टेनिस क्षेत्रात ग्रँड स्लॅमप्रमाणेच डेव्हिस चषक स्पर्धानाही प्रतिष्ठा आहे. दुर्दैवाने भारतीय टेनिस संघटक आणि खेळाडू या स्पर्धाना अपेक्षित प्राधान्य देत नाहीत. त्यासाठी खेळाडू, प्रशिक्षक व संघटक यांच्यामध्ये दूरदृष्टीची आवश्यकता आहे.

स्पेनविरुद्ध नुकतीच डेव्हिस चषकाची लढत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या लढतीमध्ये स्पेनच्या खेळाडूंचे निर्विवाद वर्चस्व राहणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. हे लक्षात घेऊन भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. टेनिस संघटकांनी सुमीत नागल याच्यासारख्या युवा खेळाडूला संधी दिली. मात्र लिअँडर पेस हा अन्य सहकाऱ्यांना नकोसा असतानाही पुन्हा विस्तवाशी खेळण्याचे धाडस करीत टेनिस संघटकांनी त्याला संधी देत पुन्हा टीका ओढवून घेतली. त्याच्या समावेशामुळे भारतास काही वेगळे यश मिळविता आले नाही.

अपेक्षेप्रमाणे स्पेनने पाचही सामने जिंकून आपला वरचष्मा सिद्ध केला. या लढतीत रॅफेल नदाल, फेलिसिओ लोपेझ, मार्क लोपेझ व डेव्हिड फेरर यांच्या समावेशामुळे  प्रेक्षकांसाठी अव्वल दर्जाचे टेनिस पाहण्याची मेजवानी होती. स्पेनला पुन्हा जागतिक गटात स्थान मिळवायचे असल्यामुळेच नदाल, फेडरर यांना या लढतीत भाग घ्यावा लागला. नदाल याने एकेरीतून माघार घेतल्यामुळे प्रेक्षकांची काहीशी निराशा झाली. तथापि दुहेरीत त्याने भाग घेत आपल्या नजाकतेचा प्रत्यय घडविला. पहिला सेट गमावल्यानंतर फारसे दडपण न घेता सामन्यात विजयश्री कशी खेचून आणायची हे नदाल व मार्क यांनी दाखवून दिले. कोणत्याही प्रकारचे मैदान व वातावरण असले तरी आपल्याला श्रेष्ठ दर्जाचा खेळ करता येतो हेच स्पॅनिश खेळाडूंनी दाखविले. फेरर, फेलिसिओ व मार्क यांनी एकेरीत आपल्या चतुरस्र खेळाची झलक दाखविली. एकेरीत नदालच्या अनुपस्थितीचा लाभ भारतीय खेळाडूंना घेता आला नाही. मात्र रामकुमार, मायनेनी व नागल यांनी दिलेली लढत आपल्याला उज्ज्वल भवितव्य असल्याची चुणूक दाखवून गेली. प्रेक्षकांना या लढतीत स्पेनचा विजय होणार हे माहीत असूनही त्यांनी मोठय़ा संख्येने या लढतींना उपस्थिती लावली व खेळाचा निखळ आनंद लुटला. त्यांनी भारतीय खेळाडूंप्रमाणेच स्पॅनिश खेळाडूंच्या अव्वल खेळास मनापासून दाद दिली व आपल्या खिलाडूवृत्तीचा प्रत्यय घडविला. स्पेनबरोबर घरच्या मैदानावर खेळण्याचे भाग्य आपल्या खेळाडूंना मिळाले ही भारतीय खेळाडूंसाठी मोठी पर्वणीच होती. त्यांच्याकडून त्यांना भावी कारकीर्दीसाठी टेनिसची भरपूर शिकवणी लाभली. त्याचा उपयोग या खेळाडूंनी पुढील कारकीर्दीसाठी केला पाहिजे. अशा संधी फारच दुर्मीळ येत असतात. युवा खेळाडूंनीही या सामन्यांचे व्हिडीओ चित्रण पाहून स्पॅनिश खेळाडू डेव्हिस चषक लढतीत कसा खेळ करतात याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे.

