-जय पाटील
मास्क घातल्यावर गुदमरल्यासारखं वाटतं, घाम येतो, नाकावर, कानांवर व्रण येतात… मास्कविषयी आपल्या असंख्य तक्रारी असतात. पण कर्णबधिरांसाठी मास्क ही आपल्या सर्वांपेक्षा अधिक गंभीर समस्या झाली आहे. त्यांचा आवाजच मास्कने दाबून टाकला आहे. त्यांच्यासाठी विशेष स्वरूपाचे मास्क तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कर्णबधिर व्यक्ती ना नीट ऐकू शकत, ना नीट बोलू शकत. काहींना थोड्याफार प्रमाणात ऐकू येतं, तर काहींची श्रवणक्षमता शून्य असते. त्यामुळे या व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या ओठांच्या हालचाली पाहून
त्यांचे म्हणणे जाणून घेतात आणि स्वतःच्या ओठांच्या हालचालींद्वारे समोरच्या व्यक्तीला आपले म्हणणे सांगतात. त्यांच्यासाठी ओठ हेच कान असतात. पण कोविडच्या कहरामुळे मास्क घालणं अपरिहार्य झाल्यापासून संवादाचं एकमेव माध्यम असलेले हे ओठच दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे कर्णबधिर व्यक्तींच्या दैनंदिन जीवनात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.

आधीच दुकानांसमोर ग्राहकांची रांग, त्यात या व्यक्ती कोणती वस्तू मागत आहेत, हे दुकानदाराला कळत नाही आणि दुकानदार काय सांगत आहे, हे या व्यक्तींना समजत नाही. अशा स्थितीत एका दुकानातून दुसऱ्या दुकानात हेलपाटे घालत या व्यक्तींना आवश्यक सामानाची खरेदी करावी लागत आहे. त्यावर उपाय म्हणून काही जण वस्तूंची छायाचित्र दाखवून संवाद साधत आहेत. कार्यालयांमध्ये सहकाऱ्यांशी संवाद साधताना, सार्वजनिक वाहतुकीची साधनं वापरताना पदोपदी या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.

ही समस्या सोडवण्यासाठी खास प्रकारचे मास्क तयार करण्यात यावेत, अशी मागणी कर्णबधिर व्यक्तींकडून होत आहे. ओठांचा भाग दिसू शकेल, असे मास्क तयार करून त्यांना पुरवण्याचे प्रयत्न काही संस्थांनी सुरू केले आहेत. सुरुवातीला मास्कच्या ओठांसमोरच्या भागात प्लास्टिक लावून पारदर्शक मास्क उपलब्ध करण्यात आले. पण प्लास्टिकमुळे घाम अधिक प्रमाणात येतो, शिवाय आर्द्रतेमुळे थोड्याच वेळात मास्क धुरकट होतो आणि ओठांच्या हालचाली दिसण्याचा उद्देश फोल ठरतो. त्यामुळे आता यासाठी नवे आणि परिणामकारक पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. करोनाचा प्रसार कमी होण्याची चिन्हे दिसत नसताना कर्णबधिरांना लवकरात लवकर आरामदायी आणि उपयुक्त मास्क उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.