इंटरनेट किंवा आंतरजाल हा आता मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. करोना संक्रमणानंतर आता बहुतांश लोक ‘वर्क फ्रॉम होम’ करू लागल्यावर तर ती प्राथमिक गरज झाली आहे. प्रत्येक जण आपल्याला विनाव्यत्यय वेगवान इंटरनेट कसे मिळेल याच्या शोधात असतो. ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी इंटरनेट सेवा पुरवठादारदेखील वेगवेगळे प्लान्स त्यांच्यासमोर ठेवतो. ज्यात वेग, जोडणीचे प्रकार असे बरेच घटक समाविष्ट असतात. त्यातील आपल्यासाठी सुयोग्य प्लान किंवा पॅकेज कोणते हे समजण्यासाठी इंटरनेटसंदर्भातील संज्ञा आणि संकल्पना मांडण्याचा हा प्रयत्न..

इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या संस्थेकडून (इंटरनेट सव्‍‌र्हिस प्रोव्हायडर) आपण इंटरनेट घेत असलो तरी इंटरनेट मुळात सुरू कुठून होते ते लक्षात घेतले पाहिजे. आपल्याला सेवा मिळेपर्यंत साधारण तीन टप्पे पूर्ण झालेले असतात. त्यांना प्रथम स्तर, द्वितीय स्तर आणि तृतीय स्तर असेच संबोधले जाते.

inquiry committee set up to investigate rto scam
परिवहन विभागातील घोटाळ्याच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन
free medical facility to employees on election duty
नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा

*  प्रथम स्तर : हा सर्वात उच्चस्तर असून याला इंटरनेट व्यवस्थेचा कणा मानले जाते. बहुसंख्य देशांचा प्रदेश किंवा एका देशातून दुसऱ्या देशास समुद्रमार्गे केबल्स टाकून इंटरनेटने जोडले गेले आहे ते याच कंपन्यांमुळे. यामुळेच आपण आपल्या देशाबाहेरसुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधू शकतो. भारतात ‘टाटा कम्युनिकेशन्स’ आणि ‘रिलायन्स जिओ’ हे प्रथम स्तर सेवा पुरवठादार आहेत. त्यांच्या मालकीच्या सबमरीन म्हणजे समुद्राखालून जाणाऱ्या केबल्स आहेत.

*  द्वितीय स्तर : हा मधला स्तर समजला जातो ज्याद्वारे मुख्यत्वे देशांतर्गत इंटरनेट सेवा समाविष्ट असते. प्रथम स्तर पुरवठादारांकडून काही ठरावीक ठिकाणांपर्यंत के बल पोहोचवण्यात येतात. या ठिकाणांना लँडिंग पॉइंट म्हणतात. असे पॉइंट भारतात मुंबई, चेन्नई, कोचीन, त्रिवेंद्रम, तुतिकोरिन, चेन्नई येथे आहेत. तिथून पुढे केबल्सद्वारे देशांतर्गत भागांत इंटरनेट पसरवण्याचे काम केले जाते. भारतात या द्वितीय स्तर पुरवठादारांमध्ये एअरटेल, बीएसएनएल, व्होडाफोन—आयडिया यांचा समावेश आहे.

*    तृतीय स्तर : हा शेवटचा स्तर असून यात स्थानिक पातळीवरील सेवा पुरवठादारांचा समावेश होतो. आपल्या घरात ज्यांच्याद्वारे इंटरनेट येते ते सामान्यपणे तृतीय स्तर सेवा पुरवठादार असतात. त्यांच्याद्वारेच एखाद्या शहरांतर्गत किंवा विभागअंतर्गत इंटरनेट सेवा पुरवली जाते. तृतीय स्तर पुरवठादार द्वितीय स्तर पुरवठादारांच्या सेवेचा विस्तार करतात.

तृतीय स्तर सेवा पुरवठादार आपल्याला इंटरनेट सुविधा पुरवताना विविध प्रकारच्या जोडण्यांचे पर्याय देतात. आपापल्या गरजेनुसार जोडणी घेणे केव्हाही फायदेशीर ठरते. भारतात उपलब्ध असणारे इंटरनेट जोडण्यांचे प्रकार आता बघू या.

*   डायल-अप जोडणी : ही तशी पूर्वीपासून प्रचलित असणारी आणि आता जवळजवळ कालबा झालेली इंटरनेट जोडणी आहे. यामध्ये लॅण्डलाइन फोनच्या जोडणीमधूनच इंटरनेट सेवा पुरवली जाते. एका विशिष्ट डायलिंग नंबरद्वारे ही सेवा वापरावी लागते. ज्याप्रमाणे आपण दूरध्वनी क्रमांक डायल करून दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क साधतो तशाच प्रकारे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरद्वारे एक क्रमांक डायल होतो (ज्याला युजर आयडी म्हणता येईल) आणि इंटरनेट सुरू होते. आपण डायलिंग केलेली सर्व उपकरणे बंद केली की आपले इंटरनेट देखील बंद होते तसेच आपण एकावेळी एकतर टेलिफोन नाहीतर इंटरनेट यापैकी एकाच सेवेचा लाभ घेऊ शकतो. यामुळेच आता हा प्रकार कालबा झाला आहे.

