News Flash

सुट्टी विशेषांक : भास्करच्या सुट्टीच्या डायरीमधून…

परीक्षा झाली. खूप झोपायचं होतं. झोपच आली नाही. संत्याकडं गेलो. मन्यापण आलेला. टाइमपास केला.

सकाळी आईनं लेक्चर न देता मॅगी खाऊ दिली. मूड मस्त झाला एकदम.

सोनाली नवांगुळ – response.lokprabha@expressindia.com
१५ एप्रिल २०१८
परीक्षा झाली. खूप झोपायचं होतं. झोपच आली नाही. संत्याकडं गेलो. मन्यापण आलेला. टाइमपास केला. अ‍ॅव्हेंजर्सवर चर्चा केली. पद्माराजे गार्डनजवळचा वडापाव हाणला. फार सुट्टंसुटं वाटत होतं. शाळा चालू असताना वडापाव खातो तेव्हा इकडंतिकडं बघत बघत. (म्हणजे ओळखीचे कुणी नाहीयेत ना? शिक्षक कुणी बघतायत का? जिभेला वडापावची भूक लागलेली असताना नि खिशात जास्त पसे नसताना कुणी यायला नको इत्यादी!) तसं म्हणालो मित्रांना तर म्हणाले, ‘‘लच पुस्तकी बोलतोस भावा. सुट्टी पडली हे खपंना काय तुला?’’ मी म्हणालो की माझ्या मनात असेच विचार येतात तर काय करू? पूर्वी इतकंही बोलायचो नाही आता वाटतं, बोलून टाकावं. ऐकणारे काय रिअ‍ॅक्ट करतील ते करतील पण मी हवं ते हवं तितकं बोलणारच.

बाबांनी आज रद्दी काढली. म्हणाले, उद्या ‘चेतना’मध्ये जायचंय ती द्यायला. ‘चेतना’ म्हणजे मतिमंद मुलांची शाळा. तिकडं कशाला रद्दी? दरवेळी रद्दीचे पसे बाबा मला नि वसुला देतात. ते आम्ही दिवाळीच्या किल्ल्यासाठी साठवतो. या वेळी तर चार महिन्यांची साठलेली रद्दी द्यायची होती. ठीकाय. तसं तर तसं.

१६ एप्रिल २०१८

सकाळी आईनं लेक्चर न देता मॅगी खाऊ दिली. मूड मस्त झाला एकदम. मग आम्ही गेलो ‘चेतना’मध्ये. बाबा बहुतेक आधी कधीतरी गेले होते, कारण त्यांना बरंच काय काय माहिती होतं. आम्ही मे एण्डला ज्या नव्या घरात शिफ्ट करणारे तिथल्या सुनीताकाकू त्या शाळेत होत्या. त्यांनी मला आणि बाबांना शाळा दाखवली. मला शाळेची रचना खूप आवडली. आत गेल्या गेल्या मोकळी जागा, मग या वर्गातून त्या वर्गात जाताना मध्येच पुन्हा मोकळी जागा आणि तिथं वडाचं झाड, पार असलेलं. आणि कुठंही मजला चढायची भानगड नाही. सगळी इमारत पसरलेली. फारच भारी वाटत होतं. तिथं मतिमंद मुलांकडून काय काय बनवून घेतात! क्लेपासून वगरे बनवतातच वस्तूबिस्तू पण सुतारकाम, फाइल्स बनवणं, ग्रीटिंग आणि कागदाचा लगदा करून त्याचे गणपती किंवा असंच काय काय साच्यातून बनवणं. म्हणजे रद्दी या कारणासाठी लागणार होती त्यांना.

यंटरयेश्टिंग!!

सुनीताकाकूंनी विचारलं, सुट्टीत काय करणारे मी म्हणून. बाबा म्हणाले,  या असल्या उन्हातून मदानं वगरे गाजवू नका म्हटलंय म्हणून घरी थांबतील. पण वाचतात बऱ्यापकी. तर अतिरेक करत दिवसभर इतकं वाचत बसायचं की आजूबाजूला कुणी आहे हे कळतही नाही साहेबांना. बोललेच तर त्यांचा सेन्स ऑफ ह्य़ूमर कळतो, पण बोलतातच कमी आमचे साहेब! – बाबांना गडबड होती म्हणून शाळा बघून लगेच बाहेर पडणार होतो. तर काकू म्हणाल्या, त्याला आवडणार असेल तर शाळेत पाठवता का महिन्याभरासाठी? शिक्षकांची काही कामं असतात अजून महिनाभर, त्यात मदत करेल. आमच्या मुलांना आता सुट्टी लागणार. तोपर्यंत येईल, इथलं वातावरण बघेल. बाबांनी माझ्याकडं बघितलं. मी मानेनं हो म्हणालो. उद्यापासून ये म्हणाल्या काकू.

