नोंद
नीलिमा कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

जपानमध्ये अशी समजूत आहे की, ओरिगामीचे एक हजार पक्षी केले तर आपली इच्छा पूर्ण होते. हिरोशिमातील ‘पीस पार्क’मध्ये जगभरातून पाठवण्यात येणाऱ्या पक्ष्यांविषयी..

जपानमध्ये १३ ऑगस्टला आपल्या सर्वपित्री अमावस्येसारखा ओबान हा पूर्वजांना तर्पण देण्याचा सण सुरू होईल. (हा दिवस लुनार कॅलेंडरप्रमाणे येतो. त्यामुळे दरवर्षी त्याची तारीख बदलते.) त्या दिवशी पूर्वजांबरोबर अनेक लोक एका सदाको नावाच्या मुलीलाही जपानी लोक श्रद्धांजली वाहतात. हिरोशिमाच्या ‘पीस पार्क’मधील सदाकोच्या स्मारकाला वाहण्यासाठी ओरिगामी कागदाचे क्रेन पक्षी पाठवतात. फक्त जपानमधूनच नव्हे तर सर्व जगातून लहान मुले हे ओरिगामी पक्षी पाठवतात. त्या सदाकोची ही गोष्ट.

दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं हिरोशिमा जपान्यांनी जिद्दीने, कष्टाने पुन्हा उभं केलं. फिनिक्स पक्ष्यासारखं हे शहर राखेतून उभं राहिलं. हिरोशिमाची ‘शांती बाग’ म्हणजे पीस पार्क! त्यात मुद्दाम जपून ठेवलेली एक उद्ध्वस्त इमारत सोडली तर अणुस्फोटाच्या संहाराचा कुठेही मागमूस नाही.

१९४५! हिरोशिमात दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला आणि अणुबॉम्बच्या स्फोटाने शहर दणाणले. तिथे केशकर्तनालय चालवणारं ससाकी हे सामान्य कुटुंब. मिस्टर ससाकी लष्करात असल्याने स्फोट झाला तेव्हा ते घरी नव्हते. शहर प्रचंड आवाजाने हादरलं होतं. मिसेस ससाकींनी बाहेर पाहिलं तर एक प्रचंड आगीचा डोंब, वाटेवरचं सगळं गिळंकृत करत त्यांच्या घराकडे सरकताना दिसला. दुसऱ्या क्षणी घराच्या िभती कोसळल्या, तेव्हा मिसेस ससाकी आपल्या दोन वर्षांच्या मुलीला, सदाकोला घेऊन किनाऱ्याकडे  पळत सुटल्या. नशिबाने एका बोटीत त्यांना जागा मिळाली. त्या दोघी दूर गेल्या म्हणून वाचल्या.

काही महिन्यांनी त्या हिरोशिमाला परत आल्या. पुन्हा सगळा खेळ मांडला. आयुष्याचे उरलेले तुकडे सांधत पुन्हा सुरुवात करणाऱ्या ससाकी कुटुंबाला भयानक स्वप्न मागे पडल्यासारखं वाटत होतं. पण दुर्दैवाने अणुस्फोटाचं भूत कायमचं डोक्यावर बसलं होतं.

सदाको ११ वर्षांची झाली. सदाकोच्या अभ्यासाबरोबर इतर गोष्टी सुरू झाल्या. खेळात तिला विशेष रस होता. तिच्या शाळेत प्रत्येक वर्गामध्ये गट करून त्यांच्यात स्पर्धा व्हायच्या. स्पध्रेच्या पहिल्या फेरीत ‘बांबू गट’ नावाचा सदाकोचा गट शेवटचा आला. सदाकोने आपल्या गटातील मुलीना जमवलं आणि सांगितलं, अपयशातून काही शिकता आलं तर ते ‘अपयश’ ठरत नाही. तिने त्यांच्याकडून रिले रेसची भरपूर प्रॅक्टिस करून घेऊन पुढच्या वेळी त्यांच्या गटाला जिंकवून दाखवलं. सदाकोकडे आपसूकच त्यांचं नेतृत्व आलं. पण त्यानंतर सदाको अचानक आजारी पडली. तिला कांजिण्या झाल्या, नंतर पायावर जांभळे डाग उमटले. ती विचित्र लक्षणं पाहून तिचे आई-वडील हादरले. नंतर ल्युकेमियाचं निदान झालं तेव्हा ते पुरते खचले. पण तसं न दाखवता ते तिच्यावर उपचार करीत होते. तिचा आजार वाढतच होता. सदाकोला रुग्णालयातल्या ल्युकेमियाच्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं.

