मनोरंजन विश्वात लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा अनेक क्षेत्रांप्रमाणे संकलनातही क्रिएटिव्हिटी असते. अतिशय आव्हानात्मक अशा संकलन क्षेत्रात भक्ती मायाळू यांनी स्वत:ची ओळख प्रस्थापित केली. दिग्दर्शन करण्यासाठी त्यांनी संकलन विभागात पहिलं पाऊल टाकलं आणि ते त्यांचं विश्वच बनून गेलं.

कॉमर्सची पाश्र्वभूमी असताना तांत्रिक बाबींशी संबंधित संकलन क्षेत्रात करिअर करावंसं का वाटलं?

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित

कॉमर्स ही शाखा निवडली तेव्हा खूप काही विचार केला नव्हता. सायन्स झेपणार नाही याची खात्री होती. त्यावेळी टक्केवारीनुसार शाखा निवडावी इतकंच डोक्यात होतं. मी कॉमर्सला जाऊ शकते तर तेच करू या, इतका साधा विचार त्यामागे होता. करिअरच्या दृष्टीने आपण शाखा निवडावी असं काही डोक्यात नव्हतं. ग्रॅज्युएट व्हायचं आहे एवढंच पक्क होतं! कॉमर्समध्ये डिग्री मिळणार असली तरी हा माझा विषय नाही हे कालांतराने माझ्या लक्षात आलं. या शाखेत मी पास झाले तरी त्या विषयांची मला आवड नाही. त्यातूनच ‘काही तरी वेगळं करू या’च्या विचाराला प्रारंभ झाला. पण हे वेगळं म्हणजे नेमकं काय ते कळत नव्हतं. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली होती की, जे करीन त्यात रस हवा. माझे वडील दिग्दर्शक राजदत्त मनोरंजन क्षेत्रात काम करीत असल्यामुळे त्यांना खूप लोक भेटायला यायचे. अनेकजण त्यांच्यासोबत काम करायची इच्छा व्यक्त करुन दाखवायचे. मग मलाही असं वाटे की बाबा जे काम करताहेत ते काम आपल्याला करायचंय. बाबांच्या कामांचा आवाका मोठा होता. ते करत असलेलं  काम मी करू शकेन की नाही हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आम्ही शाळेत असताना त्यांच्या कामाची पद्धत बघितली होती. तीन-चार दिवस घरी न येणं, रात्री उशिरा येणं, सकाळी लवकर जाणं असं त्यांचं काम सुरू असे. त्यांच्यासोबत काम करण्याबाबत त्यांना विचारण्याची भीती वाटे. शेवटी एकदा मी विचारलं ‘दिग्दर्शन शिकू का? आधी तुमची साहाय्यक म्हणून काम करू का?’ मग ते मला म्हणाले की, ‘तुला दिग्दर्शन शिकायचं असेल तर तू आधी संकलन शीक. चांगलं संकलन करणारा चांगलं दिग्दर्शन करू शकतो.’ मी बरं म्हटलं. कलाकार, दिग्दर्शक, सिनेमाटोग्राफी, संगीत ही क्षेत्रं माहिती असतात. पण, संकलन हे क्षेत्र फारसं माहीत नसतं. बाबा ‘तू संकलन करताना काम बघ’ असं म्हणाले. शूट केलेले प्रसंग सलग एकामागे एक लावायचे मग तरी त्याला इतका वेळ का लागतो, असा मला प्रश्न पडायचा. त्याबद्दल मी बाबांना विचारलंसुद्धा. त्यावर ते म्हणाले, ‘तू त्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घे. मी तुला त्याबद्दल काहीही सांगणार नाही.’ अगदी सुरुवातीला संकलकाच्या शेजारी बसून ते संकलन कसं होतंय हे तुम्हाला कळणारच नाही. तेच तेच प्रसंग तुम्ही बघताय असंच वाटतं. माझंही तसंच झालं. काही दिवसांनंतर ते काम हळूहळू समजायला लागलं. आपण शोधत होतो ते ‘वेगळं’ काम हेच आहे याची खात्री पटली. वेगळ्या कामाची म्हणजे संकलनाची सुरुवात अशी झाली. थोडी घरातून, थोडी नकळत. ‘करून बघू या’पासून हा प्रवास सुरू झाला. मग बाबांच्याच सिनेमातले काही प्रसंगांचं संकलनाचं काम करू लागले. दूरदर्शनवरील मालिकांचं संकलन करताना मी बऱ्याच गोष्टी शिकले. माझं काम नसलं तरी मी तिथे जाऊन इतरांची कामं बघत बसायचे. तिथे जाऊन सराव करायचे. या सरावाचा खूप फायदा झाला. विद्याधर पाठारे बाबांच्या सिनेमांचं संकलन करायचे. मी त्यांच्याकडून बरंच शिकले. सरावामुळे आत्मविश्वास मिळाला. संकलनाच्या मशीनवर आत्मविश्वास आला की चांगलं काम करता येतं, हे अनुभवातून शिकत गेले.