डेव्हिस चषकाच्या सामन्यांचे वेळापत्रक साधारणपणे निश्चित असते. खेळाडूंच्या दुखापती, तंदुरुस्ती व त्यांचे वैयक्तिक कार्यक्रम आदी गोष्टी लक्षात घेऊन डेव्हिस चषकाच्या तयारीचे योग्य रीतीने नियोजन केले पाहिजे. डेव्हिस चषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अनेक वेळा बलाढय़ संघांना आणि ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविणाऱ्या खेळाडूंना पराभूत करण्याची किमया दाखविली आहे. शशी मेनन, प्रेमजितलाल, रामनाथन कृष्णन, आनंद व विजय अमृतराज, रमेश कृष्णन, लिअँडर पेस व महेश भूपती आदी खेळाडूंनी या स्पर्धेत अनेक वेळा ऐतिहासिक विजय मिळविला आहे. काही वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये अव्वल यश मिळविणारे खेळाडू डेव्हिस चषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. अर्थात त्या खेळाडूंवर त्यांच्या देशाची भिस्त असतेच असे नाही. कारण त्यांच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूदेखील डेव्हिस चषक जिंकून देण्याची क्षमता असलेले खेळाडू असतात. अलीकडे काही देश मात्र अव्वल दर्जाच्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्यासाठी आग्रही असतात. आपल्याकडे पहिल्या व दुसऱ्या फळीतील खेळाडूंच्या दर्जात खूपच फरक असतो. जे खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धेत खेळत असतात, त्यांच्यावरच आपल्याला भिस्त ठेवावी लागते. आपल्या देशात जे अन्य खेळांबाबत दिसून येत असते, तेच टेनिसमध्येही दिसून येत असते. आपल्याकडे फक्त पहिल्या फळीतील खेळाडूंवरच लक्ष अधिक केंद्रित केले जात असते. अटलांटा येथे १९९६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये एकेरीत कांस्यपदक मिळविणारा पेस हा चाळिशी ओलांडली तरीही खेळतच आहे. त्याची तंदुरुस्ती, इच्छाशक्ती, खेळावरची निष्ठा, देशप्रेम, मानसिक कणखरपणा आदीबाबत त्याची सर अन्य कोणत्याही भारतीय टेनिसपटूकडे नाही. ग्रँड स्लॅम स्पर्धामधील पुरुष व मिश्रदुहेरीत तो अजूनही विजेतेपदाला गवसणी घालत आहे. त्याच्या खेळातील चतुरस्रपणा, लवचीकता, पदलालित्य, आक्रमकता, आत्मविश्वास हा अन्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायकच असतो. त्याच्याबरोबर पुरुष दुहेरी व मिश्रदुहेरीमध्ये खेळण्यासाठी अन्य परदेशी खेळाडू नेहमीच तयार असतात. मार्टिना िहगिस हिच्यासारखी अव्वल दर्जाची खेळाडूदेखील त्याच्याबरोबर खेळत असते. पेसने हिंगिस व मार्टिना नवरतिलोवा यांच्यासारख्या महान खेळाडूंच्या साथीत ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये मिश्रदुहेरीचे विजेतेपद पटकाविले आहे. पेस व महेश भूपती यांनीदेखील अनेक ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये विजेतेपदावर मोहोर नोंदविली आहे. मात्र अलीकडे भारतीय खेळाडूंनाच पेस याच्यासमवेत खेळण्याचे वावडे आहे. त्यामुळेच की काय, ऑलिम्पिक किंवा डेव्हिस चषक स्पर्धासाठी भारतीय संघ निवडताना वादंग झाले नाही तरच नवल अशी स्थिती दिसून येत असते. असे असले तरी अजूूनही पेस याच्याबाबत अखिल भारतीय टेनिस असोसिएशनकडून पेस यालाच प्राधान्य दिले जात असते. पेस व अन्य भारतीय खेळाडूंमध्ये सुसंवाद नसल्यामुळे अनेक स्पर्धामध्ये भारताला फटका बसला आहे. रिओ येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पेस याच्या साथीत रोहन बोपण्णा याला पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांच्यात सुसंवाद दिसून आला नाही. एवढेच नव्हे तर ते सामना सुरू असताना एकमेकांशी फारसे बोललेदेखील नाहीत. त्यामुळे पहिल्याच फेरीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. असे कटू प्रसंग कसे टाळता येतील याचा विचार भारतीय टेनिस संघटकांनी केला पाहिजे. हाच बोपण्णा मिश्रदुहेरीत सानिया मिर्झा हिच्या साथीत सहभागी झाला होता. त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. स्पेनविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीच्या वेळीही सुरुवातीला पेस व बोपण्णा हीच जोडी दुहेरीत खेळणार होती. मात्र ऑलिम्पिकमधील कटू प्रसंगाची पुनरावृत्ती घरच्या मैदानावर होऊ नये म्हणून ऐनवेळी पेस याच्या साथीत साकेत मायनेनी याला पाचारण करण्यात आले. या जोडीने रॅफेल नदाल व मार्क लोपेझ यांना चिवट लढत दिली. किंबहुना त्यांनी पहिला सेटदेखील जिंकला होता. मात्र नंतर नदाल व मार्क यांच्या आक्रमक खेळापुढे पेस व मायनेनी यांचा बचाव निष्प्रभ ठरला.

