बांधकाम क्षेत्रातील कुशल कामगारांची कमतरता भरून काढण्यासाठी एल. अ‍ॅण्ड टी. ही कंपनी गेली वीस वर्षे या क्षेत्रातील कौशल्यांचे विनामूल्य प्रशिक्षण देत आहे. तीन महिन्यांच्या या निवासी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन तळच्या स्तरातील अनेक तरुणांनी आपले आयुष्य घडवले आहे.

अनेक कारणांमुळे आपल्याकडे शाळागळतीचं प्रमाण मोठं आहे. किमान दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं तरी खासगी, असंघटित क्षेत्रात त्या शिक्षणाचा रोजगारासाठी काहीच उपयोग होत नाही आणि किमान शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांची फौज तयार होते. आजही कित्येक समाजांमध्ये, तळाच्या स्तरामध्ये पहिल्याच पिढय़ा दहावी-बारावीपर्यंत पोहोचत आहेत. त्यांच्यासाठी तर एवढं शिकून त्यानुसार हाताला काम नसणे ही परिस्थिती निराशेच्या गर्तेत ढकलणारी ठरते. शिक्षणाला कौशल्याची जोड नसल्यामुळे ही मुलं मग मिळेल ते काम करत कशीबशी गुजराण करायला लागतात. हातात कोणतंही कौशल्य नसल्यामुळे दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रात कायमचं अडकतात. अशा मुलांसाठी गेली वीस वर्षे सुरू असलेला एल अ‍ॅण्ड टीच्या (लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो) पनवेलच्या ‘कन्स्ट्रक्शन स्किल्स ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट’चा तीन महिन्यांचा कोर्स ही संघटित रोजगाराच्या क्षेत्रात कौशल्यासहित प्रवेश करण्याची मोठी आणि चांगली संधी आहे.

एल अ‍ॅण्ड टी ही बांधकाम क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी. कंपनीला बांधकाम क्षेत्रात कुशल कामगारांचा सतत तुटवडा भासत असे. ही कमतरता भरून काढण्यासाठी एल अ‍ॅण्ड टीने १९९६ मध्ये बांधकाम क्षेत्रातील कौशल्य शिकवणारा एक कोर्स डिझाईन केला. गेली २० वर्षे हा कोर्स सुरू आहे. आजवर हजारो तरुण मुलं या कोर्सला येऊन शिकून गेली आहेत. हा कोर्स केल्यानंतर ती एल अ‍ॅण्ड टीच्या वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करू शकतात किंवा इतरत्रही काम करायला जाऊ शकतात. तीन महिन्यांचा हा कोर्स करण्यासाठी किमान आठवी पास असणे ही किमान पात्रता गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे आठवी पास झालेला, १८ ते ३५ वयोगटातील कुणीही हा कोर्स करू शकतो. हा कोर्स करू इच्छिणाऱ्या उमेदवाराची उंची किमान १५५ सेंटीमीटर आणि वजन किमान ४५ किलो असणं आणि त्याची या क्षेत्रात आवश्यक आहेत ते कष्ट करायची तयारी असणं अपेक्षित असतं. पनवलेजवळ भोकरपाडा गावात असलेल्या एल अ‍ॅण्ड टीच्या ३३ एकर जागेत या मुलांना बांधकामाशी संबंधित सगळं म्हणजे थियरी आणि प्रक्टिकलचं शिक्षण कंपनीतल्या तज्ज्ञांकडून दिलं जातं. त्यासाठी तिथे तीन महिने राहण्याची- जेवणाखाण्याची व्यवस्थाही केली जाते. दर महिन्याच्या एक ते पाच तारखेदरम्यान पनवेल येथे प्रवेश दिला जातो. हा कोर्स करू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रहिवासाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, आधार कार्ड, मतदार कार्ड याच्या तीन तीन सत्यप्रती आणि चार पासपोर्ट साईज रंगीत फोटो आणायचे असतात. शिवाय तीन महिन्यांसाठी कपडेलत्ते- अंथरुण पांघरुण आणि ८०० रुपये डिपॉझिट एवढंच घेऊन यायचं असतं. त्यातला ५०० रुपयांचा मेस अ‍ॅडव्हान्स कोर्स पूर्ण झाल्यावर परत केला जातो. शिवाय हा कोर्स करताना दरमहा ४५० रुपये विद्यावेतनही दिलं जातं.

कोर्ससाठी भरती झाल्यावर त्याला या कोर्सचा विद्यार्थी म्हणून निळ्या रंगाचा विशिष्ट गणवेश, बांधकामाच्या क्षेत्रात वापरलं जातं ते हेल्मेट, सेफ्टी शूज, बांधकाम करताना लागतात त्या हत्यारांचं किट दिलं जातं. कंपनीच्या आवारात ७५ खोल्यांच्या सुसज्ज हॉस्टेलवर एका वेळी २७५ विद्यार्थ्यांची राहण्या-जेवण्याची सोय केली जाते. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी एक निवड चाचणी परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेत उमेदवाराला मराठी तसंच इंग्रजीतून किमान अक्षर आणि आकडय़ांची ओळख आहे ना याची चाचणी घेतली जाते.

