रचनावादी शिक्षणपद्धतीमुळे सध्या प्राथमिक शिक्षणाचा ढाचाच बदलून गेला आहे. त्याचं दृश्य रूप दिसतं ते काही जिल्हा परिषद शाळांमधून. या शाळांनी अक्षरश: कात टाकली आहे आणि एक प्रकारे नवनिर्माणच सुरू केलं आहे.

शिक्षणाच्या चौकटीत या ना त्या कारणाने बसू न शकणाऱ्या मुलांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण घेऊन जाणारे, रूढ शिक्षणाला पर्याय शोधणारे वेगवेगळे प्रयत्न कसे केले जात आहेत, ते मागच्या आठवडय़ातील ‘बिनभिंतींच्या शाळांच्या प्रयोगशाळे’त पाहिलं. हे वेगळे प्रयत्न महत्त्वाचे आहेत यात शंकाच नाहीत. पण त्याबरोबरच महत्त्वाचं असतं ते रूढ शिक्षणव्यवस्थेचा आधार घेऊन स्वत:चा विकास घडवू पाहणाऱ्या मुलांचा विचार होणं. समाजात मोठय़ा संख्येने अशीही मुलं आहेत जी महागडय़ा शाळांमध्ये जाऊ  शकत नाहीत. तथाकथित दर्जेदार शिक्षण घेऊ  शकत नाहीत. तथाकथित चौकटीच्या दृष्टीने ती सामान्य असतात. ती सरकारी शाळांमधून शिकत असतात. आपल्याकडे अगदी गाव पातळीपर्यंत इंग्रजी माध्यमाचं लोण पोहोचलं असलं तरी जिल्हा परिषदांच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्याही कमी नाही. या समूह म्हणून मोठय़ा असणाऱ्या मुलांचा विचार आपली शिक्षणव्यवस्था नेमका कसा करते आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रक्रियेत या मुलांच्या वाटय़ाला नेमकं काय येतं आहे, हे शोधताना समोर येणारं चित्र सकारात्मक आहे.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
ILO report
विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

जिल्हा परिषदांच्या शाळा टाकाऊ  असंच चित्र रंगवलं गेलं असलं तरी आज या शाळांमधून खूप काही घडतं आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांमधली पटसंख्या कमी होत गेली. त्यावर काय उपाय करता येईल या शोधातून वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या गेल्या. इतर ठिकाणी चाललेल्या प्रयोगांचा, प्रयत्नांचा अभ्यास करून ते राबवले गेले. दुसरीकडे तंत्रज्ञानामुळे बदलणाऱ्या जगाच्या धडका या शाळांच्या दारावर पडत आहेत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रेटय़ामुळे या शाळांमधून शिकवणाऱ्या शिक्षकांना, मुलांना आणि पर्यायाने शाळांनाही बदलायला लावलं आहे, असं चित्र आज दिसतं आहे.