*    डिजिटल सबस्क्रायबर लाइन : भारतात या प्रकारात ‘एडीएसएल’ या उपप्रकाराची जोडणी दिली जाते. असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाइन या प्रकारात डायल अपप्रमाणेच फोन लाइनमधून इंटरनेट सेवा पुरवली जाते आणि पुढे ती इंटरनेट आणि लॅण्डलाइन फोन अशा दोघांत विभागली जाते. याचे विभाजन करणाऱ्या उपकरणाला ‘स्प्लिटर’ म्हणतात. बहुतांश बीएसएनएल किंवा एमटीएनएल लॅण्डलाइनधारकांकडे अशा प्रकारचा इंटरनेट सेट-अप  असतो. स्प्लिटरमुळे एकाच वेळी टेलिफोन आणि इंटरनेट या दोन्ही सेवा आपल्याला वापरता येऊ शकतात. या जोडणीचा फायदा असा की आपल्या इमारतीचा किंवा विभागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला तरी इंटरनेट सेवा टेलिफोनप्रमाणे सुरू राहते. याची केबल फोनच्या लाइनमधूनच घरापर्यंत आल्यामुळे केबल तुटून इंटरनेट सेवा खंडित होण्याची शक्यता कमी असते. या जोडणीच्या मर्यादा अशा आहेत की यामध्ये डाऊनलोडिंगसाठीचा वेग जास्त असतो तर अपलोडिंगसाठीचा वेग तुलनेने कमी असतो, त्यामुळे ज्यांचा इंटरनेटचा वापर हा डेटा अपलोड करण्यासाठी जास्त असेल त्यांच्यासाठी ही जोडणी फायदेशीर ठरत नाही. या जोडणीसाठी आपल्याला मॉडेम आणि पुढे राऊटरची तांत्रिकदृष्टय़ा गरज भासते. हल्ली ‘एडीएसएल राऊटर’ असे एकच उपकरण आपल्याला बाजारात मिळते ज्याद्वारे आपण दोन्ही कामे करू शकतो.

*   केबल इंटरनेट : ही सेवा टेलिव्हिजन केबल पुरवणाऱ्या किंवा स्थानिक इंटरनेट सेवा देणाऱ्यांमार्फत दिली जाते. ज्याप्रमाणे केबल टेलिव्हिजनची केबल घरात टेलिव्हिजनला जोडली जाते तशाच प्रकारची केबल इंटरनेटसाठी पुरवली जाते जिला को-अ‍ॅक्सिअल केबल म्हणतात. याचा वेग तुलनेने डायल-अप किंवा एडीएसएलपेक्षा जास्त असतो तसेच डाऊनलोडिंग आणि अपलोडिंगसाठी जवळपास सारखाच वेग मिळतो. परंतु या प्रकारात बहुतेक वेळा आपल्याला शेअर्ड बॅण्डविड्थ मिळते. सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच रस्त्यावरून अनेक वाहने उलटसुलट जात असतील तर वेग कमी होऊन वाहतूक कोंडी होते त्याचप्रमाणे या प्रकारात एकाच उपकरणातून कनेक्शन विभागले गेलेले असते त्यामुळे आपल्याला एका ठोस किंवा सारख्या वेगात इंटरनेट मिळत नाही तर आपल्या विभागातील त्याच केबल ऑपरेटरकडून सेवा घेणाऱ्या वापकरकर्त्यांच्या वापरावर ते अवलंबून असते. या जोडणीसाठी मॉडेमची गरज भासत नाही तर राऊटर पुरेसा असतो.

*   फायबर टू द होम : भारतात सध्या याचा सर्वाधिक बोलबाला आहे. रिलायन्स जिओकडून या सेवेची घोषणा केल्यावर हे अधिकच चर्चेत आलं आहे. ही सध्या सर्वात वेगवान जोडणी मानली जाते. यामध्ये वापरली जाणारी केबल ही कॉपर (तांबे) केबल नसून त्यात काचेसारख्या पारदर्शक पदार्थाचा वापर केला जातो आणि हेच अधिक वेग मिळण्याचे कारण आहे. आपण पाठवलेला सिग्नल हा प्रकाशाच्या वेगात परावर्तित केला जातो. यामध्ये आपल्याला डाऊनलोडिंग आणि अपलोडिंगसाठी समान आणि अधिक वेग मिळतो.