स्पेनविरुद्धची लढत सुरुवातीला दिवसाउजेडी घेण्यात येणार होती. मात्र या लढतीस प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून ही लढत विद्युत प्रकाशात घेण्यात आली. भारतीय संघातील अन्य खेळाडू त्याबाबत फारसे राजी नव्हते. तसेच संघाचे न खेळणारे कर्णधार आनंद अमृतराज यांनीदेखील त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तथापि पेस याने आपण विद्युत प्रकाशात खेळण्यास तयार असल्याचे सांगितले. पेस याची नेहमीच अन्य खेळाडूंपेक्षा वेगळी भूमिका असते व हेच अन्य सहकाऱ्यांना खटकत असते. पेस याला संघात स्थान दिल्यामुळे जर संघातील एकोपा नष्ट होणार असेल, खेळाडूंमध्ये सुसंवाद राहणार नसेल तर त्याला किती वर्षे आणखी संधी द्यायची याचा गांभीर्याने संघटकांनी विचार केला पाहिजे. युकी भांब्री, सोमदेव देववर्मन यांच्या तंदुरुस्तीच्या समस्या अलीकडे वाढल्या आहेत. रामकुमार रामनाथन, साकेत मायनेनी, सुमीत नागल यांच्यासारख्या युवा खेळाडूंना परदेशातील स्पर्धा व प्रशिक्षण शिबिरांमध्ये अधिकाधिक संधी कशी मिळेल यावर टेनिस संघटकांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. स्पेन, सर्बिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांच्यासारख्या देशांमध्ये अनेक खेळाडूंचा खजिना असतो. एखादा तंदुरुस्त नसेल तर त्याच्या जागी भक्कम कामगिरी करण्याची क्षमता असलेले खेळाडू तयार असतात.

आनंद अमृतराज यांची डेव्हिस चषक लढतीसाठी न खेळणारे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते स्वत: डेव्हिस चषकाबाबत माहीर आहेत. मात्र युवा खेळाडूंबरोबर चांगला सुसंवाद निर्माण करण्यासाठी मध्यम वयाच्या प्रशिक्षकांना ही संधी देणे उचित ठरेल. युवा खेळाडूंना सहसा बुजुर्ग खेळाडूंचे सल्ले योग्य वाटत नसतात. हे लक्षात घेऊन टेनिस संघटकांनी युवा खेळाडूंच्या पसंतीस योग्य होईल अशाच व्यक्तीकडे जबाबदारी सोपविली पाहिजे. डेव्हिस चषक स्पर्धेत आपल्या देशास गौरवास्पद यश कसे मिळेल याचा विचार केवळ संघटकांनी नव्हे तर पहिल्या व दुसऱ्या फळीतील खेळाडूंनी तसेच त्यांच्या प्रशिक्षकांनीही विचार करण्याची गरज आहे.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com