तुम्ही सिनेमांपेक्षा मालिकांच्या संकलनात जास्त रमलात. याचं काही खास कारण?

तसं विशेष काही कारण नाही. मी संकलनाच्या कामाला सुरुवात केली तेव्हा खासगी चॅनल्स येत होते. टीव्ही हे माध्यम मोठं होत होतं. करिअरचा सुरुवातीचा टप्पा असल्यामुळे सिनेमा करतेय की मालिका, असा विचारच कधी मनात आला नाही. ‘तुझ्या मुलीचं नाव टीव्हीवर वाचलं’ असं आईला नातेवाईक-मित्रमैत्रिणी सांगायच्या. त्याचा तिला आनंद व्हायचा. त्यातही टेक्निशियन म्हणून नाव आल्यामुळे तिला अधिकच कौतुक वाटे. या क्षेत्रात ग्लॅमर नव्हतं, पण कामाची पावती मिळत गेली. या कौतुकामुळे अधिकाधिक चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन मिळत गेलं. त्यामुळे त्यावेळी सिनेमा, मालिका असा कधी विचार केला नाही.

‘ट्वेंटीफोर’ या लोकप्रिय मालिकेच्या दोन्ही सीझनचं संकलन तुम्ही केलंय. या कामाची सुरुवात कशी झाली?

‘ट्वेंटीफोर’ या मालिकेचा दिग्दर्शक अभिनय देव माझा सख्खा मावसभाऊ आहे. आम्ही आमच्या करिअरच्या सुरुवातीला एकत्र काम केलंय, नवनवीन गोष्टी शिकलोय. आम्ही भावंड असलो तरी त्याच्या कामाच्या पद्धतीत अतिशय शिस्त आहे. त्यामुळे मी त्याला हवं तसं काम करून देण्याचा प्रयत्न करत होते. त्याला जाहिरात आणि मला टीव्ही क्षेत्राचा अनुभव होता. आम्ही दोघेही शिकत असताना एकत्र काम केलंय. काही छोटय़ा एपिसोड्सचं त्याने दिग्दर्शन आणि मी संकलन केलं होतं. माझं काम मोठय़ा जबाबदारीचं होतं. ती जबाबदारी मी पार पाडू शकेन की नाही याचं थोडं दडपण होतं. ‘ट्वेंटीफोर’सारखा शो भारतीय प्रेक्षकांसाठी नवीन होता. त्यामुळे त्याचं संकलनही नवीन होतं. संदर्भासाठी अभिनयने मला  ‘ट्वेंटीफोर’ या अमेरिकन सीरिजचे भाग बघायला सांगितले. मी त्याचे काही भाग बघितले. त्यात त्यांना काय हवंय ते कळलं. टीव्हीमध्ये अनेक गोष्टी वेळेशी बांधल्या जातात. ठरावीक वेळेत ठरावीक काम व्हायला हवं अशी डेडलाइन असते. त्यामुळे खूप दडपण, ताण असतो. पण त्या कामाचं कौतुक झालं की समाधान आणि आनंद मिळतो.

‘ट्वेंटीफोर’ या अमेरिकन सीरिजचे एपिसोड बघताना भारतीय मालिकाही त्यासारखी चांगली व्हावी पण त्याचं अनुकरण होऊ नये हे दडपण होतं का?

