21 April 2019

News Flash

बाप्पा मोरया : सोशल मीडियावरचे बाप्पा

गणपतीची मूर्ती आणण्यापूर्वी अनेक ठिकाणी सजावट केली जाते. विशिष्ट थीमचा वापर केला जातो.

प्रियंका वाघुले

गणेशोत्सव जवळ आला की सगळीकडेच उत्साहाचे वातावरण निर्माण होते. नाही म्हटलं तरी बाप्पा हे प्रत्येकाचेच लाडके असतात. अगदी लहान, मोठे, तरुण, वयस्कर सगळ्यांचेच. या बाप्पाची नावं जितकी वेगवेगळी, तितकीच बाप्पाच्या मूर्तीची रूपंही वेगवेगळी गणेशोत्सवात पाहायला मिळतात. आपल्या माता- पिता, शंकर -पार्वतीबरोबर बसलेल्या लहानशा बापापासून ते बाहुबलीच्या रूपातल्या बाप्पाच्या मूर्तीपर्यंत. अशा प्रकारे आपल्या आवडीच्या मूर्ती भक्त बनवून घेत असतात.

सणाच्या निमित्ताने बाप्पा जितका मूर्तीच्या रूपात ठिकठिकाणी आलेला दिसतो तितकाच हा बाप्पा आपल्याला व्हॉट्सअप, फेसबुकसारख्या सामाजिक माध्यमांवरही दिसत असतो. ही माध्यमे आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनलेला असताना, बाप्पा आपल्या मार्फत तिथपर्यंत पोहोचणार नाही असं होईलच कसं म्हणा. छोटय़ातल्या छोटय़ा गोष्टीला या माध्यमावर आणणारे बाप्पालाही चांगलीच प्रसिद्धी मिळवून देतात.

गणपतीचे पाद्यपूजन होत असल्यापासून ते विसर्जनापर्यंत बाप्पा आपल्याला व्हॉट्सअप, फेसबुकवर दिसत असतात. पाद्यपूजन सोहळ्याला तिथे उपस्थित असलेले अनेक जण फेसबुकवर लाइव्ह येतात. आणि ज्यांना तिथे उपस्थित राहाणे शक्य नाही अशांना दर्शनासाठी छान संधी देतात; जेणेकरून त्यांच्यासोबत इतरांचेही दर्शन व्हावे.

गणपतीची मूर्ती आणण्यापूर्वी अनेक ठिकाणी सजावट केली जाते. विशिष्ट थीमचा वापर केला जातो. ऐतिहासिक बाबींचा आधार घेतला जातो. तर कुठे लहान मुलांना आवडणाऱ्या कार्टून्सना आकर्षण म्हणून उभे केले जाते. तर काही ठिकाणी ‘पाणी वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘स्त्रीभ्रूण हत्या रोखा’ यासारखे संदेश दिलेले असतात. या संदेश देणाऱ्या फलकांचे, सजावटीचे फोटो काढून ते या माध्यमांवर टाकले जातात. यामार्फतही संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.

घरात आलेल्या बाप्पासाठी वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. विशेषत: उकडीचे मोदक, लाडू बनवले जातात. आपल्या घरातल्या लाडक्या बाप्पासाठी असे नवेद्य बनवतानाचे, नवेद्य बाप्पासमोर मांडल्याची छायाचित्रे विशेषत: तरुणी टाकत असतात. तर घरी आलेल्या बाप्पाबरोबर जवळ जवळ प्रत्येक जण फोटो काढून ते माध्यमांद्वारे  सगळ्यांसोबत शेअर केले जातात.

बऱ्याचदा अनेक ठिकाणच्या मंडळांमध्ये टाळ, झांज, माईक वापरून आरती होते. सगळे एकत्र येऊन जल्लोषात आरती करतात. अशा वेळेस आपल्या मंडळाचा जल्लोष दाखवण्यासाठी काही जण फेसबुक वर लाइव्ह जातात. तर अनेक ठिकाणी मंडळं या दिवसात स्त्रियांसाठी पाककला, मुलांसाठी विविध खेळ असे कार्यक्रम आयोजित करतात. अनेकदा महाप्रसाद ठेवला जातो. अशा या सामूहिक कार्यक्रमांचे फोटो टाकले जातात.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येण्याची संधी बहुधा कुणी सोडत नाही. गणेशोत्सवानिमित्त शाळेतील जुने मित्र-मत्रिणी, जुन्या रहिवासी ठिकाणचे जुने मित्र एकत्र येऊन गणपती बघायला जायचे कार्यक्रम आखतात. मग अगदी दिवस दिवस भटकून गणपती बघण्याचा आनंद लुटला जातो. अनेक जण गणपती मंडळांनी केलीली सजावट, रोषणाई बघण्यासाठी नाइट आऊट करतात. ती धमाल, मस्ती, मज्जा फोटोद्वारे, सेल्फीद्वारे ‘आफ्टर लॉंग टाइम’, ‘बेस्ट बडीज’ अशा टॅगलाइन्ससह सोशल मीडियावर पडते.

अनेकदा आपल्या गणपतीच्या मूर्तीचे, सजावटीचे फोटो टाकून त्यांचं वेगळेपण, तसं करण्यामागचा हेतू सांगितला जातो. अशा प्रकारे आपल्याकडे आलेल्या बाप्पाला समाज माध्यमांद्वारे समाजापर्यंत पोहोचवलं जातं.

response.lokprabha@expressindia.com

First Published on September 14, 2018 1:54 am

Web Title: ganesh chaturthi festival ganeshotsav 2018 article 5