हे सगळं सरसकट सगळ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये घडतं आहे, असा दावा करता येणार नाही. पण जिथे जिथे सुरू आहे, तिथे नवी उमेद जागवली जात आहे. या शाळांमध्ये नेमकं काय घडतं आहे हे सांगताना पुणे जिल्ह्य़ातील भोर तालुक्यातील केंजळ येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जे. के. पाटील सांगतात, २०११-१२ पासून  पहिली ते चौथीसाठी कृतियुक्त अध्ययन प्रणाली सुरू करण्यात आली. सीईओ संजीवकुमार यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत पुणे जिल्हा परिषदेने हा उपक्रम सुरू केला. इथे मुलांनी कृतीवर आधारित अध्ययन करायचं होतं. जिल्हा परिषदेने एकूण ३० शाळांमध्ये हा पथदर्शक प्रकल्प करायचं ठरवलं होतं. त्यात आमच्या शाळेची निवड झाली होती.’ या प्रकल्पासाठी जिल्हा परिषदेच्या ४० शिक्षकांची टीम चेन्नईला पाठवली गेली. तिथं त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं. छत्तीसगढ इथं याच पद्धतीने मल्टिग्रेड, मल्टिलेव्हल लर्निगचा प्रयोग सुरू होता. तिथंही २० जणांना प्रशिक्षण घ्यायला पाठवलं गेलं. दोन्हीकडचं प्रशिक्षण घेऊन आलेल्या शिक्षकांनी मग इथल्या अभ्यासक्रमाला योग्य असं अध्ययन साहित्य निर्माण केलं. मराठी गणित, इंग्रजी, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, परिसर अभ्यास या विषयांचा महाराष्ट्रातला अभ्यासक्रम त्या अध्ययनाला पूरक असा बदलला. रचनावादानुसार त्याची मांडणी केली गेली. हा रचनावाद सांगतो की समोर आव्हानं असतील तर मूल स्वत शिकतं. शिक्षकांनी त्याला फक्त गरज लागेल तेव्हा मदत करायची असते. या सूत्रानुसार मग पहिली ते चौथीपर्यंतचा सगळा अभ्यासक्रम बदलला गेला.

खरं तर या प्रयोगात शिकण्याची सगळी रचनाच बदलून गेली आहे. ती नेमकी कशी बदलली आहे, ते जे. के. पाटील स्पष्ट करतात. ते सांगतात की, आता जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्वीसारखे वर्ग भरत नाहीत. तर विषयखोल्या असतात. समजा पहिली ते चौथी चार इयत्तांचे चार वर्ग आहेत.  प्रत्येक वर्गात ४० मुलं असतील तर प्रत्येक वर्गाचा एक मिळून चार शिक्षक असतात. अशा वेळी पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी अशा प्रत्येक वर्गातील १० मुलं मिळून ४० मुलांचा एक गट केला जातो. चार शिक्षकांकडे चार गटांची जबाबदारी दिली जाते. ही मोठी मुलं आणि लहान मुलं एकत्र बसतात, एकत्र शिकतात. पूर्वीसारखी ३५ मिनिटांचा एक तास, असे वेगवेगळ्या विषयांचे तास अशी रचना आता नाही. तर दिवसभरात दोन सेशन्स असतात. समजा अ गटासाठी सकाळच्या सत्रात मराठी भाषा आणि कला हे सेशन असेल तर त्यांनी त्या खोलीत जाऊन तिथल्या अ‍ॅक्टिव्हिटी करायच्या. दुपारी जेवणाच्या वेळपर्यंत तो गट त्या खोलीत तर दुसरा गट दुसऱ्या समजा गणिताच्या खोलीत, तर तिसरा गट कार्यानुभवात आणि चौथा गट परिसर अभ्यास करत असेल. मग दुपारनंतर या गटांच्या वर्गखोल्यांची अदलाबदली होते. त्यांचे शिकायचे विषयही बदलतात. या पद्धतीमुळे मुलांना शिकण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. जे. के. पाटील सांगतात की या पद्धतीमध्ये मोठी मुलं लहान मुलांना मदत करतात. त्यांचा एकमेकांशी चांगला संवाद होतो, चर्चा होतात. मुख्य म्हणजे विषय सुरू झाला आणि दुसऱ्या तासाची वेळ झाली म्हणून तो संपत नाही. मुलं सलग वेगवेगळ्या कृतीद्वारे शिकतात. दिवसभरात त्यांची अशी दोन सेशन्स असतात. या सेशनमधल्या अ‍ॅक्टिव्हिटी या त्यांच्या अभ्यासक्रमाचाच भाग असतात. मुलांनी कुठे, केव्हा, काय करायचं याचं पाठय़पुस्तकावर आधारित तपशीलवार नियोजन केलं गेलं आहे.