१७ एप्रिल

आज सकाळी लवकर आवरलं आणि पोचलो ‘चेतना’मध्ये. आठ वाजायच्या आत मी तिथं होतो. काकू अजून पोचायच्या होत्या म्हणून झाडाच्या पाराजवळ बसून आजूबाजूला बघत राहिलो. पक्ष्यांचे आवाज कितीतरी जाणवत होते. उन्हाळा असून शाळेची बाग कायच्या काय हिरवी दिसत होती. आणि कंपाऊंडवरचा गुलमोहर आणि बहावा चित्रातल्यासारखेच दिसत होते. झुळुकेबरोबर कसलातरी फ्रेश वास येत होता. इतक्यात कुणाचा तरी आवाज आला. ‘धद्दा धद्दा..’ कुणीतरी हाक मारत होतं. मला की आणि कुणाला? वळून बघितलं तर पेरूच्या झाडामागून ती हाक मारत होती. काय बरं तिचं नाव? ती माझ्या मित्राची बहीण. मी तिला खूपदा बघितलंय. कारण आमच्याच पलीकडच्या बििल्डगमध्ये ती राहते. ती तशी फार बाहेर दिसत नाही. तिचं नाव तर कधीच सांगितलं नाही मित्रानं. मी तिच्याकडून बघून हसलो नि हात हलवला. तिनंही गडबड करत हात हलवला नि पळून गेली आत. आतल्या इतक्या खोल्यांपकी कुठं गेली असेल कुणास ठाऊक. पण मला आणखी फ्रेश वाटलं. असं वाटलं की मागं तिला जेव्हा जेव्हा बघितलं तेव्हा मला तिच्याबद्दल काहीतरी विचारायचं होतं.

ती थोडी वेगळी होती. तिला गडबड असायची सगळ्याची. ती खरंतर माझ्यापेक्षा बरीच मोठी वाटत होती, पण तरी ती एखाद्या लहान मुलासारखी होती. आम्ही रोज बघायचो तिला. शाळेची रिक्षा न्यायला आलेली दिसायचीच समोर. असं वाटायचं की काहीतरी निमित्त काढून मित्राच्या घरी जावं नि तिला बघावं. पण मुद्दाम कसं जाणार? एकदा त्यानं त्याच्या वाढदिवसाला बोलावलेलं तेव्हा गेलो होतो पाचसात जण. त्याच्या आईनं मस्त बटाटेवडे केले होते. मित्र म्हणाला म्हणून त्याच्या आईनं हिरवी मिर्चीपण तळली नि त्याचा ठसका देणारा वास पसरला. आम्ही शिंकलो, खोकलो. इतक्यात त्याची ती बहीण आतल्या खोलीत खोकायला लागली. आई गर्क होती कामात म्हणून तिनं मित्राला हाक मारली आणि म्हटलं, बघ जा रे तिला. पाणी दे. तो लाजल्यासारखा झाला होता. कारण बाकीचे मित्र काहीतरी सिक्रेट ओपन झाल्यासारखं त्याच्याकडं टक लावून बघत होते. तो आतल्या खोलीत गेला आणि बहुतेक पाणी देत होता. तितक्यात ती जोरानं बाहेर आली होती. येऊन हॉलमध्ये बसली जमिनीवर फतकल मारून. ती छान दिसत होती. म्हणजे मोठी पण लहान बाळासारखी साधी. ती चिडली होती आतल्या खोलीत ठेवल्यामुळं. तिला टीव्ही बघायचा होता. ती बाहेर आल्यावर सगळे थिजल्यासारखे उठून उभे राहिलेले. एकटक बघायला लागले तिच्याकडे. नुसतं बघत नव्हे काहीतरी विचित्र बघत राहिले. एकदोन जण तर हसणं रोखत होते हेही दिसत होतं. मित्र एकदम गळपटला. मग चिडला तिच्यावर. तिला जोर लावून उठवत त्यानं आत नेलं. त्याची आईही मदतीला आली. त्यांनी तिला कोल्डिड्रक देतो असं सांगून आत नेऊन बसवलं. बाहेरून कडीपण घातली. कारण नंतर ती दार बडवत होती. मित्र बाहेर आला तेव्हा ऑकवर्ड झालेला होता. मला कळलं की त्याचा इंटरेस्ट संपलाय. त्याच्याशी बोलावं वाटत असूनसुद्धा मी त्याला म्हणालो, की अरे यार, बाबांनी एक काम सांगितलेलं विसरलो. जाऊन पटकन करतो. आणि बाकीच्या मित्रांनासुद्धा उठवलं. चला रे मदतीला म्हणून. ते मुर्खासारखं कसली मदत वगरे विचारत होते, मी आवाज वाढवत म्हणालो, काय अर्ज देवून मदत घ्यायची काय?