‘ट्वेंटीफोर’ही अमेरिकन सीरिज मी फक्त संदर्भासाठी बघितली होती. त्यातला चार विंडोज दाखवण्याचा प्रकार मी त्यातून घेतला. पण हे करताना प्रेक्षक या नव्या प्रकाराला स्वीकारतील का अशी शंका होती. कारण विंडोज केल्या तर टीव्हीची संपूर्ण स्क्रीन त्या तीन-चार विंडोजनी सामावली जाते. ते प्रेक्षकांना कितपत आवडेल, पटेल अशी शंका त्या वेळी आली होती. पण, नंतर ते एपिसोड बघून ही शंका दूर झाली. त्या मालिकेच्या कथेत तुम्ही इतके समरस होऊन जाता की त्या विंडोजने विशेष काही फरक पडत नाही. उलट एपिसोडमधले भाग विंडोजच्या रूपात छोटय़ा चौकटीत तुम्हाला ते दिसत राहतात. मालिकेचा दिग्दर्शक अभिनयला जाहिरात क्षेत्राचा अनुभव आहे. जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये कमीत कमी वेळात एक गोष्ट सांगण्याची कला अवगत असते. त्यामुळे ‘ट्वेंटीफोर’च्या एपिसोडचा वेग जलद ठेवायचा असं मी ठरवलं.  एखादी जाहिरात प्रेक्षक तीस वेळा बघतात. पण मालिकेचा एपिसोड प्रेक्षक एकदाच बघतो. त्यामुळे त्याचा वेग इतकाही जलद नको की प्रेक्षकांना काय बघितलं हे कळणारच नाही. त्यामुळे वेगाच्या बाबतीत मला फार काळजी घ्यावी लागली. अतिजलद आणि अतिसंथ यातला समतोल साधावा लागला.

तुम्ही संकलन करत असलेल्या मालिकेच्या शूटिंगला जाता का?

मालिकेच्या शूटिंगला क्वचित कधी तरी जाते. संकलन करण्यासाठी शूटिंगला न जाता संकलनाच्या टेबलवरही अनेक गोष्टी बदलतात, शिकता येतात. संकलन करताना स्क्रिप्ट दिली जाते. त्यातील प्रसंगांचा क्रमही दिलेला असतो. ‘ट्वेंटीफोर’चा एपिसोड साधारण ४५ मिनिटांचा बनवायचा असतो. शूटिंगच्या फुटेजनुसार एपिसोड साठाव्या मिनिटाला जात असेल तर त्या वेळी काही प्रसंग काढावे लागतात, काही पुढच्या एपिसोडमध्ये टाकावे लागतात. अशा वेळी पटकथेतील प्रसंगांचा क्रम वर-खाली होतो. तसंच प्रत्येक एपिसोडचा फ्रीज म्हणजे एपिसोड जिथे संपतो तो फ्रीज पॉइंट; तोही महत्त्वाचा असतो. त्यामुळे मिळालेल्या फुटेजमधलं काय वापरता येईल, काय नाही, काय पुढच्या एपिसोडमध्ये जाईल हे सगळं संकलनाच्या टेबलवर बसून करायचं असतं. ‘ट्वेंटीफोर’चंच एक उदाहरण देते. अठराव्या एपिसोडच्या शेवटी शिबानी मलिक मरते. मालिकेच्या पहिल्या एपिसोडपासून एका भागाचं मटेरिअल दुसऱ्यात आणि तिसऱ्याचं दुसऱ्यात असं सतत करावं लागत होतं. त्यामुळे मलिकच्या मृत्यूचा फ्रीज एकोणिसाव्या भागाच्या मधे कुठेतरी येत होता. तेव्हा दिग्दर्शक अभिनयने मला सांगितलं की, ‘मलिकच्या मृत्यूचा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे. तो एपिसोडच्या शेवटीच यायला हवा. तरच प्रेक्षकांवर त्याचा प्रभाव पडेल.’ एकोणिसाव्या एपिसोडमध्ये सुरुवातीच्या १५-२० मिनिटांनंतर येणारा सीन अठराव्या एपिसोडला शेवटी आणायचा म्हणजे दोन्ही एपिसोडमधल्या प्रसंगांचा क्रम खूपच बदलावा लागणार होता. बऱ्याच विचारांती मलिकच्या मृत्यूचा फ्रीज अठराव्या एपिसोडला आणला. म्हणूनच म्हटलं की, संकलन करण्यासाठी शूटिंगच्या ठिकाणी न जाताही संकलनाच्या टेबलावर अनेक गोष्टी समजतात आणि त्यात बदलही करावे लागतात.

एकाच वेळी ट्वेंटीफोर, नांदा सौख्य भरे, तू माझा सांगाती या तिन्ही मालिकांचं संकलन तुम्ही करताय. तिन्हीचे विषय परस्परभिन्न आहेत. यासाठी स्वत:ला स्विच ऑफ, स्विच ऑन करावं लागत असेल.

