26 October 2020

News Flash

त्याची जगात कुठेही ‘शाखा’ नाही…

एखादं रोजच्या बघण्यामधलं झाड १८४ वर्षे जुनं व या जातीतलं जगातलं एकमेव झाड असल्याचं तुम्हाला कुणी सांगितलं तर?

(एक्सप्रेस फोटो)

– सुनिता कुलकर्णी
आपल्यासारखा दुसरा पीस जगात नसतो तेव्हा एकटेपणाचं दुख बाळगायचं की आपण एकमेवाद्वितीय असल्याचा माज करायचा ?  अर्थात हा प्रश्न माणसांना पडतो. झाडांना नाही. तुम्ही त्यांची दखल घ्या किंवा घेऊ नका, ती असतात. पक्ष्यांची घरटी अंगाखांद्यावर बाळगत, दमल्याभागल्या पांस्थथांना सावली देत, फळाफुलांनी बहरत ती उभी असतात. स्क्वेअर फुटाच्या आकडेमोडीत आणि इंच न इंच वापरायच्या शहरी स्पर्धेत झाडांना तसं स्थान नसतंच. पण आपल्या आसपासचं एखादं रोजच्या बघण्यामधलं झाड १८४ वर्षे जुनं आहे आणि या जातीतलं हे जगातलं एकमेव झाड आहे असं तुम्हाला कुणी सांगितलं तर?

तुम्हाला त्या झाडाला जाऊन घट्ट मिठी मारावीशी वाटेल की नाही? आणि त्याने पाहिलेल्या या सगळ्या उन्हापावसाळ्यांनी त्याच्या अंगाखांद्यावर आलेल्या सुरकुत्यांवरून हात फिरवत चार शहाणपणाच्या गोष्टी त्याच्याकडून ऐकाव्याशा वाटतील की नाही?

सॅपोटासी कुळामधल्या या झाडाचं नाव आहे ‘मधुका डिप्लोस्टेमॉन’. केरळमधील जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डन अॅण्ड रीसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांना हे झाड सापडलं ते कोलम जिल्ह्यात पारावूर इथल्या कुनाइल अयिरवल्ली शिवमंदिरासमोर. म्हणजे हे झाड तिथं आधीपासून म्हणजे तब्बल १८३ वर्षांपासून होतंच, पण ते तिथं आहे याचा शोध संशोधकांना आता लागला. ही वर्षे इतक्या नेमकेपणाने सांगण्याचं कारण म्हणजे त्याआधी १८३५ मध्ये रॉबर्ट वेट या इस्ट इंडिया कंपनीच्या बोटॅनिस्टने या झाडाची नोंद केली होती.

इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर या आंतरराष्ट्रीय संस्थेने या झाडाचा अती दुर्मिळ वनस्पतींच्या यादीत समावेश केला आहे. डॉ. प्रकाशकुमार हे जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डन अॅण्ड रीसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधन चमूचे प्रमुख आहेत. ते सांगतात की या कुळातलं, या जातीचं हे जगात एकमेव झाड आहे. याआधी या जातीची दोनतीन झाडं भारतात होती, पण ती नष्ट झाली. १८३५ मध्ये रॉबर्ट वेटने या चार फुट उंचीच्या झाडाची नोंद केल्यानंतर आता १८४ वर्षांनी त्याची पुन्हा दखल घेतली गेली आहे. हे झाड स्थानिक असल्यामुळे त्याच्या जगात खरोखरच कुठेही ‘शाखा’ नाहीत. आता ते जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

इंडियन असोसिएशन ऑफ अँजिओस्पर्म टॅक्सोनॉमी या संस्थेच्या जर्नलमध्ये यासंबंधीचा लेख प्रसिद्ध झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या शाजू फिलीप यांनी हे वृत्त दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2020 11:32 am

Web Title: it has no branch anywhere in the world msr 87
Next Stories
1 मिर्झापूर…नवा सिझन, नवे वाद
2 सावळा गं रंग तुझा…
3 नव्या कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर किसान रेल रुळांवर
Just Now!
X