अरुपाचे रूप
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com /  @vinayakparab
सय्यद हैदर रझा म्हणजे तंत्रचित्रे किंवा अस्सल भारतीय माती आणि परंपरेशी नाते सांगणारी चित्रे असाच समज गेल्या २० वर्षांमध्ये अनेकांच्या मनामध्ये मूळ धरून आहे आणि तोच गेल्या २० वर्षांत सातत्याने जपलाही जातो आहे. त्यामुळे कोणे एके काळी रझा निसर्गदृश्यचित्रणही करायचे असे कुणाला सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही, अशीच अवस्था आहे. त्यातही आता नवीन ट्रेण्ड हा थेट अमूर्तचित्रणाचा आहे. त्यामुळे अनेकांना असे वाटते की, रझा थेट अमूर्ताकडेच वळले.  त्यातही अलीकडे भारतीय मातीविषयीचे प्रेम हा तसा राजकीय विषय झाल्याने त्यांच्या अस्सल भारतीय असण्याच्या मुद्दय़ावर अधिक भर दिला जातो. मात्र हा प्रवास नेमका कसा झाला, याबद्दल कुणीच फारसे बोलत नाही. अनेकांना हा प्रवास कसा झाला हेही तसे नेमके ठावूक नसते. काही वर्षांपूर्वी राज्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित प्रदर्शनामध्ये रझांचे निसर्गदृश्यचित्रण पाहिले, त्यावेळेस अनेकांना धक्काच बसला होता. रझा निसर्गदृश्यचित्रणही करायचे याचे आश्चर्यच वाटले होते अनेकांना. पण म्हणूनच रझा समजून घ्यायचे तर सध्या लोअरपरळच्या पेनिन्सुलामध्ये पिरामल म्युझियममध्ये सुरू असलेल्या रझा यांच्या प्रदर्शनास भेट द्यायला हवी.

एकूण चार महत्त्वाच्या टप्प्यांतून, ३५ चित्रांच्या सहाय्याने आपल्याला इथे रझा यांचा कलाप्रवास समजून घेता येतो. मुंबईतील त्यांचे आगमन ज्यामुळे त्यांच्यासाठी जगाची कवाडे खुली झाली. त्यानंतर पॅरिसला जाणे,  तिथून परतल्यानंतर भारतीय रूपक आणि रुपाकारांकडे खेचले जाणे  व अखेरीस तंत्रचित्रांचा टप्पा. यातील सुरुवातीची चित्रे १९४० च्या भागामध्ये आहेत. त्यात बनारस, मुंबई अशा काही ठिकाणांची रझा यांनी केलेली लँडस्केप्स पाहायला मिळतात. यातही प्रकर्षांने असे लक्षात येते की, यथातथ्यदर्शन म्हणजेच केवळ जे जसे दिसते तसे चितारण्याकडे त्यांचा कल कधीच नव्हता. त्यामध्येही विशेष म्हणजे, तिथे असलेले रंग आणि छायाप्रकाशाचा खेळ त्यामधून  निर्माण होणारी भाववृत्ती ही त्यांच्या चित्रांच्या केंद्रस्थानी होती. त्यामुळे बारकाव्यानिशी केलेले चित्रण त्यात पाहायला मिळत नाही. बनारस आणि मुंबई ही चित्रे तेच सांगण्याचा प्रयत्न करतात. या भागातील काश्मीर आणि क्युबिझमच्या शैलीतील स्टिललाइफ ही दोन वेगळी चित्रे आहेत. काश्मीरच्या चित्रातही रंगांची उधळण त्यांना भावलेली दिसते आणि त्यामुळे श्रीनगर या शहराची भाववृत्ती चित्रात येईल, असे ते पाहतात. स्टीललाईफमध्ये तर पिकासोचा प्रभाव पूर्ण जाणवतो. त्यांच्यातील प्रयोगशीलता पूर्ण जाणवून देणारे असे हे चित्र आहे.