हो, स्वत:ला स्विच ऑफ, स्विच ऑन करावं लागतं. म्हणजे एका मालिकेचं संकलन झालं की दुसऱ्या मालिकेच्या विषयानुसार संकलनाबाबत विचार करायला सुरुवात होते. ‘नांदा सौख्य भरे’ आणि ‘तू माझा सांगाती’ यांचं संकलन बऱ्याच महिन्यांपासून करत असल्यामुळे त्याचा पॅटर्न आता समजलाय. मालिकेच्या टीमच्या सहकार्यामुळे तिथे वेळेचं गणित जमवता येतं. स्विच ऑफ स्विच ऑन करताना थोडासा त्रास होतो, हे मी मान्य करीन. तिन्ही मालिकांचा वेग त्यांच्या विषयांनुसार वेगवेगळा आहे. संकलन करताना ही बाब लक्षात घ्यावी लागते. त्यामुळे कधी कधी मीच स्वत:ला प्रश्न विचारते की ‘तू माझा..’ वेगाने पुढे जातेय का, किंवा ‘ट्वेंटीफोर’चा वेग मंदावला नाही ना. हा झगडा सतत मनात चालू असतो. मालिकेची टीम या सगळ्यात खूप मदत करते. एखाद्या दिवशी एखाद्या मालिकेच्या एपिसोडचं संकलन करणं शक्य नसेल तर त्यात्या मालिकेची टीम सांभाळून घेते. मी ‘ट्वेंटीफोर’ करत असल्यामुळे मला इतर दोन्ही मालिकांकडून पाठिंबा मिळतो. तसंच कधी कधी ‘त्या भागांचं संकलन करायला तू हवीच आहेस’ असंही हक्काने सांगतात. हे आमच्यातलं गिव्ह अ‍ॅण्ड टेक आहे.

डेडलाइन, क्रिएटिव्हिटी आणि संकलनाचा दर्जा हे सगळं गणित सांभाळत एका एपिसोडच्या संकलनाला साधारण किती वेळ लागतो?

प्रत्येक मालिकेच्या विषयानुसार त्याला लागणारा वेळही बदलत जातो. दैनंदिन मालिका असेल तर मालिकेच्या सुरुवातीच्या भागांसाठी जास्त वेळ दिला तरी चालतो, कारण त्याचं काम थोडं आधी सुरू झालेलं असतं. पण, मालिका सुरू झाली की एका दिवसात एक एपिसोड हे करावंच लागतं. ‘ट्वेंटीफोर’ याला अपवाद आहे. ही मालिका आठवडय़ातून दोन दिवस असते. शिवाय प्रत्येक एपिसोड एक तासाचा असतो. या मालिकेच्या एका एपिसोडला कधी आठ दिवस तर कधी पंधरा दिवसही लागतात. ‘ट्वेंटीफोर’ या मालिकेचं संकलन मी नऊ महिन्यांपासून करतेय. यात एकाच वेळी अनेक ट्रॅक्स आहेत. अ‍ॅक्शन सीक्वेन्स आहेत. अ‍ॅक्शन सीक्वेन्सचं संकलन अ‍ॅक्शन डिरेक्टर बघतो. त्यांनी सुचवलेले बदल करावे लागतात. त्यामुळे ‘ट्वेंटीफोर’च्या संकलनाला लागणारा वेळ निश्चित सांगता येत नाही. मालिकेचा विषय कोणत्या दिशेने जातो, दिग्दर्शक कोण आहे यावरही संकलनाला किती वेळ लागणार आहे हे कळतं.

चॅनलमध्ये व्यावसायिक गणितांना आता महत्त्व दिलं जातं. मालिकांमध्ये काय दाखवायचं, कसं दाखवायचं यात चॅनलचा प्रमुख सहभाग असतो. मालिकेच्या संकलनामध्येही चॅनल तितकंच सहभागी असतं का?