पारंपरिक पद्धतीत एकच वर्ग घेऊन सगळ्यांना सरधोपटपणे शिकवलं जातं. त्यांची गती लक्षात घेतली जात नाही. मुलांच्या क्षमतेचा त्यात विचार होत नाही. नव्या पद्धतीत  मूल त्याला जे येतं त्या टप्प्यावर शिकायला सुरुवात करतं. शिकता शिकता त्याचं सातत्यपूर्ण, र्सवकष मूल्यमापन होतं. त्याला परीक्षेचं दडपण राहात नाही. कृतीतून शिक्षण अशी ही पद्धत असल्याचं जे. के. पाटील सांगतात. त्यांच्या मते या सगळ्या प्रक्रियेत मुलं धीट झाली आहेत. ती पूर्वी बोलायला बिचकायची. आता तसं होत नाही. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आला आहे. २०११-१२ पासून सुरू असलेल्या या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका  महत्त्वाची आहे, हे ते आवर्जून सांगतात.

सातारा तालुक्यातल्या कुमठे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे या सगळ्या प्रक्रियेबद्दल सांगतात की, शिक्षण सचिव अनंतकुमार यांनी रचनावादानुसार काम करत असलेल्या सातारा जिल्ह्य़ातल्या कुमठे बीट इथं पर्यवेक्षक अधिकाऱ्यांची दोन दिवसांची कार्यशाळा घेतली. त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातले काही शिक्षक या शाळांवर पाठवून दिले. कुमठे बीट इथलं काम बघून त्या त्या बीटमध्ये तसं काम उभं राहायला सुरुवात झाली. त्यातून पुढचा प्रश्न असा उभा राहिला की शाळा भेटी करून प्रेरणा मिळते पण सखोल ज्ञान मिळत नाही. प्रत्येक शिक्षकाला सखोल ज्ञान हवं. मग या शिक्षकांना रचनावादी अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण दिलं गेलं. त्यासाठी तीन दिवसांचं वर्कशॉॅप घेतलं गेलं. शिकण्यासाठी मुलांचा मेंदू हा महत्त्वाचा अवयव आहे, तर त्याच्याशी संबंधित शिकण्याच्या बाबी कुठल्या, त्यावर आधारित गोष्टी कुठल्या हा सगळा विचार त्या प्रशिक्षणातून दिला गेला. त्या कालावधीत राज्यातल्या रचनावादानुसार काम करणाऱ्या ज्या शाळा बघण्यासारख्या होत्या, त्यांना राज्यातल्या जवळजवळ लाखभर शिक्षकांनी भेटी दिल्या. हे काम बघून तादाळी बीट, गेवराई बीट, लातूर तालुका, हवेली बीट अशा इतर ठिकाणी काम उभं राहिलं.

या सगळ्या प्रक्रियेत रचनावादानुसार काम करणाऱ्या शाळांमध्ये नेमकं काय घडलं, यावर प्रतिभा भराडे सांगतात की अभ्यासक्रमात जेवढय़ा क्षमता अपेक्षित आहेत, त्या सगळ्या क्षमता या पद्धतीने शिकणाऱ्या मुलांना येतात. सगळ्यात महत्त्वाचं ही मुलं आत्मविश्वासाने वावरताना, बोलताना दिसतात. त्यांच्यात समस्या सोडवण्याची चांगली क्षमता निर्माण झाली आहे. मुलाला स्वत:चं ज्ञान स्वत: मिळवता यावं, हीच रचनावादी अभ्यासक्रमाची गरज आहे. ती क्षमताही त्यांच्यात आली आहे. त्यासाठी छोटे छोटे टप्पे पाडून इथपर्यंतचा प्रवास झाला आहे.