नंतरचा टप्पा हा फ्रान्समध्ये गेल्यानंतरचा आणि तिथला प्रभाव घेऊन येणारा असा आहे. त्यामध्ये आकारांचा प्रवास अमूर्ताच्या दिशेने सुरू झालेला दिसतो. खासकरून लँडस्केप अ‍ॅण्ड हाऊसेस विथ ट्रीज या चित्रामध्ये त्याचे प्रत्यंतर येते. इथे रूढार्थाने लँडस्केपही नाही आणि झाडेही दिसत नाहीत. मात्र चित्र व्यवस्थित पाहिले तर त्याचा ‘फील’ मात्र जाणवण्यासारखा आहे. आता ‘फील’ अर्थात ‘जाणवणे’ केंद्रस्थानी आले आहे. या चित्राच्या तुलनेने तीन वर्षे नंतर म्हणजे १९५९ साली चितारलेल्या गाव या चित्रामध्ये तर आधीचे आकार सुटे होऊन त्यांचा प्रवास रूपाकारांच्या दिशेने झालेला दिसतो. त्यामध्ये रंगांची दिसणारी उधळण ही रझांच्या रंगसंगतीमध्ये व रंगलेपनामध्ये होत चाललेला बदल पुरती स्पष्ट करणारी अशी आहे. इथेही गावाचा ‘फील’ आहे. रझा रंगरूपाकारातून आपल्याला गाव जाणवून देतात. फ्रान्समधील त्यांची सर्वच चित्रे अशी वेगळी आणि शैलीतील बदल लक्षात आणून देणारी आहेत. चर्चचे गाजलेले चित्रही असेच आहे. इते रामकुमार आणि एफ. एन. सूझा असे त्यांचे दोन समकालीनही याच कालखंडात काम करताना दिसतात. अनेकदा समकालीन (पान १२ वर) कलावंतांचा किंवा थोडे ज्येष्ठ असलेल्या कलावंतांचाही प्रभाव राहतोच. इथे रुझांच्या ठळक रेषांपेक्षा रामकुमारांच्या रंगचित्रणाचा प्रभाव थोडा अधिक झालेला पाहायला मिळतो. हा आयोजकांनी केलेला प्रयोग कलाभ्यासकांसाठी महत्त्वाचा ठरावा. हा नेमका तोच टप्पा आहे रझांच्या आयुष्यातील ज्यावेळेस ते बेतलेल्या रचनांकडून मुक्तछंदाकडे प्रवास करताना दिसतात. त्या त्या ठिकाणाचे जाणवणे रंगांच्या माध्यमातून अधिक दृढ होत चाललेले इथे पाहायला मिळते. या टप्प्यातील रंगप्रवास अधिक गडद म्हणावा, असा आहे. इथूनच मग पुढचा टप्पा साहजिक सुरू होतो. पण हा पुढचा टप्पा भारताशी जोडलेला आहे. त्या आधी एक अमेरिका भेटही होऊन जाते. अमेरिकेतील शिक्षणाचा अनुभवही नंतर त्यांच्या चित्रांवर प्रभाव टाकून गेलेला दिसतो. आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनांतून फिरल्यानंतर कदाचित स्वतच्या मुळांकडे जाण्याची तीव्र जाणीव निर्माण झाली असावी, असे म्हणण्यास इथे वाव आहे. त्याचा दृश्यप्रभाव राजस्थान आणि पंजाब या दोन चित्रांमध्ये थेट पाहायला मिळतो. म्हणूनच या लेखाच्या पहिल्या दोन पानांवर त्यांचे अखेरच्या टप्प्य़ातील तंत्रचित्र ठरावे असे सूर्यनमस्कार हे चित्र प्रथम दिलेले असून त्यानंतर राजस्थान व पंजाब ही दोन चित्रे एकाच रेषेत दिली आहेत. त्यांच्यामध्ये होत गेलेले बदल आणि त्यातील साधम्र्य दोन्ही वाचकांच्या नजरेला थेट जाणवावे यासाठी ही अशी रचना करण्यात आली आहे. इथे पंजाब आणि राजस्थान या दोन्ही चित्रांमध्ये तिथे जाणवलेला निसर्ग आणि एकूणच त्या मातीचे, त्या ठिकाणाचे जाणवणे रंगांमधून प्रभावीपणे व्यक्त झाले आहे. मग पंजाब म्हटल्यानंतर डोळ्यांसमोर येणारी राईच्या शेतीतील पिवळ्या फुलांची लहर असो किंवा तिथली हिरवीगार बहरलेली शेतं असोत.. या टप्प्याचे वर्णन करायचे तर रझांच्या बाबतीत झाले मोकळे आकार.. असेच करावे लागेल. यातील ग्रे लँडस्केप हे देखील पाहण्यासारखे चित्र आहेत. इथे फक्त काळ्यापांढऱ्यातून आलेला फील आहे. त्यातील छटा, त्यांचे थर आणि पापुद्रेही आहेत. त्यातले जाणवणे इतर रंगचित्रांपेक्षा खूपच वेगळे आहे.  त्यानंतरचा अखेरच्या टप्प्यातील प्रवास अध्यात्मिक म्हणावा, असाच आहे. त्यात बिंदूशी आणि या मातीशी, या मातीतील तत्त्वज्ञानाशी जोडले जाणे हे अधिक होते. मग तेच रंग, आकार यांचा प्रवास भारतीय मुशीतून व्यक्त होताना दिसतो. पण अलीकडे लोकांना लक्षात राहिला आहे तो केवळ तो अखेरचाच टप्पा. रझांच्या आयुष्यातील त्यांच्या चित्रप्रवासातील ही स्थित्यंतरेही तेवढीच महत्त्वाची आहेत. किंबहुना ही स्थित्यंतरेच त्यांची चित्रे वेगळ्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपल्याला अधिक मदत करतात. आवर्जून पाहावे, चुकवू नये असे हे प्रदर्शन २८ ऑक्टोबपर्यंत पाहाता येईल.