चॅनलचा सहभाग असतो. चॅनलचं ते कामच आहे. मालिकेचा एपिसोड कशा पद्धतीने तयार झालाय हे बघणं म्हणजे त्यांच्या कामाची एक पद्धत आहे. काही दिवसांनी चॅनलशी चांगले संबंध निर्माण झाले की ‘फोनवर बोलून काय बदल करायचे ते ठरवू’ असं चॅनलच सुचवते. अर्थात यासाठी तुमचं काम चोख असायला हवं आणि तुमच्या कामामुळे चॅनलचा तुमच्यावर विश्वास असायला हवा. मालिकेचा प्रत्येक एपिसोड चॅनलकडे जातो. त्यात त्यांना हवे असलेले बदल ते सांगतात. काही गोष्टी सुचवतात. पण ट्वेंटीफोरच्या बाबतीत माझा अनुभव थोडा वेगळा आहे. पहिल्या सीझनला चॅनलची टीम संकलन केलेला एपिसोड बघायला यायची. काही बदल सुचवायची. त्यातल्या शक्य असणाऱ्या गोष्टी आम्ही करायचो. पण आता दुसऱ्या सीझनच्या वेळी मात्र बदल झाला. एपिसोड झाला की वेगवेगळ्या टीम्सना दाखवणं, मग त्यात बदल करणं यात वेळेचं गणित थोडं अवघड होतंय तर यातून आपण काही तरी मार्ग काढू या, असं दिग्दर्शक अभिनयने चॅनलला सुचवलं. चॅनलनेही मालिकेच्या संपूर्ण टीमला याबाबत सहकार्य केलं. संकलन झालेला एपिसोड चॅनल बघणार नाही, असं सांगितलं. अनिल कपूर आणि अभिनय देव करत असलेल्या कामावर विश्वास असल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे संपूर्ण एपिसोडचं संकलन झाल्यावर त्यातल्या इतर बाबींसाठी म्हणजे चॅनलच्या नियमावलीत एपिसोड आहे की नाही हे तपासण्यासाठी चॅनल एपिसोड बघेल, असं सांगितलं. त्याशिवाय चॅनलचा संकलनामध्ये हस्तक्षेप नसतो. चॅनलच्या सहकार्यामुळे झालेला ‘ट्वेंटीफोर’बद्दलचा हा बदल मला स्वागतार्ह वाटतो.

दोन सीन एकमेकांना जोडले जाणं म्हणजे संकलन असा अनेकांचा ढोबळ समज असतो. पण, यात क्रिएटिव्हिटीही असते. संकलकाला ती यात नेमकी कुठे आणि कशी दिसते?