तिथे किरणोत्सर्गामुळे ल्युकेमिया झालेली अनेक लहान मुलं होती. खोल रुतलेला अण्वस्र हल्ला पुन्हा असा नऊ-दहा वर्षांनी दात विचकत पुढे उभा होता. वरकरणी आयुष्य मार्गाला लागलं होतं, पण आतून ते समाजाला पोखरत होतं. ल्युकेमियाच्या वॉर्डमधली मुलं दगावत होती, ते पाहून आपणही मरणार हे सदाकोला कळून चुकलं. आण्विक संकट तात्कालिक नसतं. वर्षांनुर्वष त्याचे दुष्परिणाम रेंगाळतात.

जपानमध्ये अशी समजूत आहे की जर ओरिगामी कागदाचे एक हजार पक्षी केले तर तुमची इच्छा पूर्ण होते. सदाकोने ते पक्षी करायला सुरुवात केली, ती नेटाने बसून पक्षी करत होती. साधारण ५०० पक्षी झाले. मध्येच कागद संपला. सदाको दवाखान्यातले वेष्टनाचे कागद वापरू लागली. तिची मत्रीण चीझुकू तिला कागद आणून द्यायची. खंगत चाललेल्या त्या मुलीने ६४४ चा आकडा गाठला. एक दिवस तिला सणकून ताप भरला. ही शेवटची पायरी होती. शक्ती संपत आली होती.

‘तुला काय हवं बेटा?’ डॉक्टरांनी शेवटची इच्छा विचारली. सदाको केविलवाणी हसली, तिची जगण्याची इच्छा तर पूर्ण होणारच नव्हती. ‘विश्वशांती,’ ती म्हणाली. त्याचसाठी ती ते हजार पक्षी तयार करीत होती. आपल्यासारखी आणि या वॉर्डमधल्या मुलांसारखी शेकडो निष्पाप मुलं बळी पडली आहेत, पुन्हा कोणी असे निष्पाप बळी पडू नयेत म्हणून ‘विश्वशांती’ची प्रार्थना! तिची शेवटची इच्छा होती – ‘पीस ऑन अर्थ’! शांततेचं दान मागत सदाकोने प्राण सोडला.

त्या घटनेचा सगळ्यात जास्त धक्का तिच्या बांबू गटाला बसला. खेळात हरल्यावर पुन्हा जिद्दीने सर्वाना उभं करणारी सदाको हजार ओरिगामी क्रेन पक्षी व्हायच्या आधीच कायमची सोडून गेली होती. बांबू गटाच्या मुलींनी एक कल्पना लढवली. हिरोशिमा पीस पार्कमध्ये अणुस्फोटामध्ये बळी गेलेल्या मुलांचं सदाकोच्या नावाने स्मारक बांधण्याचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी पसे गोळा करायचं जनतेला आवाहन केलं, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. १९५८ मध्ये हे स्मारक तयार झालं. बांबू गटाने तिची जागतिक शांततेची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हजार ओरिगामी पक्षी करून तिच्या स्मारकाला वाहिले. तेव्हापासून सदाको ही जागतिक शांततेचं प्रतीक झाली आहे.

आजही जगाच्या सर्व देशांतून शाळकरी मुलं, शांततेचं प्रतीक म्हणून ओरिगामी कागदाचे क्रेन पक्षी करून तिथे पाठवतात. हे स्मारक पाहायला जाणारे अण्वस्त्र युद्धापासून दूर राहण्याची शपथ घेतात. रसूल गाम्झातोव्ह हा रशियन कवी हे स्मारक पाहून गहिवरला. ‘क्रेन’ ही कविता त्याला इथेच स्फुरली. या कवितेला नंतर लेनिन पुरस्कार मिळाला. तो म्हणतो,

It seems to me, sometimes, soldiers,

Who didn’t return from the bloody fields,

Didn’t lie dead in our land, a single moment,

But transformed into white Cranes.

जपानच्या भेटीत सदाको माझ्या मनात कायमची ठसली. रसूल म्हणतो तसं, ‘घरी परत न आलेले, किंवा मानाने अन्त्यसंस्कार न झालेले, कोणी पुरात वाहून गेलेले, कोणी आगीत होरपळलेले, कोणी किरणोत्सर्गाला बळी पडलेले.. अनेक जीव – क्रेन पक्षी झाले आहेत.’  त्यात  भर घालायला पाहिजे, शांततेच्या काळात कोणाच्या घृणास्पद तिरस्काराला, रंगद्वेष, वर्णद्वेष यांना बळी पडलेल्या निष्पाप जीवांची! फक्त याच वर्षी अशी २५० हत्याकांडं झाली आहेत.. माणुसकीचा आक्रोश सुरूच आहे. सदाकोचा आत्मा पुन्हा एकदा तळमळला असेल.

शांततेसाठी मी मनातल्या मनात हजार क्रेन पक्ष्यांच्या माळा अर्पण करते. या देशाच्या नागरिकांना प्रार्थनेतून शक्ती मिळू दे.. ती गोळा करून ते निष्क्रिय बसलेल्या नाठाळांचे माथी काठी हाणण्यास सज्ज होऊ देत, ही माझी प्रार्थना!