त्या दिवशी मला सारखं मित्राची बहीण, मित्र, आई आठवत होते. खूप विचारायचं होतं ते तसंच दाबून ठेवलेलं. मित्राला आवडत नाही हा विषय हे न बोलताच कळतं. आज त्याची ती बहीण दिसली नि मला तिनं ओळखलं. मी मनातल्या मनात नि नंतर जोराने स्वतलाच ‘धद्दा धद्दा’ अशी हाक मारली. तितक्यात सुनीता काकू आल्याच. आत जाऊन पुन्हा एकदा नीट शाळा बघितली. काम काही फार केलं नाही. काम द्या म्हटल्यावर सुनीताकाकू म्हणाल्या, बघणं हेसुद्धा कामंच आहे.

२० एप्रिल २०१८

दोन दिवस काय काय मनात येत होतं! ते सगळं नीट लिहिता येईल असं वाटत नव्हतं. लिहावंही वाटत नव्हतं. आता छान वाटतंय. मी या दिवसांत फाइल युनिटमध्ये मदत केली. सुतारकाम शिकवणाऱ्या सरांना काही मापाचे तुकडे मशीनवर कापून दिले. त्याचं चिमणीचं घरटं बनणारे. असलं मशीनबिशीन वापरायचं म्हणजे खायचं काम नाही. नीट बघावं लागतं. माप जराही चुकून चालत नाही. नाही तर काम बेढब होतं म्हणाले सर. सर म्हणाले, चुकलेलं दुरुस्त करण्यात चौपट वेळ जातो, त्यापेक्षा वेळ नीट देऊन नेमकंच काम करायचं भास्करराव! ते गमतीत भास्करराव म्हणतात. तिथले आणि एक सर तर मला बखलेबुवा म्हणूनच हाक मारतात. खूप जण मला असं म्हणतात त्यामुळं आश्चर्य काही वाटलं नाही. बाबा म्हणतात नेहमी, भास्करबुवा बखले हाक मारून घ्यायची तर गायकी जाऊ दे, काही तरी गुण येऊ देत त्यांचे. मी म्हणतो, पेशन्स, पेशन्स. तर हे नेहमीचं.

कागदाचा लगदा आज नीट मळून मुलांच्या मदतीनं शिवाजीच्या, सरस्वतीच्या, गणपतीच्या साच्यात घातला. ही मुलं मतिमंद आहेत, पण सांगेल तसं करत होती. कुणीकुणी जास्त स्लो तर कुणीकुणी अतीच फास्ट होतं. काही मुलं तर फारच प्रेमळ वागायची. जाताना हात धरून मिठी मारायची. आधी मला कसं तरी वाटायचं अंगाला हात लावून घेणं, शिवाय ती मुलं बरीच मोठी होती. म्हणजे माझा एखादा नोकरी करणारा दादा मोठा असेल तितकी. मिशी असणारी. माझी तर अजून लव पण नाही दिसत. (सातवीतल्या पोरांना मिशा येऊ शकतात हे मला माहिती आहे.) पण मला नंतर कळलं की त्यांना माझ्याबद्दल काही तरी वाटतंय ते सांगतायत असं करून. पण मग मी मिठी मारली तर अभय मागं सरकला. अभयला सलमान आवडतो. तो त्याच्यासारखंच ब्रेसलेट हातात घालतो नि तसाच चालत येतो आडदांडासारखा. मी म्हटलं, सलमान लाजला! तर त्यानं माझ्याकडं खूपखूप हसून बघितलं आणि म्हणाला, सलमान लाजत नसतोय. त्यानं लगेच मला मिठी मारली. माझ्या मदतीच्या कामात फार मुली नव्हत्या. ज्या होत्या त्यात ती ‘धद्दा’ नव्हती.