याचं एक ताजं उदाहरण देते. ‘ट्वेंटीफोर’चं. ‘ट्वेंटीफोर’च्या पहिल्या एपिसोडमध्ये खूप सीन्स होते. पहिलाच एपिसोड असल्यामुळे त्यात एकामागे एक घटना घडताना दाखवल्या होत्या. त्यात पात्रांची ओळख करून देणारे प्रसंगही होते. त्या एपिसोडचं संकलन करताना तो ठरवल्यापेक्षा जास्त मिनिटांचा झाल्याचं लक्षात आलं. दिलेल्या फुटेजचं संकलन करून विशिष्ट मिनिटांचा एपिसोड तयार केला जातो. तसा पहिला एपिसोड तयार केला. पण, अपेक्षेपेक्षा थोडा जास्त झाला.  त्यातलं काय काढता येईल हे लगेच डोक्यात आलं. पण, तो पहिला एपिसोड असल्यामुळे त्यात काही महत्त्वाच्या गोष्टीही होत्या. त्या काढून टाकणं किंवा त्या दुसऱ्या एपिसोडमध्ये घेणं शक्य नव्हतं. अशा वेळी काय करायचं हा प्रश्न होता. पण, मला एक कल्पना सुचली. मालिकेचा खलनायक हरुन शेरचंदची एंट्री पहिल्या एपिसोडमध्येच दिसायला हवी हे निश्चित होतं. त्यात एक सीन होता. तो एडिटसुद्धा झाला होता. जयसिंग राठोड जेलमध्ये जातो. त्या वेळी एक इन्स्पेक्टर जयला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज दाखवून रोशनने आदल्या दिवशी जेलमध्ये केलेल्या कृत्याबद्दल सांगतो. रोशनचा माफीनामा नाकारल्यामुळे तत्संबंधीच्या कागदावर त्याची सही घेण्यासाठी त्याचा वकील जेलमध्ये आलेला असतो. सही करण्यासाठी रोशनचे हात मोकळे केले जातात. त्या संधीचा फायदा घेत रोशन वकिलाच्या मानेत पेन घुसवून त्याला मारतो. एपिसोडमध्ये हा प्रसंग दाखवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज म्हणून दाखवलं जाणार होतं. सीसीटीव्हीवर असल्यामुळे रोशनच्या या कृत्याचा क्लोज अप घेता येत नव्हता आणि त्यामुळे त्या प्रसंगाचा प्रभाव फारसा पडत नव्हता. या प्रसंगाला जोडून पुन्हा जय आणि इन्स्पेक्टरचा प्रसंग होता. इन्स्पेक्टर जयला विचारतो, ‘ऐसा हेवान तुमने देखा है कहीं?’ जय त्याला उत्तर देतो, ‘हा मैंने देखा है क इससेभी बत्तर इसका भाई हरुन शेरचंद क’ आणि हरुनच्या एंट्रीचा सीन सुरू होतो. सीसीटीव्हीचा सीन काढला तर त्याला जोडून असणारा जय आणि इन्स्पेक्टरचा सीन काढावा लागेल आणि तो काढला तर हरुनच्या एंट्रीसाठी हवी असलेली सुरुवात दिसणार नाही. आता काय करायचं असा पेच होता. पण पुढे एटीयूमध्ये शिबानी मलिक तिच्या सहकाऱ्यांशी बोलत असते. तेव्हा ती रोशनच्या फाशीसंदर्भात बोलते. जीवघेणा व्हायरस पसरवण्याची धमकी दिली गेली आहे, ते काम हरुन शेरचंदचं असल्याची शंका आहे, असं सगळं ती बोलत असते. हरुन रोशनचा धाकटा भाऊ आहे. त्याचं ड्रग्जचं नेटवर्क आहे, हेही ती सांगते. इथे मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी मालिकेच्या टीमला एक पर्याय सुचवला. एटीयूमध्ये शिबानी सहकाऱ्यांशी व्हायरसबद्दल बोलण्याचा प्रसंग, जयला समजलेला जेलमधला रोशन आणि वकिलाचा प्रसंग आणि हरुनच्या एंट्रीचा प्रसंग यापैकी रोशन-वकिलाचा सीन काढला तरी एटीयूच्या सीनमध्ये शिबानी हरुनबद्दल बोलताना दिसत आहे. त्यामुळे जेलमधला सीन काढून टाकून शिबानीचा सीन आणि कट टू हरुनची एंट्री असं संकलन करू या, हे मी टीमला सुचवलं. त्यांना ते पटलं, आवडलं. हे काहीच स्क्रिप्टमध्ये नव्हतं. ते सगळं संकलनाच्या टेबलावर ठरलं. ही ती क्रिएटिव्हिटी! प्रसंग केवळ एकमेकांना न जोडता त्यात काही नावीन्यपूर्ण करता येईल, त्यामध्ये कनेक्टिव्हिटी कशी राहील याचा विचार होणं गरजेचं आहे. संकलन करताना कधी कधी एक वेगळी पटकथाच लिहिली जाते.

कोणत्याही कलाकृतीत संकलनाची भूमिका किती महत्त्वाची असते?

मालिका, सिनेमांमध्ये संकलन अत्यंत महत्त्वाचं आहे. खरंतर फिल्ममेकिंगमधला प्रत्येक भाग खूप महत्त्वाचा असतो. त्यातल्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. संकलनामुळे सिनेमाचा दर्जा ३० ते ४० टक्के उंचावतो, हे मात्र सांगेन. पण, त्यासाठी सिनेमाची संहिता, सादरीकरण, कलाकारांचं काम हेही चांगलं होणं गरजेचं असतं. सिनेमाचा पाया असणाऱ्या घटकांचीच बांधणी योग्य नसेल तर संकलन कितीही उत्तम केलं तरी सिनेमाच्या दर्जावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे सिनेमाचा पाया भक्कम हवा. संकलनामुळे काही टक्क्यांनी सिनेमा वरचढ होतो.

अशी कोणती कलाकृती आहे ज्याचं संकलन करायला तुम्हाला आवडलं असतं?

हिंदी सिनेमे बघताना मला असं खूपदा वाटतं की मी अमुक गोष्टी सिनेमातून काढल्या असत्या, वेगाने पुढे नेल्या असत्या. पण विशिष्ट अशी एक कलाकृती सांगता येणार नाही. आयुष्यात भूतकाळात माणसाला जे मिळालेलं नसतं ते त्याला हवं असतं. ही माणसाची प्रवृत्ती आहे. तसंच माझं आहे. मी फारसे सिनेमे, जाहिराती यांचं संकलन केलेलं नाही. त्यामुळे अर्थातच मला ते काम करायला आवडेल. हिंदी, इंग्लिश सिनेमे करण्याची इच्छा आहे.

