अर्थवेध
देशातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटचे पारंपरिक स्वरूप बदलावे आणि त्याचा अधिक प्रसार व्हावा या उद्देशाने एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात झाली. एकदिवसीय क्रिकेटमधील नावीन्यही संपले असून ट्वेंटी-२० आणि आयपीएलचे युग अवतरले आहे. क्रिकेटच्या प्रकारात बदल होत असताना आता क्रिकेटमधील अर्थकारणही झपाटय़ाने विस्तारत आहेत. क्रिकेटमधील या ‘अर्थ’चा शोध अर्थवेध या दिवाळी अंकात घेण्यात आला आहे. या दिवाळी अंकाच्या पहिल्या भागात क्रिकेटबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली असून यामध्ये भारतामधील ऐतिहासिक क्रिकेटपटू, पहिलेवहिले विक्रम, बॅट, चेंडू, नाणेफेक ( टॉस), धावफलक आणि समालोचन या क्रिकेटच्या पाच महत्त्वाच्या घटकांचा कशा पद्धतीने विकास झाला याची माहिती दिली आहे. आयपीएलच्या आगमनामुळे भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. आयपीएलच्या अर्थकारणचा आढावा दीपक घैसास यांनी घेतला आहे. याशिवाय सामनानिश्चिती, चीअरगर्ल्स, महिला क्रिकेटपटू यांबाबतच्या विशेष लेखांचा अंकात समावेश करण्यात आला आहे. अंकाच्या शेवटच्या भागात आयपीएलमधील पाच पर्वात खेळलेल्या खेळाडूंची यादी त्यांच्या किमतीसह देण्यात आलेली यादी जिज्ञासू क्रिकेट रसिकांनी संग्रही ठेवावी अशी आहे.
अर्थवेध :  
संपादक – वैशाली साठे,
पृष्ठे – १३६  किंमत – ७५ रुपये.
एक संक्रमण
‘एक संक्रमण’ हा दिवाळी अंक शुद्ध साहित्यिक मूल्यांना वाहिलेला आहे. यंदाचा हा १६ वा दिवाळी अंक. यात काकस्पर्श नेतो कुठे जो. म. पीठेकर, ‘संपूर्ण चांगुलपणातले जगणे’ डॉ. कमलेश सोमण, ‘ग्रेसफूल माणिक’ जोसेफ तुस्कानो, ‘स्त्री-भ्रूण हत्या: गरज मानसिक बदलाची’ रॉकी लोपीस, ‘दयामरण खरेच द्यावे का?’ नंदकुमार जावळे असे ज्वलंत प्रश्नांवरील अभ्यासपूर्ण लेख आहेत. प्राचार्य पु. द. कोडोलीकर यांनी लिहिलेला ‘खलील जीब्रान : नव्या युगाचा प्रेषित’ हा प्रदीर्घ लेख अतिशय सुंदर व वाचनीय आहे. त्याचप्रमाणे रवींद्र जवादे, रा. रं. बोराडे, बा.व. राणे, विनया खडपेकर, उषा देव, आशा अरुण पाटील, निर्मला मठपती तसेच तुलसी बेहेरे यांचा ‘शतकापूर्वीचा मॉरिशसमधील दशावतार’ यांचे साहित्य म्हणजे वाचकांना उत्तम फराळ आहे.
‘एक संक्रमण’ :
संपादक : रॉकी लोपीस,
पृष्ठे- २१२, मूल्य- १०० रु.