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्याला बांधकामाशी संबंधित गवंडीकाम, बांधकामाशी संबंधित सुतारकाम, बांधकामाशी संबंधित बार बेंडिंग आणि स्टील काम तसंच टायलिंग येणं अपेक्षित असतं. या चारही गोष्टी या उमेदवारांना तीन महिन्यांत शिकवल्या जातात. त्यात ८० टक्के भर प्रॅक्टिकलवर असतो आणि २० टक्के थिअरी शिकवली जाते. आधी ई-लर्निगच्या माध्यमातून थिअरी आणि मग पॅ्रक्टिकल या पद्धतीने गेल्यामुळे आधीच या कामांची कल्पना आलेली असते. कोर्समध्ये बांधकामाशी संबंधित गवंडीकाम, सुतारकाम, बार बेंडिंग आणि टायलिंग या प्रत्येक कामाच्या शिक्षणाची मोडय़ुल्स तयार केली गेली आहेत. म्हणजे गवंडीकाम असेल तर ते कसं असायला हवं त्याचे निकष ठरवले गेले आहेत. यामध्ये फक्त वेल्डिंगच्या कामाच्या शिक्षणाच्या बाबतीत आयटीआयचा वेल्डिंगचा कोर्स केलेला असणं किंवा त्या कामाचा किमान अनुभव असणं गृहीत धरलेलं असतं. प्रत्येक मुलाला त्याने एकदा करून दाखवलेलं काम मोडून पुन्हा असं पाच वेळा करून दाखवावं लागतं. त्यातून अपेक्षित कौशल्यापर्यंत तो पोहोचतो. ते आवश्यक कौशल्य आलं की मगच पुढचं कौशल्य शिकवायला सुरुवात केली जाते. एखाद्याला तेच काम पाच वेळा मोडून करून दाखवूनही अपेक्षित कौशल्यापर्यंत पोहोचता आलं नाही तर तिथे पोहोचेपर्यंत त्याला ते पुन:पुन्हा करून दाखवावं लागतं. आजकाल मोठमोठे टॉवर उभारले जात असल्यामुळे उंचावर जाऊन काम कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं. बांधकामाच्या क्षेत्रात येणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाशी, बदलांशी विद्यार्थ्यांचा परिचय करून दिला जातो. हे सगळं शिक्षण घेत असताना या विद्यार्थ्यांना रोज सुरक्षितपणे काम करण्याची शपथ दिली जाते. हे सगळं प्रशिक्षण सुरू असताना त्यांच्यासाठी फावल्या वेळात इनडोअर, आऊटडोअर गेम्स आयोजित केलेले असतात. आगीचं सेफ्टीडील, एड्स अवेअरनेस प्रोग्रॅम त्यांच्यासाठी आयोजित केले जातात. महत्त्वाचं म्हणजे आयटीआयशी समकक्ष असणाऱ्या या कोर्समध्ये पास किंवा नापास करण्याची पद्धत नाही. एखादी नवीन गोष्ट शिकवली की सतत परीक्षा घेऊन ती पक्की करून घेतली जाते. एक मोडय़ुल आल्यावर मगच पुढचं मोडय़ुल शिकवलं जातं. अशा रीतीने या कोर्समध्ये २२ मोडय़ुल्स शिकवली जातात.

एकदा हा कोर्स पूर्ण झाला की त्यांना त्याचं प्रमाणपत्र दिलं जातं. वर्कमेन रेफरल कार्ड मिळतं. एलएनटीच्या साइट्वर काम करायची इच्छा असेल त्या सगळ्यांना वेगवेगळ्या साइट्वर पाठवलं जातं. वर्कमेन रेफरल कार्डामुळे ते जिथे जातील तिथल्या पोर्टलमधून त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवता येतं. एलएनटीचा असा अनुभव आहे की, ८० टक्के उमेदवार एलएनटीतच काम करायला प्राधान्य देतात. पण जे २० टक्के लोक इतरत्र काम करायला जातात, तेही प्रोजेक्ट मॅनेजरच्या पदापर्यंत पोहोचले आहेत. काही जणांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. काही जण गल्फ कंट्रीजमध्ये गेले आहेत. बीएआरसीत, मिलिटरी इंजिनीयरिंगमध्ये बांधकाम मजुरांची मोठय़ा प्रमाणावर गरज असते. तिथे कित्येकांना कामं मिळाली आहेत.

आजचा जमाना कौशल्याला महत्त्व देणारा आहे. तळच्या थरातल्या मुलांकडे दहावी-बारावी होऊनसुद्धा कोणतीही कौशल्यं नसतील तर त्यांना निव्वळ मेहनत करावी लागते आणि त्या तुलनेत उत्पन्न फारसं काहीच मिळत नाही. अशांसाठी हा कौशल्याधारित कोर्स म्हणजे चांगलं जीवन जगण्याची एक चांगली संधी आहे.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com