यासंदर्भातलं उदाहरण देताना त्या सांगतात की समजा मुलांना वाचन येणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी त्याला आधी हात आणि डोळ्यांचा समन्वय असणं अपेक्षित असतं. हा समन्वय होण्यासाठी अ‍ॅक्टिव्हिटी असतात. उदा. गजगे खेळणं. या खेळाने हस्त नेत्र समन्वय व्हायला मदत होते. समजा एक पट्टी आहे. त्यावर एका ठिकाणी वाघ काढला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी गुहा काढली आहे आणि मध्ये रस्ता आहे, तर मुलाने वाघ गुहेकडे कसा जाईल हे बोट फिरवून सांगायचं असतं. बोट डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जातं, ते जात असताना डोळाही डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जातो. त्यातून मुलाला वाचनाची दिशा तयार होत जाते की अशा पद्धतीने आपण वाचन करायचं आहे. असे छोटे छोटे टप्पे पाडले गेले आहेत. त्यात मुलांना वाटत नाही की आपण अभ्यास करतो आहोत. पण शिक्षकाच्या दृष्टीने मुलाची वाचनाची तयारी होत जाते. मुलांनी वर्गात गप्पा माराव्यात यासाठी तयारी करून घेतली जाते. विविध खेळ घेतले जातात. जाणीवपूर्वक विविध गाणी एकवली जातात. मुलांचे उच्चार नीट व्हावेत यासाठीची गाणी शिकवली जातात. शिक्षक पुस्तकातील गोष्ट अशा पद्धतीने वाचतात की मूल त्या गोष्टीच्या प्रेमात पडतं आणि शिक्षकांनी जिथं पुस्तक ठेवलं असेल तिथलं उचलून ते स्वत: हाताळतं. यातून वातावरण निर्मिती होत जाते. ती पुस्तकावर प्रेम करायला लागतात. छोटी छोटी पुस्तकं रोज एक असं शाळेतच वाचतात. त्यांनी पुस्तक घेणं, त्याचा आस्वाद घेणं, पुस्तकावर प्रेम करणं हे सगळं आपोआप घडतं. त्यासाठीचं वातावरण शाळेतून तयार केलं जातं. हे सगळं पहिलीपासून सातवीपर्यंत सुरू आहे. आता हे सगळं माध्यमिक शाळेच्या पातळीवर घडावं यासाठी  शासनाची तयारी सुरू आहे.

प्रतिभा भराडे सांगतात आत्तापर्यंत आपल्याकडे पूर्वापार सांगितलं आहे तसंच करण्याची पद्धत होती. त्यात ज्या मुलाला येतं, त्याच मुलावर हुशारीचा शिक्का बसायचा. बाकी मुलांना ढ ठरवलं जायचं. पण आता हुशार- ढ ही संकल्पनाच गेली आहे. आता प्रत्येक मूल हुशार, बुद्धिमान आहे, फक्त प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता वेगळी आहे, असं मानलं जातं. ही क्षमता शिक्षक शोधू शकतात. त्या पद्धतीने वातावरण तयार करून दिलं तर मुलं स्वत: शिकतात आणि १०० टक्के शिकतात, असं आता मानलं जातं.

एकेका वर्गात ५० टक्के मुलं असताना अशा पद्धतीने मुलांवर काम करून घेणं शक्य आहे का, यावर त्या सांगतात की अगदी १०० मुलांचा वर्ग असेल तरी हे शक्य आहे. फक्त वर्गात मुलांना एकमेकांच्या सहकार्याने काम करण्यासाठी पुरेशी जागा असायला हवी. आपल्या मेंदूला आव्हानात्मक काम करायला आवडतं. तशा पद्धतीने वातावरण निर्माण केलं तर मुलं चांगल्या पद्धतीने शिकतात. उदाहरणार्थ अमुक अमुक राजाचा मृत्यू काणत्या साली झाला, कोणत्या लढाईत झाला असं विचारलं तर मुलांना हे आव्हानात्मक वाटत नाही, पण त्याएवजी कोणत्या राजाचा मृत्यू पायरीवरून पडून झाला, असं विचारलं तर मग त्यांचा मेंदू कामाला लागतो. हा आव्हान देण्याचा भाग महत्त्वाचा आहे. आजपर्यंत शाळेत मुलांना शिस्त लावणं वगैरे पारंपरिक कल्पना गृहीत धरल्या गेल्या. पण आता स्वयंशिस्त गृहीत धरली गेली आहे. मुलांना हाताला आणि मेंदूला काम असल्यामुळे त्यांना नियंत्रित करण्याचा प्रश्न येत नाही, असं त्या सांगतात. वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी या त्यांच्या अभ्यासक्रमाचाच भाग आहेत. त्यातून विद्यार्थी स्वत: शिकतो. शिक्षक त्याला शिकायला मदत करतो. या सगळ्यामुळे शिक्षकांचं काम कमी झालं आहे, पण त्यांनी स्वत: करायचा अभ्यास वाढला आहे. तेच पुस्तक, तोच धडा शिकवण्यापेक्षा त्यांचं आताचं काम अधिक आव्हानात्मक आहे.

अहमदनगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील बहिरवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक भाऊ  चासकर सांगतात. जिल्हा परिषद शाळा गेल्या दशकभरात वेगवेगळ्या मार्गानी आनंददायी शिक्षणाची केंद्र बनल्या आहेत. सगळ्या शाळांचं असं झालंय असा दावा करता येणार नाही, पण गेल्या काही काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं लोण अगदी बुद्रुक गावांपर्यंत पोहोचलं आहे. पटसंख्या कमी व्हायचं ते एक कारण आहे. पण ती कमी व्हायला लागल्यावर आता काहीतरी हालचाल केल्याशिवाय काही होणार नाही, यातून शाळा बदलायला लागल्या. सगळी मरगळ वगैरे झटकून शिक्षकांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने शाळांचं रूप पहिल्यांदा बदललेलं दिसतं. धुळीची पुटं झटकली गेली, त्यावर रंग आले, भिंती बोलक्या झाल्या. साहित्य आलं. ते सांगतात, गणित शिकवायचं तर आधी आम्ही मुलांना मणीमाळांच्या मदतीने शिकवायचो. त्यात तीन वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आल्या. चिखल मळणं, मुलांनी करणं, अनुभव घेत शिकणं हे आलं. तेव्हा शिक्षणात काही सौद्धांतिक पातळीवरचे बदल संशोधनाच्या अंगाने होत होते. उदा.  रचनावाद आला. मुलांच्या कृती, त्यांच्याशी गप्पा परिसरात जाऊन प्रकल्प यासारखं अ‍ॅक्टिव्हिटीवर आधारित शिकणं यामुळे मुलांच्या भावविश्वाशी, अनुभवविश्वाशी नातं सांगणारे अध्ययन, अनुभवांची रचना करणं, तसे प्रकल्प मुलांना देणं असे बदल होत गेले. ते शिक्षकांनी खूप पटकन स्वीकारले. यामुळे मुलांमधली कृतिशीलता वाढली आहे. ती वर्गात गप्पा मारत शिकतात, परिसरात विविध ठिकाणी जातात. वेगवगेळ्या लोकांना भेटतात. त्यांच्याकडून माहिती घेतात. त्यांचं अ‍ॅक्टिव्हिटीवर आधारित शिकणं वाढलं आहे.

चासकर सांगतात, शाळांमध्ये नवीन शिक्षक आले. ते नव्या तंत्रस्नेही जगाचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर जिल्हा परिषद शाळांमध्ये करायला सुरुवात केली. तंत्रज्ञान वापरलं की काम सोपं होतं असं त्यांच्या लक्षात आलं. त्यातून सरकारी शाळांचं डिजिटायझेशन झालं. जिल्हा परिषद शाळांमधला बदलाचे कर्तेकरवते तिथले शिक्षक आहेत. त्यांना जाणवलं की हे केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये टॅब, प्रोजेक्टर, लॅपटॉप या सगळ्यांचा वापर व्हायला लागला आहे.

