जय पाटील
अमेरिकेत ग्रॅज्युएशन म्हणजे मोठ्ठं सेलिब्रेशन. शैक्षणिक कारकीर्दीचा एक महत्त्वाचा टप्पा पार करून नव्या जगात प्रवेश करण्याचा, अतिशय अभिमानाचा असा हा दिवस. पण २०२० ची बॅच या दिवसाचा आनंद घेऊ शकली नाही. टोप्या आकाशात भिरकावू हा क्षण साजरा करू शकली नाही. पण त्यांच्या आयुष्यातली ही उणीव भरून काढण्यासाठी आयोजित करण्यात आला एक अनोखा कार्यक्रम…डिअर क्लास ऑफ २०२०.
मिशेल ओबामा यांचं रिच हायर इनिशिएटिव्ह आणि युट्युबने एकत्रितपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. भारतीय वेळेनुसार ८ मार्चच्या मध्यरात्री युट्युबवर लाइव्ह स्वरूपात सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जगभरातल्या अनेक प्रतिथयश व्यक्तींनी या ग्रॅज्युएट्सना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची सुरुवात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्या संदेशाने झाली.
यावेळी बराक ओबामा म्हणाले, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याच्या, स्वतःची जीवनमूल्य निश्चित करण्याच्या टप्प्यावर आज तुम्ही आहात. भविष्य तुमच्या हातात आहे. अमेरिका याआधीही अनेक संकटांना तोंड देत इथवर पोहोचली आहे. या संकटातून तुमच्या सारखी नवी पिढी प्रचंड मेहनतीने आणि धाडसाने मार्ग काढेल, असा विश्वास आहे.
मिशेल यांनी विद्यार्थ्यांना धीराने पुढे जाण्याचा सल्ला दिला. महासाथीने जगासमोर अनेक आव्हानं निर्माण केली आहेत आणि त्याच वेळी आपल्या देशात वंशभेदाची समस्या पुन्हा उभी ठाकली आहे. या बदलांच्या काळात गोंधळून जाणं स्वाभाविक आहे, पण खचून जाऊ नका. येत्या काळात जगात बरेच बदल होणार आहेत. तुम्हाला या बदलांचे साक्षीदार होता येणार आहे. या बदलांनी अनेक संधी निर्माण केल्या आहेत. त्यांचा पुरेपूर उपयोग करून घ्या, असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं.
मलाला युसुफझाईने ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि सध्या साथ आणि टाळेबंदीमुळे तिच्या अभ्यासात काय अडथळे उभे राहिले आहेत, याचे अनुभव सांगितले. अनेकांनी आपल्या शालेय जीवनातल्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या यशात अनेकांचा वाटा असतो. ग्रॅज्युएशन साजरं करता येत नसलं तरी अशआ व्यक्तींना आवर्जून धन्यवाद द्यायला विसरू नका, असं आवाहन करण्यात आलं. अमेरिकेतला वंशभेद चव्हाट्यावर मांडणाऱ्या घटनेचा अनेकांनी निषेध केला.
सुंदर पिचाई, लेडी गागा, जेनिफर लोपेझ, हसन मिनाज, मलाला युसुफझाई यांच्यासह अनेक प्रतिथयश व्यक्तींनी या ऑनलाइन व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आधी हा कार्यक्रम ५ जून रोजी करण्यात येणार होता. पण जॉर्ज फ्लॉइडची हत्या आणि त्यानंतर अमेरिकेत वंशभेदाविरुद्ध उसळलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्याचा हा प्रयोग अनोखा ठरला.