२४ एप्रिल २०१८

आता मी बऱ्यापकी कामात मदत करायला शिकलोय. परवा रविवारी असंच वाचत बसलेलो तर मन्या आला नि म्हणाला, शिटीला जखमा होतील लेका एका जागी बसून. ऊठ, खेळायला बाहेर चल. मी तंद्रीत होतो त्यामुळं उत्तर दिलं नाही. तर म्हणाला, लेका, मतिमंदाच्या शाळंत जाऊन तू बी मतिमन झालायस. ते मागच्या बेंचवर बसत नाही का आपल्या वर्गात, ते सुकडं, ते बी याकटक बघत बसतं नि पेपरात भोपळा घेतं. ते बी मतिमनंच हय तुझ्यागत.

मला एकदम चिडायलाच झालं. मी म्हणालो, मन्या तोंड दिलंय म्हणून वाट्टेल ते बोलू नकोस. मतिमंद माणसं मुद्दाम तसं वागत नाहीत. त्यांचा तो खराखुरा प्रॉब्लेम आहे. उलट किती तरी वेळा तुझ्यापेक्षाही शहाणं वागतात ती मुलं. त्यांच्यापकी अनेकांना कळतं बरंच. तू पाहिजे तर प्रशांतला नि मला मठ्ठ म्हण, पण मतिमंद नको. किंवा तू चल त्या शाळेत माझ्याबरोबर. मतिमंद अशी हाक तू शिवी दिल्यासारखी मारतोस ते पहिलं बंद कर नायतर फार वाईटए बघ मी! मन्या हादरलाच. मी अशी तंबीची भाषा देऊ शकतो हे त्याला नवीनच होतं. खरंतर मलाही नवीनंच वाटत होतं. मी या शाळेतल्या मतिमंद मुलांच्या बाजूचा असल्यासारखा मन्याशी भांडलो. खरं तर त्यांच्याबद्दल कुणीही चुकीचं काही बोललं तर मी त्यांच्याशीही आता वाद घालू शकतो.

२७ एप्रिल

आज ‘चेतना’त गेलो तेव्हा फक्त दूध प्यालेलो होतो. रात्री ‘हात ना पसरू कधी’ नावाचं पुस्तक वाचत बसलेलो तर झोपेपर्यंत साडेतीन वाजले. उठायला उशीर झाला. डेंजर होतं त्या पुस्तकातलं सगळं. झोपेतही तोच विचार करत होतो. अमेरिकेतला हेन्री व्हिस्कार्डी नावाचा माणूस. गुडघ्याखाली पाय नसणारा. तो म्हणत होता की अपंगत्व दिसतंय, पण त्यातल्या क्षमता जास्त दिसताहेत. तो म्हणत होता की डोनेशन नका देऊ फक्त ओपन मार्केटमध्ये सगळ्यांबरोबर स्पध्रेत उतरण्याचा चान्स द्या. सगळं कळत नव्हतं, पण इतकं कळत होतं की हा माणूस विमानात बसला तेव्हा कृत्रिम पाय काढून ठेवताना लाजला नाही. लोक बावचळून बघायला लागले तर दचकला नाही. निवांत प्रवास केला त्यानं. पार आडवी झोपून असलेली अपंग माणसंही त्याच्या कारखान्यात कामाला होती. सगळ्यांचे आळस कसे पिळून काढायचे ते त्याला माहिती होतं.

हे असलं वाचताना झोप कशाला लागेल? मी तर जागाच झालो नि म्हटलं की आपल्याला बरंच काम करायला पाहिजे. वेळ नुस्ता घालवून उपयोगाचं नाही. मी असं म्हटलं तरी टिकत नाही. पण ‘चेतना’त जायला लागल्यापासून मला माझ्यात फरक दिसतोय. मला मतिमंद मुलांच्यातलेही फरक कळायला लागलेत. सगळ्यांना कळतं ते वेगळं असतं. राग येण्याचा गोष्टी वेगळ्या असतात. स्टॅमिनाही वेगळा असतो. लघवीला जाताना पँटचा हूक किंवा सलवारची नाडी कशी सोडायची हेसुद्धा शिकवायला लागतं. (ज्यांना ते जमू शकत नाही ते कंपलसरी इलॅस्टिकची पँट किंवा सलवार वापरतात.) वयानं मोठे दिसले तरी त्यांची बुद्धी कमीजास्त वाढलेली असते. पण तसं तर मग मतिमंद नसणाऱ्यांचंसुद्धा असतंच की! मग मतिमंद माणसांना घरची लोकं का लाजतात? ढ मुलांना पण मान मिळतो पण यांना नाही. तरी यांना एखादं काम शिकवलं की खूप कळतं हे मी बघतोय. त्यांचे शिक्षक किंवा आईबाबा हेन्री व्हिस्कार्डीसारखे मिळाले तर भारीच होतं. त्यांच्याकडून कसं काम काढायचं ते कळतं त्यांना. पण काही जण लाजतात किंवा भितात माझ्या मित्रासारखे. आणि मी? मला तर बोलताच आलं नाही मित्राशी. खरं तर मला आता वाटतंय, की त्याच्याशी बोलायला पाहिजे. आमची रिअ‍ॅक्शन काय असेल याचा विचार करून तो बहिणीला दडवत असेल का? तिचं नाव काय हे मला अजून माहिती नाही.