पटसंख्या कमी होणं हे जिल्हा परिषद शाळांसमोरचं मोठं आव्हान होतं. पण भाऊ चासकर सांगतात की २०१५-१६ या वर्षांत १४ हजार मुलं सरकारी शाळेत आली आहेत. कारण इंग्रजी माध्यमांचा ओढा वाढणार, त्या विरोधात काहीही सांगून उपयोग नाही हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांनी तंत्रज्ञान या आधुनिकतेच्या प्रतीकाचा खुबीने वापर केला. जिल्हा परिषद शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर सुरू झाला. मुलं घरी जाऊन सांगत. अमुक टॅब हाताळला, अमुक सॉफ्टवेअर हाताळलं. इंग्रजीपेक्षा ही तंत्रसाधनं वापरून दृश्य परिणाम होतो आहे. त्यातून जिल्हा परिषद शाळांचं प्रतिमासंवर्धन झालं आहे. ही प्रतीकं सरकारी शिक्षकांनी उत्तम पद्धतीने वापरली. याला परिसरात नेणं, परिसराशी जोडून घेणं याची जोड दिली गेली. एका बाजूला आधुनिकीकरणाची साधनं आणि दुसरीकडे गाव परिसरातल्या भेटी, परिसराकडे डोळसपणे बघणं यातून मुलांचं जगणं आणि त्यांचं शिकणं यांची सांगड घातली गेली. त्यासाठी आम्ही शाळेत येणाऱ्या आदिवासी मुलाची भाषा बोलतो. त्यांना शाळेत त्या भाषेत बोलायची, लिहायची संधी असते. परिसर अभ्यासासाठी आम्ही त्यांच्या परिसरात फिरतो. ती आमची गाइड होतात. मुलांशी बोलणं हा रचनावादी शिक्षणाचा भाग आहे. त्यांच्याशी बोलून, त्यांचं भावविश्व, अनुभव विश्व समजून घेऊन त्यांना शिकवणं सध्या सुरू आहे. खूप शिक्षक सांगतात की आम्ही त्यानुसार स्वत:मध्ये बदल केला आहे. मेंदूबाबतचं संशोधन करून केलेला रचनावादाचा एक सिद्धांत आहे. तो सांगतो की जे मूल दडपणाखाली असतं ते शिकत नाही. त्याने मनाची कवाडं बंद करून घेतलेली असतात. जिथे भीतीमुक्त वातावरण असते, रंजकतेने अध्ययन होतं, अनुभवांची रचना करत शिकवलं जातं, प्रकल्प, उपक्रम, कृती असतात, तिथे मूल शिकतं. या बालमानसशास्रानुसार काम आमच्या शाळांमध्ये सुरू आहे. आम्ही कोणतीही घोकंपट्टी करून घेत नाही. तिथे पाऊस आला की मुलांना पावसात भिजायला पाठवतो. आम्ही सहलीला जातो. पाऊस येतो, पावसाचं वाहणारं पाणी गढूळ का येतं आहे, ते विचार करायला लावून त्यातून जमिनीची धूप का होते, ती कशी रोखायला हवी याबद्दल चर्चा होते. ते वेगळं शिकवावं लागत नाही. जगण्यातून, कृतीतून शिकणं होतं. मोठय़ा संख्येने परिसर भेटी, व्यापाऱ्यांशी गप्पा, पर्यावरणावर निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा घेण्यापेक्षा झाडं लावायला शिकवतो. आमच्याकडे अशी एक हजार १७४ झाडं मुलांनी जगवली आहेत. हे पर्यावरण शिक्षण आहे. या सगळ्यातून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. निर्णयक्षमता आली आहे. या सगळ्यातून शाळांमध्ये नवनिर्माण सुरू आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने जिल्हा परिषद शाळांची अशी वाटचाल सुरू आहे. आज सरसकट सगळ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा पद्धतीने काम होत नाही, हे खरं आहे. पण काही शाळांची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे हे महत्त्वाचं.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com