संकलन क्षेत्रातातील आर्थिक सुरक्षिततेबद्दल काय सांगाल?

मनोरंजन विश्वातील प्रत्येक क्षेत्रातच काम असलं की पैसा आहे, अशी गत आहे. संकलन क्षेत्राचंही तसंच आहे. काम मिळणं, मिळवणं आणि टिकवून ठेवणं या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. कधी एकाच वेळी दोन-तीन कामं तर कधी एकही काम नाही असंही होत असतं. म्हणूनच जेव्हा काम मिळतं तेव्हा ते व्यवस्थित करणं, पैसे कमवणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. तसंच एक काम संपलं की न थांबता दुसरं शोधण्याच्या, मिळवण्याच्या मागे लागायला हवं.

सुरुवातीला दिग्दर्शन करायचं डोक्यात असताना वडिलांच्या मार्गदर्शनामुळे संकलनाकडे वळलात. ‘दिग्दर्शक होण्यासाठी आधी संकलनाचा अनुभव घे’ असा तुमच्या वडिलांचा सल्ला तुम्ही त्या वेळी ऐकलात. संकलनाचा इतक्या वर्षांचा अनुभव गाठीशी असताना आता दिग्दर्शन करावंसं वाटत नाही का?

खरं सांगायचं तर मी आता माझ्या कम्फर्ट झोनमध्ये आले आहे. माझा सिनेमाचा अनुभव कमी आहे. तो अनुभव घेताना अनेक गोष्टी समजतात. अर्थात संकलनाच्या टेबलवरही अनेक गोष्टी समजतात. तिथलं शिक्षण मोठं आणि महत्त्वाचं आहे. पण, प्रत्यक्ष अनुभव माझा कमी असल्यामुळे माझ्या मनात आता थोडी भीती आहे. शिवाय संकलनाची कामं आता इतकी असतात की दिग्दर्शनाकडे वळायचं ठरवलं तर संकलनाचं काम थोडं थांबवावं लागेल. दिग्दर्शन करायचंय असा विचार करून मी या क्षेत्रात आले होते त्यामुळे ते एखादं काम तरी मी करावं, असं कधी तरी वाटतं. पण, आताच्या कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ते सहज शक्य होत नाही. त्यामुळे सध्या तरी दिग्दर्शनाबाबत काही ठरवलं नाही.

भविष्यात कधी दिग्दर्शन केलं तर जाहिरात, सिनेमा, मालिका, शॉर्टफिल्म, डॉक्युमेंटरी यापैकी कशाला अधिक पसंती द्याल?

तर मी सिनेमा करीन. पण, सिनेमा या क्षेत्रात काम करताना तुमचा फील्डवरचा अनुभव असणं गरजेचं आहे. सिनेमा करताना तुम्हाला दहा गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. हा सगळा अनुभव सिनेमासाठी तुम्ही प्रत्यक्ष काम केल्यावरच मिळतो. तो माझ्याकडे नाहीये. तसंच मी फार लोकांमध्ये रमणारी व्यक्ती नाही. संकलन क्षेत्रात मी खूप कम्फर्टेबल असते. तिथे एकटं बसून शांतपणे काम करणं मला आवडतं. खूप लोकांमध्ये जाणं, वावरणं हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे दिग्दर्शन करायला आवडेल पण सध्याच्या अनेक कामांमुळे ते कितपत जमेल माहीत नाही.

तुम्हाला लेखनाचीही आवड आहे.

हो, हे खरंय. कॉलेजमध्ये असताना मी कविता करायचे. संकलनाचं काम सुरू झाल्यावर कविता वगैरे सगळं बाजूलाच राहीलंय. मध्यंतरी असाच कधी तरी मोकळा वेळ मिळाला होता. त्या दरम्यान एक कविता लिहिली होती. त्याचं रूपांतर झी मराठीच्या ‘आभास हा’ या मालिकेच्या शीर्षकगीतात झालं. मला आताही लिहायला खूप आवडेल. पण, सध्या पुरेसा वेळ मिळत नाही. मला स्क्रिप्ट लिहिण्याची जास्त आवड आहे. या माझ्या आवडीचा संकलन करताना मला खूप फायदा होतो. मालिकेच्या टीमला मी अनेकदा काही सल्ले देते. इतक्या वर्षांच्या माझ्या संकलनाच्या अनुभवानंतर मालिकेची टीमहीआता स्क्रिप्टच्या बाबतीत माझं मत विचारात घेते. पूर्वी असं नव्हतं. दिलेल्या फुटेजमध्येच सगळं संकलन करावं लागायचं. आता मला एखादी गोष्ट एखाद्या सीनमध्ये हवी असेल तर तसे मालिकेच्या शूटमध्येही बदल केले जातात. मला नवनवीन काही तरी सुचणं हे माझ्या लेखनाच्या आवडीमुळेच शक्य होतं.