*   जिपॉन कनेक्शन : सध्या फायबर कनेक्शनबरोबरच ही सुविधा पाहायला मिळते. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला फायबर केबलद्वारे २० किलोमीटपर्यंतच्या अंतरासाठी जोडणी करता येते, जी इतर प्रकारांत ५-६ किलोमीटपर्यंतच असू शकते. दुसरा फायदा असा की फायबर कनेक्शन असल्यामुळे याचा वेग आणि बॅण्डविड्थसुद्धा आपल्याला एक समान आणि जास्त मिळते. जिपॉनद्वारे वापरकर्त्यांला व्हिडीओ स्ट्रीमिंग, डेटा (इंटरनेटचा सर्वसाधारण वापर) आणि इंटरनेट व्हॉइस कॉल यासाठी एकसमान वेग आणि सेवा मिळू शकते.

*   मोबाइल इंटरनेट नेटवर्क : या प्रकारात मोबाइल हॅण्डसेटमधील सिमकार्ड इंटरनेट सेवा पुरवते. हा भारतातील वायरलेस इंटरनेटमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार आहे. याचा फायदा म्हणजे मोबाइलप्रमाणे इंटरनेट आपल्या खिशात राहते, परंतु मोबाइल टॉवरच्या सिग्नलमधील अडथळ्यांमुळे याचा वेग कमी- जास्त होऊ शकतो.

इंटरनेट सुविधा घेताना कनेक्शनच्या प्रकाराप्रमाणेच त्यासाठी आवश्यक उपकरणे, प्लान्स आणि त्यावर आधारित वेग लक्षात घेणे गरजेचे आहे.

*  मॉडेम आणि राऊटर : मॉडेमचा वापर हा इलेक्ट्रिकल सिग्नलला डिजिटल (बायनरी) सिग्नलमध्ये रूपांतरित करण्यासाठी होतो तर राऊटरचा उपयोग हा डिजिटल सिग्नल विभागून तो एकापेक्षा अधिक उपकरणापर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. फोनलाइनमधून येणाऱ्या कनेक्शनसाठी  मॉडेम आणि राऊटर अशी दोन उपकरणे असणारं डिव्हाइस आवश्यक आहे तर इतर प्रकारात फक्त राऊटर पुरेसा ठरतो.

*   इंटरनेटचा वेग : आपल्याला जो उपलब्ब्ध प्लानचा तक्ता दाखवण्यात येतो त्यात वेग नमूद केलेला असतो. तो एमबीपीएस किं वा एमबी/एस स्वरूपात असतो. येथील स्मॉल बी लक्षात घेण्याजोगा आहे. येथील बी हा बिट्स या अर्थी आहे. म्हणजे  एमबीपीएसचा अर्थ आहे मेगा बिट्स प्रति सेकंद. आपण बहुत करून तो मेगा बाइट पर सेकंद असा गृहीत धरलेला असतो. आता आपल्या मोबाइल, संगणक, लॅपटॉपवर किंवा टोरंट क्लाएंट अथवा ब्राऊजरवर (क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर इत्यादी) जो डाऊनलोडिंग अथवा अपलोडिंगचा वेग दिसतो तो एमबीपीएस  किं वा के बीपीएस अथवा एमबी/एस किं वा के बी/एस असा दिसतो. जिथे कॅपिटल बी आहे तिथे त्याचा अर्थ मेगा बाइट प्रति सेकंद किंवा किलोबाइट प्रति सेकंद असा असतो. याचाच अर्थ तुम्हाला एक मेगा बाइटची फाइल एका सेकंदात डाऊनलोड करून हवी असेल तर तुम्हाला सुमारे आठ मेगा बिट्स प्रति सेकंदाचा प्लान किंवा तेवढा वेग मिळणं आवश्यक आहे!

टिप्स :

१. आपल्याला डाऊनलोडिंग आणि अपलोडिंगची किती गरज आहे हे ओळखून प्लान निवडावा.

२. शक्यतो आपण राहत असलेल्या विभागात ज्या सव्‍‌र्हिस प्रोव्हायडरचे जास्त वापरकर्ते आहेत अशीच सेवा निवडावी.

३. चांगल्या दर्जाच्या आणि प्रमाणित राऊटर किंवा मॉडेमचा उपयोग करावा. बनावट उपकरणांमुळे सुविधेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

४. राऊटर शक्यतो पुरेशा उंच आणि मोकळ्या जागी ठेवावा, घरातील भिंती आणि कानाकोपऱ्यांमुळेदेखील सिग्नलवर परिणाम होतो. त्यासाठी सिग्नलची क्षमता तपासण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहेत त्याचा वापर करून योग्य जागी राऊटर ठेवावा.

५. सर्वसाधारण चौकोनी कुटुंबासाठी फक्त एक राऊटर पुरेसा ठरतो, पण वापरकर्त्यांची संख्या जास्त असेल किंवा घर मोठे असेल तर डय़ुअल अँटेना किंवा त्याहून अधिक क्षमतेचा राऊटर किंवा एक्सटेंडरसारखी उपकरणे वापरून आपण समान वेगात इंटरनेट वापरू शकतो.

 response.lokprabha@expressindia.com