव्य केले. याचा निषेध वॉशिंग्टन पोस्टने संपादकीयामध्ये केला. हल्लेखोराची विध्वंसक विचारधारा सुसंस्कृत जगात स्वीकारार्ह नसल्याचं नि:संकोचपणे मान्य करणं आवश्यक असताना ट्रम्प यांची प्रतिक्रिया चुकीचा संदेश देणारी आहे, मुस्लीमद्वेषातून ती आली आहे, असे ‘पोस्ट’ने म्हटले आहे.
या हत्याकांडाचे वर्णन ‘दहशतवादी हल्ला’ असे न करता त्याला ‘ख्राइस्टचर्च मॉस्क शूटिंग’ म्हटल्याबद्दल बीबीसी, डेली मिररसारख्या ब्रिटिश प्रसारमाध्यमांवर टीकेची झोड उठली. ‘बीबीसी’चे माजी संपादक रिफात जावैद यांनी ‘बीबीसी’ला पक्षपाती ठरवले आहे. ‘डेली मिरर’ने तर ब्रेंटन टॅरंट या ख्राइस्टचर्चच्या हल्लेखोराचे बालपणीचे छायाचित्र प्रसिद्ध करून त्याला लहानगा देवदूत संबोधले.
अल् जझीरा वाहिनीने हत्याकांडाच्या बातम्या हाताळण्याच्या मुख्य धारेतील काही प्रसिद्धीमाध्यमांच्या पद्धतीवर आक्षेप घेतले. काही वृत्तवाहिन्यांनी टॅरंटच्या गोळीबाराच्या थेट प्रक्षेपणाची (लाइव्ह स्ट्रीम) ध्वनिचित्रफीत प्रसारित करून क्लिक्स आणि रेटिंग मिळवले, ते चूक असल्याचे मत ‘अल् जझीरा’ने संकेतस्थळावरील लेखात नोंदवले आहे. काही प्रसारमाध्यमांना या प्रकरणात बातमीसाठी एक चेहरा मिळाला, तो श्वेतवर्णीय असल्याने त्याच्यातला दहशतवादी त्यांना दिसला नाही. शिवाय, काही माध्यमे फक्त न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंदा आर्डन यांच्यासाठी तेथे गेली. हल्ला आणि त्यात बळी पडलेल्यांपेक्षा श्वेतवर्णीय आर्डन यांनाच त्यांनी जास्त प्रसिद्धी दिली, असे निरीक्षणही या लेखात आहे.
‘जेसिंदा आर्डन यांच्यासारख्या चांगल्या नेतृत्वाची अमेरिकेला गरज आहे,’ अशी टिप्पणी न्यू यॉर्क टाइम्सने संपादकीयामध्ये केली आहे. ‘वी आर वन, दे आर अस’ हे आर्डन यांचे उद्गार प्रशंसेचा विषय ठरले. आयसिस, जैश-ए-मोहम्मद किंवा तत्सम दहशतवादी गटांमुळे संपूर्ण मुस्लीम समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित होत असताना आर्डनबाईंची ही भावना त्या समाजाला अन्य समाजांशी जोडणारी आहे, अशा आशयाचे वृत्तांत ‘वॉिशग्टन पोस्ट’सह अनेक मोठय़ा वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले.
‘हल्लेखोराने आमच्या मुस्लीम समाजातील ५० जणांचे प्राण घेतले,’ अशी न्यूझीलंड हेराल्डच्या संपादकीयाची सुरुवात आहे. ज्यांचे प्राण गेले त्यांपकी बहुतेक पाकिस्तान, भारत, मलेशिया, बांगलादेश, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, सोमालिया इत्यादी देशांतील स्थलांतरित किंवा सीरियातील निर्वासित होते. त्यामुळे त्यातील ‘अवर मुस्लीम कम्युनिटी’ हे शब्द तेथील साऱ्याच स्थलांतरितांना विश्वास देणारे आहेत.
वाढता श्वेत राष्ट्रवाद आणि त्यातून जन्मलेल्या दहशतवादाच्या अनुषंगाने इस्रायली माध्यमांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. ‘अमेरिकेतील ज्यू आणि मुस्लिमांना आता एकमेकांची कधी नव्हे एवढी गरज आहे,’ असे मत मांडणारा मायकल फेल्सन यांचा लेख हारेट्झ या दैनिकाने प्रसिद्ध केला आहे. ‘आपल्या दोन समाजांमध्ये तणाव असला तरी आपल्याशी दुर्वर्तन करणाऱ्या आणि आता आपले जीवही घेणाऱ्या श्वेतवर्णीयांच्या कट्टरतावादाविरोधात एकत्र उभे राहणे, हा आपल्या निवडीचा भाग नाही तर काळाची गरज आहे, हे ख्राइस्टचर्च व (अमेरिकेतील) पीटस्बर्गमधील शोकांतिकांनी सिद्ध केले आहे,’ असे निरीक्षणही या लेखात आहे. जेरुसलेम पोस्टनेही अशाच आशयाचा ‘वी मस्ट प्रोटेक्ट ख्राइस्टचर्च फॅमिलीज’ हा लेख प्रसिद्ध केला आहे. त्यात ‘आम्ही ज्यू समुदाय तुमची (मुस्लिमांची) भावंडे आहोत, आपण सर्व अब्राहमची मुले आहोत,’ असे आश्वासक मत मांडले आहे. ज्यू आणि मुस्लीम हे दोन्ही समाज जेरुसलेमवर आध्यात्मिक हक्क सांगतात. हा वाद आणि पाश्चिमात्य देशांतील श्वेतवर्णीय कट्टरतावाद्यांमध्ये दोन्ही समाजांविषयी वाढती द्वेषभावना या पाश्र्वभूमीवर ख्राइस्टचर्चच्या निमित्ताने घेतलेली ही भूमिका आश्वासक आहे.
संकलन : सिद्धार्थ ताराबाई