नुसतं दूध प्याल्यामुळं भूक लागली तर सुनीताकाकूंनी मुलांसाठी केलेला नाश्ता खायला चल म्हणून बोलावलं. कांदेपोहे होते. मला ते मुळीच आवडत नाहीत. पण सगळी मुलंमुली खात होती, त्यांच्या पंक्तीत चांगलं वाटेल म्हणून बसलो नि दोन डिश पोहे हाणले. खूपच टेस्टी होते. आता मला पोहे आवडायला लागणार आहेत.

रवींद्र देसाईंनी अनुवाद केलेलं हे पुस्तक मी या वेळी खूप जणांना देणारे. इंग्लिश पुस्तकाचं नाव आहे ‘गिव्ह अस द टूल्स’. ते मूळ आणून मी पुन्हा वाचणारे.

यंटरयेश्टिंग!!

१० मे २०१८

डायरी लिहायला वेळ मिळेना, पण तरी काय अडलं नाही. मी आता वाटतं ते बऱ्यापकी बोलतो. पूर्वीसारखं पूर्ण गप्प राहत नाही. एक तारखेनंतर ‘चेतना’मध्ये मुलं येणं बंद झालं. तरी मी जात होतो, मदत करायला. कामात गढल्यामुळं मुलांची आठवण कमी यायची, पण जरा पाय मोकळे केल्यावर अभयची मिठी नि सलमानची तो मारत असलेली स्टाइल आठवायची. सुयशनं त्याच्या रुमालानं तो पुसतो तशी माझी लाळ (न आलेली) पुसली होती हे आठवायचं. पंगत आठवायची आणि ‘धद्दा’ सुद्धा.

मी १५ मे रोजी गावाला जाणार आहे तेव्हा मी आता शाळा सुरू झाली की अधूनमधून येत राहीन, असं सगळ्यांना सांगितलं आहे. ‘चेतना’तले रिक्षामामाही माझे आता मित्र झालेत. ते आणि शिक्षक या सगळ्या मुलांवर इतकं प्रेम करतात की मुलांना सुट्टीला जायचंच नसतं. ज्यांना मोबाइलवर बोलता येतं ती मुलं सारखं या सगळ्यांना फोन करतात नि भेटायला येऊ का विचारतात, असं मला सगळ्यांनी सांगितलं.

यंटरयेश्टिंग!!

१४ मे २०१८

आज शाळेत न जाता माझ्या मित्राकडं गेलो. ‘हात ना पसरू कधी’ हे पुस्तकही त्याला गिफ्ट दिलं. तो मी अचानक आल्याचं बघून खूश झाला, पण त्याच्या आईनं चहा दिल्यावर ‘धद्दा’ बाहेर आली. तो दचकला आणि ताडकन उठला. तिला आत घेऊन जायला बहुतेक. ती माझ्याकडं बघून हसली नि म्हणाली, ‘धद्दा.. धद्दा.. क्हधी आला?’ तिनं असं म्हटल्यावर मी एकदम खूशच झालो नि म्हणालो, ‘आत्ताच आलो. पण तू मला तुझं नाव नाही सांगितलंस. तुझं नाव काय?’ तर तिच्या दादाच्या हातातलं पुस्तक घेत म्हणाली, ‘हे मला आणलं?’ – मी होय म्हणालो आणि पुन्हा नाव विचारलं. तर म्हणाली, ‘म्हाजं पूर्ण नाव आधिती श्रीधर खुंडलकर. र्हाणार शिव्हाजी फेट, खोल्हापूर.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 1:07 am

Web Title: bhaskar holiday diary
Next Stories
1 सुट्टी विशेषांक : किन्शू आणि शुंकी
2 सुट्टी विशेषांक : उलटा विचार
3 सुट्टी विशेषांक : लाकूडतोड्या आणि वनदेवता
Just Now!
X