05 December 2019

News Flash

हतबल हत्ती! (ओदिशा)

देशात २०१७ मध्ये झालेल्या वन्यप्राणी गणनेत तब्बल २७ हजार ३१२ हत्ती आढळले.

आपल्याच घरात निर्धास्तपणे विहार करणारे हत्तींचे कळपच्या कळप धडाडत जाणाऱ्या रेल्वेपुढे मान टाकू लागले आहेत.

विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com
खबर राज्यांची
जंगलं आणि शहरांच्या हद्दीची सरमिसळ आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या आता केवळ मुंबईसारख्या महानगरांपुरत्याच सीमित राहिलेल्या नाहीत. ओदिशासारख्या तुलनेने विरळ लोकवस्तीच्या आणि मुबलक वनसंपदा बाळगून असलेल्या राज्यांतही आज ही समस्या गंभीर ठरू लागली आहे. ओदिशामध्ये एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत ६७ हत्ती मृत्युमुखी पडले. त्यापैकी ३० मृत्यू अनैसर्गिक होते.

देशात २०१७ मध्ये झालेल्या वन्यप्राणी गणनेत तब्बल २७ हजार ३१२ हत्ती आढळले. जगभरातील हत्तींच्या संख्येशी तुलना केल्यास हे प्रमाण तब्बल ५५ टक्के आहे. याच गणनेत ओदिशामधील हत्तींची संख्या एक हजार ९७६ एवढी नोंदवण्यात आली होती, मात्र आज वाढता मानवी हस्तक्षेप या गजवैभवापुढे न पेलणारं आव्हान बनून उभा ठाकला आहे. हे आव्हान एवढं महाकाय आहे, की त्यापुढे हे अवाढव्य जीवही हतबल झाले आहेत. पूर्वी हस्तिदंतांसाठी हत्तींची शिकार केली जात असे, मात्र आता हा हव्यास केवळ हस्तिदंतांपुरताच सीमित राहिलेला नाही. हत्तींचा अधिवास असलेली वनंच रेल्वे मार्गानी दुभागून टाकली आहेत. आपल्याच घरात निर्धास्तपणे विहार करणारे हत्तींचे कळपच्या कळप धडाडत जाणाऱ्या रेल्वेपुढे मान टाकू लागले आहेत. कधी लोंबकळणाऱ्या किंवा उघडय़ा पडलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन गजराज बळी पडत आहेत. कधी विषबाधेमुळे, तर कधी चक्क नेहमीच्या वाटेत अचानक आडवी आलेली िभत पाडण्याच्या प्रयत्नात हत्ती मृत्युमुखी पडू लागले आहेत.

ओदिशामध्ये एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत मृत्युमुखी पडलेल्या ६७ हत्तींपकी १९ हत्तींचा मृत्यू वीजतारेचा स्पर्श झाल्याने, सहा हत्तींचा मृत्यू ट्रेनच्या धडकेत आणि सुमारे १२ हत्तींचा मृत्यू विहीर किंवा डबक्यात पडून झाला.

ही समस्या काही केवळ गेल्या वर्षभरातील नाही. गेल्या पाच वर्षांत ओदिशात ३५३ हत्ती मृत्युमुखी पडले. त्यापकी बहुतेकांच्या मृत्यूमागे मानवनिर्मित कारणेच होती. ओदिशातील हत्ती मृत्यूची वार्षकि सरासरी ७० झाली आहे. हत्तींचे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात होणारे मृत्यू आणि त्याविषयी राज्य सरकारची अनास्था पाहता, वन्यजीवप्रेमी ओरिसाची संभावना ‘हत्तींची स्मशानभूमी’ म्हणून करू लागले आहेत.

अर्थात हत्तींच्या हल्ल्यात माणसे मृत्युमुखी पडल्याची किंवा गंभीर जखमी झाल्याची उदाहरणेही कमी नाहीत. देशाच्या पूर्वेकडील राज्यांतील शेकडो नागरिकांचे हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झाले आहेत. एकटय़ा ओदिशात २०११ पासून आजवर तब्बल ५३५ व्यक्तींना हत्तीहल्ल्यात प्राण गमावावे लागले आहेत. याच काळात ५४८ हत्तींचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. हत्तींच्या कळपांनी तब्बल सहा हजार ४१७ घरांचे नुकसान केले आहे. शेती आणि मालमत्तेची नासधूस हादेखील तेथील रहिवाशांसाठी चिंतेचाच विषय आहे. एवढय़ा महाकाय प्राण्याच्या नसíगक अधिवासात, खाद्य शोधण्याच्या मार्गात अडथळे उभे करण्याचे गंभीर परिणाम अनेकांना भोगावे लागले आहेत. पूर्व आणि ईशान्य भारतातील हत्ती व मानवातील संघर्ष दिवसागणिक गंभीर रूप धारण करू लागला आहे.