कामाच्या व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ मिळाला तर काय करता?

ल्ल कामातून थोडा मोकळा वेळ मिळाला तर इंग्लिश सिनेमे बघते. बऱ्याचदा हिंदी-मराठी सिनेमे बघायचे राहून जातात. ते बघण्यासाठी मला मिळालेला मोकळा वेळ मी सत्कारणी लावते. फारसा रिकामा वेळ मिळत नसल्यामुळे माझ्या सुरू असलेल्या कामातच मी विविध गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते. वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम करत संकलनाविषयीचा माझा अभ्यास होत असतो. मी संकलनाचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. मी काम करत गेले. वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेले. मी माझ्या वडिलांना गुरू म्हणेन. त्यांच्याकडूनच बरंच काही शिकले.

तुमच्या कामाने म्हणजे संकलन क्षेत्राने तुम्हाला काय शिकवलं?

संयमी राहायला शिकवलं. संकलनाचं काम शांतपणे एका खोलीत बसून तासन्तास सुरू असतं. बराच वेळ एकाच ठिकाणी बसून काम संपवण्याचा संयम या क्षेत्राने दिला. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी या क्षेत्रात काम करत असल्यामुळे शिकतेय. काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे शिकतेय. मला नेहमी असं वाटतं की जर आपल्याला कळलं की कोणती गोष्ट किती घ्यायची आणि कुठे थांबवायची तर आपल्या बऱ्याचशा अडचणी, समस्या कमी होतील. हेच मी संकलनाच्या कामात करते. कुठला सीन घ्यायचा, कुठला काढून टाकायचा, कुठला कापायचा हे मी ठरवते आणि त्यातून एक चांगली कलाकृती निर्माण होते. ‘ट्वेंटीफोर’मध्ये प्रत्येक सीन दोन कॅमेऱ्याने शूट होतात. सगळ्या सीनचे दोन-दोन फुटेज येतात. त्यातून मला ठरवायचं असतं की एका कॅमेऱ्याचं फुटेज कधी, किती वापरायचंय आणि दुसऱ्या कॅमेऱ्याचं कधी. यातंच कुठलं काढायचं आणि घ्यायचं हेही मी ठरवते. हे सगळं म्हणजे संकलन. हे मला आयुष्यातही उपयोगी पडतं. मला कोणाकडून काय घ्यायचंय, किती घ्यायचंय, थांबायचंय हे त्यातूनच शिकतेय. ही संपूर्ण शिकवण मी आत्मसात केली असं मी म्हणणार नाही. शिक्षणाची ही मोठी प्रक्रिया आहे. त्यातून मी प्रत्येक वेळी जात असते.

‘ट्वेंटीफोर’च्या दुसऱ्या सीझनच्या सुरुवातीला पहिल्या सीझनचा रिकॅप देण्यासाठी एक व्हॉइस ओव्हर होता. या व्हॉइस ओव्हरसाठी अनिल कपूर यांनी नाना पाटेकर यांना बोलावलं होतं. नाना आणि माझ्या बाबांची आधीपासूनची ओळख. त्यामुळे ते मलाही ओळखतात. मला बघून ते म्हणाले की, ‘तू इथे काय करतेस?’ मी म्हटलं, ‘मी ‘ट्वेंटीफोर’च एडिटिंग करते’. एवढं बोलून मी माझं काम करायला लागले. माझ्या कानावर आलं; अनिल कपूर यांनी नाना पाटेकर यांना सांगितलं की, ‘भक्ती ‘ट्वेंटीफोर’चा बॅकबोन आहे.’ अशी मोठी व्यक्ती आपल्याबद्दल बोलल्याचं ऐकून बरं वाटतं.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com