अनसíगक कारणांमुळे होणाऱ्या हत्तींच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे सर्व स्तरांतून टीका होऊ लागल्यानंतर २०११ मध्ये ओदिशा सरकारने एक अधिसूचना काढली. त्यात प्रत्येक हत्तीच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र हत्तीचा मृत्यू झाला की त्या भागातील एखाद्या वनरक्षकाला निलंबित करून कारवाईचा देखावा केला जातो, मात्र कोणत्याही विभागीय वन अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

हत्तींचे वाढते मृत्यू रोखण्यासाठी ओदिशा सरकारने खास हत्तींच्या संरक्षण संवर्धनासाठी १४ संरक्षित क्षेत्रे निश्चित केली आहेत, तरीही रेल्वे रुळांवर आणि वीजतारांच्या भेंडोळ्यात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात हत्तीमृत्यू होत आहेत, यावरून या प्रकल्पाची अंमलबजावणी किती कार्यक्षमपणे केली जात असावी, याचा अंदाज येतो.

हत्ती-मानव संघर्षांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ओदिशा सरकारने चार विशेष वाहने सेवेत आणण्याचा विचार सुरू केला आहे. क्रेन लावलेली आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञ असलेली ही वाहने भरकटलेल्या हत्तींना सुरक्षित आणि मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यास हातभार लावतील. प्रत्येक वाहनासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या वाहनांसाठी ओदिशा सरकार पश्चिम बंगालच्या पर्यावरण आणि वन विभागाचेही साहाय्य घेणार आहे.

विजेच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे होणारे गजमृत्यू रोखण्यासाठी जुनाट वीजखांब बदलणे, या खांबांना हत्तींनी स्पर्श करू नये म्हणून त्यावर अणकुचीदार आवरण लावणे, विजेच्या तारा योग्य उंचीवरच आहेत की नाही, याची वेळोवेळी खात्री करून घेणे, लोंबकळणाऱ्या ओव्हरहेड वायर तातडीने दुरुस्त करणे असे अगदी सहज शक्य असणारे उपाय वन्यजीवप्रेमींनी सुचवले आहेत, मात्र त्यांची अंमलबजावणी करण्याची तसदी संबंधित यंत्रणा घेत नाहीत. हत्तींच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांच्या प्रगतीचा आढावा दर महिन्याला घेण्यात यावा आणि मुख्य म्हणजे हत्तीमृत्यूंची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, ही येथील वन्यजीवप्रेमींची प्रमुख मागणी आहे.

हत्तींच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी उत्तराखंडमध्ये ड्रोनचा वापर केला जात आहे. हा उपाय हत्तींचे मृत्यू रोखण्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरला आहे. ९० टक्के रेल्वे अपघात हे रात्रीच्या वेळी झाले आहेत. त्यामुळे हत्तींचा वावर असणाऱ्या भागांत रात्री रेल्वे गाडय़ांचा वेग कमी ठेवणे, रेल्वेमार्गालगत गस्तीपथके तनात ठेवणे, असे उपाय केल्यास अशा अपघाती मृत्यूंना आळा घालणे शक्य होईल, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.

हत्तीचा स्मृतिस्तंभ

इथल्या चम्पुआ ब्लॉकमध्ये मृत हत्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक ४० फुटी स्तंभ उभारण्यात आला आहे. या परिसरात २००९ साली एका हत्तीचा विजेच्या तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाला होता. ऐश्वर्याचं प्रतीक असलेला हत्ती आपल्या शेतांत मृत्युमुखी पडल्याची अपराधी भावना गावकऱ्यांमध्ये होती. हत्तीला तिथेच दफन करण्यात आले होते. देणग्या गोळा करून हा स्तंभ उभारण्यात आला. हत्तीला श्रद्धांजली वाहिली जावी आणि मानवी निष्काळजीपणामुळे होणारे वन्यजीवांचे मृत्यू टाळण्यासंदर्भात जनजागृतीही व्हावी अशी यामागची भावना होती.

अन्य राज्यांतील स्थिती

२०१७ च्या प्राणिगणनेनुसार देशात सर्वाधिक हत्ती कर्नाटकात आहेत आणि त्यापाठोपाठ आसामचा क्रमांक लागतो. दक्षिण आणि ईशान्य भारतात हत्तींचे प्रमाण प्रचंड आहे, मात्र ईशान्य आणि पूर्वेकडील राज्यांतील हत्तींचे अनसíगक मृत्यू वर्षांगणिक वाढू लागले आहेत. २००२ साली झालेल्या वन्य प्राणिगणनेच्या तुलनेत २०१७ च्या गणनेत आसाममधली हत्तींची संख्या वाढल्याचे आढळले, मात्र त्यानंतरच्या काळात आसाममधील हत्तींची संख्या वेगाने घटू लागली आहे. गेल्या तीन वर्षांत आसाम आणि पश्चिम बंगालच्या हद्दीत ४९ हत्ती मृत्युमुखी पडले, त्यापकी तब्बल ३७ हत्तींचा ट्रेनच्या धडकेत बळी गेल्याची नोंद आहे.

First Published on January 25, 2019 1:03 am

Web Title: elephant issue in odisha
Just Now!
X